Friday, September 10, 2010

9/11 ची 9 वर्ष

अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याला 11 सप्टेंबर 2010 रोजी 9 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि नेमकी त्याच दिवशी रमजान ईद आहे. काय पण योगायोग म्हणायचा. अमेरिकेच्या अभिमानावर झालेला हल्ला म्हणजे 9/11 चा हल्ला म्हणता येईल. अमेरिकेचा अभिमान, स्वाभिमान, गर्व या हल्ल्याने धुळीस मिळाला. इतकंच नव्हे तर जगाचे राजकारणही बदलले. अमेरिकेचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भारत कसा दहशतवादाला सामोरा जात असेल याचा भयानक अनुभव अमेरिकेने घेतला.
9/11 च्या प्रत्येक स्मरणदिनी जगभरातले नागरिक इस्लामी हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहतात. मात्र या वर्षी अमेरिकेतल्या फ्लोरिडा प्रांतातल्या एका चर्चचे धर्मगुरू टेरी जोन्स यांनी 9/11 च्या नवव्या स्मरणदिनी कुराणाच्या प्रतींचे दहन करण्याचे आंदोलन जाहीर केले. आणि जगभरातून त्यांचा निषेध सुरू झाला. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या आंदोलनाची निर्भत्सना करून अल कायदाच्या हाती आयते 'कोलित' देऊ नका असे आवाहन केले. या आंदोलनामुळे अफगाणीस्तानातल्या अमेरिकन सैनिकांच्या प्राणाला धोका निर्माण होऊ शकतो. जगभरात इस्लामी दहशतवादाच्या हल्ल्यांमध्ये वाढ होऊ शकते, असा इशारा दिला. आपले केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ही लूंगी सावरत धर्मनिरपेक्षतेची पुंगी वाजवून घेतली. अनेक इस्लामी देशात याच्या सहाजिकच आणि नेहमीप्रमाणे हिंसक प्रतिक्रिया उमटल्या.
धर्मगुरू टेरी जोन्स यांनी जाहीर केलेले आंदोलन चुकीचेच होते. अर्थात त्यांनी ते आता मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. बरं झालं जोन्स यांनी आंदोलन मागे घेतलं. नाही तर शांततेचा संदेश देणा-या इस्लाम धर्माच्या अनुयायांनी जगभरात अशांतता माजवली असती. अफगाणीस्तानपासून ते मालेगावपर्यंत दंगली भडकल्या असत्या. पण धर्मगुरू जोन्स यांनी वेळीच हे आंदोलन मागे घेतले. जखम डोक्याला आणि पट्टी पायाला, असे हे जोन्स यांचे आंदोलन म्हणता येईल. इस्लामी दहशतवाद्यांनी 9/11 चा हल्ला घडवला, हे जगजाहीर आहे. मात्र त्याचा राग कुराणवर कसा काढता येईल ? कारण त्यात काही वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करण्याचा फतवा नव्हता. धर्मग्रंथ जाळून अतिरेकी विचार बदलता येणार नाहीत. तर उलट अशा कृत्यांमुळे अतिरेक्यांच्याच संख्येत वाढ होईल. उलट मुस्लिमांमध्ये अतिरेकीपणा का वाढिला लागतोय ? याची चिकीत्सा करण्याची गरज आहे. मुस्लीमांमधल्या अतिरेकीपणाचे मूळ कशात आहे ? ते शोधून त्यातल्या चुका दुरूस्त करण्याची गरज आहे. कुराण जाळून उपयोग होणार नाही.
हिंदू धर्मातल्या मनूस्मृतीचे दहन करण्यात आले होते. मनूस्मृतीमुळे वर्णव्यवस्था आणि त्यातून जातीय व्यवस्थेची उतरंड निर्माण होऊन समाजात जातीभेद निर्माण झाला होता. माणसाला माणूस म्हणून जगण्याचाच हक्क नाकारण्यात आला होता. म्हणून मनूस्मृतीचे दहन करण्यात आले होते. मात्र त्यावेळी काही जगभर गजहब माजला नव्हता. तर जातीयता दूर करण्याचे ते साधन मानले गेले होते. अर्थात असा उदारपणा इस्लामच्या अनुयायांमध्ये यावा अशी अपेक्षा करणं, अत्यंत चुकीचे म्हणावे लागेल.
अमेरिकेत सध्या ज्या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड सेंटर होते, त्याला ग्राऊंड झिरो म्हणतात. त्या ग्राऊंड झिरोच्या शेजारी मशीद बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाला तिथल्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. एका सर्वेनुसार ( संदर्भ नवभारत टाईम्स ) दोन तृतीआंश नागरिकांनी मशीदीला विरोध केलाय. तर एक तृतीआंश नागरिकांनी इस्लाम हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचं मत व्यक्त केलेय. हा सर्वे पुढारलेल्या, प्रगत अमेरिकेत झालाय, हे येथे पुन्हा एकदा नमूद करण्यात येत आहे. धर्मनिरपेक्षतावाद्यांनी यांची (गंभीर) नोंद घ्यावी. धर्मगुरू टेरी जोन्स यांनीही ग्राऊंड झिरो नजीकच्या मशीदीला तीव्र विरोध केलेला आहे.
ग्राऊंड झिरो नजीकची प्रस्तावित मशीद आणि रामजन्मभूमीत एक साम्य शोधता येईल. आधुनिक बाबरांनी विमानांच्या मदतीने वर्ल्ड ट्रेड सेंटर जमीनदोस्त करून अमेरिकेचे गर्वहरण केले. तर भारतात मूर्तीभंजक मोघल सम्राट बाबराने रामजन्मभूमीच्या ठिकाणी मशीद बांधून सर्व हिंदूंच्या श्रद्धेवर आघात केला. आता ग्राऊंड झिरो नजीकची प्रस्तावीत मशीद आणि रामजन्मभूमीच्या ठिकाणी पुन्हा मशीद बांधण्याची होणारी मागणी मान्य करणं म्हणजे या बाबरांना शरण जाणेच म्हणावे लागेल. म्हणजे त्यांना ज्या वास्तू मिळत नाहीत त्या ते उध्दवस्त करणार आणि नंतर तिथे मशीदी बांधणार. वा काय पण न्याय म्हणायचा.
हिंदूंच्या श्रद्धास्थानावर मशीद उभी राहू शकते. ग्राऊंड झिरोवरही मशीद उभी राहू शकते. पण कधी कुणी मक्का - मदिनेत छोटसं मंदिर, छोटंसं चर्च बांधू शकतं का ? शांततेचा संदेश देणारा तो धर्म आणि त्याचे अनुयायी हे मान्य करतील ?

2 comments:

  1. अगदी बरोबर लिहीले आहे. मी ह्याच अनुशंघाने एक ब्लॉग लिहीला आहे वाचुन बघा वेळ झाला व जमले तर.

    www.rashtrarpan.blogspot.com
    www.bolghevda.blogspot.com
    www.rashtravrat.blogspot.com

    ReplyDelete
  2. www.rashtrarpan.blogspot.com ह्या मध्ये 'Making Peace with history' ह्या नावाने.

    ReplyDelete