Wednesday, January 12, 2011

मौका सभी को मिलता है !

मनसेचे संभाजीनगर जिल्ह्यातले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना झालेल्या अमानूष मारहाणीनंतर सगळीकडेच संताप व्यक्त होत होता. त्या संतापाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत तोंड फोडले. सुमारे वीस पोलीस त्यात महिला पोलिसही मागे नव्हत्या, या सर्वांनी हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केली. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी, पुढारलेल्या राज्यात बिहारला लाजवणारी घटना घडली. शिवसेनेनेही या घटनेचा निषेध केला. मारहाण झालेल्या हर्षवर्धन जाधव यांचे छायाचित्र पाहून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही संतप्त झाले होते. इतकंच नव्हे तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही या घटनेचा निषेध केला होता. अर्थात राजकीय आकसातूनच ही घटना घडली. कन्नड तालुक्यातल्या अवैध धंद्यांना वेसण घालण्याची आमदार जाधव यांची मागणी होती. त्यातून पोलीस हे चवताळलेले होते. आमदार जाधवांनी हे प्रकरण गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यापर्यंत नेले होते. मुंबईतही मतदारसंघातल्या महिलांना बरोबर घेऊन पाटलांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नेहमीप्रमाणे बोलबच्ची करणा-या पाटलांनी याही प्रकरणाची तड लावली नाही.
मात्र पोलिसांनी त्यांच्या पोटावर पाय देणा-या आमदार जाधवांना लक्षात ठेवले होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरल्याचे निमीत्त करून पोलिसांनी त्यांचे शौर्य दाखवून दिले. कारण पोलिसांच्या पोटाचा प्रश्न होता. कारण दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, अल्प पगार यात पोलिसांचे भागत नाही. त्यामुळे त्यांना दारूवाले, ट्रक ड्रायव्हर्स, बारवाले, बिल्डर्स, दुकानदार, ड्रग्जचा व्यापार करणारे, माफिया, गुंड, रेतीची विक्री करणारे, हॉटेल, ढाबेवाले यांच्याकडून हप्ते घ्यावे लागतात. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या केसेस न नोंदवता जागेवर तोडपाणी करून दोन्ही पक्षांकडूनही नाईलाजाने पैसे घ्यावे लागतात. बरं आहे, किमान यामुळे कोर्ट कचे-या वाचतात. न्यायालयावरचा ताणही वाचतो. खरंच पोलीस पैसे घेतात, पण त्रासही वाचवतात. जेवढे आठवले तेवढे या ठिकाणी लिहिले. या व्यतीरिक्त काही असेल तर सांगा, त्याचाही समावेश ब्लॉगमध्ये करू. काही पोलीस तर रेड लाईट एरियातूनही हप्ते घेतात. काय करणार ? महागाईच एवढी आहे की, बिचा-या पोलिसांना भाड घेणा-यांकडून भाड घ्यावी लागते. मात्र आमदार जाधवांवर हल्ला करताना हप्ते घेणा-या पोलिसांचे हात थरथरले नाहीत. या बद्दल त्यांना पुरस्कारच द्यायला हवा.
आमदार जाधवांवर हल्ला करणारे हेच पोलीस आता राज्यभरात अवैध धंदे करणा-यांवर हल्ला करतील. नक्षलवाद रोखतील. गुन्हेगारी कमी होईल. नाक्या - नाक्यावर ट्रक वाल्यांकडून हप्ता घेणार नाहीत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा दबदबा निर्माण होईल. अशी आशा करू यात. मात्र या निमीत्ताने 'अरारा आबा, तुमचा नाही ताबा' हेच दिसून येते. राज्यातल्या पोलीस 'खा'त्यावर त्यांचा वचक नाही. हप्तेबाजीत पोलीस दल गुंग झालंय. परिणामी राज्यभरात अवैध धंदे फोफावले आहेत. परप्रांतियांची गुन्हेगारी आणि घुसखोरी वाढली आहे. अवैध झोपड्या आणि बांधकामांचा राज्याला वेढा पडलाय. या सर्वांवर हे हप्तेखोर पोलीस तुटून पडणार आहेत का ?
गृहमंत्री आर.आर.पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जातीयवादी राजकारण तर दादोजी कोंडदेव प्रकरणात उघड झाले होते. मात्र आता तर त्यांची राजकीय अक्कलही गुडघ्यातच आहे, हेच आमदार जाधव प्रकरणातून स्पष्ट झालंय. विरोधकांना विचारांनी नव्हे तर दंडूक्यांनी संपवण्याची ही राष्ट्रवादी पद्धत असावी. नाही तरी मोठ्या पवारांनी महागाईने आम आदमी मरणाला लावलाच आहे. त्यात हे लहाने पवार हातात दंडूका घेऊन विरोधकांना संपवायला निघालेत. तर गृहमंत्री आर.आर.पाटील यांना त्यांचे खाते नेमके कशाशी खातात हेच कळत नसावे. त्यामुळे त्यांनी गुन्हेगार आणि गुन्हेगारीची सफाई होत नसेल, तर किमान राज्यात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात लक्ष घालावे. इतकंच ते करू शकतात.
'मौका सभी को मिलता है', या वेळी आघाडी सरकारला मिळालेला मौका हा मतविभागणीमुळेच मिळालेला आहे. त्यामुळेच या राज्यकर्त्यांना माज चढलाय. मात्र या राज्यकर्त्यांना हा 'मौका' का मिळाला याचा विचार राज ठाकरे कधी करणार आहेत का ?

2 comments:

  1. शाहु-फुले- आंबेडकरांचे उठता बसता नाव घेणारे हे सरकार किती जातीयवादी आणि सुडबद्धीने पछाडलेले आहे हेच मागच्या महिना भरात सर्वांसमोर आले आहे. आघाडी सरकारच्या पापाचा घडा आता भरत आलायं. येत्या निवडणुकीत ह्या नाकर्त्या सरकारला हटवून मतदार विरोधकांना 'मौका' देतील हे नक्की

    ReplyDelete
  2. खूप चांगलं लिहिलंत राव

    ReplyDelete