Thursday, April 22, 2010

पैशांसाठी झटेल तोच पवारांना 'पटेल'

आयपीएलची फायनल आता अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातली मॅच पाहण्यासाठी क्रिकेट रसिक आतुर झाले आहेत. मात्र या मॅचेसपेक्षाही थरारक अशा लढती मैदानाबाहेर सुरू आहेत. शशी थरूर यांची विकेट केव्हाच गेली आहे. त्यामुळे आता दुसरी विकेट कुणाची जाणार याची चर्चाही आता सुरू झाली आहे. दुसरी विकेट कुणाची जाणार याची चर्चा सुरू व्हावी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आयपीएलशी आमचा संबंध नाही, असं सांगायला सुरूवात करावी याचा अर्थ सुज्ञांना केव्हाच कळला. राष्ट्रवादीची ही भूमिका म्हणजे 'आम्ही नाही त्यातले आणि कडी लावा...' अशीच आहे.
खरं तर आयपीएलच्या विरोधात इतकी आदळआपट करण्याची मुळात गरजच नाही. कारण आयपीएलमुळे देशातल्या राजकारण्यांचा ब्लॅक मनी बिनबोभाट व्हाईट होतोय. पाणीटंचाईची धग कुणाला जाणवत नाही. अनेक दु:खांवरचं उत्तर म्हणजे आयपीएल म्हणता येईल. शेतक-यांच्या आत्महत्येचा मुद्दाही आता केव्हाच मागे पडलाय. केंद्रीय कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांनी शेतक-यांच्या आत्महत्येचा मुद्दा, या माध्यमातून निकाली काढला आहे. कारण शेतकरी नावाची काही चीज या देशात आहे, याचाच आता सगळ्यांना विसर पडला आहे. आयपीएलसाठी पैसा लावणे, आणि पैसा कमावणे हाच आता राजकारण्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यांच्या बरोबरीने माफियाही आलेच.
विदर्भात आतापर्यंत हजारो शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मात्र शरद पवार त्यांचे अश्रू पुसण्यासाठी तिथं गेले नाहीत. मात्र आयपीएलसाठी त्यांनी छातीचा कोट केला. ललित मोदी यांचीही जीवापाड पाठराखण केली. मात्र हे प्रकरण अंगलट येणार याची जाणीव झाल्यानंतर नेहमीप्रमाणे हात झटकले. आता त्यांच्या पक्षाचे नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांची कन्या पूर्णा पटेल हिची चौकशी करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर पूर्णा पटेल हिन प्रफुल्ल पटेल यांच्या सचिवांकडे एक ई-मेलही पाठवला होता. पूर्णा पटेल आयपीएलसाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहे . तिनेच पटेल यांच्या सचिव चंपा भारद्वाजकडे मेल पाठवला होता . हाच मेल भारद्वाज यांनी १९ मार्च रोजी तत्कालिन परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरुर यांना फॉरवर्ड केला होता. या मेलमध्ये आयपीएलच्या दोन नव्या टीमसाठी होणा- या लिलावात कोणत्या कंपन्या सहभागी होणार आहेत आणि साधारण किती मोठ्या बोली लागणार अशी माहिती होती. पटेल यांची सचिव त्यांच्या परवानगीशिवाय एवढी हिंमत करणं शक्य नाही.
आता सुप्रिया सुळे यांनी पूर्णा पटेल या निर्दोष असल्याचं पक्क राष्ट्रवादी प्रमाणपत्र दिलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रफुल्ल पटेल राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एवढी तत्परता शेत-यांविषयी किंवा सामान्य जनतेविषयी कधी दाखवल्याचं आठवत नाही. मात्र आता प्रश्न सामान्यांशी नव्हे तर पैशाशी निगडीत आहे. आणि हाच पैसा राष्ट्रवादी काँग्रेसला हवा आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या त्या भागातले सरंजामदार, बडे नेते, गुंड यांच्या पाठिंब्यानेच सुरू आहे. आणि या सर्वांना पोसण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. तो पैसा कुणाला 'पटेल' अथवा न 'पटेल' मात्र तो अशाच नेत्यांच्या मार्फत उभारावा लागतो. कोटीच्या कोटी उड्डाणे यशस्वी करायची असतील तर त्याला पर्याय नाही. पटेल यांनी एअर इंडियाचा 'महाराजा' भिकेला लावण्याची वेळ आणली आहे. मात्र पक्षासाठी हवी असणारी मनी पॉवरही तेच उभारू शकतात. 'जो जो करील मनोरंजन मुलांचे, जडेल प्रभुशी नाते तयांचे' याच पार्श्वभूमीवर 'जो जो जोडेल पैसा पक्षासाठी, जडेल त्यांच्याशा नाते राष्ट्रवादीचे' अशी सध्या स्थिती आहे.

खमंग फोडणी - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधला हनीमून कधीच संपला आहे. मुळात त्यांच्यात तसं नातं कधी नव्हतंच. होतो तो फक्त सत्तेचा व्यवहार. आणि या व्यवहारातूनच दोन्ही पक्षांमध्ये आता गँगवॉर सुरू झालंय. काँग्रेसच्या शशी थरूर यांची विकेट गेली आहे. आता काँग्रेस गँगही राष्ट्रवादीच्या एखाद्या नेत्याचा गेम केल्याशिवाय आता शांत बसणार नाही. आता कुणाला 'पटेल' अथवा न 'पटेल' मात्र जो पर्यंत एखाद्याचा गेम होणार नाही तोपर्यंत काँग्रेसचे नेते 'प्रफुल्ली'त होणार नाहीत.

4 comments:

  1. आपले हे मौलिक विचार दै. पुढारीच्या वाचकांची पत्रे या सदरासाठी पाठवा. जरूर छापले जाईल.....

    ReplyDelete
  2. murkh samarthak ani karykartyapeksha aaplyasarkhya samanjas nagrikanchi deshala garaj aahe. pawar ani patelansarkhya netyanmage jya karyakrtyanche samrthan aani takad aahe ashya karykartyanche, aaple nete kay laykiche aahet hey samjnyachi akkal nahi hyacha khed vatatoy.
    lekh chaan lihilay matra vastusthiti chhan nahiy.keep it up

    ReplyDelete
  3. शिर्षक अगदी 100 टक्के पटले.ललित मोदींकडून आर्थिक फायदा मिळत असणार म्हणूनच त्यांच्याकडे इतका काळ दुर्लक्ष करण्यात आले. आता मोदी डोईजड होऊ लागताच त्यांचा पत्ता कापण्यात आला. प्रफुल्लभाई तुंम्ही आता सुपात आहात... सवाधान !

    ReplyDelete