Thursday, September 30, 2010

या निकालात 'राम' आहे !

अखेर अयोध्येतील वादग्रस्त जागा ही रामजन्मभूमी असल्याचा निकाल न्यायालयाने दिला. या निकालामुळे मागील साठ वर्षांपासून प्रलंबित असलेला खटला निघाली निघाला. इतकंच नव्हे तर वादग्रस्त जागेतून रामलल्लाची मूर्ती हटवली जाणार नाही. त्या ठिकाणी रामाचीच पूजा होईल, असा महत्वपूर्ण निकालही न्यायालयाने दिला आहे. त्या ठिकाणी वर्षानूवर्षे पूजा होत असल्याने वादग्रस्त जागेवर मशीद होती, असे मानता येणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. रामलल्लाबरोबर कोट्यवधी भाविकांच्या भावना जोडल्या आहेत. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. वादग्रस्त ढाचा जुन्या अवशेषांवर बांधण्यात आला होता. ती वास्तू हिंदू धर्मियांची असल्याचे पुरातत्त्व खात्याच्या पुराव्यांवरून सिद्ध झाले होते.
देशात अनेक मशीदी आहेत. त्यातल्या बहुतेक मशीदींचा पाया खोदून काढला तरी तिथे मंदिराचेच अवशेष सापडतील. पण हिंदू हे सहिष्णू आहेत. ते काही अशी मागणी करणार नाहीत. पण किमान हिंदूंची आस्था असणारी राम, कृष्ण हे देव तरी मशीदींच्या वादातून मुक्त करायला हवे. बाबराने केलेले आक्रमण, पाडलेले मंदिर या बाबी वर्षानुवर्षे सगळ्यांना माहिती होत्या. साठ वर्षांपूर्वी त्या विषयीचा खटलाही न्यायालयात गेला. पण मुस्लिमांना हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची बुद्धी झाली नाही. ज्या देशात आपण राहतो, त्या देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या श्रद्धास्थानाला तडा देऊ नये अशी उपरती त्यांना झाली नाही. जाऊ द्या कशाला दुधात मिठाचा खडा टाकायचा.
न्यायालयानेही वादग्रस्त जागेचे त्रिभाजन करण्याचा आदेश दिला आहे. या देशात हिंदू आणि मुस्लिमांना एकत्रच सहजीवन व्यतीत करायचे आहे, हाच संदेश या माध्यमातून न्यायालयाने दिलाय. हिंदू सहिष्णू असल्याने न्यायालयाचा त्रिभाजनाचा मुद्दा त्यांना पटणारा आहे. या त्रिभाजनामुळे बाबराने केलेल्या अतिक्रमणातला काही भाग कायम होणार आहे. मात्र न्यायालयाने ही जागा रामजन्मभूमीची असल्याचे मान्य केल्याने सामान्य नागरीक सुखावला आहे. सर्वच राजकीय पक्ष, नेते, सामान्य नागरीक यांनी संयम बाळगून, हर्षोल्हास न करता निकाल स्वीकारला आहे.
मात्र हिच गोष्ट जर पन्नास वर्षांपूर्वी घडली असती तर 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांना आक्रमक भूमिका घ्यावी लागली नसती. मंदिर - मशीद या वादात देशाचं नुकसान झालं नसतं. जातीय दंगलीत अनेकांना प्राण गमवावे लागले नसते. या देशात हिंदूंचेही ऐकले जाते, असा विश्वास आता हिंदूंमध्ये निर्माण होऊ शकेल. आपल्याच देशात गुलामीच्या मनोवृत्तीत जगण्याची सवय झालेल्या नागरिकांना हा निकाल सुखावणारा आहे.

1 comment:

  1. या ब्लॉगमध्ये 'राम'आहे. उच्च न्यायालयानं अतिशय समतोल असा हा निकाल दिला आहे. ब्लॉग लेखकानंही अत्यंत समतोलपणे हा ब्लॉग लिहलाय. आता दोन्ही पक्ष सर्वोच्च न्यायालयात न जाता समोपचाराने सोडवायला हवा.

    ReplyDelete