Friday, March 26, 2010

अमिताभची उपस्थिती, काँग्रेसला (अ)शोक

मागील दहा वर्षात राज्यातल्या आघाडी सरकारने केलेले दाखवण्यासारखे एकमेव काम म्हणजे वांद्रे - वरळी सी लिंक. अर्थात हा प्रकल्प युतीने मंजूर केला तेव्हाचा त्याचा खर्च आणि नंतर प्रकल्प रेंगाळल्यामुळे त्याचा वाढलेला खर्च हा भाग आपण येथे विचारात घ्यायचा नाही. बरं, दहा वर्षात एकच काम झालं आहे. त्यामुळे एखाद्या दांपत्याला दहा वर्षानंतर अपत्य झालं तर त्यांना जेवढा आनंद होईल तसाच आनंद आघाडी सरकारला व्हावा, यात काही नवल नाही. कारण बाकीच्या आघाडीवर सगळा आनंदीआनंदच आहे. त्यामुळे या एका सी - लिंकचेच चार - चार वेळा उदघाटन करणं सुरू आहे. कधी त्याला राजीव गांधींचे नाव द्या, कधी आठ लेन सुरू झाल्या त्याचा कार्यक्रम कर असे उद्योग आता सुरू आहेत. आणि या कार्यक्रमांमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे. काँग्रेसचे नाक ठेचण्यासाठीच अमिताभ बच्चनला कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं, असाही काही विश्लेषकांचा दावा आहे.
बरं, एकदा कुणाला पाहुणा म्हणून बोलावल्यानंतर मी त्याला बोलावलं नाही. तर लहान्या भावाने बोलावलं असा सूर लावणं म्हणजे पाहुण्यांचा अपमान करण्यासारखंच आहे. अमिताभ बच्चन यांची अमरसिंग यांच्या बरोबरची सलगी, जया बच्चन यांची सपाची खासदारकी यामुळे काँग्रेसची त्यांच्याविषयी नाराजी आहे. मात्र हेच अमिताभ बच्चन एके काळी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र बोफोर्सच्या भ्रष्टाचाराचे तोफगोळे अंगावर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राजकारण यांना रामराम ठोकला. त्यामुळे गांधी आणि बच्चन परिवारामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यामुळेच हा वांद्रे - वरळी सी लिंकच्या आठ लेन सुरू करण्याच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ?' असा पवित्रा घ्यावा लागला. इतकंच नव्हे तर अमिताभ या कार्यक्रमाला येणार आहेत, याची माहिती नव्हती असंही अशोकराव म्हणाले. काय राव तुम्ही, मुख्यमंत्री असून कार्यक्रमाला कुणाची उपस्थिती राहणार हे तुम्हाला माहित नाही ? तुमच्याच मंत्रीमंडळातले मंत्री अब्दुल सत्तार तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत लाथांनी तुडवतात. सर्व चॅनेल्स ते टीव्हीवर दाखवतात. तरी तुम्हाला त्याची माहिती नसते. किंवा हा विषय तितका महत्वाचा नसतो. तुमचंही बरोबर आहे. कारण अब्दुल सत्तार सारखे हिरे काँग्रेसच्या सत्तेच्या हाराची शोभा वाढवतात. यांचा चेहरा गुंड असला तरी त्यांच्या पाठीमागे मोठी वोट बँक असते.
राजकारण आणि समाजकारण करताना इतकी क्षुद्र मनोवृत्ती दाखवणं हे काही मोठेपणाचं लक्षण नाही. एखाद्याला पाहुणा म्हणून बोलवायचं आणि या पद्धतीने अपमानीत करायचं यातून राजकारण्यांच्या मनाचा कोतेपणा दिसून येतो. गांधी आणि बच्चन यांच्या इगो प्रॉब्लेममध्ये आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मात्र पार भजं झालं आहे. यापुढे तर आता अमिताभ बच्चन ज्या मार्गाने जाणार असतील तो मार्गही टाळणं मुख्यमंत्र्यांसाठी श्रेयस्कर ठरेल. नाही तर बो-या, बिस्तरा गुंडाळून नांदेडचा मार्ग त्यांना धरावा लागेल. मात्र इथं गांधी परिवाराला खुश करण्यासाठी त्यांना एक दुसरा मार्ग सुचवता येईल. चव्हाण यांनी पुन्हा या सी लिंक वर असाच काहीतरी सटरफटर कार्यक्रम ठेवावा. त्यासाठी अभिनेता शाहरूख खानला बोलवावं. मग बघा अशोकराव गांधी घराणं तुमच्यावर कसं खुश होतं. प्रियंका आणि राहूल गांधींचा हा खान दोस्त एकदा बोलवाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी उलटवून लावत व्हा 'बाजीगर'.

खमंग फोडणी
अमिताभ बच्चन पुण्याच्या साहित्य संमेलनात हजर राहणार असल्यास त्यांच्या बरोबर एका व्यासपीठावर उपस्थित राहू नये, अशी तंबी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना हायकमांडकडून देण्यात आली आहे. काय म्हणावं या काँग्रेसला ? अमिताभ बच्चन आणि अशोकराव चव्हाण हे दोघेही मुंबई या शहरात राहतात. मग आता हायकमांड काय 'वर्षा' बंगला नांदेडला हलविण्याचा आदेश देणार आहे का ?

2 comments:

  1. ha sagla prakar mahamurkhpanacha aahe hech khare. amitabhchya upasthitine vaad nirmaan vhava he aaplya raajkiya diwalkhoriche lakshan aahe dusare kaay?

    ReplyDelete
  2. ya vadat kahi ram nahi... pan jast vait yach vatat ki news channelswalehi tech tech gheun baslet... itar changlya, mhatvachya, sakaratmah, jyala arth asel asha batmya samplyat ka... media ne jar ashya nirarth batmya den thambawl tarach ya goshtihi thambtil... vit alay ya batmicha....

    ReplyDelete