Monday, February 16, 2009

नाचा, गा, आणि हसा, सामाजिक प्रश्न विसरा

टीआरपी. होय हीच ती तीन शब्द ज्याच्यासाठीच वाहिन्या काम करताहेत, याविषयी आता शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि ते ही खरंच आहे, म्हणा एवढा पैसा गुंतवला ( आता तो काळा की पांढरा हे मात्र विचारू नका) म्हटल्यावर तो मार्केटमधून मिळवावा लागणारच. त्यासाठी जे लोकांना आवडतं ते आम्ही देतो असं म्हणत वाहिन्यांवर सध्या वेगवेगळ्या प्रकराचे मनोरंजनाचे कार्यक्रम दिसताहेत. अर्थात यात हिंदीच्या बरोबरीने प्रादेशिक वाहिन्याही आघाडीवर आहेत.
मराठीचा विचार केला तर झी मराठीवरील सारेगमपच्या लिटील चॅम्प्सची अफाट लोकप्रियता वाहिन्यांच्या विश्वात ऐतिहासिक अशीच म्हणावी लागेल. त्याशिवाय या आधीच्या त्यांच्या सेलिब्रिटी, स्वप्न स्वरांचे नव तारूण्याचे या कार्यक्रमांनाही प्रतिसाद मिळाला होता. तसंच हास्यसम्राटचे दुसरे पर्वही पार पडले. त्याशिवाय आम्ही सारे खवय्ये, आदेश भावोजींचे होम मिनीस्टर. शहरी मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या पचनी पडणा-या मालिका येथे सुरू आहेत.
टीव्हीवरील कॉमेडी एक्सप्रेसमध्ये 'बेंचोवर उभा राहा' या शब्दाभोवतीचे विनोद सातत्याने रिपीट होतात. तसंच रंगतदार मेजवानीच्या माध्यमातून जेवायलाही घालतात. 'चार दिवस सासूचे' मालिकेत उद्योगपती आणि राजकारणी यांच्याशी सामान्यांचा कधी संबंध येत नाही, अशी कथानके अजूनही सुरू आहेत.
बाकी स्टार प्रवाह च्या मालिकाही श्रीमंतांची गुलामगिरी सोडायला तयार नाहीत.
हिंदीमध्येही सारेगमप, बुगीवुगी, 9 X वरील डान्स शो, इंडियन आयडॉल, व्हाईस ऑफ इंडिया, नच बलिये,लाफ्टर शो या सारखे कार्यक्रम विविध वाहिन्यांवर सुरू आहेत. अबाल - वृद्ध या कार्यक्रमात सहभागी होताहेत. लहान मुलेही मोठ्यांना चाट पाडतील असे विनोद सांगताहेत.
आता प्रश्न पडतो तो सामान्यांना या कार्यक्रमांची गरज आहे का? मालिकांमधील श्रीमंती, त्यांची लफडी, विवाहबाह्य संबंध यातून समाजाचं कोणतं प्रबोधन होतंय?
टीआरपीच्या मागे लागत सामान्यांना फक्त नाचायला आणि दात काढायलाच लावणार आहात का? या वाहिन्यांना जर नाचणे, गाणे आणि हसणे एवढंच कळत असेल तर त्यांच्या सामाजिक जाणिवा या नक्कीच संवेदनाहिन आहेत, असं म्हणावं लागेल. समाजाच्या समस्या, सामान्यांचे जीवन हे या वाहिन्यांमधून प्रतिबिंबीत होत नाही. हमलोग, नुक्कड, गुल गुलशन गुलफाम,रजनी, तमस या सारख्या मालिका आजही बघायला आवडतील. मात्र वाहिन्यांची तेवढी बौद्धीक क्षमता नाही की काय असा प्रश्न निर्माण होतोय. तुमच्या वाहिन्यांवरील श्रीमंतीशी सामान्यांना घेणे नाही. त्यांना काही सकस मालिका, संदेश देण्याची पात्रता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.
देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आपल्या राज्यात होताहेत. त्या विषयी मराठी मनोरंजन वाहिन्यांवर एकही मालिका झाली नाही, हा वाहिन्यांवरील कलंक आहे. नाचणे, गाणे, दात काढणे या पलिकडेही विषय आहेत. शेतक-यांच्या आत्महत्येला टीआरपीमध्ये तोलू नका. तो प्रश्नही वाहिन्यांवर दिसला पाहिजे. शेतकरी नसेल टीआरपी देत, पण त्याने पिकविलेलेच अन्न तुमच्या पोटात जाते, हे तरी तुमच्या बुद्धीला पटत असेल तर त्यादृष्टीने काही करता येत असेल तर बघा.
आणि सगळ्यात शेवटी मनोरंजन वाहिन्यांनो तुम्ही नर्तक,गायक, हास्यकलाकार घडवाच. पण त्याच बरोबर माणूसही घडवता येईल या दृष्टीने प्रयत्न करा,प्रेक्षकही तुम्हाला साथ देतील. तुम्ही सुरूवात तर करा...

1 comment:

  1. सर्वच संवेदनशील व्यक्तींना अस्वस्थ करणा-या व्यक्तींना भेडसावणा-या विषयाला या ब्लॉगमध्ये हात घातलाय.संतोषजी स्वत: इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करत असूनही त्यांनी या माध्यमातल्या वस्तुस्थितीचं तटस्थपणे विश्लेषण केलं आहे.संतोषजी सारख्या व्यक्ती माध्यमात वाढल्या तरच या प्रकारच्या घटना थांबू शकतील.

    ReplyDelete