Monday, February 3, 2014

वेड लागले मराठी सिनेमाचे


मराठी सिनेमाचं सुवर्णयुग म्हणावं असा हा कालखंड आहे. श्वास सिनेमानंतर मराठी चित्रपटाचं नवं सुवर्णयुग अवतरलं असं म्हणावं लागेल. मागील काही वर्षात आलेल्या सिनेमांनी मराठी प्रेक्षकवर्ग पुन्हा सिनेमागृहांकडे खेचला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे यात तरूणाईचा मोठा सहभाग आहे. मागील काही वर्षात आलेल्या श्वास, नॉट ओन्ली मिसेस राऊत, डोंबिवली फास्ट, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, वळू, पछाडलेला, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,  झेंडा,  देऊळ, शाळा, नटरंग, काकस्पर्श, बालगंधर्व, पांगिरा, जोगवा, 72 मैल एक प्रवास, झपाटलेला - 2 या सारख्या सिनेमांनी मराठी सिनेसृष्टीला नवी उंची प्राप्त करून दिली. दुनियादारी या सिनेमानंही कोटीच्याकोटी उड्डाणं घेतली. तरूणाईला हा सिनेमा चांगलाच भावला. त्यानंतर आलेल्या टाईमपास सिनेमानेही प्रेक्षकांची मनं जिंकली. साधी सरळ प्रेम कहाणी प्रेक्षकांना चांगलीच आवडली.
सुमारे 25 एक वर्षापूर्वीची प्रेम कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. सर्वसामान्य तरूणांना भावणारा दगडू जो खरं ते बोलतो, तो आवडला नसता तरच नवल. एमएम म्हणजे मॅरेज मटेरिअल असलेली प्राजक्ताही प्रेक्षकांना भावली. मराठी सिनेमातली गाणी आता तरूणाईच्या ओठांवर आहेत. मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांचे हाऊसफुलचे बोर्ड लागू लागले आहेत. कॉलेजमधले विद्यार्थी हे सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचं चित्र आहे. विनोदी, राजकीय, सामाजिक विषयांना स्पर्श करणा-या सिनेमातील कथा प्रेक्षकांना भावताहेत.
कॉलेजमध्ये असताना मी आणि आमचे मित्रही सिनेमा पाहायला जायचो. मात्र कॉलेजमध्ये असताना मराठी सिनेमा बघायला जाणं, फारसं नशिबी आलंच नाही. किंवा गेलो तरी तिथे गर्दी नव्हे तर ब-यापैकी शुकशुकाट असायचा. गर्दी असायची ती अजय देवगन, शाहरूख, सलमान यांच्या सिनेमांना. त्यामुळे या खानावळीचे चित्रपट (मराठी) मन मारून पाहावे लागत होते. अर्थात सर्वच हिंदी चित्रपट टुकार होते, त्यातली गाणी चांगली नव्हती, कथा चांगल्या नव्हत्या असं मुळीच नाही. मात्र अमृतातही पैजा जिंकणा-या मराठी भाषेची सर हिंदीला कशी येणार ? अपवाद म्हणून यात समावेश करता येईल तो बिनधास्त या सिनेमाचा. कॉलेजमध्ये असताना हा सिनेमा ब-यापैकी चालला होता. 'मराठीच्या कक्षा रुंदावणारा सिनेमा' अशी  त्याची जाहिरात करण्यात आली होती. यात हिरोंचं काम हिरोईननेच केलं होतं. कारण दोन मैत्रिणींची कथा त्यात असल्याने, हा छोटासा विनोद केला.
कॉलेजमध्ये असताना जास्त मराठी सिनेमा पाहता आले नव्हते. मात्र शाळेत असताना अशी ही बनवाबनवी, थरथराट, हमाल दे धमाल, धडाकेबाज, झपाटलेला हे सिनेमा गर्दी खेचत होते. लक्ष्मीकांत बेर्डेचा तो सुवर्णकाळ होता. लक्ष्याचा सिनेमा म्हणजे गर्दी  हे समीकरण होतं. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ही जोडी असली म्हणजे हास्याचे स्फोट होणारच. कोणताही अंगविक्षेप न करता विनोद करणं ही तर अशोक सराफ यांची खासियत.

शाळेत असतानाच माहेरची साडी हा सिनेमा चांगलाच सुपरहिट ठरला होता. संभाजीनगरला अंजली थिएटरमध्ये तेव्हा या सिनेमाचे सकाळी सहा वाजल्यापासून शो लावण्यात आले होते. त्या वेळी आमच्या घरी अनेक नातेवाईक मुक्कामाला आल्याचं आठवतं. गावाकडून सिनेमासाठी येणारी नातलग मंडळी थेट मुक्कामाला यायची. सिनेमा पाहून आल्यानंतर महिला वर्गानं ओल्या डोळ्यांनी केलेल्या चर्चा अजूनही आठवतात. मी आणि माझा भाऊ रवींद्र आम्हा दोघांना आईने कानाला पकडून हा सिनेमा बघायला नेलं होतं. कारण आम्हाला दोन वेळेस हा सिनेमा पाहण्यासाठी पैसे दिले होते. मात्र आम्ही तेव्हा त्या पैशातून हिंदी सिनेमा पाहिले होते. म्हणून आई-वडील आणि बहिण यांच्या कडक बंदोबस्तात आम्हा दोघा भावांना हा सिनेमा दाखवण्यात आला होता.
त्या वेळी संभाजीनगरमध्ये माहेर साडी सेंटर हे दुकानही सुरू झालं होतं. बहुतेक ते अजुनही सुरू असावं. माहेरची साडी हा सिनेमा पाहून, ज्या पित्यांचा मुलीबरोबर वाद झालेला होता. ज्यांनी मुलीचं तोंड पाहणार नाही, अशी शपथ घेतली होते. असे बाप मुलीच्या सासरी साडी घेऊन गेले, अशी चर्चा महिलांमध्ये चांगलीच रंगत होती. मात्र तो बाप कोण होता ? त्याचं नाव काय ? ही घटना कोणत्या गावात घडली ? हा तपशील मात्र कधीच समोर आला नाही.
माहेरची साडी, हा सिनेमा सुपरहिट ठरला यात वाद नाही. मात्र या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला वीस वर्ष मागे ढकललं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण या चित्रपटानंतर हळद, कुंकू, हाच बहिणीचा भाऊ, सत्यवान, सावित्री अशी एकापेक्षा एक रडपटांची लाईनच लागली होती. मराठी सिनेमापासून प्रेक्षक दुरावण्याचं हे ही एक कारण होतं. नव्वदच्या दशकात अशी रडकथा सुरू असताना चौकट राजा, कळत-नकळत, सरकारनामा या चित्रपटांनी थोडी-फार लाज राखली असं म्हणता येईल.
अर्थात कोणतीच परिस्थिती जास्त काळ टिकत नसते. या न्यायाने तो वाईट कालखंडही निघून गेला आहे. मल्टिप्लेक्सच्या जमान्यात मराठी सिनेमाही गर्दी खेचणारा ठरू लागला आहे. त्यामुळे आता हिंदी मंडळींनाही मराठी सिनेमाचं मार्केट साद घालू लागलं आहे. त्यामुळेच रोहित शेट्टी आणि शाहरूख खानला मराठी सिनेमा करण्याचा मोह झाला आहे. नव्या दमाचे दिग्दर्शक, तरूण कलाकार, नवनव्या कथा, वेगळे प्रयोग करण्याची तयारी यामुळे मराठी सिनेमा आगामी काळातही अशीच दमदार कामगिरी करेल यात शंका नाही.

No comments:

Post a Comment