Saturday, November 21, 2009

शिवसेना आणि वागळे

अखेर शिवसेनेने निखील वागळे यांच्यावर हल्ला केलाच. एक जबाबदार पक्ष असलेल्या आणि स्वत:चे मुखपत्र चालवणा-या शिवसेनेने पत्रकारावर हल्ला करावा ही घटना निषेध करावा तितका कमीच अशी आहे. निखील वागळे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेविषयी केलेली मते जर शिवसेनेला पटत नसतील तर त्यांनी लोकशाही पद्धतीने निषेध करायला हवा होता. विधानसभा आणि लोकसभेतही शिवसेनेचे आमदार, खासदार आहेत. राज्य आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहातही हा प्रश्न मांडता आला असता. मात्र शिवसेनेनं एखाद्या प्रश्नावर डोकं लावण्यापेक्षा डोकी फोडण्याची सोपी आणि पक्षाची मूळ भूमिका घेतली. मात्र ही भूमिका त्यांच्या पक्षाच्या लोकप्रियतेच्या मूळावर येवू शकते. कारण माध्यमं ही जशी प्रतिमा घडवतात तशीच ती प्रतिमाही बिघडवतात.
खुद्द निखील वागळे यांनीच त्यांच्या आजचा सवाल कार्यक्रमात सांगितलं की, त्यांच्यावर झालेला हा नववा हल्ला आहे. आता हा मुद्दा अभिमानाने सांगावा की त्यावर आत्मचिंतन करायचं, हे वागळेंनीच ठरवायला हवं. वागळे ज्या कार्यक्रमांचं अँकरींग करतात त्यात आक्रस्ताळेपणा किती असतो, हे ही त्यांनी बघायला हवं. राजकीय नेत्यांचा उपमर्द करण्यात वागळेंना आनंद मिळत असावा. मात्र शिरीष पारकरांनी ऑन एअर निखील वागळेंना शिकवलेला धडा अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. बातमी लिहताना त्यात बात असावी त्यात 'मी' नसावा. हे प्रिंट मीडियातील साधं तत्व आहे. टेलिव्हिजन मीडियातही हा नियम लागू करायला हरकत नसावी. किंवा तो नियम सगळेच पाळतात. मात्र निखील वागळेंच्या कार्यक्रमात बात कमी आणि 'मी' च अधिक असतो. तासभर बडबड करणारे वागळे पाहुण्यांना तीस सेकंदात मुद्दा मांडायला सांगतात, हे काही पटणारं नाही. निखील वागळे यांना त्यांची समाजवादी विचारधारा आणि शिवसेना विरोध यासाठीच आयबीएन लोकमतमध्ये रहायचे आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. निखील वागळे यांनी मनसेने परप्रांतियांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर मनसेवरही असाच हल्ला चढवला होता. तेव्हाही जनमत हे वागळेंच्या विरोधात गेले होते. मनसेवर होणारी टीका नवा हल्ला घडवते की काय अशी भीती तेव्हा व्यक्त करण्यात येत होती. तेव्हा जे घडले नाही, ते यावेळी घडले.
आयबीएन लोकमतवर झालेला हल्ला हा पत्रकारितेवरील हल्ला मानावा तरी कसा ? निखील वागळेंचे शिवसेने बरोबर असलेले भांडण हे त्यांचे वैयक्तीक भांडण असावे अशी शंका येते. चूका वागळेंनी करायच्या आणि हल्ला झाल्यावर हा पत्रकारितेवरील हल्ला अशी आरोळी ठोकायची. आणि इतर पत्रकारांनी गुमानपणे त्यांच्यात सामील व्हायचं. आता या वैयक्तीक भांडणातून मीडियाने दूर होण्याची वेळ आली आहे. कारण शिवसेना आणि निखील वागळे यांचे हे वैयक्तीक भांडण आहे. यात पत्रकारितेला वेठिस धरण्याची गरज नाही. देशात आणि राज्यातही इतर अनेक पत्रकार आहेत. ते ही शिवसेनेवर टीका करतात. मात्र सगळ्याच पत्रकारांवर काही हल्ले होत नाहीत. टीका करण्याचीही एक पद्धत असते. दुस-यांना शिव्या घालण्याऐवजी समंजसपणे भाषा वापरली तरी संवाद साधता येतो.

खमंग फोडणी - शिवसेना आणि निखील वागळे यांना वेगळे करता येणं शक्य नाही. महानगर आणि शिवसेना या इतिहासाची या निमीत्ताने पुनरावृत्ती झाली आहे. निखील वागळेंनी शिवसेनाप्रमुखांवर टीका करायची, शिवसैनिकांनी महानगरवर हल्ला करायचा. ही जूनी पद्धती पुन्हा नव्याने वापरात आली. शिवसैनिकांनी आयबीएनवर हल्ला केला. निखील वागळेंना पुन्हा बोलण्याची संधी मिळाली. शिवसेनेलाही आपसूक प्रसिद्धी मिळाली. मार खाणारेही मोठे झाले आण मारणारेही मोठे झाले. दोघांचाही फायदा. शेवटी शिवसेना आणि निखील वागळे हेच म्हणत असणार की, 'दुश्मन असावा तर असा...'

3 comments:

  1. निखिल वागळे म्हणजे पत्रकारिता नाही ही गोष्ट बरोबर आहे. शिवाय दोन्ही बाजू लोकांसमोर मांडणे ही वस्तूस्थिती विसरल्यावर एकांगीपणा येतो. त्याच एकांगीपणाचा अतिरेक झाल्यावर एक विशिष्ट प्रतिमा तयार होते आणि त्यातूनच हल्ले होतातच. उदा. आयबीएन हिंदी वाहिनी पूर्वी निखिल वागळेंना शिवसेना विरोधी म्हणूनच टॉक शो मध्ये आमंत्रित करीत होती.

    ReplyDelete
  2. मात्र शिरीष पारकरांनी ऑन एअर निखील वागळेंना शिकवलेला धडा अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे.

    याबद्दल सविस्तर लिहिलं तर अधिक उत्तम.

    विचारांशी सहमत.

    ReplyDelete
  3. ह्या प्रकरणावर लिहणा-या व्यक्तींमध्ये सरसळ सरळ दोन तट आहेत. एक शिवसेनेवाला..दुसरा आयबीएनवाला.आपण दोन्ही बाजूंना चांगला न्याय दिलाय.चांगला चापही दिलाय..TRUTH ONLY हे नाव केवळ फॅशन करता आपण घेतलेले नाही.हे या लेखातून दाखवून दिले आहे.

    ReplyDelete