Monday, June 14, 2010

आता कुठे गेला 'राज'सुता तूझा धर्म ?

विधानपरिषद निवडणूक म्हणजे आता तन, मन लावून नव्हे तर धन लावून लढण्याचा प्रकार झाली आहे. या आधीही अपक्षांना मॅनेज करून, इतर पक्षातल्या नाराजांना गोंजारून अनेकांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. मात्र यावेळची निवडणूक ही हटके ठरली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेना - भाजप युती आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात समर्थ पर्याय असल्याचा दावा करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले होते. युती आणि काँग्रेस कसे नालायक आहेत, असं सांगत त्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली होती. नवनिर्माण तर काही झाले नाही. मात्र पहिल्याच फटक्यात मनसेचे तेरा आमदार निवडून आले. तेरातल्या चौघांनी भर सभागृहात अबू आझमीला झापडवले. मग मनसेच्या या चार आमदारांना निलंबनाची कायदेशीर चपराक लगावण्यात आली. तेरामधून चार वजा झाले आणि 'नऊ'निर्माण मात्र प्रत्यक्षात साकार झालं.
विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार निवडून आले हे सत्य आहे. मात्र या तेरा आमदारांमुळे शिवसेना भाजप युतीचे तीनतेरा वाजले, हेही तितकंच सत्य आहे. आणि यातूनच मनसेला काँग्रेसची फूस तर नाही ना ? अशी चर्चा सुरू झाली. शिवसेना - भाजप युतीची अभेद्य मराठी वोटबँक काँग्रेसच्या बाटग्यांना फोडता येत नव्हती. मात्र मनसेसारख्या घरभेद्यांमुळे मराठी माणसांच्या मतांमध्ये फूट पाडण्यात त्यांना यश आलं. शिवसेना - भाजपला मनसेमुळे झालेल्या मतविभागणीमुळे अनेक जागा गमवाव्या लागल्या. परिणामी या 'राज'कृपेमुळे अशोक चव्हाणांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी प्राणप्रतिष्ठापणा झाली. काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. मात्र त्याच काँग्रेसने मनसेचे चार आमदार निलंबीत केले. आणि त्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी मनसेला नाक घासत शरण आणलं. ज्या विधानसभा निवडणुकीत मनसेने काँग्रेसला लक्ष्य केले होते. पुन्हा त्यांच्याच दारी निलंबन रद्द करण्यासाठी मनसेला जावं लागलं. काँग्रेसने पुरेपूर किंमत वसूल केली. शेवटी काँग्रेस हा शेठजींचाच पक्ष. टक्केवारीची सवय असलेल्या धनिक काँग्रेजींनी मनसेची मते फुकटात पदरात पाडून घेतली.
राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्यासाठी त्यांना कुणाच्या मताची गरजही नाही. आमदारांचे निलंबन रद्द करण्यासाठी त्यांना काँग्रेसला पाठिंबा द्यावाही लागला असेल. मात्र यातून हे स्पष्ट झालंय की, त्यांच्या स्वार्थासाठी ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीच्या कळपातही जाऊ शकतात. मनसे म्हणजे मराठी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी काँग्रेसने निर्माण केलेला 'राज'मार्ग आहे, हे आता सगळ्यांनाच पटू लागलं आहे. मनसेने विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्यानंतर आता त्यांनीच जनतेच्या काय भावना आहेत ? हे जाणून घ्यावं.

खमंग फोडणी - मनसेचा शिवसेना विरोध आता थांबायला हवा. कारण यातून नुकसान होतंय ते फक्त मराठी माणसांच. मनसेचा शिवसेना द्वेष काँग्रेसच्या पथ्यावर पडतोय, ही साधी बाब त्यांना कळत नसेल का ? मात्र 'नवरा मेला तरी चालेल, पण सवत रंडकी झाली पाहीजे' ही मनसेची स्वार्थी विचारसरणी मराठी माणसाच्या मुळावर आणि काँग्रसच्या पथ्यावर पडतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाढदिवसानिमीत्त मुंबई महापालिकेच्या आकाराचा केक कापला. काँग्रेसही महापालिका कापण्यासाठी टपलेली आहेच. आणि मनसेची ही कृती महापालिकेचा हा केक काँग्रेसच्या तोंडात पडावा यासाठी प्रयत्न करणारी अशीच आहे. आता जनतेसमोर मनसे आणि मुंबई महापालिकेचा केकही आला आहे. कुणाच्या हातात सुरी आहे, तेही दिसलं आहे. त्यामुळे या ढोंग्यांचे पितळ उघडे पडले आहे.

1 comment:

  1. एवढं बेधडक लिहायला जिगर लागतो....पण सांभाळा...लालबाग परळमध्ये रोज यावं लागतं.

    ReplyDelete