Friday, January 8, 2010

नारायणा, कोणता झेंडा घेऊ हाती ?

अखेर शुक्रवारी झेंडा फडकलाच नाही. मराठी सिनेमाला कित्येक वर्षानंतर चांगले दिवस आले आहेत. चक्क रिलीज होण्याआधीच सिनेमांचे बुकींग होऊ लागलं आहे. नटरंगच्या यशानंतर चित्रपटसृष्टीत आश्वासक वातावरण निर्माण झालं. अवधूत गुप्तेंचा झेंडा चांगलाच फडफडणार, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली होती. मात्र नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी सदा मालवणकर या पात्रावर आक्षेप घेतला आणि प्रदर्शनाकडे जाणारा झेंडा उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र या घटनेमुळे राज्यात आता तिसरं 'शक्तीपीठ' निर्माण झालं आहे, या विषयी शंका बाळगण्याचं कारण आहे. पहिलं 'शक्तीपीठ' अर्थातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे. तर दुसरं 'शक्तीपीठ' हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आहेत. तर आता राणे फॅमिली हे तिसरं 'शक्तीपीठ' आता उदयाला येतंय. पाणी प्रश्नावरून काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर 'स्वाभिमान'चे उपद्रवमुल्य लक्षात येऊ लागलं होतं. त्यावेळी मिळालेली प्रसिद्धी ही आता झेंडाच्या मुळावर आली, असं आता म्हटलं तरी वावगं होणार नाही. मात्र अवधूत गुप्ते यांनी शिवसेना किंवा मनसेच्या नेत्यांनाही सिनेमा दाखवण्याची गरज नव्हती. या दोन्ही पक्षांना हा सिनेमा दाखवल्याने नितेश राणे यांना त्यांचे उपद्रवमुल्य दाखवून देणं गरजेचं होतं. आणि त्यातूनच त्यांना हा सिनेमा दाखवला गेला. आणि यातून शेवटी जे त्यांना हवं होतं, असाच निर्णय घेण्यात आला.
आता नितेश राणे यांचे वडिल नारायण राणे हेच स्वत: सरकारमध्ये महसूल मंत्री आहेत. सरकारचे कार्य हे संरक्षण देणे हे आहे. आणि सरकारमधीलच एका जबाबदार मंत्र्याचा मुलगा तोडफोडीची भाषा करत असेल तर मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काय फक्त तमाशा बघण्याची भूमिका घेणार आहेत का ? नितेश राणे यांनी तर एका वृत्तवाहिनीच्या संपादकाला कोकणात रक्तबंबाळ केल्याची आठवणही करून दिली. यावरून राणे यांनीच हे कृत्य केल्याचे पुन्हा सिद्ध होते. या फोनोवरून नितेश राणे यांच्यावर पोलीस काही कारवाई करू शकतील का ? कारण त्यांनी पुढे बोलताना अवधूत गुप्तेंना हा सूचक इशारा असल्याचंही म्हटलं होतं.
आता उद्धव ठाकरे यांनीही झेंडाला विरोध करणा-यांना दांडा दाखवा अशी भूमिका घेतली आहे. मात्र चित्रपटाचे निर्माते अवधूत गुप्ते यांनीच पडती भूमिका घेतल्याने राज्यात कायद्याचे राज्य किती उत्तम प्रकारे चाललेलं आहे, हेच सिद्ध होत आहे. शिवसेनेचा राज्यातला जनाधार कमी होत असल्याने त्यांना महत्व देण्याची गरज नाही, असं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं होतं. शिवसेनेला कमी मतं मिळाल्याने त्यांच्यावर काढलेला हा चित्रपट चालणार नाही, असंही त्यांचं म्हणनं होतं. बरं मग हा चित्रपट चालणार नव्हता तर त्याला आक्षेप घेण्यासारखं तरा काय होतं ? नितेश राणे यांनी हा नियम त्यांच्या वडिलांनाही ही लागू करायला काय हरकत आहे. कारण शिवसेनेतून नारायण राणे फुटले तेव्हा त्यांच्या बरोबर त्यांनी 30 ते 40 आमदार असल्याचा दावा केला होता. मात्र राजीनामा देणा-यांची संख्या तेवढी नव्हती. गत सरकारमध्ये त्यांच्यामागे किमान आठ ते दहा आमदार होते. आता तर नारायण राणे यांच्यासकट पाचही आमदार त्यांच्यामागे नाहीत. मग नारायण राणे यांचाही जनाधार कमी झाला, असं सिद्ध होतं.

खमंग फोडणी - राणे फॅमिली ही आता राज्यात म्हणजे सध्या कोकणातील काही भाग आणि मुंबईतील काही भागात 'शक्तीपीठ' म्हणून पुढे येत आहे. नारायण राणे यांचे एक चिरंजीव सध्या खासदार आहेत. अर्थात निवडून आले तेव्हा ते खासदार झाल्याचं कळालं. त्यानंतर त्यांनी कोणती कामे केली हे त्यांना कुणी विचारलं नाही. आणि अर्थात त्यांनीही ते सांगितलेलं नाही. दुसरे चिरंजीव सध्या स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून मुंबईत धुमाकूळ घालीत आहेत. त्यामुळे ही तिहेरी शक्ती राज्यात पुढे येऊ शकते. हे अवधूत गुप्ते यांनी जाणायला हवं. आणि आता त्यांनी नव्या चित्रपटाची निर्मिती करावी. त्यासाठी नारायणा, कोणता झेंडा घेऊ हाती ? हे शिर्षक घ्यावं. म्हणजे किमान कुणाचा नसलेला स्वाभिमान तरी दुखावणार नाही.

5 comments:

  1. ब्लॉग छान लिहलाय....तसं पाहता झेंडा कुणाच्या हातात देण्याचा प्रश्नच नाही..अवधूतनं स्वत:चा स्वाभिमान राखत हा झेंडा हाती घेत दिमाखानं फडकावयाला हवा...तरच गुंडगिरीचा स्वाभिमान बाळगणा-यांना चपराक बसेल.

    ReplyDelete
  2. blog changla lihila ahe...shirshak ajun chagle have karan santosh goren kadun amhala hatke headline chi apeksha aste. sena, mns nantar ata senetilach tisari shakti samori yete ahe. he ya blog madhil vishesh ahe...he blog phude pustak rupane lokana wachayla milavet...hi apeksha...\

    ReplyDelete
  3. हा ब्लॉग कदाचित घाईगडबडीत लिहलेला असावा. त्यामुळे अनेक मुद्दे राहून गेलेत. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी फक्त सेन्सॉरच्या सर्टिफिकेटची गरज असते. राजकीय सेन्स़रशीप नाही. ही राजकीय सेन्सॉरशीप आपल्या कलाकरांनीच सुरु केली. काय वाट्टेल ते होवो राजकीय नेत्यांना प्रदर्शनापूर्वी परवानगीसाठी शो दाखवणार नाही. अशी भूमिका कलाकारांनी घ्यायला हवी. कलाकार यावर ठाम राहिले तरच असे कोणते प्रति सेन्सॉर तयार होणार नाही

    ReplyDelete
  4. chan aahe aaplya unchi prmanech (shrarik ha, veggla aarath nako)mojkya shbdat sarva
    kahi......nahitari ranen chya swabhiman vishai lihinya sarkhe kahich nahi ...

    ReplyDelete
  5. Hi garu, tuza blog mi vachato. chan lihatos..go ahed.. pan rane is tisare shaktipith. it may be half shaktipith if consider three n half shaktipith..

    ReplyDelete