राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. त्याच्याच जोरावर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. छगन भुजबळांना कोणतीही 'टाळी' न वाजवता, त्यांच्या पदावरून पायउतार करण्याची किमया त्यांनी साधली आहे. याला दुस-या भाषेत टगेगिरीही म्हणायला खुद्द अजित पवारांचीही हरकत असणार नाही. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मितीच सहकारातले टगे, सोसायट्यांचे टगे, वतनदार टगे, गावागावातले गुंड आणि टगे यांना पोसण्यासाठी झालेली आहे. या सर्व टग्यांचे पोशिंदे आणि नेते अजित पवार आहेत, असं म्हणनं धाडसाचं होणार नाही.


संभाजीनगर जिल्ह्यातले कन्नडेच मनसे आमदार मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी ताफ्यात घुसले होते. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या बाचाबाचीनंतर हर्षवर्धन जाधवांना मारहाण करण्यात आली. ती मारहाण इतकी क्रूर होती की, त्यांचा पार्श्वभाग काळा-निळा पडला होता. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा गुन्हा त्यांनी केला होता. मात्र ते विरोधी पक्षाचे आमदार होते. आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने तर आचारसंहिता सुरू असताना सरकारी विश्रामगृहात तरूणीवर बलात्कार केलाय. नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानं हतबल तरूणीवर बलात्कार करण्याचे कृत्य त्यांनी केले. कायदा - सुव्यवस्थेचा आव आणणारे गृहमंत्री आर.आर.पाटील, हा वाघ अजून त्याच्या पायावर चालतोच कसा ? याचे उत्तर द्या. हर्षवर्धन जाधव सारखा याला का फोडत नाहीत ? या वाघाने केलेल्या कृत्याबद्दल त्याच्या पार्श्वभागाला हार लावून 12 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर सत्कार करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा विचार आहे का ?
वाळूमाफिया, दूधमाफिया, सहकारमाफिया,कारखानदारमाफिया,भेसळमाफिया,तेलमाफिया या सर्वांचे पोशिंदे असलेल्या या टग्यांच्या वारसदारांकडून राज्यात काहीही भ्रष्टाचारमुक्त राहिलेले नाही. आता तर त्यांनी इज्जतीवर हात घालायलाच सुरूवात केली आहे. 'टग्यांचा खरा वारसदार कोण ?' अशीच स्पर्धा राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात यापेक्षाही भयानक घटना घडू शकतील. देवा आता तूच वाचव रे बाबा. देवा तू तरी आहेस ना जागेवर ? का तूझीही या टग्यांनी भेसळ केली ?