Sunday, April 19, 2009

40 टक्क्यांची लोकशाही आणि कँडल क्रांतीवीर

15 व्या लोकसभेसाठी राज्यात सरासरी 50 टक्के मतदान झालं तर मुंबईत ते अवघं 40 टक्क्याच्या जवळपास फिरकलं. राजकीय पक्ष मोठ्या त्वेषाने प्रचार सभा घेत होते. मात्र सामान्य मतदार त्यात सहभागी होताना दिसले नाही. अर्थात निवडणुकीचा उत्साह दिसला तो वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये. शेवटी निवडणुकीच्या बातम्या दिल्या नाही तर, मग त्यांना तरी जाहिराती कुठून मिळणार नाही का ?

बरं सामान्य नागरिकांनी निवडणुकीत, मतदानात सहभागी व्हावं यासाठी असे प्रचाराचे मुद्दे तरी या निवडणुकीत होते कुठे? राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 60 वर्षापासून प्रत्येक निवडणुकीत सारखीच आश्वासने देण्यात येत आहेत. पाणी,वीज,रस्ते या मुलभूत सुविधा सुद्धा जर नागरिकांना उपलब्ध करून देता येत नसतील तर हे राजकारणी कोणत्या थोबाडाने मते मागायला येतात, हे ही तपासायला हवे.

मुंबईवर हल्ला झाल्यानंतर येथिल इंग्रजाळलेला वर्ग रस्त्यावर आला. ( सामान्य नागरिक नेहमीच रस्त्यावर असल्याने त्याला याचे नवल वाटले नाही.) त्यांनी ताज समोर मेणबत्त्या लावल्या. कँडल लाईट डिनर घेणारे, कँडल घेवून एकत्रित आले. कोणतेही आवाहन न करता मोठी गर्दी जमली. तमाम वाहिन्यांना जणू ही नवी ही क्रांती असल्याचाच तेव्हा भास झाला. विशेषत: इंग्रजी वृत्तवाहिन्या यात आघाडीवर होत्या. वृत्तपत्रांनीही यावर रकानेच्या रकाने भरले. सरकार आणि राजकारण्यांवर हे कँडल क्रांतीवीर तुटून पडले. चॅनेल्सच्या बुम आणि कॅमे-यासमोर त्यांनी फाड फाड इंग्रजीमध्ये राजकारण्यांना तासून काढले. याचाच परिणाम म्हणून की काय विलासराव देशमुख आणि आर.आर.पाटील यांनी खुर्ची सोडावी लागली. कँडल क्रांतीवीरांचा हा रोष निवडणुकीत व्यक्त होणार अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र तसं घडलं नाही. या श्रीमंत वर्गाच्या चोचले पुरवण्याच्या ठिकाणावर दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याने हे चिडले होते. ताज सर्वसामान्यांसाठी दुरून बघण्याचे ठिकाण असले तरी श्रीमंतांच्या ऐश्वर्याचा दर्प तेथे असतो. आणि त्यावरच दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने त्यांच्या या श्रीमंत अस्मितेला धक्का पोचल्याने हे कँडल क्रांतीवीर रस्त्यावर आले होते.
जागतिक आणि पुढारलेले शहर म्हणवल्या जाणा-या या शहराची मतदानातील ही अनास्था लोकशाहीसाठी गंभीर बाब ठरणारी आहे. नागरिकांची ही अनास्था राजकीय नेते आणि पक्षांच्या पथ्यावर पडणारी आहे. जनताच जर जाब विचारणार नसेल तर राजकारण्यांवर मतदारांचा अंकुश राहणार नाही. मतदानासाठी बाहेर पडला तो हातावर पोट असणारा कनिष्ठ मध्यमवर्ग. श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गाने सलग चार दिवसाची सुट्टी साधत थंड हवेच्या ठिकाणी जाणे पसंत केले. उन्हाच्या धारेत उभा राहिला तो 40 टक्के सामान्य मतदार. हाच मतदार या लोकशाहीचा कणा आहे. या 40 टक्के मतदारांमुळे लोकशाहीचा डोलारा उभा आहे. मात्र सरकारी धोरणे ठरवताना त्याचा कितपत विचार केला जातो, हे ही आता तपासायला हवे. देशातील ही लोकशाही टिकवायची असेल तर कँडल क्रांतीवीरांना बाजूला सारून सामान्य मतदाराच्याच हिताचा आता विचार व्हायला हवा.

2 comments:

  1. प्रिय मित्रा, याखेपेसच्या निवडणूकीत मुद्दे नव्हते असे नाही फक्त ते मांडले गेले नाहीत. औद्योगिक क्षेत्रात जसे मंदीचे वातावरण सध्या जाणवते तसेच सध्या देशातील सामाजीक क्षेत्रातही जाणवत आहे. प्रचंड औदासिन्य आणि बेफिकीरी यातून आलेले फस्ट्रेशन यामुळे आमची पिढी प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहे. आशेचा एक किरण कुठेही दिसत नाही असे म्हणणा-यांना सणसणीत चपराक आहे ती म्हणजे तरूण मुलामुलींनी या निवडणूकीत आपणहून घेतलेला सहभाग... अर्थात अनेक गोष्टींप्रमाणे ही देखील कुठेच हायलाईट न झालेली बाब. मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राजकारण्यांना घाम फोडणारा मोर्चा काढणारे मुंबईकर निवडणूकीत भाग घेत नाहीत हा लोकशाहीचा पराभव नाही तर निर्लज्जपणाचा कळस आहे. ( जनतेला शिव्या घालणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे तरीही हा प्रमाद बाळगून मी तो शब्द लिहित आहे ) आपला झाडू आपल्याच हातात आहे. तो आपण वापरत नाही मग तुमच्या आसपास घाण आहे असे तुम्हाला ओरडण्याचा नैतिक अधिकार नाही. मला तरी असे वाटते की, अगोदर आपण आपला आरसा पहावा.....

    ReplyDelete
  2. मतदानाचे प्रकार वाढवण्याकरता आता पोस्टल,इंटनेटचे ऑप्शन उपलब्ध करुन देऊन यायला आहेत.असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांना मतदान करण्याची इछ्छा असूनही मतदान करु शकत नाहीत त्यांना यातून संधी मिळेल.तसेच मतदानाचा अधिकारही कप्लसरी करायला हवा.

    ReplyDelete