Thursday, October 14, 2010

काँग्रेसच्या झेंडा मार्चला, पैशाचा दांडा

काँग्रेसच्या ग्राम ते सेवाग्राम अभियानाचा समारोप होण्याच्या एक दिवस आधीच, त्यांच्या भ्रष्ट आचरणाचा समारोप झाला. या अभियानाच्या समारोपासाठी कशाप्रकारे पैसे गोळा केले जातात, हे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून सगळ्या जगाने पाहिले. आता यात काँग्रेसचा तरी दोष कसा म्हणायचा ? त्यांच्या नेत्याकडे कोणते असे विचार आहेत ? की जे ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी करावी. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना नाईलाजाने पैसा जमा करावा लागतो. तो झोपडपट्ट्यांध्ये वाटून गर्दी जमवावी लागते. बरं हे काय आता होतंय, अशातलाही भाग नाही. काँग्रेसला गर्दी जमवण्यासाठी अनेक वर्षांपासून पैशांचा आधार घ्यावाच लागतो.
देव जरी प्रसन्न करायचा असला तरी त्याची भक्ती करावी लागते. त्याला नवस बोलावा लागतो. त्याला काही तरी अर्पण करावं लागते. जसं देवांचं तसंच नेत्यांचंही असतं. आता नेते म्हणजेच देव अशी परिस्थिती आहे. आणि आता तर साक्षात सोनिया माताच थेट १० जनपथवरून वर्ध्यात अवतरणार म्हटल्यावर काँग्रेसी मंत्री भक्तांनी पैशांचा भोग चढवला नाही तरच नवल. पैसा, पैशातून गर्दी, गर्दीतून मातेच्या दरबारात मानाचे स्थान मिळते. मग त्यासाठी प्रत्यके मंत्र्याने 'पर हेड' दहा लाख रूपये कॉन्ट्रीब्युशन देण्याचे ठरले. मंत्र्यांना तरी पैसा द्यायला काय जड जाणार म्हणा. शेवटी 'हपापाचा माल गपापा' म्हण्तात तो असा.
असो. आता माता सोनियाच येणार म्हटल्यावर या काँग्रेसी नेत्यांच्या अंगात आलं नाही तरच नवल. मातेसमोर गर्दी जमा करण्यासाठी पैशाच्या चिंतेत असणा-या माणिकराव आणि चतुर्वेदी या नेत्यांना समोर कॅमेरा सुरू आहे, याचेही भान राहिले नसावे. इतके हे सोनिया मातेचे भक्त मातेसाठी गर्दी जमवण्याच्या चर्चेत गुंग झाले होते. 'अब सीएम लाईन पे आया' असे शब्दही या संभाषणात म्हटले गेले. पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांविषयी कशी भाषा वापरतात, हे ही नागरिकांना दिसून आले. मुख्यमंत्र्यांना दानत नाही, असं त्यांचेच प्रदेशाध्यक्ष स्पष्टपणे बोलतात.
आता यात या नेत्यांचा काही दोष आहे, असंही म्हणता येत नाही. कारण काँग्रेसच्या नेत्यांच्या सभांना जर गर्दी जमवायची असेल तर, पैशाशिवाय पर्याय नाही. कारण पैशाशिवाय काँग्रेसवाल्यांची भाषणं कुणी ऐकत नाही. कारण त्यांच्याकडे विचार नसतो. त्यामुळे भाड्याने आणि वाहनांमध्ये भरून तिथं डोकी आणावी लागतात. काँग्रेसचा व्यवहारच असा रोखीचा आहे. त्यांना पैशाशिवाय मत मिळत नाही. पैशाशिवाय सभेला गर्दी होत नाही. त्यामुळे कारभार करतानाही ते रोखीशिवाय काम करत नाही. अशा पैशाच्या गोष्टींवर काँग्रेसचा कारभार सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपासून ते हायकमांडपर्यंत फक्त पैसाच बोलतो. या पैश्यासाठी नेते भ्रष्टाचार करून देश नागवा करत आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराने देशातला 'आम आदमी' पुरता हैरान झालाय. पण याची काँग्रेसच्या नेत्यांना काळजी नाही. कारण ते सगळं काही विकत घेऊ शकतात, हवा तितका पैसा पुरवू शकतात.
मात्र आपणही जास्त टेन्शन घेऊ नये. या सगळ्या प्रकाराकडे सकारात्मक दृष्टीकोण ठेऊन बघणं गरजेचे आहे. कारण 'मोठ्या कार्यक्रमासाठी खर्च होतो', असं आता मुख्यमंत्र्यांनीच म्हटलं आहे. पण इथं खर्च मोठ्या कार्यक्रमासाठी नव्हे तर 'मोठी गर्दी' जमवण्यासाठी होत आहे. आपण पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीकोण ठेवून बघू यात. काँग्रेस पक्ष सुरूवातीपासूनच ट्रक - टेम्पोमध्ये माणसं भरून आणून गर्दी जमवतो. या वेळेस त्यांनी दोन कोटी रूपये खर्चून दोन हजार बसेस भाड्याने घेतल्या आहेत. ट्रकपेक्षा 'आम आदमी'साठी बस कधीही चांगलीच नाही का ? पुढिल दहा वर्षानंतर कदाचित हेलिकॉप्टरचा वापर करून गर्दी केली जाईल. चला, काही का असेना पण प्रगती तर होत आहे ना. गर्दी जमवण्यासाठीची वाहनं बदलत चालली आहेत. मात्र त्यात भरून आणल्या जात असलेल्या 'आम आदमी'ची गरिबी काही हटत नाही. कारण त्याची गरिबी हटली तर काँग्रेस देशातून हटेल. त्यामुळे जय हो सोनिया माता की. सेवाग्राम अभियान की. वसुली करनेवाले काँग्रेस के नेताओंकी. जय हो.

1 comment:

  1. नेहमीच छान व मुद्देसुद लिहीता.

    ReplyDelete