Sunday, April 9, 2017

या मेसेजचं करायचं काय ?

एखादा सण जवळ आल्यावर आधी खूप आनंद वाटायचा. मात्र आता एखादा सण जवळ आल्यावर पोटात गोळा उठतो. कारण फक्त सण जवळ आला रे आला की, व्हॉट्सऍपवर शुभेच्छांचा जोरदार मारा सुरू होतो. ग्रुपमधले सगळेच सदस्य दणादण मेसेज, इमेज आणि व्हिडीओमधून शुभेच्छांचा मारा सुरू करतात. दिवस म्हणू नका की रात्र म्हणू नका, बिचारा मोबाईल टुंगटुंग वाजत मेसेजेस आल्याची वर्दी देत राहतो.
दिवाळी, दसरा, होळी, गणेशोत्सव, नवरात्री, हॅप्पी न्यू ईअर या काळात शुभेच्छांचा मारा परमोच्च शिखरावर असतो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला प्रखर राष्ट्रभक्तीसह मेसेज येत असतात. मग हे मेसेज डिलीट करायचे कधी, वाचायचे कधी अशा समस्या निर्माण होतात.
कोणत्याही धर्माचे सण त्याला अपवाद नाहीत. उगीच एकांगी वाटू नये म्हणून स्पष्ट करतो. महाशिवरात्रीच्याही शुभेच्छा नुकत्याच भक्तीभावाने दिल्या गेल्या. त्यामुळे आगामी काळात शनी अमावस्या, ग्रहण यांच्याही शुभेच्छा दिल्या जाऊ शकतात.
सणांनंतर थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी या काळातही व्हॉट्सऍपवर मेसेजचा पूर येतो. अनेक जण तर शुभेच्छांवर न थांबता महापुरूषांचे कोट्स, त्यांचे लेख फॉरवर्ड करत असतात. पण एवढं सारं साहित्य वाचायचं कधी, हा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे.
सण आणि जयंती एकवेळ समजून घेवू. पण काही मित्र आणि सहका-यांना तर असं वाटतं, जणू यांनी शुभ सकाळचे मेसेज पाठवले नाही तर सूर्यच उगवणार नाही. आता या सकाळमध्येही भगवी, निधी, हिरवी सकाळ असे विविध रंगही असतात.
सध्याच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात अनेक संस्कार हरवत चालले आहेत. याची काही व्हॉट्सऍप बहाद्दरांना जाणिव आहे. त्यामुळे आई-वडिलांचा आदर, गुरूजनांचे उपकार, मुलांना चांगलं शिक्षण या आशयाचे मेसेज पाठवले जातात. हे मेसेज जर पाठवले नाही तर समाजात उरलेली नितीमत्ता कायमचीच हरवेल अशी भीती हे मेसेज पाठवणा-यांना वाटत असावी.
आता एका दिवसावर हनुमान जयंती आली आहे. त्यामुळे सर्व व्हॉट्सऍप बहाद्दर जणू काही तेच सूर्य गिळायला निघाले या आवेशाने शुभेच्छांचे मेसेज टाकतील. हे आणि असे हजारो मेसेज वाचण्याची, सहन करण्याची आणि डिलीट करण्याची शक्ती हनुमान सगळ्यांना देवो, ही प्रार्थना.

11 comments:

  1. Sir, agdi mantle lihiley tumhi.

    ReplyDelete
  2. Kahi pahayche...kahi n phatach pudhe jayache...kahina reply dyacha.. kadhi mannat lya manat hasayche...

    ReplyDelete
  3. वस्तुस्थिती शब्दात.. अप्रतिम ☑

    ReplyDelete
  4. वस्तुस्थिती शब्दात.. अप्रतिम ☑

    ReplyDelete
  5. लैच भारी लिहलाय राव या सर्व गोष्टींचा कंटाळा आल्याने मी एक शक्कल लढवली रोजचा वापरायचं फोन साधाच ठेवलाय आणि whatsapp साठी वेगळा नंबर ठेवलाय ठराविक लोकांनाच न देतो पण तरीही हा वैताग होतोच आहे , चला सोसिल लाईफ जगायचे म्हणजे थोडे सोसलेच पाहिजे , थोडे असे थोडे तसे करून सहन करायचे

    ReplyDelete