Friday, February 19, 2010

चला, एक पाऊल पुढे !

नोकरी, व्यवसाय सगळेच करतात. अर्थात काही जण काहीही न करता आनंदात जगू शकतात. मात्र नोकरी, व्यवसाय करताना आपल्या सगळ्यांनाच कामाचं समाधान मिळतं का ? अर्थात या प्रश्नाचं उत्तर देणं सगळ्यांनाच सोपं आहे किंवा नाही. अर्थात सगळेच याचं उत्तर कितपत खरं देतील हा ही मुद्दा आहेच. मात्र मी आज खरंच खुश आहे. काम करताना आपण टीम मध्ये काम करतो. त्यामुळे मी ज्या टीमचा भाग आहे, ती टीमही खुश आहे. कारण आज आम्हाला कामाचं समाधान मिळालं. आता यावर कुणी तरी (खवचट) म्हणू शकेल की, रोज कामाचं समाधान मिळत नाही का ? बरं हा प्रश्नही चूकीचा नाही. मात्र सगळेच दिवस सारखेच नसतात. रोजची परिस्थिती ही वेगळी असते. एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे असं जे म्हटलं जातं, ते सगळीकडेच लागू पडतं. मग त्याला नोकरीतरी कशी अपवाद असू शकेल.

आपण नोकरी का करतो ? त्याची उत्तरं पुढिल प्रमाणे देता येतील - करिअर करायचं आहे, आमच्या बापाने ईस्टेट कमवून ठेवली नाही, मला या क्षेत्रात उत्तुंग काम करायचं आहे. ही किंवा या प्रकारची उत्तरं आपल्याला मिळतील. मी ही नोकरी करतो. सर्व सहका-यांबरोबर जुळवून घेत नोकरी करतो. नोकरीत अनेकदा ताण-तणावाचे प्रसंग येतात. अडचणीचे प्रसंग येतात. अर्थात हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. मात्र आज जे घडलंय त्याचं श्रेय माझ्या संस्थेला, रिपोर्टरला आणि माझ्या सहका-यांनाच आहे. कारण आज मी त्यांच्यामुळेच खुश आहे. 1 जानेवारीपासून सुरू केलेला आमचा 'जरा हटके' हा कार्यक्रम बघताना आज डोळे पाणावले. पुण्यातला दिव्यांश खरे, यवतमाळची मोहिनी डगवार, परभणीचा योगेश खंदारे या अपंग विद्यार्थ्यांच्या संघर्षाची स्टोरी या कार्यक्रमात दाखवली. अपंगत्वाचा कोणताही न्यूनगंड न बाळगता हे विद्यार्थी ज्या ताठ कण्याने जीवन जगत आहेत, त्याला सलाम. जन्मत:च दोन हात आणि एक पाय नसतानाही क्रिकेट खेळणारा, वक्तृत्व आणि संगीत क्षेत्रातही कामगिरी बजावणारा दिव्यांश हा आत्महत्या करणा-यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी योग्य ठरावा. जीवन सुंदर आहे, असाच संदेश तो देतो. यवतमाळची मोहिनी डगवार हात नसताना सायकल चालवत महाविद्यालयात जाते. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नरत राहून सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगते. तसाच परभणी जिल्ह्यातल्या पूर्णाचा योगेश खंदारे अपघातानंतर दोन्ही हात गमावून पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगतोय. नव्हे तर तो इतरांना जीवन कसं जगावं याचाच संदेश देतोय. उपचारादरम्यान हात कापावे लागलेल्या योगेशने पायाने लिहण्याची कला शिकून घेतली. मला दोन हात नाहीत. तरी मी आनंदाने जगतोय, अरे दोन हात असलेल्या विद्यार्थ्यांनो तुम्ही कशासाठी आत्महत्या करत आहात ? असा सवाल तो विचारतो.
जीवनात प्रत्येकालाच ताण-तणावांना सामोरं जावं लागतं. अर्थात हे ताण-तणाव, स्पर्धा नसेल तर आपलीच प्रगती खुंटेल. या ताण - तणावांचं योग्य व्यवस्थापन केलं तर सगळ्यांनाच जीवनाचा आनंद घेता येईल. जीवनाकडे सकारात्मकपणे पहा, सगळ्यांशी संवाद ठेवा, मनात सगळ्यांसाठी प्रेम बाळगा, कुणाविषयी वाईट बोलू नका, आणि मग बघा खरंच जीवन सुंदर आहे. यवतमाळची मोहिनी डगवार आणि परभणी जिल्ह्यातल्या पूर्णाचा योगेश खंदारे यांना मदतीची गरज आहे. त्यांच्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी खरंच एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. करालना त्यांना मदत ?

2 comments:

 1. पुण्यातला दिव्यांश खरे, यवतमाळची मोहिनी डगवार, परभणीचा योगेश खंदारे कोणालाही उभारी देईल अशी या तिघांची कथा आहे. अशा प्रकाराच्या स्टोरीज दाखवल्यावर मनाला समाधान नक्कीच मिळेल. अशा प्रकारच्या स्टोरीज इलेक्ट्रॉनिक मीडियाने अधिकाधिक दाखवायला हव्यात. तरचं आपल्यावरचे अनेकांचे आक्षेप कमी होण्यास मदत होईल.

  ReplyDelete
 2. blog varil lekhan Aavadale.....

  Devnath Gandate
  Reporter Sakal Newspaper
  chandrapur
  9922120599

  http://kavyashilpa.blogspot.com

  ReplyDelete