Friday, April 8, 2011

नेतृत्व नसलेल्या समूहाचा नेता आणि मीडिया

देशाचा सर्व मीडिया सध्या अण्णामय झाला आहे. युपीए सरकारचा माजच अण्णांनी उतरवल्याचं स्पष्ट झालं आहे. कपिल सिब्बल, प्रणव मुखर्जी यांना नाक घासत अण्णांसमोर जावं लागलं. सोनिया गांधींनीही त्यांना उपोषण मागं घेण्याची विनंती केली. पण आपल्या मागणीवर ठाम असलेल्या अण्णांनी काँग्रेसी नेत्यांची मागणी धुडकावून लावली. समितीत दोन अध्यक्ष आणि दोन्ही पक्षांचे पाच सदस्य असावे ही मागणी त्यांनी कायम ठेवली आहे. मात्र सरकारसमोर झुकणार नाही असं स्पष्ट करताना देशातल्या नागरिकांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या भावना किती तीव्र आहेत, हेच या घटनाक्रमातून दिसून येत आहे. जंतरमंतरवर जमलेली गर्दी, मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेलं उपोषण या सह देशभरात अण्णांना पाठिंबा देण्यासाठी 'आम आदमी' उत्सफूर्तपणे रस्त्यावर उतरला आहे. ही काही काँग्रेसच्या सभेला जशी भाड्यानं माणसं आणावी लागतात तशी गर्दी नाही. हा नागरिकांच्या मनात भ्रष्टाचाराविषयी असलेला राग आहे, तो व्यक्त करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. देशात सुरू असलेली भ्रष्टाचाराची मालिका पाहून नागरिकांच्या मनात संताप निर्माण झाला होता. पण नागरिकांचा राजकीय पक्षांवरील विश्वास कमी होत चालला आहे, हे कटू सत्यही या निमीत्तानं अधोरेखीत झालं. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची घोषणा राजकीय पक्षांनी केली, पण त्यांना नागरिकांचा पाठिंबा मिळू शकला नाही. कारण आता राजकीय नेत्यांची भ्रष्टाचारांमुळं पत घसरली आहे. लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी उपोषणाची घोषणा करून, उपोषणला सुरूवात करताच देशभरातल्या नागरिकांना नेतृत्व मिळालं. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांचा संताप व्यक्त करण्यासाठी त्यांना एक माध्यम मिळालं. भ्रष्टाचाराच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे लढणा-या नागरिकांना त्यांच्या समूहांना अण्णा हजारेंच्या माध्यमातून एक नेता मिळाला.


हिंदी, इंग्रजी आणि मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियानं या जनआंदोलनाची जोरकस नोंद घेतली. बीबीसीनंही हे आंदोलन वेगळं रसायन असल्याचं स्पष्ट केलं. इजिप्त, लिबियानंतर आता भारताचा नंबर तर नाही ना ? या शंकेनं भ्रष्टाचारी नेत्यांना धडकी भरली. पण काही (विकलेले) पत्रकार, वृत्तपत्रं यांना जनतेची नाडी कळालीच नाही. अण्णांच्या आंदोलनाला आततायीपणा संबोधण्यात आलं. निवडणुकीच्या काळातच असणारा पेड न्यूजचा प्रकार आता रोजच्या बातम्यांमध्येही येऊ घातला आहे की काय ? अशी शंका आता येत आहे. कारण बातमीत बातमी न राहता मत प्रदर्शित होऊ लागलं आहे. काही (सुपारीबाज) पत्रकारांनी हे आंदोलन म्हणजे सेलिब्रिटींची प्रसिद्धीसाठीची धडपड, मेणबत्त्यावाल्यांचा स्टंट अशा प्रकारे बातम्या दिल्या आहेत. पॅकेज पत्रकारिता करणारे पत्रकार या घटनेमुळं उघडे पडत आहेत. अण्णांच्या आंदोलनाला वेगळं वळण देण्यासाठी त्यांना नेहमीप्रमाणं पॅकेज दिलं जात असेल अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.

नेतृत्व नसलेल्या समूहाला अण्णांच्या रूपानं नेता मिळाला. पण ज्यांच्याकडं समाजाला दिशा देण्याची जबाबदारी आहे अशा काही अपवादात्मक माध्यमांनी बातम्यांचा धंदा मांडला आहे. त्यामुळं अशा पोटार्थी माध्यमं आणि पत्रकारांचीही पत आगामी काळात रसातळाला जाईल यात शंका नाही.

2 comments:

  1. खूप छान लेख. मस्त

    ReplyDelete
  2. khabrilal.paper@gmail.com
    - मस्त ई-मेल आयडी आहे रे गारू तुझा...

    ReplyDelete