Thursday, December 8, 2011

ती गाणी, ते दिवस !

गाणी, ही जवळपास प्रत्येकालाच आवडतात. गाण्याला भाषेचंही बंधन नाही. सुश्राव्य वाटणारी गाणी अर्थ माहित नसली तरी ती गुणगुणली जातात. सध्या गाजत असलेले 'कोलावरी डी' हे गाणंही असंच लोकप्रिय झालं आहे. हैदराबादमध्ये नोकरीला असताना अनेक तेलुगु चित्रपट पाहिले. वर्षम, मल्लेश्वरी, घर्षणा या चित्रपटातील गाणी आजही माझ्या ओठांवर आहेत.
मात्र माझ्या हृदयाला स्पर्श करणारी गाणी होती ती आशिकी चित्रपटातली. 1990 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी मी आठवीत होतो. संभाजीनगरमध्ये रॉक्सी चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तेव्हा त्या चित्रपटाचे सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सात शो लावण्यात आले होते. तरूणाईनं हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. आता मी आठवीत म्हटल्यावर काही तरूण नव्हतो. पण तारूण्याच्या जवळपास जायला सुरूवात झाली होती. आशिकी प्रमाणे सात शो लागण्याचं भाग्य नंतर साजन आणि माहेरची साडीच्या वाट्याला आलं होतं.
प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी आशिकी चित्रपटातली गाणी जणू काही प्रेमग्रंथच होता. अर्थात हा चित्रपट तेव्हा मी थिएटरमध्ये पाहिला नव्हता. अर्थात कोणत्या वडलांना मुलांनी अशी थेरं पाहणं आवडलं असतं ? पण तेव्हा दूरदर्शनवरील चित्रहारमध्ये दर बुधवारी आशिकीतलं एकतरी गाणं लागायचंच. त्यावेळी केबल आणि खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या नव्हत्या. त्यामुळं बुधवारी चित्रहारमध्ये दाखवलेली गाणी
दुस-या दिवशी सगळ्यांच्या ओठांवर असायची. शाळेत जाताना बसपासून ते वर्गामध्येही तीच गाणी म्हटली जायची.
आशिकीतल्या गाण्यांमध्ये काय नव्हतं ? प्रेमात पडलेला, प्रेमभंग झालेला, प्रेमात पडू पाहणारा या सर्वांना भावतील अशी गाणी त्यात होती. 'जाने जिगर जानेमन' हे गाणं तर तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होतं. याच गाण्याबरोबर चित्रपटातली इतर गाणी आजही हृदयाच्या गुलाबी कप्प्यात कस्तूरी प्रमाणं जपून ठेवली आहेत. जसं पहिलं प्रेम विसरता येत नाही. तशीच या चित्रपटातली गाणी मनातून जात नाहीत. प्रेमभंग झालेल्यांसाठी 'मैं दूनिया भूला दूँगा तेरी चाहत में' हे गाणं विशेष होतं. अर्थात माझा कोणताही प्रेमभंग झालेला नव्हता, हे माझ्या विघ्नसंतोषी मित्रांसाठी आधीच नमूद करून ठेवत आहे. नाही तरी पत्रकारांना कशात काही नसताना, काही तरी असल्याचा वास येत असतो, म्हणून खुलासा केलेला बरा. अर्थात याचा काहीही परिणाम होणार नाही, याची मला खात्री आहे. कारण 'ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या...'
चला वरील मुद्दा बाजूला ठेऊन अजून थोडं मागं जाऊ या. आशिकीच्या आदल्या वर्षी प्रदर्शित झालेला रामलखन आणि त्याच्या आधी 1988 मधल्या तेजाबच्या गाण्यांनीही चांगलाच मनाचा ठाव घेतला होता.
तेव्हा तर स्वत:चं नाव सांगता येत नसणा-या मुलांच्या तोंडून माधूरीचं 'एक दो तीन...' हे गाणं हमखास ऐकायला मिळायचं. आशिकी चित्रपटानंतर सडक आणि साजन चित्रपटातल्या गाण्यांनीही मनात चांगलंच घर केलं होतं. दहावीला जाईपर्यंत हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. अर्थात साजन चित्रपट काही थिएटरमध्ये पाहता आला नव्हता. तो चित्रपट गणेशोत्सवाच्या काळात व्हीडीओवर पाहिला होता. अर्थात गणेशोत्सवाच्या काळात व्हीडीओवर चित्रपट पाहण्याची गंमत या पिढीतल्या मुलांना आणि तरूणांना कशी कळणार म्हणा ? याच प्रकारचं वाक्य माझ्या वडलांच्या तोंडी असायचं. ते म्हणतात गणेशोत्सवातल्या मेळ्यांची मजा तुम्हाला काय कळणार ? माझा मुलगा मोठा झाल्यावर गणेशोत्सवातली कोणती मजा सांगेल ? हे त्या गणेशालाच माहित.
मात्र शाळेत असताना सडक चित्रपट मात्र मी थिएटरमध्ये पाहिला होता. शाळेच्या सहलीसाठी वडलांनी खर्चण्यासाठी तब्बल 70 रूपये दिले होते. त्यातले मी फक्त 30 रूपये खर्च केले. मग सहलीवरून आल्यावर मी आणि माझा लहाना भाऊ रवींद्रनं बाल्कनीचं तिकीट काढून संभाजीनगरातल्या अंबा थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला. तेव्हा बाल्कनीचं तिकीटही पंधरा रूपये होतं. मग उरलेल्या दहा रूपयात इंटरव्हलमध्ये वडापाव खाऊनही काही पैसे उरले होते.
शाळेनंतर महाविद्यालयीन जीवन सुरू झालं. तेव्हाही अनेक चित्रपट पाहण्यात आले. त्यातली अनेक गाणी ऐकली, गुणगुणली. मात्र आजही मनावरून आशिकी, सडक आणि साजन मधली गाणी पुसली जात नाहीत. त्यातही आशिकीतल्या गाण्यांचा मनावर मोठा पगडा कायम राहिला आहे. प्रेमात पडलेल्यांचा तो प्रेमग्रंथ आजही माझ्या मनात तसाच जपून ठेवला आहे. त्या प्रेमग्रंथातली पानं कधीही निवांत क्षणी चाळली जातात. त्या आठवणीत मन हरपून जातं. अर्थात याचा कुणाला पत्ताही लागत नाही. आपल्या आठवणी या आपल्या साठीच असल्यावर त्याचा कुणाला पत्ता लागण्याची गरजच काय ?

5 comments:

 1. hey Snatosh,
  Mai teri sare blogs padhne ki koshish karta hou, kuch nahe padh pata because of work or any another reason, bt sach main accha lagta hai teri blogs padhna, purani yadi taja ho he jati hai also naye bate mate bhe padhne milte hai.........
  Good going , Keep it up...

  ReplyDelete
 2. आपला लेख छान वाटला माझ्य्झ्झ कॉलेज च्या जीवनात वावरून आल्या सारखे वाटले आपला लेख वाचल्या नंतर, खूप छान....

  ReplyDelete
 3. Pritakm आणि N.D.Patil तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. जुन्या आठवणी मनात ठेवून भविष्याकडे वाटचाल सुरू ठेवायची.

  ReplyDelete
 4. आशिकीची गाणी मी ही न चुकता छायागीतमध्ये पाहत असे. आशिकी प्रमाणेच बाजीगर, मोहरा, दिलवाले, रंगीलामधील गाणी लागली मला माझे शाळेचे दिवस आठवतात.

  ReplyDelete
 5. चला, वेगळे काही तरी लिहिलेस याचा आनंद झाला आणि हलका-फुलका विषय छान मांडला आहेस, वाचतांना पण मजा आली. छान, असेच लिहीत जा. तुझ्या ब्लॉगचा मी नियमित वाचक आहे

  ReplyDelete