Sunday, May 10, 2020

पुराना जायेगा तभी तो नया आएगा...


कपिल शर्मा याने ओएलएक्सची जाहिरात केली होती. त्या जाहिरातीची टॅगलाईन होती, पुराना जायेगा तो नया आयेगा. आता राज्यातल्या भाजपनं त्या टॅगलाईननुसार काम करायला सुरूवात केलीय. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली नाही. प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तसं पाहिलं तर भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी मार्गदर्शक मंडळाच्या माध्यमातून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, सुमित्रा महाजन या ज्येष्ठांचा आधीच गुळाचा गणपती केला आहे.
मात्र भाजपनं पक्षासाठी खस्ता खाललेल्या एकनाथ खडसेंचा सन्मान राखायला हवा होता. भाजपला कोणी विचारत नव्हतं त्या काळात खडसेंनी पक्षाच्या वाढीसाठी श्रम घेतले. विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षासाठी किती काम केलं, हे त्यांच्या पक्षाला माहित असेलच. पण त्यांच्यावर अन्याय झाला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
एकनाथ खडसे अनेक वर्ष आमदार, मंत्री राहिले आहेत. त्यांची सून खासदार आहे, मुलीलाही विधानसभेचं तिकीट मिळालं होतं. असं असताना एकनाथ खडसेंवर अन्याय झाला, असं कसं म्हणता येईल ? पंकजा मुंडे मंत्री होत्या. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण त्यांची बहीण खासदार आहे. तरीही त्यांच्यावर अन्याय झाला, असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. अर्थात पंकजा मुंडे निवडून आल्या नसल्या तरी त्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेतच. (बहुतेक त्यामुळेच ही वेळ आली असावी, असंही बोललं जातं.)
पण यामुळे एक मुद्दा समोर येतो. याच नेत्यांना वर्षानुवर्ष आमदार-खासदार, मंत्री केल्यामुळे त्यांच्या पक्षातल्या इतर तरूणांना संधीच मिळत नाही. त्यामुळे भाजपचा निर्णय चुकीचा वाटत नाही. पण हा निर्णय घेताना फक्त हे चारच नेते बाजूला सारणं योग्य नाही. पुराना माल हटवायचा असेल तर, सगळाच पुराना माल मोडित काढायला हवा. फक्त राजकीय आकांक्षा आहेत, म्हणून सहकाऱ्यांचे पत्ते कापले जावू नयेत हे ही तितकंच म्हत्वाचं आहे.  
आता भाजप प्रमाणेच आता इतर पक्षांनीही वर्षानुवर्ष अनेक घराण्यांमध्येच दिली जाणारी पदं, उमेदवारी बदलावी असा विचार करण्याची गरज आहे. भाजपनं जशी (अल्प) धमक दाखवली तशी धमक  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दाखवू शकेल का  ? #संगो

Friday, May 8, 2020

मजूर, कामगारांचे तळतळाट भोवणार !


घराकडे निघालेले मजूर रेल्वे ट्रॅकवर झोपले. 45 किलोमीट चालून थकलेले मजूर काही वेळ विश्रांतीसाठी ट्रॅकवर विसावले. लॉकडाऊनमुळे ट्रेन बंद आहेत, असं वाटल्यानं त्यांनी काही वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरीकडे एक मालगाडी वेगानं येत होती. धडधडत आलेल्या मालगाडीच्या लोको पायलटनं ट्रॅकवरील मजूर बघितले. त्यामुळे त्यानं ब्रेक दाबला, पण तो पर्यंत उशीर झाला होता. मध्य प्रदेशातल्या गावाकडे निघालेल्या मजुरांच्या जीवनाचा प्रवास थांबला. मालगाडी खाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाला. करमाड जवळ झालेल्या या अपघातानं अवघा देश हळहळला.


घराकडे जाणाऱ्या मजुरांचे मृत्यू, मजुरांचं स्थलांतर हे आपल्या सर्वांचं अपयश आहे. हे माझं अपयश, हे यंत्रणांचं अपयश, हे राज्य सरकारचं अपयश, हे केंद्र सरकारचं अपयश आहे. कोरोनामुळे मृत्यू होऊ नये यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केला. एकदा नव्हे तर तीनदा लॉकडाऊन घोषित केला. देशातल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी हा लॉकडाऊन गरजेचाच आहे. मात्र आता कोरोनामुळे नव्हे तर लॉकडाऊनच्या अपयशामुळे नागरिकांचा जीव चालला आहे. केंद्र सरकारनं लॉकडाऊन आधीच घोषित केला असता आणि त्याआधी मजुर, कामगारांना त्यांच्या राज्यात परतण्याची संधी दिली असती तर आजच्या इतकं विदारक चित्र दिसलं नसतं. परदेशात गेलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार तत्परता दाखवत आहे. पण देशातल्या नागरिकांकडे तितकं लक्ष दिलं जात नाही. 
महामार्गांवरून मजूर आणि कामगार प्रखर उन्हातून पायी त्यांच्या घराकडे जात आहेत. लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला, खायला काही मिळत नाही. यामुळे आपल्याच या बांधवांवर पायी जाण्याची वेळ आलीय. अनेक जण हजार किलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त अंतरावरील त्यांचं घर जवळ करण्यासाठी पायी जात आहेत. या कामगारांसोबत त्यांची मुलं, पत्नी आहेत. या सर्वांचा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही. ज्या शहरात पोट भरण्यासाठी आले होते, त्या शहरात त्यांना मदत करणारा एकही हात मिळाला नाही. सरकार त्यांना मदत देऊ शकलं नाही. त्यामुळे छोट्या मुलांनाही पायी चालावं लागतंय. उपाशी मरण्यापेक्षा परप्रांतातल्या घरी जाऊ, असा विचार करून हजारो मजूर, कामगार देशभरातून स्थलांतर करत आहेत. हे स्थलांतर करताना अनेकांचा मृत्यूही झाला. उन्हाचे चटके सोसत, उपाशीपोटी हजारो किलोमीटर पायी चालणाऱ्यांचे तळतळाट सगळ्यांनाच भोवणार आहेत. एक नागरिक म्हणून हे माझं अपयश आहे. समाज म्हणून हे आपलं अपयश आहे. सरकार म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते, राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रमुखांचंही अपयश आहे. #संगो

Thursday, April 30, 2020

तरूणाईचा ऋषी !

'प्यार हुआ इकरार हुआ' या गाण्यात भाऊ रणधीर कपूर आणि रिमाच्या सोबत छोटी पाऊलं टाकत जाणाऱ्या ऋषी कपूरनं नंतर बॉलिवूडमध्ये मजबूतपणे पाय रोवले.बॉलिवूडचा सदाबहार चॉकलेट हिरो अशी ओळख असलेल्या ऋषी कपूर यांनी अनेक हिट सिनेमांमध्ये अभिनय केला. त्यांच्यावर चित्रीत झालेली रोमँटिक गाणी शेकडो वर्ष रसिक गुणगुणत राहतील.
मेरा नाम जोकर सिनेमात राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका ऋषी कपूरनं साकारली. मात्र हा सिनेमा हिट ठरला नाही. त्यामुळे राज कपूर यांनी बॉबी सिनेमातून ऋषी कपूरला लॉन्च केलं.ऋषी कपूर आणि डिंपल कापडियाची रोमँटिक लव्ह स्टोरी हिट ठरली. बॉलिवूडला नवा चॉकलेट हिरो मिळाला. अनेक हिट गाणी असणाराहा सिनेमा बॉलिवूडलाही बोल्ड दृश्यांकडे नेणारा ठरला. मैं शायर तो नहीं, हे गाणं प्रचंड हिट झालं. याच सिनेमातल्या हम तुम एक कमरे में बंद हो, या गाण्यानं तरूणांच्या मनात का आहे ? यालाच पडद्यावर मांडलं.
ऋषी कपूरचा सिनेसृष्टीतला प्रवासही इथूनच दणक्यात सुरू झाला.
मेरे उमर के नौ जवानों असं म्हणत ऋषी कपूरनं तरूणाईची मनं जिंकायला सुरूवात केली. अशी मनं जिंकणारा ऋषी कपूर मग, बचना ये हसिनों हे गाणंही तितक्याच जोशात गाताना दिसला. बॉबी, लैला मजून, अमर अकबर अॅन्थनी, नसीब, प्रेम रोग, सागर, खेल खेल में, रफू चक्कर, जमाना दिवाना, चांदनी, हिना, प्रेम ग्रंथ, कभी कभी, सरगम, कर्ज, दुसरा आदमी, नगिना, दिवाना, बोल राधा बोल या हिट सिनेमातील ऋषी कपूर यांचा अभिनय आणि गाणी प्रचंड गाजली. प्रत्येक दशकातील हिरोईनसोबत ऋषी कपूरची जोडी हिट आणि
तितकीच राोमँटिकही ठरली. डिंपल कपाडिया, नितू सिंग, जयाप्रदा, श्रीदेवी, पद्मिनी कोल्हापुरे, रिना रॉय माधुरी दीक्षित, जुही चावला, दिव्या भारती या सारख्या अनेक हिरोईन्स सोबत हिट सिनेमे देण्याचा विक्रम
ऋषी कपूर यांनी केला. चॉकलेट बॉय असलेल्या ऋषी कपूर यांनी साकारलेली प्रियकराची गंभीर भूमिकाही गाजली. 'भवरे ने खिलाया फूल, फूल को ले गया...' या गाण्यातून ऋषी कपूरनं साकारलेला प्रेमी हृदयाचा ठाव घेणारा ठरला.
एक हसिना थी, एक दिवाना था असं गाणं म्हणत प्रेयसीनं धोका दिल्यानंतर दुसऱ्या जन्मात सूड उगवणारा प्रियकर साकारावा तो ऋषी कपूरनंच. तर रंग भरे बादल से तेरे नैनों की काजल से, हे चांदनी सिनेमातील गाणं आणि ऋषी कपूरचे स्वेटर्स रसिकांच्या कायम लक्षात राहतील.
प्रत्येकाच्या मनात प्रेमाचा रंग भरणारा हा सदाबहार चॉकलेट हिरो रसिकांची मैफल नेहमीसाठीच सुनीसुनी करून गेला. #संगो

Monday, April 6, 2020

इशारों को अगर समझो...


या दोन फुलांनी हिंदी सिनेमामध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे. साठच्या दशकात जेव्हा हिंदी सिनेमा आजच्या इतका 'खुलला' नव्हता. त्यावेळी प्रेमाचे प्रसंग खुलवण्याची मोठी जबाबदारी या दोन फुलांनी पार पाडली. ही दोन फुलं पडद्यावर आली म्हणजे हिरो-हिरोईन काय करत असतील, याचा प्रत्येकानं आपापल्या बुद्धीप्रमाणे अंदाज लावायचा. एकंदरीतच प्रेक्षकांच्या बुद्धीला चालना देण्याचं काम त्या काळातल्या हिंदी सिनेमानं केलं, असं म्हटलं तरी चालेल.
हिरो हिरोईन बागभर नाचत गाणी म्हणायचे. पण प्रेमाला पुढे नेण्यासाठी बागेतल्या याच दोन फुलांचा आधार घ्यावा लागायचा. फुलं ही प्रेमाचं प्रतिक आहेत. गुलाबाचं एक फुल देऊन हिरोईनला प्रपोज करणं, हे तर आपण अनेकदा पडद्यावर काय प्रत्यक्षातही पाहिलेलं. अनेकांनी तसं केलंही असेल.
ते जाऊ द्या. मूळ मुद्यावर येऊयात. फुलातून जसा प्रेमाचा इशारा सूज्ञ प्रेक्षकांना मिळतो तसाच इशारा गरम पाण्याच्या पातेल्यातूनही मिळायचा. आलं का लक्षात. जुन्या सिनेमात गरोदर हिरोईनची हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी व्हायची नाही. मग तो सिन असा असायचा, रात्रीचा अंधार आणि घराबाहेर ताटकळत बसलेले लोक. त्याचवेळी दरवाजा उघडतो एक महिला लगबगीनं बाहेर येते आणि गरम पाण्याचं पातेलं घेऊन आत जाते. काहीच वेळात बाळाचा रडण्याचा आवाज येतो. मग हिरो, हिरोचे आई-वडील खूश होतात. मिठाई वाटली जाते. गरम पाण्याचं पातेलं पाहिलं की, त्या काळातल्या सूज्ञ प्रेक्षकांना पुढे काय होणार याचा अंदाज यायचा. 
ऐंशीच्या दशकात दूरदर्शन ही एकमेव वाहिनी घरोघरी पाहिली जायची. त्यावेळी आठवड्यातून एकदा रविवारी हिंदी सिनेमा दाखवला जायचा. मनोरंजनाचं एकमेव साधन असल्यानं हिंदी सिनेमानं शिकवलेला हा सूज्ञपणा माझ्या अंगी आला. अर्थात त्याकाळी दूरदर्शनवर सिनेमा पाहिलेल्या सगळ्यांनाच हा सूज्ञपणा प्राप्त झाला.
सांकेतिक फुलांप्रमाणेच खऱ्या फुलांनीही हिंदी सिनेमाचा पडदा चांगलाच खुलवला. सिलसिला सिनेमात अमिताभ आणि रेखाच्या सोबतीला असलेल्या फुलांनी सजलेला फुलांचा 'सिलसिला' रसिक प्रेक्षकांच्या हृदयात जीवंत आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, सिनेमातली पिवळी फुलं ऑल टाईम हिट आहेत. 
साठच्या दशकात प्रेमासाठी फुलांचा आधार घ्यावा लागला. नंतरच्या काळात हिरो-हिरोईन 'खुलत' गेले. त्यामुळे सांकेतिक भाषेची गरजच राहिली नाही. परिणामी इशाऱ्यांची ती भाषा आता इतिहासजमा झालीय.
#संगो

Tuesday, January 14, 2020

रजनीकांतचा 'दरबार' भरला !

रजनीकांतचा सिनेमा हाऊसफुल्ल थिएटरमध्ये तमिळ ऑडियन्सबरोबर पाहणं हा एक अदभूत जीवंत अनूभव आहे. हा अनूभव मी मुंबईत माझ्या मुलासह माटुंग्यातल्या अरोरा थिएटरमध्ये अनुभवला. साऊथमध्ये ज्या प्रमाणे हिरोचे मोठे कटआऊट लावले जातात. हिरोच्या कटआऊटला अभिषेक केला जातो. मुंबईतल्या अरोरा थिएटरमध्यही असेच कटआऊट  रविवारच्या शोची तिकीट तीन दिवस आधीच बूक केली होती. साडेसहाचा शो होता, मात्र आम्ही सहा वाजताच थिएटरला पोहोचलो. आमच्या आधीच अनेक रजनीभक्त तिथं आले होते. तमिळ नागरिक बहुतेक सहकुटुंब सहपरिवार रजनीमय होत असावेत. कारण सहकुटुंब आलेल्या प्रेक्षकांची संख्या इथं जास्त होती. अगदी 70 वर्षाची वृद्धा ते आईच्या कुशीत विसावलेलं बाळ अशी कुटुंब इथं पाहायला मिळाली. रजनीचं बाळकडू पाजायचं असेल तर, दुसरा कोणता पर्यायच नाही.
काहीच वेळात सिंगल स्क्रिन असलेल्या अरोरा थिएटरचे दरवाजे उघडले. सर्व रजनी रसिकांनी आत प्रवेश केला. स्टॉल आणि बाल्कनी अशी वर्गवारी इथं होती. बाल्कनीचं तिकीट असल्यानं आम्ही पायऱ्यांवरून भारावलेल्या वातावरणात बाल्कनीत खूर्ची गाठली. काही क्षणात जाहिरातींना सुरूवात झाली. रजनी फॅन्सला वाटलं की सिनेमा सुरू होतोय. त्यांनी शिट्ट्या वाजवायला सुरूवात केली. असं सात आठ वेळा झालं. अखेर दरबारचं सर्टिफिकेट आलं आणि त्या पाठोपाठ SUPER STAR R A J N I ही अक्षरं फूल टू बॅकग्राऊंड म्युझिकच्या दणदणाटात स्क्रिनवर झळकली. शिट्ट्या, टाळ्या आणि आरोळ्या पर्मोच्च शिखरावर पोहोचल्या. 
सिनेमाच्या सुरूवातीलाच एका भाईची पार्टी सुरू झाली. पार्टीत चर्चा होती ती फक्त पोलीस कमिशनर आदित्य अरूणाचलमची म्हणजेच रजनीकांतची. मग काय जिथं पार्टी सुरू होती त्या हॉलवर टाकलेलं लोखंडी पत्रे दबायला सुरूवात झाली. पाऊलं पुढे धावायला लागली गुंडांनी गोळीबार सुरू केला. जाळीतून रजनीकांतचं दर्शन झालं, फॅन्स बेभान झाले. तोच रजनी सर्व गुंडांच्या आत पोहोचला. पापणी लवते न लवते तोच रजनी स्टाईलनं गुंडांचा खात्मा सुरू झाला. बुक्की, तलवार आणि बंदुकीच्या गोळ्यांनी सुमारे 60 ते 70 गुंड धारातीर्थी पडले.
मग एक गाणं झालं. ऑडियन्स पुन्हा बेभान झाली. गाणं झाल्यानंतर आदित्य अरूणाचलमची मुंबईला बदली होते. मुंबईत येऊन रजनीकांत ड्रग्ज माफियांचा सफाया करायला सुरूवात करतो. गंमत म्हणजे माटुंग्याच्या अरोरा थिएटरमध्ये सिनेमा सुरू असतो आणि पडद्यावरही माटुंगा भागात रजनीकांत रेड टाकत असतो. रजनीकांतचं मोठं नाव होतं. एवढं काम केल्यावर थकवा येणारच. त्यामुळे एक सुंदर अभिनेत्री आणि रजनीकांतची प्रेमकहाणी सुरू होते. काही गाणी होतात. आणि इथंच स्टोरीत ट्विस्ट येतो. रजनीकांतच्या मुलीचं अपघातात निधन होतं. मग चिडलेला रजनीकांत इतर पोलिसांना घेऊन एका मीडिया सेंटरच्या इमारतीत लपलेल्या गुंडांच्या टोळीचा नायनाट करतो. त्यानंतर मोठा व्हिलन सुनील शेट्टीला ढगात पाठवतो. आणि सिनेमा संपतो.
तमिळ भाषेतला हा सिनेमा भाषा कळत नसूनही समजला. अर्थात इथं भाषा समजण्याची गरजच नव्हती. सुपरस्टार रजनी समजला की, अशक्य असं काहीच नसतं. सिनेमा सुरू असताना सातत्यानं सुरू असलेल्या शिट्ट्या आणि फॅन्सचा जल्लोष बाहेर पडतानाही कानात गुंजत असतो. तर डोक्यात फक्त रजनीच्या अॅक्शन असतात.
आणि एक महत्त्वाचं म्हणजे मल्टिप्लेक्समध्ये जशी लूट होते तशी सिंगल स्क्रीनमध्ये होत नाही. 40 रुपयात दोन समोसे, 10 रुपयात पाण्याची बॉटल आणि 50 रुपयात पॉपकॉर्न मिळतं. त्यामुळे सिनेमा बघताना सिंगल स्क्रिनला प्राधान्य देणं फायद्याचं ठरणारं आहे.  #संगो #RAJNIKANT #DARBAR

Saturday, November 2, 2019

संजयचं ‘महाभारत’ !


सामनाचे संपादक, खासदार आणि शिवेसनेचे नेते अशा तीन आघाड्यांवर कामगिरी बजावणाऱ्या संजय राऊतांनी सध्या चांगलाच धुरळा उडवून दिलाय. राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष तीव्र झालेला असताना संजय राऊतांनी शिवसेनेसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुख्यमंत्रीपदाच्या समसमान वाटणीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. शिवसेनेकडून या लढाईचं नेतृत्व सरदार संजय राऊतांकडे देण्यात आलं आहे.
शिवसेनेकडून ही लढाई एकहातीपणे संजय राऊतांकडे दिल्याचं स्पष्टपणे दिसतंय. लेखणीचे 'रोखठोक' सपासप वार करणाऱ्या संजय राऊतांनी त्यांच्या 'सच्चाई'च्या बाईटनं भाजपच्या नेतृत्वाला जेरीस आणलं आहे. सध्याच्या काळात सगळ्या न्यूज चॅनेल्सवर संजय राऊतांचेच बाईट दिसत आहेत. एकट्या संजय राऊत यांनी भाजपला सळो की पळो करून सोडलं आहे. भाजपचे बडे नेते, प्रवक्ते या सर्वांची संजय राऊतांना उत्तर देताना दमछाक होत आहे.
सामनाचे 30 वर्षांपासून संपादक असलेले संजय राऊत शिवसेनेचे नेतेही आहेत. संजय राऊतांच्या लिखाणाचे राज्यात लाखो चाहते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना सुरू केला. शिवसेनाप्रमुखांच्या जहाल अग्रलेख आणि व्यंगचित्रांमुळे सामना लोकप्रिय झाला. तर नंतरच्या काळात सामनाला ब्रॅण्ड करण्यात संजय राऊतांचं योगदान आहे. संजय राऊत यांचं ज्वलंत लिखाण हे सामनाला ब्रॅण्ड करण्यासाठी फायद्याचं ठरलं. याच सामनातून केंद्र आणि राज्यातल्या भाजपवर बाण सोडण्यात आले. सामनातल्या अग्रलेखांमुळे भाजपचा प्रचंड तडफडाट झाल्याचं जगानं पाहिलं. संजय राऊतांमुळे शिवसेना अडचणीत येते, असा आरोपही केला जातो. मात्र अनेकदा अडचणीच्या काळात संजय राऊत शिवसेनेचा किल्ला लढवतात. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांवर शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले. शिवसेना अनेकदा बॅकफूटवर दिसली. त्यावेळी संजय राऊतांनी सामनातल्या बातम्या आणि अग्रलेखांनी राणेंना जेरीस आणलं. त्यावेळी राज्यात पक्ष सत्तेत नसताना शिवसैनिकांच्या मनात अंगार पेटवला. आताही सत्तेच्या संग्रामात शिवसेनेची भूमिका संजय राऊत आक्रमकपणे मांडताना दिसताहेत.
उद्धव ठाकरेंच्या आदेशाशिवाय संजय राऊत इतकी आक्रमक भूमिका घेणार नाहीत, हे ही तितकंच खरं आहे. संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनीच फ्री हँड दिलाय यात शंका नाही.
समाजात जागृती आणनं, अन्यायाला वाचा फोडणं हे संपादकांचं काम. मात्र आता बदलत्या परिस्थितीत राजकीय पक्षांचं मुखपत्र असलेल्या दैनिकांमधल्या संपादकांना जनजागृतीपेक्षा सत्ताजागृती महत्त्वाची झाली आहे. आणि त्यामुळेच अग्रलेख लिहणारे संजय राऊत सत्तेच्या कुरूक्षेत्रात राजकीय महाभारत घडवत आहेत. 
#संगो #SHIVSENA #शिवसेना

Thursday, October 24, 2019

मी पुन्हा येईन, आम्हीही येणार !



मी पुन्हा येईन, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द खरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळवलं. मात्र पुन्हा येताना भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. चार-पाच वेळा मेगाभरती करूनही भाजपला 2014 मिळवलेल्या 122 जागा मिळवता आल्या नाही. शिवसेनेलाही 2014 मध्ये मिळवलेल्या 63 जागा राखता आल्या नाही.
मात्र निकाल लागल्यानंतर राज्यभरात शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. युतीनं सत्ता राखण्याचा पराक्रम केल्यानं कार्यकर्ते बेभान झाले. भाजपनं सेंच्युरी पार केली. तर शिवसेनाही साठीत पोहोचली. मात्र 2014 मध्ये दोन्ही पक्षांनी स्वबळावर मिळवलेल्या जागांपेक्षा हा आकडा कमीच होता. युती करूनही दोन्ही पक्षांना 2014च्या तुलनेत दमदार यश मिळवता  आलं नाही. राजकारणात एक अधिक एक दोन होईल असं नसतं, असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती या निवडणुकीत आली. शिवसेना भाजपनं एकत्र निवडणुका लढूनही त्यांच्या जागा कमी झाल्या. भाजपनं निवडणुका जाहीर होण्याच्या आधी आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतरही मेगाभरतीचा सपाटा लावला. सर्वच पक्षातल्या आजी माजी आमदारांची भाजपचा झेंडा हाती घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक सरदार भाजपच्या गोटात सामील झाले. पण निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेले सरदार भाजपला सत्तेच्या लढाईत चांगली साथ देऊ शकले नाही. भाजपप्रमाणेच शिवसेनेतही निवडणुकीच्या तोंडावर जोरदार इनकमिंग झालं, अनेकांनी शिवबंधन बांधलं. पण नव्यानं पक्षात आलेले सैनिक आधीच्या शिवसैनिकांसारखे लढवय्ये निघले नाही. ऐन मोक्याच्या लढाईत नव्या सैनिकांनी कच खाल्ली. परिणामी 2014च्या तुलनेत शिवसेनेच्या जागा कमी झाल्या.

तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या. त्यामुळे आता आघाडीचे नेते आम्हीही येणार असं म्हणू लागले आहेत. काँग्रेसनं जिंकलेल्या जागांचा आकडा पाहून राहुल गांधीनांही धक्का बसला असेल. काहीही न करता काँग्रेसनं 50चा आकडा गाठला. काँग्रेसनं जरी काही केलं नसलं तरी शरद पवारांनी राज्यभर घेतलेल्या सभा, जिगरबाजपणे पावसात केलेलं भाषण याचा फायदा काँग्रेसलाही झाला. निवडणुका जाहीर होण्याच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रितपणे 40 जागाही मिळतील असं वाटत नव्हतं. मात्र शरद पवारांमुळे हवा बदलली. आघाडीचा आकडा शंभरच्या पलीकडे पोहोचला. या विजयामुळे राज्यातल्या आगामी पालिका आणि झेडपी निवडणुका सत्ताधाऱ्यांना सोप्या जाणार नाहीत. पवारांनी आघाडीत आत्मविश्वास निर्माण केला. राज्यात विरोधकांना शक्ति मिळाल्यानं सरकारवरही अंकुश राहिल. परिणामी आता सरकारला चांगलं काम करावंच लागेल. नाही तर पवारांच्या हाती असलेला आसूड सत्ताधाऱ्यांच्या पाठीवर ओढला जाईल. #संगो