Saturday, November 16, 2013

अविस्मरणीय शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन !
17 नोव्हेंबर 2013 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पहिला स्मृतिदिन. 17 नोव्हेंबर 2012 रोजी धगधगणारा हा सूर्य अस्ताला गेला. शिवसेनाप्रमुखांचं निधन होऊन एक वर्ष झालं. मात्र या एक वर्षात एक क्षणही असा गेला नाही, जेव्हा शिवसेनाप्रमुखांची आठवण झाली नाही. मागील वर्षी दिवाळी झाल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी जगाचा निरोप घेतला. हिंदूंवर प्रेम करणा-या आमच्या हिंदूहृदयसम्राटांनी, त्यांच्या लाडक्या हिंदूंनी दिवाळी साजरी केल्यानंतरच जगाचा निरोप घेतला. हिंदूंचा सर्वात मोठा सण दिवाळी. जगाचा निरोप घेतानाही आपल्या हिंदूंना दिवाळी साजरी करता यावी, असा विचार शिवसेनाप्रमुखांनी केला नव्हता ना, असंही अनेकदा वाटून जातं.
जो नेता आपल्या हिंदूंवर इतकं प्रेम करतो, त्या शिवसेनाप्रमुखांवर जगभरातले हिंदू जीव ओवाळून टाकतात. 18 नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्कारासाठी लाखो शिवसैनिक देशाच्या कानाकोप-यातून मुंबईत आले होते. अथांग अरबी सागर खुजा वाटावा असा शिवसैनिकांचा सागर 18 नोव्हेंबरला मुंबईच्या रस्त्या-रस्त्यांवर दिसत होता. लाखांच्या सभांना जादूई भाषणानं जिंकणारे शिवसेनाप्रमुख, ज्वलंत हिंदूत्वाचा अंगार फुलवणारे शिवसेनाप्रमुख, खचलेल्या हिंदूंना बळ देणारे शिवसेनाप्रमुख, मराठी अस्मिता जागवणारे शिवसेनाप्रमुख, सामनातल्या अग्रलेखांनी शब्दाचे अंगार फुलवणारे शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रांच्या फटका-यांनी तडाखा देणारे शिवसेनाप्रमुख, जागतिक पातळीवर हिंदूंचे नेते अशी ओळख असलेले शिवसेनाप्रमुख, हा देश हिंदूंचा आहे हे ठणकावून सांगणारे शिवसेनाप्रमुख, अशा शिवसेनाप्रमुखांच्या अनेक प्रतिमा शिवसैनिकांना आठवत होत्या. या आठवणी अश्रू आणि हुंदक्याच्या रूपाने बाहेर पडत होत्या. अशाच शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणी मनात साठवून त्यांना अखेरचा 'जय महाराष्ट्र' करण्यासाठी राज्याच्या प्रत्येक शहरातून तसंच दूरवरच्या खेड्या-खेड्यातून शिवसैनिक आले होते.
ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी लाखोंच्या सभा घेतल्या त्याच शिवतीर्थावर त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.  शिवसेनाप्रमुखांच्या शब्दांनी ज्या शिवतीर्थावर अंगार उसळवला त्या शिवतीर्थावर 18 नोव्हेंबरला सर्व शब्द नि:शब्द झाले हाते. शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींनी माझ्या सारखे सगळे शिवसैनिक व्याकूळ झाले होते. मात्र या दु:खात फक्त एकाच घोषणेसाठी शब्द फुटत होते ती म्हणजे "परत या, परत या बाळासाहेब परत या."
काँग्रेसच्या षंढ धर्मनिरपेक्षतावाद संस्कारांनी इथला बहुसंख्यक हिदूं पराभूत मानसिकतेत जगत होत. जातियवादी शक्ती इथं मुजोर झाल्या होत्या. अनेक मोहल्ल्यांमधून पाकिस्तान क्रिकेटची मॅच जिंकल्यावर फटाके वाजवले जात होते. ठिकठिकाणी घडणा-या दंगलीमधून हिंदूंची कत्तल व्हायची. काँग्रेसच्या षंढ धर्मनिरपेक्षतावादी विचारसरणीने इथल्या हिंदूला दुर्बल केलं होत. मात्र शिवसेनाप्रमुखांनी त्याच दुर्बल हिंदुंच्या मनात अंगार फुलवला. राष्ट्रद्रोह्यांना खडे चारले, मोहल्ल्यांची मस्ती जिरली. 1947 सारखीच फाळणी करून अजून एक पाकिस्तान निर्माण करू, असं 'हिरवं स्वप्न' पाहणा-यांची तोंडं काळी-निळी पडली.
शिवसेनाप्रमुख म्हणजे हिंदूस्थानचा हुंकार होता. ज्येष्ठ पत्रकार खुशवंतसिंग यांनी शिवसेनाप्रमुखांना सेफ्टी व्हॉल्व उपमा दिली होती. प्रेशर कुकरचा वॉल त्यातल्या वाफेला जागा देतो. ज्यामुळे प्रेशर कुकरचा स्फोट होत नाही. देशातल्या जनतेचा राग, राजकारण्यांवरचा रोष, भ्रष्टाचारावरची चीड, अल्पसंख्यकांचं लांगूलचालन, पाकिस्तानच्या कुरापती,  दहशतवादाचा धोका, दंगली, बॉम्बस्फोट, हिंदूंवरील अन्याय या सारख्या अनेक ज्वलंत प्रश्नांवर कोणताच नेता बोलत नव्हता. मग जनतेच्या मनातली वाफेची चीड शिवसेनाप्रमुखांच्या भाषणातून व्यक्त व्हायची. आपले प्रश्न मांडणारा, आपली भाषा बोलणारा एकच नेता आहे आणि तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेेब ठाकरे. त्यामुळेच जणू एका कुकर प्रमाणे असणा-या या देशातल्या नागरिकांच्या संतापाचा कधी स्फोट झाला नाही. त्यामुळे खुशवंतसिंग यांनी शिवसेनापमुखांना या देशाचा सेफ्टी व्हॉल्व म्हटलं होतं.
आजही देशातल्या नागरिकांच्या मनात संताप, चीड, त्वेषाची वाफ साठली आहे. मात्र ही वाफ बाहेर पडणार कशी ? कारण सामान्यांच्या मनातलं बोलणारे शिवसेनाप्रमुख आज आपल्यात नाहीत.

1 comment:

  1. Apratim lekh....
    Shivsenapramukhanchya aathvani sarva Hindunchya manat akherchya shwasaparyant tikun rahnar yat tilmatra shanka nahi... Hindunchya manat dhaddhadnare aani itarnchya manat dhadki bharnare Balasaheb ekmevadwitiya hote...
    Kal konasathihi thambat nahi...aani to magehi jaat nahi... Aata asa Safety valve Hindustanat hone nahi...
    Balasaheb aaplya manat amar aahet..

    ReplyDelete