Friday, February 20, 2009

हे पक्ष गुंडांचे, हे पक्ष पुंडांचे, गँगस्टर गुन्हेगार नांदो हे राष्ट्र माफियांचे

लोकसभेच्या निवडणुका आता लवकरच जाहीर होणार आहेत. त्यानंतर चार - पाच महिन्यात राज्यातही निवडणुका होतील. लोकसभा आणि निवडणुका या गुन्हेगारांसाठी गंगा स्नान करून पवित्र होण्याची संधी, असल्याने मोठ्या प्रमाणात गुन्हेगार आता राजकीय पक्षांमध्ये सामील होतील.
अर्थात समान्य मतदार हा लोकशाहीला कलंक मानतील. शेवटी सामान्य माणसं ही सामान्यच विचार करणार नाही का? गुन्हेगारांचे राजकारणात येने ही लोकशाहीच्या सबलीकरणासाठी योग्य मार्ग आहे. प्रबळ गुन्हेगार राजकारणात आल्यानं लोकशाही सशक्त होणार आहे, यात आता शंका बाळगण्याचं कारण नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात नाही का देश स्वातंत्र्य व्हावा यासाठी नेते तुरूंगात जात. तुरूंगात गेल्यानंतर त्यांना जनता पाठिंबा देई. होय लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातही हाच फॉर्म्युला वापरल्यानं हा चित्रपट लोकप्रिय झाला. महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून इंग्रज सरकारला जेरीस आणलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
राजकारणात येणा-या गुन्हेगारही गांधीवादी आहेत. पण त्यात थोडा फरक आहे. हे गुन्हेगार खून, दरोडे, बलात्कार, खंडणी, गुंडगिरी, तस्करी यासारखे कार्य करतात. म्हणजेच ते सविनय कायदेभंग नव्हे तर विनयभंग टाईप गांधीगिरी करतात, त्या मार्गातून तुरूंगात जातात. आणि राजकारणात येण्याची पात्रता मिळवतात. अर्थात हे करताना त्यांना थोड्या - फार यातनाही होत असतील, पण काय करणार कुणी तरी म्हटलंय ना जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.
तेव्हा लोकशाहीच्या सबलीकरणासाठी गुन्हेगार, कलंकित सिनेस्टार, मॅच फिक्सींग करणारे क्रिकेटपटू, बॉम्बस्फोटातील आरोपींना सोडविणार वकील, गँगस्टर, छोटे - मोठे गुन्हेगार लवकर राजकारणात प्रवेश करा. कारण आता तुम्हीच या राष्ट्राचे तारणहर आहात. दाऊद इब्राहीम राजकीय नेत्यांना पैसा पुरविणार आहे. तेव्हा या संधीचा लाभ घ्या.
सामान्य नागरिकांनो डोळे पांढरे करू नका. अबू सालेम, अरूण गवळी, संजय दत्त, अझरूद्दीन, माजीद मेमन, अबू आझमी, राजाभैय्या, लतिफ, सूर्यभान आणि या सारखीच जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एकापेक्षा एक साहस केलेली ही नरांची खाण आपल्या देशाचं नेतृत्व करायला सिद्ध झालीय. गुन्हेगारांनी राजकीय पक्षांना पैसा पुरविण्याऐवजी स्वत:च देश चालवायला घेतला तर त्यात वावगे ते काय?
गुन्हेगार सत्तेत आल्यानंतर शहरात कोणतीही जागा शिल्लक ठेवणार नाहीत. या माध्यमातून अनेकांना घर मिळेल. शस्त्रास्त्रे विनासायास मिळाल्याने प्रत्येक जण स्वत:च संरक्षण करू शकेल. अंमली पदार्थ सर्रास उपलब्ध झाल्यानं डोक्याला विचार करायला संधी मिळणार नाही, त्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही. हे सर्व गांधीवादी पाचशे किंवा हजाराच्याच नोटा स्वीकारतील त्यामुळे सामान्य नागरिकांची सुट्टया पैशांची समस्याही सुटेल. हे गुन्हेगार स्वत:चे संरक्षण करण्यास समर्थ असल्याने पोलीस विभागाचाही खर्च वाचेल.
हे काँग्रेस, भाजप,बसपा,सपा पक्षांनो सर्व गुन्हेगारांन सामावून घेण्याचं काम करत आहात. गंगा नदीप्रमाणे तुम्ही त्यांची पापे धुवून टाकत आहात. त्यामुळे सामान्य नागरिकांनी गंगेत स्नान करण्याऐवजी तुमच्या कार्यालयात स्नान करणे योग्य ठरेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत सर्व गुन्हेगारांनो तुम्ही निवडून या हा देश हे राज्य चालवा तरच पाकिस्तान सारख्या राष्ट्राला आपली जरब बसेल. दहशतवादी भारतात प्रवेश करायला घाबरतील. देशात कुठेही परकीय हल्ले होणार नाहीत. तेव्हा गुन्हेगारांना लवकर सत्ता हाती घ्या आणि हा देश परकीय भयातून मुक्त करा.
हे राष्ट्र गुंडांचे आणि माफियांचे होवो, यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करायचे असतील त्यांना यश येवो. हीच सदिच्छा.
वर लिहीलेलं पटतंय. होय असल्यास ,थांबा पुढील वाचू नका.
पटत नसेल तर 24 तास डोळे उघडून नीट बघत सत्य आणि सत्यच सांगा. तरच देश वाचेल आणि आपण जग जिंकू. पत्रकारांनो आता तुमचीही कसोटी आहे. गुन्हेगारांना रोखा नसता भविष्यात सगळ्यांनाच क्राईमच्याच बातम्या कराव्या लागतील.

3 comments:

  1. छान ब्लॉग आहे...शिर्षक तर कॅची आहेच शिवाय ब्लॉगमध्ये उपरोधीक भाषेचा छान वापर करण्यात आलाय.

    ReplyDelete
  2. गोरे सर.......... कट टू कट शब्दांची चांगली वीण गुंफली आहे. झकास आपल्याला आवडला......असेच लिहीत चला.......आम्हाला आपला मार्ग आवडला....

    ReplyDelete
  3. राजकारणाचं खरं रूप या लेखातून स्पष्ट झालयं. तसंच, अगदी मुद्देसुद लिहल्यामुळे त्याला एक लिंक मिळाली आहे...निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर असा लेख खरोखरच मतदारांसाठी एक योग्य मार्गदर्शन ठरू शकेल....

    MADHURAA SURPUR

    ReplyDelete