Tuesday, August 3, 2010

जरा लांबलं बरं का

माझ्या ब्लॉगच्या अनियमीत वाचनात नियमीतपणा असणा-या वाचकांना यावेळी जरा थांबावंच लागलं. कारण जसा वाचकांच्या अनियमीत वाचनात नियमीतपणा असू शकतो. तसा तो लेखकाच्या अनियमीत लिखाणात नियमीतपणा असू शकतो. व्वा लेखाच्या सुरूवातीलाच चांगला पंच बसला नाही का ? आता कुणाचं उत्तर काही का असेना. पण आपण सकारात्मक विचारसरणी कशाला सोडायची ? आता विचार काही केला तरी वस्तूस्थिती काही बदलणार नाही. त्यामुळे यावेळी ब्लॉग मध्ये खंड पडला आणि जरा लांबलं हे कबूल केलेलं बरं.
मागील महिनाभरात अनेक विषय होते, ज्यावर लिहणं गरजेचं होतं. बेळगाव प्रश्न, एफएम वाल्यांचा मराठी द्वेष, महागाई, काश्मीर, परप्रांतीय असे ते विषय होते. बरं यात नवं असं काय होतं ? कारण हे प्रश्न तर पूर्वीपासूनच आहेत. फक्त ते नव्याने कधी उपस्थित होतात ? याचीच ती का उत्सुकता असते. पण आपण लिहण्यात एक मजा असते. सगळेच लिहतात. ( एक जनरल वाक्य. ) तसं मी ही लिहतो. ज्या व्यवसायात मी आहे, त्या व्यवसायात लिखाण करण्याची संधी तशी कमीच मिळते. अर्थात नोकरी, संसार सांभाळून लिहणं म्हणजे दिव्यच. अर्थात यावर कुणी मित्र असंही म्हणेल की, आम्ही नियमीत लिहतो. मग काय आम्हाला संसार नाही का ? असा प्रश्न जर कुणी उपस्थित केला तर तो मुळीच चुकीचा नाही. पण नोकरी, संसार सांभाळून हे वाक्य वापरण्यात आलंय ते सरळमार्गी संसारी व्यक्तीसाठी. ( जोक )
पण काही का असेना यावेळी जरा लांबलंच. कारण कधी नव्हे तो आजारीही पडलो. चांगला मलेरिया झाला. कॉलेजमध्ये असताना लव्हेरिया झाला नाही. पण मुंबईत मच्छरांनी माझ्या निष्कलंक शरीराला मलेरियाने कलंकित केलं. त्यामुळे सात दिवस घरात विश्रांती घ्यावी लागली. ( आहे या पगारात फार्म हाऊस विकत घेणे शक्य नाही. त्यामुळे घरातच विश्रांती ) आता मी आजारी पडलो, याचा पत्नी आणि साडे तीन वर्षाचे चिरंजीव यांना आनंदच झाला. पत्नीने केलेली सेवा आणि चिरंजीवांनी मांडलेला उच्छाद यामुळे 'कभी खुशी कभी गम' अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र पत्नीला आजारी नव-याची दया आली. तिच्या सेवेने मला सात दिवसातच ठणठणीत झाल्यासारखं वाटलं. म्हणून पुन्हा कार्यालयात गेलो. आणि तीन दिवसात पुन्हा आजारी पडलो.
मग पुन्हा खुशी - गम. अर्थात आजारी पडणं वाईटच. आजारपण काढून कार्यालयात ( ऑफीसमध्ये ) गेल्यावर सर्व सहका-यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. हात भर आंतर राखून असणारेही जवळ आले. म्हणजे चौकशी करून गेले. आजारपण काढलेल्या जीवाला जरा बरं वाटलं. तशातच घराचंही काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रं गोळा करणं, विविध गोष्टींची पूर्तता करणं हे ही ओघानंच आलं. याचाही लिखाणावर परिणाम झालाच.तर अशा अनेक कारणांमुळे यावेळी ब्लॉग लिहणं जरा लांबलं. पण आता मी आलोय. अर्थात कुठे गेलोच नव्हतो. पण हे वाक्य असंच वापरावं लागतं. पुन्हा लिहायला सुरूवात केलीय. तेव्हा असेच आपला नियमीत अनियमीतपणा जपत भेटत राहू. मी सवडीने लिहीन, तुम्हीही सवडीने वाचा. अर्थात आवड असेल तर सवड निघतेच. व्वा लेखाच्या शेवटीही चांगलाच पंच बसला नाही का ? पुन्हा सकारात्मक विचारसरणी.

1 comment:

 1. धनंजय जोग
  बंगलोर
  (०९८८६६९६८६२०)

  माझ्या मते "उत्स्फूर्त लिहिणारे" मग ते लेखक असोत,कवी असोत,समीक्षक असोत किंवा हो,हो,अगदी ब्लॉगरायटर ही असोत अशी मंडळी आपल्याच तंद्रीत,बिनधास्तपणे,समरसून लिहीत असतात, यांना कलंदर म्हणूयात. तर अशा या कलंदर लेखणीतूनच दर्जेदार लिखाण उपजते.यांना साहित्यिक कृतींचा रतीब घालायचा नसतो वा झारा घेऊन बुंदी पाडल्याप्रमाणे कविता किंवा कथाही पाडायच्या नसतात.यांना मागणी तसा पुरवठा असा दंडक मान्य नसतो म्हणूनच अशा कलंदर साहित्यिकांच्या कृती सरस ठरतात. वर्षातून एकदोनच चित्रपटज्याचे निघतात अशा आमीरखानच्या झकास चित्रपटांच्या जातकुळीच्या या साहित्यनिर्मिती असतात.साहजिकच वाचकांना ही मेजवानी वाटते.तेव्हा आजारपणामुळे लिहू शकला नाहीत याबद्दल चुटपुट लागू देऊ नये किंवा खंत करू नये.
  बाकी आपण दाखवलेला प्रांजळपणा भावला.आपणास शुभेच्छा !

  ReplyDelete