Thursday, May 6, 2010

शिक्षा झाली, अंमलबजावणी कधी ?

दहशतवादी अजमल आमीर कसाबला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आणि देशभरात एकच जल्लोष झाला. न्यायपालिकेनेही हा खटला त्वरेने पूर्णत्वास नेला. अनेक साक्षीदारांच्या साक्षी, उलट तपासणी या सर्व प्रक्रिया पार पाडून न्यायालयाने दिलेला निर्णय सामान्य नागरिकांना सुखावणारा होता. दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेला हा दहशतवादी म्हणजे मुंबई पोलिसांच्या असामान्य शौर्याचं प्रतीकच आहे. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या बलिदानामुळे हा क्रुरकर्मा पोलिसांच्या हाती लागला. पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा जगासमोर टराटरा फाडता आला. भारतात दहशतवादी कारवाया करून जबाबदारी नाकारणा-या पाकिस्तानचे दात या निमीत्ताने घशात घालण्यात भारताला यश मिळालं.
मात्र या कसाबला फाशी कधी देणार ? हाच प्रश्न आता सगळ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. कारण आपल्या लोकशाहीचे मंदिर असणा-या संसदेवर हल्ला घडवून आणणारा आरोपी अफजल गुरू यालाही न्यायालयाने फाशीची ठोठावलेली शिक्षा अजून पूर्णत्वास गेलेली नाही. दहशतवादाच्या गुरूवर्यांवरच अजून राष्ट्रपतींचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या कसाबचा हिसाब कधी होणार ?
कसाब या सापाला आता जिवंत ठेवून उपयोग होणार नाही. कारण मौलाना मसूद अझर याला 1994 साली श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर 1995 मध्ये काही विदेशी पर्यटकांचे अपहरण करून अझरच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती. मात्र मागणी मान्य न झाल्याने त्या पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. मात्र डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट 814 या विमानाचे अपहरण करून ते कंदहारमध्ये उतरवण्यात आलं, आणि त्या बदल्यात मौलाना मसूद अझर या सापाला सोडावं लागलं. नंतर या सापाने त्याची जात दाखवलीच. अर्थात सापाचा धर्म, दंश करणे हाच आहे. त्यामुळे तो त्याच्या धर्माला जागला. भारतीय संसदेवर त्याने हल्ला घडवून आणला. त्याआधी अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला घडवण्याच्या कटातही तो सामील होता. आणि मुंबईवरील हल्ल्यातही त्याचे नाव पुढे आले. पाकिस्ताननेही त्याच्यावर थातूरमातूर कारवाई केल्याचे दाखवले. मात्र त्या सापावर पाकिस्तानने कोणतेही आरोप ठेवलेले नव्हते.
आता पुन्हा तेच संकट घोंगावू लागलं आहे. कसाब या सापाला सोडवण्यासाठी त्याचे इतर साथीदार साप, कोणती तरी दहशतवादी कृती करण्याच्या आधीच त्याला फासावर लटकणं गरजेचं आहे. या सापाला गेट वे ऑफ इंडियासमोरच ठेचायला पाहिजे. तरच इतर सापांची वळवळ थांबेल. दहशतवाद्यांवर जरब बसवायची असेल तर अशी धाडसी कृती केल्याशिवाय पर्याय नाही. कारण काळ सोकावला तर अफजल गुरूची सुटका करण्याच्या मागणीसाठी जसे मानवाधिकारवाले रस्त्यावर उतरले होते. त्याप्रमाणे कसाबसाठीही गळा काढायला हे लोक कमी करणार नाहीत.

1 comment:

  1. या ब्लॉगमध्ये खमंग फोडणी नाही ? असो पुन्हा एकदा ब्लॉगविश्वात आपले स्वागत..आता मागील अनुशेष भरण्यासाठी जोरात कामाला लागा ह्याच शुभेच्छा

    ReplyDelete