Wednesday, August 26, 2009

वाहिन्यांचा वाह्यातपणा

सोनी वाहिनीवर प्रसारित होणा-या 'इस जंगल से मुझे बचाओ' या कार्यक्रमाचा सोमवारी (24/08/09) रात्री साडे सात वाजता एक भाग दाखवण्यात आला. हा भाग 15 ऑगस्ट रोजी प्रसारित करण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनानिमीत्त दाखवलेल्या या भागात सहभागी झालेल्या कलाकारांनी स्वातंत्र्याविषयी त्यांची मतं व्यक्त केली. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद त्यांनी अंगावरील कपडे काढत व्यक्त केला. कपडे काढणं हे ही स्वातंत्र्य असल्याचे मौलिक विचारही त्यांनी मांडले. एकंदरीत या कार्यक्रमातील कलाकारांचे संवाद हे बीपच्या रूपातच ऐकू येतात. त्यामुळे त्यांचा दर्जा काय असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अगदी झोपडपट्टी टाईप शिव्या देणारे कलाकार आणि त्यांचे कपडे बघून जंगलातील प्राण्यांवर इस प्रोग्रामसे हमे बचाव असं म्हणण्याची वेळ येवू नये म्हणजे मिळवलं. यात सहभागी झालेल्या महिला कलाकारांना काही अभिनयाचे अंग असेल असं जाणवत नाही. त्यामुळे या कलाकार आहे तेच 'अंग' अभिनय म्हणून सादर करत असाव्यात. असो.
दुसरा एक हिट प्रोग्राम म्हणजे स्टार प्लस वरील 'सच का सामना'. या कार्यक्रमावरून तर संसदेतही गदारोळ झाला होता. भारतीय संस्कृतीला हा कार्यक्रम शोभणारा नाही, अशी एकसूरात सर्व पक्षीय खासदारांनी तक्रार केली होती. तर दूरचित्रवाणीवरील कलाकारांनी खासदार संसदेत गोंधळ घालतात, काही खासदार हे गुन्हेगार आहेत अशा शब्दात त्यांच्यावर पलटवार केला होता. या वेळी 'दिवार' चित्रपटातला 'भाई तूम साईन करोगे या नहीं' हा सीन डोळ्यासमोर उभा राहतो. अमिताभ आणि शशी कपूर मधील या संवादाचा शेवट निरूपा रॉयच्या संवादाने होतो. तो संवाद म्हणजे 'दुसरों के पाप गिननेसे तूम्हारे अपने पाप कम नहीं होते,' या कलाकार आणि खासदारांधील वादावर ही मात्रा योग्य ठरते, नाही का? 'सच का सामना' हा कार्यक्रम रात्री उशिरा दाखवला जातो, तेव्हा मुले झोपतात असा दावाही कलाकारांकडून करण्यात आला. त्यांची स्वत:ची मुले तरी रात्री अकराच्या आधी कधी झोपतात का? हे त्यांनी सांगायला हवं. एकंदरीतच या कार्यक्रमाचे स्वरूप, त्यात विचारले जाणारे प्रश्न अत्यंत व्यक्तीगत स्वरूपाचे असतात. तरीही हा कार्यक्रम का बघितला जात असावा. तर त्यामागे आहे ती मूळ मानवी प्रवृत्ती. आणि तिचं सार एका म्हणीत सांगता येईल ते म्हणजे, 'आपलं ठेवायचं झाकून अन....'
एनडीटीव्ही इमॅजिनच्या 'राखी का स्वयंवर' या कार्यक्रमानेही अशीच राळ उडवून टीआरपी पदरात पाडून घेतली. ( वादाचा दुसरा पदर तो असा. ) यातून या वाहिन्यांची दुटप्पी भूमिका अधोरेखीत होते. एकाच ग्रुपच्या या वाहिन्या असतात. त्यातील मनोरंजन वाहिनी ही वाद निर्माण करणारे कार्यक्रम तयार करून प्रसिद्धी आणि टीआरपी मिळवते. त्यानंतर याच ग्रुपमधील दुसरी बातम्यांची वाहिनी ( न्यूज चॅनेल ) त्या कार्यक्रमासंबंधीच्या बातम्या आणि चर्चात्मक कार्यक्रम सादर करून टीआरपी म्हणजेच जाहिरातींचा मलिदा मिळवते. म्हणजे 'चित भी मेरी और पट भी मेरी' असा हा प्रकार. आणि पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांचीच टिमकीही जोरात वाजवली जाते.
'बालिका वधू' मालिकेवरूनही संसदेत मोठा गदारोळ झाला होता. या मालिकेने तर आधूनिक 21 व्या शतकाचा वध केला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये. कलर्स वाहिनी सुरू झाली तेव्हा या मालिकेने चांगलेच रंग उधळले होते. मात्र त्यांनी आता उधळलेले हे गुण आचंबित करणारे आहेत. या वाहिनीनेही मालिका + वाद = टीआरपी, हे गणित चांगल्या प्रकारे जुळवून आणल्याचं दिसून येतं.
आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली वाहिन्यांचा वाह्यातपणा कितपत खपवून घ्यायचा यालाही मर्यादा असायला हवी. मात्र शेवटी काय तर 'ठेविले चॅनेल तैसेची रहावे, हाती असू द्यावा रिमोट' असं म्हणायचं आणि शांत बसायचं. कारण आता दर्शकांच्या हाती दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही.

खमंग फोडणी - रिएलिटी शो सादर करणा-या या वाहिन्यांसाठी एक छान संकल्पना आहे. जास्त दूर नाही मुंबईतच ( या वाहिन्यांची ऑफिसेस येथे आहेत यासाठी ) लोकल्समध्ये गाणे गावून मिळणा-या पैश्यातून अनेक जण उपजिविका भागवतात. 'शिर्डी वाले साई बाबां', 'केशवा माधवा', 'बहारो फुल बरसावो' या प्रकारची अनेक गाणी ते सादर करतात. यातील पंधरा ते वीस गायक - गायिका निवडून त्यांच्या गायनाचा रिएलिटी शो सादर करा. त्यावर एसएमएस मागवा. आणि होवून जाऊ द्या एक मोठा ग्रँड फिनाले. काय म्हणता चॅनेल्सवाले, है क्या दम ?

2 comments:

  1. गारू, आपल्या लेखणीला छार आल्यामुळेच आपण वाहिन्यांवरही त्याचे फटकारे मारलेत. हे बरे झाले. त्याचबरोबर दुसरीकडे आपण झी टीव्हीवरी अगले जनम...ची दास्तां बयाँ केली असती तर ती देखील त्याची दुसरी बाजु ठरली असतील. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय टीव्हीवरील कार्यक्रमांना व्यवस्थित सेन्सॉर करू शकलेले नाही. किंबहुना त्यांच्याकडे तशी यंत्रणाच नाही. त्यामुळे हे सर्व गोंधळ उडत आहेत. अच्छा... बाकी यातील एक वाक्य तर अप्रतिम आहे. ते म्हणजे - या मालिकेने तर एकवीसाव्या शतकाचा वध केला. - अशा प्रकारचे वाक्य लिहिण्याची हातोटी केवळ सरावाने आणि नियमित वाचनाने, चिंतनाने मिळते.

    ReplyDelete
  2. समाजातील काही टक्के प्रेक्षकांसाठीच सध्या या वाहिन्या काम करतात असे चित्र आहे.इलेक्ट्रॉनिक मिडीयात राहून या माध्यमातील वाह्यातपणावर थेट शब्दात टीक आपण केलीय.ही नक्कीच समाधानाची बाब आहे.

    ReplyDelete