Saturday, January 21, 2012

शिवसेनाप्रमुख आणि मी !

26 सप्टेंबर 1993. स्थळ - मराठवाडा सांस्कृतिक मैदान, संभाजीनगर. याच ठिकाणी माझी शिवसेनाप्रमुखांबरोबर पहिली भेट झाली. अर्थात मैदानातल्या लाखो शिवसैनिकांमधला मी एक. विराट सभेला मार्गदर्शन करताना पहिल्यांदाच बाळासाहेबांना मी पहात होतो. प्रसंग होता 'सामना'च्या मराठवाडा आवृत्तीच्या प्रकाशनाचा. याच काळात शिवसेनेची मराठवाड्यात घोडदौड सुरू होती. अर्थात तेव्हाच्या शेठजींच्या वृत्तपत्रात शिवसेनेच्या विरोधातल्याच बातम्या छापल्या जात होत्या. त्यामुळे शिवसेनेला विरोधकांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी आणि पक्षाची दिशा शिवसैनिकांपर्यंत पोचवण्यासाठी वृत्तपत्राची गरज होती. ती मराठवाडा आवृत्तीच्या निमीत्तानं पूर्ण झाली. त्याचवर्षी मुंबईत दंगली आणि बॉम्बस्फोट झाले होते. या सर्व घटनांचा आढावा घेत शिवसेनाप्रमुखांची तोफ धडधडत होती.
याच मैदानावर 1988 मध्ये शिवसेनाप्रमुखांनी मराठवाड्यातली पहिली सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी मुसलमानी अत्याचाराचं निशाण असलेल्या औरंगाबाद या शहराचं संभाजीनगर असं नामांतर केलं होतं. हा तडाखा होता तिथल्या धर्मांध हिरव्या सापांना. शिवसेनाप्रमुखांच्या तडाख्यानं धर्मांध हिरव्या सापांची मराठवाड्यातली वळवळ थांबली. दंगली घडवणा-या धर्मांध हिरव्या सापांना ठेचत पूर्ण मराठवाड्यात शिवसेनेचं भगवं वादळ केव्हा पोहोचलं, हे कळालं देखील नाही.
माझं बालपण हे वादळ जवळून पहात होतं, आणि मी ही त्या वादळाचा एक भाग झालो तो कायमचाच. बंजारा कॉलनीतल्या एलनारे सरांची ट्यूशन संपवून येताना क्रांती चौकातल्या पेपर स्टॉलवरून मी सामनाचा अंक विकत घ्यायचो. माझ्या हिरो रेंजर सायकलच्या कॅरिअरला सामनाचा अंक लावून घराच्या दिशेने प्रयाण व्हायचं.
1994 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर आमच्या भागात आम्ही शिवसेनेची स्थापना केली. तेव्हा मी 17 वर्षांचा होतो. बहुतेक त्यानंतरच शिवसेनेचं नाशिकला भव्य अधिवेशन झालं. अधिवेशनाच्या आधी मराठवाड्यात शिवसैनिक नोंदणी सुरू होती. दहा रूपये भरून मी शिवसैनिक म्हणून नोंदणी केली. शिवसैनिक म्हणून नोंदणी झाल्याचं ओळखपत्र दिलं गेलं. ते पत्र आजही मी प्राणपणानं जपून ठेवलं आहे. हेच कार्ड घेऊन नाशिकच्या अधिवेशनाला हजेरी लावली. अधिवेशनात देवीला घातलेलं 'दार उघड बये दार उघड' हे साकडं शिवसेनेला सत्तेकडे नेणारं ठरलं. या अधिवेशनासाठी नक्षत्रवाडीतून मी आणि बाबासाहेब राऊत हे दोघे गेलो होतो. नाशकातल्या गोल्फ क्लब मैदानावर विराट जाहीर सभेनं अधिवेशनाची सांगता झाली होती. संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच शहरातले सारे रस्ते राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांच्या भगव्या वादळानं ओसंडून वाहत होते. शिवसेनाप्रमुखांनी दिलेला 'विधानसभेवर भगवा फडकवण्याचा' आदेश प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवसैनिकांचं वादळ त्या मैदानावरून राज्यात वेगानं पसरलं.
1995 मध्ये शिवसेनाप्रमुखांचं वादळ राज्यभर फिरत होतं. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेत पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. दुस-याच दिवशी शिवसेनाप्रमुखांची पैठणला सभा होती. संभाजीनगर - पैठण मार्गावर असलेल्या नक्षत्रवाडीतल्या आमच्या शाखेनं शिवसेनाप्रमुखांचं स्वागत केलं होतं. एका मिनीटासाठी का होईना, शिवसेनाप्रमुखांना जवळून पाहण्याची संधी आमच्या सर्व शिवसैनिकांना मिळाली होती.
मणी - मसल्स अशा सर्वच अर्थाने प्रबळ असलेल्या काँग्रेसला आव्हान देणं सोपं नव्हतं. मात्र शिवसेनाप्रमुखांचे धगधगते विचार आणि 'जय भवानी जय शिवाजी' ही घोषणा. बस्स इतक्याच भांडवलावर विधानसभेवर भगवं निशाण फडकवण्यात शिवसेना आणि शिवसैनिकांना यश आलं.
1995 मध्येच संभाजीनगर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी पुन्हा एकदा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. औरंगाबादचे संभाजीनगर तर करणारच पण खुल्ताबाद, दौलताबाद यांचंही नामांतर करू. ज्या शहरांच्या नावात 'बाद' आहे ते बाद करू अशी खास ठाकरी शैलीही त्यांनी दाखवून दिली.
बहुधा याचवर्षी मी मुंबईत होणा-या दसरा मेळाव्यालाही हजेरी लावली होती. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या काही दिवस आधी शिवतीर्थावर पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या स्वाध्याय परिवाराचा भव्य कार्यक्रम झाला होता. त्याचा शिवसेनाप्रमुखांनी आदरानं उल्लेख केला. 'हिंदू धर्मीय संघटित होतात ही आनंदाची बाब आहे. मात्र पांडूरंग शास्त्री आणि माझा मार्ग वेगळा आहे. ते पांडूरंग शास्त्री आहेत, तर मी दांडूरंग शास्त्री आहे', असं सांगत शिवसेनाप्रमुखांनी सभा जिंकली.
1996 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख आणि माझी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर भेट झाली. अर्थात लाखोंच्या गर्दीतला मी एक. यावेळी शिवसेनाप्रमुखांनी युतीच्या मंत्रिमंडळातून काढण्यात आलेल्या अशोक पाटील डोणगावकरांवर तोफ डागली. अपक्ष आमदार असलेल्या डोणगावकरांना राज्यमंत्री करण्यात आलं होतं. मात्र सरकारवर टीका करण्याची त्यांची खुमखुमी होती. परिणामी त्यांची गच्छंती झाली. 'डोणगावकरांना पंचपक्वानांचं ताट वाढलं होतं. मात्र त्यांना मूत कालवून खाण्याची सवय', अशा खास ठाकरी शैलीत त्यांनी समाचार घेतला.
त्यानंतर 1999 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या सभांमधून पुन्हा शिवसेनाप्रमुखांची भेट झाली. मात्र 2003 मध्ये नोकरीच्या निमीत्तानं हैद्राबादला गेल्यानं जाहीर सभेतून शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकता आले नाही. मात्र 2007 मध्ये मुंबईत आलो आणि शिवतीर्थावरची विठ्ठलाच्या भेटीसाठीची वारी चुकली नाही.
अशा या माझ्या दैवताला वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा. सत्तेसाठी सतराशेसाठ असताना कोट्यवधी शिवसैनिकांना ऊर्जा देणारं हे दैवत जगभरातल्या हिंदूंना कायमच दिशा देत आलं आहे.

खमंग फोडणी - शिवसेनाप्रमुखांनी दिलेला 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाचा मंत्र आज किती गरजेचा आहे, हे लक्षात येऊ लागलं आहे. कारण राजकीय क्षेत्र असो वा सरकारी किंवा खाजगी कार्यालयं तिथले अनेक कर्मचारी फक्त कार्यालयीन राजकारणात मश्गूल असतात. नेत्यांनाही समाजकारणाऐवजी राजकारणातच जास्त रस आहे. कोणत्याही कार्यालयात फक्त दहाच टक्के लोक काम करत असतात, असं तिथल्याच वरिष्ठ अधिका-यांचं मत असतं. असाच प्रकार राजकारणातही दिसून येतो. परिणामी टीम लिडर निर्माण न होता गटाचं हित बघणारे ग्रूप लिडर, सर्व क्षेत्रात निर्माण होत आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा मंत्र जर सगळ्यांनीच आचरणात आणला तर गलिच्छ राजकारण थांबून देशाची भरभराट व्हायला वेळ लागणार नाही.

1 comment:

  1. गारु तुमच्या सारखे कट्टर बाळासाहेब भक्त हीच शिवसेनेची खरी शक्ती आहे. शिवसेना प्रमुखांना उदंड आयुष्य लाभावे हीच प्रार्थना .

    ReplyDelete