Sunday, February 27, 2011

टग्यांचे वारसदार, बलात्कारी आमदार

राजकारणात राहून खरं बोलणं हा गुण फार कमी राजकारण्यांमध्ये आहे. कारण खरं बोलणा-यांना राजकारण करताच येत नाही. मात्र राजकारण करतानाही खरं बोलण्याची किमया अजित'दादा' पवार यांनी साधली आहे. मीडिया बॅन केला पाहिजे, पत्रकारांना दंडुके मारले पाहिजे अशी परखड भूमिका त्यांनी नांदेडमध्ये घेऊन पत्रकारांना पोलिसांच्या हातून 'प्रसाद' दिला होता. सहकार क्षेत्रातल्या त्यांच्या बगलबच्च्यांची भलावण करण्यासाठी तिथे टगेच लागतात, असं सांगताना 'मी ही एक टग्या' असल्याची कबूली दिली होती. तर शनीशिंगणापूरमध्ये हॉस्पिटलचे उदघाटन करण्याच्या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांना 'गांडूळा'ची उपमा दिली होती. तर अशी ही टगेगिरी त्यांनी जाहीरपणे सांगितली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. त्याच्याच जोरावर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. छगन भुजबळांना कोणतीही 'टाळी' न वाजवता, त्यांच्या पदावरून पायउतार करण्याची किमया त्यांनी साधली आहे. याला दुस-या भाषेत टगेगिरीही म्हणायला खुद्द अजित पवारांचीही हरकत असणार नाही. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मितीच सहकारातले टगे, सोसायट्यांचे टगे, वतनदार टगे, गावागावातले गुंड आणि टगे यांना पोसण्यासाठी झालेली आहे. या सर्व टग्यांचे पोशिंदे आणि नेते अजित पवार आहेत, असं म्हणनं धाडसाचं होणार नाही.
आता दुसरी गंमत बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीचे स्वागतच होईल, यात शंका नाही. मात्र पवार साहेब महिलांना आरक्षण देण्याबरोबरच तुमच्या पक्षाच्या आमदारांकडून संरक्षण मिळेल का ? या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करा.
कारण वीस वर्षाच्या तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही या वाघाला ( वाघ कसला बलात्कारी लांडगाच ) पक्षातून निलंबित केलं आहे. पण ऐवढी कारवाई पुरेशी आहे का ? या वाघाला पक्षातून बडतर्फ करून, आमदारकीचा राजीनामा का घेतला नाही ? त्याचे निलंबन रद्द करून तुरूंगातून सुटल्यावर त्याला केलेल्या 'कृत्या'बद्दल महाराष्ट्र भूषण किंवा टग्या भूषण असा एखादा पुरस्कार देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढा-यांचा ( टग्यांचा ) विचार आहे का ?
संभाजीनगर जिल्ह्यातले कन्नडेच मनसे आमदार मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी ताफ्यात घुसले होते. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या बाचाबाचीनंतर हर्षवर्धन जाधवांना मारहाण करण्यात आली. ती मारहाण इतकी क्रूर होती की, त्यांचा पार्श्वभाग काळा-निळा पडला होता. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा गुन्हा त्यांनी केला होता. मात्र ते विरोधी पक्षाचे आमदार होते. आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने तर आचारसंहिता सुरू असताना सरकारी विश्रामगृहात तरूणीवर बलात्कार केलाय. नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानं हतबल तरूणीवर बलात्कार करण्याचे कृत्य त्यांनी केले. कायदा - सुव्यवस्थेचा आव आणणारे गृहमंत्री आर.आर.पाटील, हा वाघ अजून त्याच्या पायावर चालतोच कसा ? याचे उत्तर द्या. हर्षवर्धन जाधव सारखा याला का फोडत नाहीत ? या वाघाने केलेल्या कृत्याबद्दल त्याच्या पार्श्वभागाला हार लावून 12 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर सत्कार करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा विचार आहे का ?
वाळूमाफिया, दूधमाफिया, सहकारमाफिया,कारखानदारमाफिया,भेसळमाफिया,तेलमाफिया या सर्वांचे पोशिंदे असलेल्या या टग्यांच्या वारसदारांकडून राज्यात काहीही भ्रष्टाचारमुक्त राहिलेले नाही. आता तर त्यांनी इज्जतीवर हात घालायलाच सुरूवात केली आहे. 'टग्यांचा खरा वारसदार कोण ?' अशीच स्पर्धा राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात यापेक्षाही भयानक घटना घडू शकतील. देवा आता तूच वाचव रे बाबा. देवा तू तरी आहेस ना जागेवर ? का तूझीही या टग्यांनी भेसळ केली ?

3 comments:

  1. आपल्याला अँकरिंग मिळावे म्हणून संपादकांची सातत्याने लाल करणा-या आपल्या सारख्या भगवी लेखणी हातात घेतलेल्या लेखकाकडून अशाच लेखनाची अपेक्षा आहे.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. आधीच्या COMMENT मध्ये थोडी चूक होती म्हणून ती REMOVED केली.
    हातातली लेखणी आणि तिची शाई भगवी नाही, मात्र विचारसरणी निश्चीतच भगवी आहे. ही लेखणी काही कुणाला विकली गेलेली नाही. कोणत्याही कोट्यातून काही मिळवलेलं नाही. मनातल्या भावना नि:स्वार्थीपणे लिहून काढतो इतकंच. आणि आतापासून नव्हे तर 1988 म्हणजे माझ्या वयाच्या अकराव्या वर्षापासून विचारसरणी भगवीच राहिली आहे. आणि तेव्हा कुठलंही मराठी चॅनेल अस्तित्वात नव्हतं. त्यामुळे अमित यांनी वापरलेला लाल करण्याचा शब्द म्हणजे ते संतापाने काळे-निळे झाले आहेत, हे दाखवतं. आणि राहिला अँकरींगचा भाग त्यासाठी दोन स्क्रीन टेस्ट दिल्या आहेत. तीसरी लवकरच देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काहीही अपेक्षा ठेवल्या किंवा नाही ठेवल्या तरी काही फरक पडत नाही.

    ReplyDelete