Saturday, January 15, 2022

आरोग्य आणि मनाचा 'योग'!

 


कोरोनाचा धोका कधी वाढतो तर कधी कमी होतो. ही परिस्थिती किती दिवस कायम राहिल हे सांगता येत नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपलं शरीर सज्ज असणं हीच आता मोठी गरज बनली आहे. त्यामुळे साधी, सरळ आणि कोणालाही करता येणारी योगासनं नक्की करा. सध्याच्या काळात त्याची नितांत गरज आहे. मागील वर्षी मला कोरोना झाला होता. त्यानंतर मी योगासनांकडे गांभीर्यानं वळलो. त्या आधी योगासनं करायचं मात्र त्यात सातत्य नव्हतं. आता दोन वर्षांपासून योगासनांमध्ये सातत्य असल्यानं त्याचे फायदे मला नक्कीच जाणवत आहेत. अर्थात त्यामुळे योगासनांकडे गांभीर्यानं नको तर आनंदाने वळा.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी योगासनं करून प्रतिकारशक्ती वाढवता येते. योगासनांमुळे शरीर आजारांशी समर्थपणे सामना करू शकतं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मन आनंदित राहण्यासाठी योगासनं करणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट असल्यास आपलं शरीर आजारांविरोधात लढण्यास सक्षम असते. गंभीर आजारांचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला सुरक्षा कवच प्रदान करण्याचं कार्य करते. जेणेकरून कोणत्याही आजाराचा संसर्ग सहजरित्या आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. दैनंदिन जीवनात व्यायाम, योगासने आणि प्राणायम करण्यासाठी वेळ काढणं आवश्यक आहे. 

वीरभद्रासन आणि त्यातील काही प्रकार शरीरासाठी लाभदायक आहेत. यामुळे हृदयास योग्य रक्तपुरवठा होतो. यामुळे शारीरिक ऊर्जा वाढण्यास मदत होते. यामुळे शरीर आजार-रोगांविरोधात सक्षमरित्या लढू शकतं. शिवाय, या आसनाच्या सरावामुळे छातीचे स्नायू, मान आणि पाठीचा कणा ताणला जातो. यामुळे अवयव बळकट होतात. नौकासन, वज्रासन, भुजंगासन, सर्वांगासन, हलासन, धनुरासन ही आसनं सोपी आहेत.

प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी त्रिकोणासनही फायद्याचं ठरतं. त्रिकोणासन केल्यानं शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होतो. या आसनामुळे कमरेचे स्नायू लवचिक आणि मजबूत होतात. पाय, गुडघे, पोटऱ्या, हात, खांदे आणि छातीचे स्नायूंना चांगला ताण मिळतो. मन, मेंदू, मज्जासंस्थेचं आरोग्य सुधारते. महत्त्वाचे म्हणजे मानसिक आणि शारीरिक समतोल प्राप्त होतो.

योगा म्हणजे भारतानं जगाला दिलेला अनमोल ठेवा आहे. योगासनांमुळे शरीर निरोगी आणि मन प्रसन्न ठेवण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्यानं या संकटात सर्वांनीच योगासनं करणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीर निरोगी राहून कोरोनाचा सामना करण्यात नक्कीच मदत होईल. आणि हो सूर्यनमस्कार केल्यानं अनेक फायदे होतात. त्याविषयी अधिक माहिती पुढील ब्लॉगमध्ये. #संगो


Friday, January 7, 2022

व्यायामाची साथ, कोरोनावर मात!

 

कोरोनाचं सावट कायम असल्यानं प्रत्येकाने शरिरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. कोरोनाच्या संकटात प्रत्येकाचं शरीर निरोगी असणं गरजेचं आहे. निरोगी शरिरात आणि भरपूर प्रतिकारशक्ती असेल तर कोरोनाच नव्हे तर कोणत्याही विषाणूंचा सामना करता येऊ शकतो.  व्यायाम कोणत्याही काळात शरीराला फिट ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही व्यायाम-प्रेमी नसाल, तरी आवश्‍यक तेवढा व्यायाम करायला सुरुवात करा. नियमित आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम लवकरात लवकर संरक्षक शक्ती वाढवतात. व्यायामाची सुरूवात करताना मध्यम प्रकारचा शारीरिक ताण देणारे आणि सुमारे 30 ते 45 मिनिटे असा व्यायाम करणे अतिशय योग्य ठरेल. 

कोरोनाचा वाढता संसर्ग, वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध पाहता जिममध्ये जाणं शक्य होत नाही. त्यामुळे घरच्या घरी करता येणारे व्यायाम तितकेच प्रभावी आहेत. सकाळ-संध्याकाळ दोन वेळा 10 मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्या तर साधारण 200 कॅलरी जळतात. एक तास दोरीवरच्या उड्या मारल्यामुळे सरासरी 700 हून अधिक कॅलरीज जळतात. दुसरा व्यायाम प्रकार म्हणजे एकप्रकारच्या उठाबशा आहेत. बर्पे हा जवळपास स्क्वाटसारखा व्यायाम आहे. याच्या सहाय्याने शरीरातील चरबी कमी करायला मदत होते. बर्पेस वेगवान हालचाल करतात, त्यामुळे ते तुमचे हृदयही पंप करतात.

घरात करण्यासाठी पुश अप हा व्यायाम अतिशय सोपा आहे. कमी जागेतदेखील तुम्ही हा व्यायाम करू शकता. पुश अप्स हा अतिशय सोपा व्यायाम असून 10 मिनिटांच्या व्यायामाने तुम्हाला खूप शक्ती मिळते.

प्लॅन्क हा व्यायाम पोटासाठी अतिशय उपयोगी आहे. फॅट्स कमी करण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर आहे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवून तुम्ही केवळ हातांच्या मदतीनं शरीरवर घ्यायचं आहे. दिवसातून 3 वेळा हा व्यायाम केल्यास तुम्हाला नक्कीच याचा फायदा होतो. साईड प्लॅन्क हा व्यायामची शरीराला अनेक फायदे देणारा आहे.

तर बाइसिकल क्रंचमुळे तुमच्या पूर्ण स्नायूंचा व्यायाम होतो. फॅट्स कमी होऊन अॅब्स बनवण्यासाठी हा व्यायाम केला जातो. या प्रकारामध्ये बेसिक क्रंच, रिव्हर्स क्रंच, डबल क्रंच असे तीन प्रकार असतात. ज्याप्रकारे आपण सायकल चालवण्यासाठी पाय वरखाली करतो त्याच पद्धतीने जमिनीवर झोपून आपण हा व्यायाम करू शकतो.

व्यायामाचा प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. अनेक संशोधनांद्वारे सिद्ध झालंय की फ्लू, न्यूमोनिया, इतर काही संसर्ग, मधुमेह किंवा हृदयविकारासारखे मोठे आजार व्यायामामुळे नियंत्रणात आले आहेत. कायम उत्साही राहिल्यामुळे जळजळ कमी होते, प्रतिकारक पेशींची संख्या वाढते. आतड्यातील मायक्रोब्सचा सकारात्मक परिणाम शरीराच्या संरक्षण संस्थेवर होतो. शरीरातील प्रतिकारक शक्तीचे नियमन होते. रोजच्या व्यायामामुळे ही संरक्षण संस्था सतत कार्यरत ठेवण्यास मदत होते. 

व्यायामाची आवड असो किंवा नसो फिट राहण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. व्यायाम परिणामकारक होण्यासाठी खूप वेळाचा, शक्तिदायक आणि न आवडणारा व्यायाम असला पाहिजे, असे नाही. घरातल्या किंवा सोसायटीच्या पायऱ्यांचा चढ-उतार करणे चांगला आणि उत्साहवर्धक व्यायाम आहे. 

भरभर चालणे, पळणे, सायकल चालवणे किंवा तासभर सर्वसामान्य ताकदीचा कोणताही व्यायाम चांगल्या प्रकाराची प्रतिकारशक्ती निर्माण करतो. त्यामुळे जर व्यायाम करत नसाल तर आताच करायला लागा. कारण फिट राहाल तरच कोणत्याही परिस्थितीत हिट राहाल. #संगो


Tuesday, August 17, 2021

तालिबानची सत्ता, जगाला धोका


 अफगाणिस्तानचा राष्ट्रपती कोण होणार ? याकडे आता जगाचं लक्ष लागलं आहे. तालिबानच्या अव्वल चार नेत्यांपैकी एक जण राष्ट्रपती होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुल्ला हैबतुल्लाह अखुनजादाचं नाव राष्ट्रपतीपदासाठी आघाडीवर आहे. हैबतुल्लाह अखुनजादा हा तालिबानचा सर्वात मोठा नेता आहे. तोच अफगाणिस्तानाचा नवा राष्ट्रपती असेल असं बोललं जातंय. तालिबानच्या राजकीय, धार्मिक आणि अन्य बाबींवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे. तालिबानच्या राजकीय, धार्मिक आणि सैन्य विषयक बाबींवर त्याचा शब्द अंतिम मानला जातो. अख्तर मंसूर मारल्या गेल्यानंतर हैबतुल्लाह अखुनजादा याने तालिबानचं नेतृत्व सांभाळलं. हैबतुल्लाह याने तालिबानच्या विखुरलेल्या शक्तीला एकत्र केलं. हारलेल्या तालिबानींमध्ये त्याने विश्वास निर्माण केला. त्यामुळेच अवघ्या 103 दिवसात तालिबानींनी अफगाणिस्तान ताब्यात घेतलं.  मुल्ला हैबतुल्लाह अखुनजादा याच्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरादरचं नावही अफगाणिस्तानचा राष्ट्रपती होण्यासाठी आघाडीवर आहे. बरादर हा तालिबानच्या सहसंस्थापकांपैकी एक आहे. राजकीय कार्यालय प्रमुख आणि शांती वार्ता पथकाचा तो सदस्य आहे. तालिबानची राजकीय वाटचाल कशी असेल याचा निर्णय अब्दुल गनी बरादरकडे असणार आहे. 1980 मध्ये अफगाणी सरकारविरोधातल्या लढ्यात बरादर आघाडीवर होता. कंदहारच्या मदरशात कमांडर मोहम्मद उमरसह त्यानं काम केलंय. 1996 ते 2001 मध्ये हेरात प्रांताचा तो गव्हर्नर होता. सिराजुद्दीन हक्कानी तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता मानला जातो. हक्कानी नेटवर्क या नावानं कुख्यात असलेल्या नेटवर्कनं अमेरिका आणि नाटोला मोठा तडाखा दिला. मागील 20 वर्षात अमेरिका आणि नाटोच्या सैन्यावर अनेक आत्मघाती हल्ले करण्यात आले. हक्कानी नेटवर्कनं हे हल्ले केले होते. त्यामुळे  हक्कानीवर अमेरिकेनं 1 कोटी डॉलरचं बक्षिस जाहीर केलं. सिराजुद्दीन हक्कानी हा रशियाच्या विरोधात लढलेल्या जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा आहे. भारतीय दूतावासांवर हल्ले करण्यातही हक्कानी नेटवर्कचा हात होता.

सिराजुद्दीन हक्कानीनंतर मुल्ला मोहम्मद याकूब तालिबानमधला सर्वात प्रबळ नेता मानला जातो. तालिबानची स्थापना करणाऱ्या मुल्ला उमरचा याकूब हा मुलगा आहे. मुल्ला याकूबनं पाकिस्तानातल्या मदरशांमध्ये शिक्षण घेतलं. सध्या तो तालिबानच्या  मिलिट्री कमीशनचा प्रमुख आहे. त्याच्या अखत्यारीत अनेक कमांडर येतात. त्यांच्यावर विविध हल्ले करण्याची जबाबदारी दिली जाते. मुल्ला याकूब हा ऑपरेशनसाठी या कमांडरचा वापर करतो. मुल्ला उमरचा मुलगा असल्यानं याकूबला तालिबानमध्ये मोठा मान दिला जातो.  अफगाणिस्तानचा राष्ट्रपती या चार जणांपैकी कोणी तरी एक जण असणार आहे. तालिबान्यांनी रक्तरंजीत मार्गानं सत्ता हस्तगत केलीय. मात्र यानंतरचा काळ तिथल्या जनतेसाठी खडतर असणार आहे. तसंच तालिबानसमोरही अनेक आव्हानं आहेत.

अफगाणिस्तानवर विजय मिळवणं आणि त्यावर सत्ता गाजवणं कोणालाच शक्य झालं नाही. ब्रिटन, रशिया, अमेरिकेलाही अफगाणिस्तानात यश मिळालं नाही. अमेरिकेनं बॉम्बचा वर्षाव करून अफगाणिस्तान बेचिराख करून टाकला. मात्र तालिबानचा नायनाट करण्यात त्यांना अपयश आलं. जगावर वर्चस्व गाजवणाऱ्या महासत्ता अफगाणिस्तानात पराभूत झाल्या. 20 वर्ष अफगाणिस्तानमध्ये राहिल्यानंतरही अमेरिकेला तालिबानची पाळंमुळं उखडून फेकता आली नाही. अमेरिकेच्या आधी ब्रिटन आणि 90च्या दशकात रशियालाही इथून पराभूत होऊन परतावं लागंल. अफगाणिस्तानची भौगोलिक रचनाच अशी आहे की, त्यांच्या जमिनीवर त्यांचा पराभव होऊ शकत नाही. डोंगराळ भागावर हवाई हल्ले करता येतात. मात्र टोरा बोरासारख्या असंख्य पर्वत रांगांमध्ये तालिबानी लपून बसतात. हवाई हल्ल्यातही त्यांचं जास्त नुकसान होत नाही. अमेरिकेनं मागील 20 वर्षात अफगाणिस्तानच्या सैन्याला प्रशिक्षण दिलं. त्यांना अत्याधुनिक शस्त्रात्रं दिली. मात्र असं असूनही अफगाणिस्तानच्या सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त सैन्यानं तालिबानींचा प्रतिकार केला नाही. साठ हजार तालिबानींनी अवघ्या 103 दिवसात अफगाणिस्तान ताब्यात घेतला. अफगाणिस्तानच्या पळपुट्या सैनिकांनी रणांगणातून पळ काढला.

तालिबानला भारतानं अधिकृतरीत्या कधीच मान्यता दिली नाही. भारताचं तालिबानसोबत चर्चा करण्याचं आणखी एक सर्वात मोठं कारण आहे की, अफगाण सरकारसोबतच्या भारताच्या नात्यात वितुष्ट आलं असतं. भारत-अफगाणिस्तानमधील संबंध ऐतिहासिकदृष्ट्या चांगले राहिले आहेत. मात्र, आता स्थिती बदललीय. असं असलं तरी  गेल्या काही दिवसात तालिबानकडून भारतविरोधी कुठलंच वक्तव्य समोर आलेलं नाही. तालिबाननं अफगाणिस्तानच्या विकासातील भारताच्या भूमिकेलाही चूक म्हटलं नाही.

दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जवळपास 2611 किलोमीटर लांबीची सीमा आहे. आपल्या सीमेवर अफगाणिस्तानातून येणाऱ्या शरणार्थींची गर्दी होतेय की काय, याची चिंता पाकिस्तानला आहे.

तर चीनलाही चिंतेनं घेरलंय. चीनमधला शिनजियांग प्रांत संपन्न असून त्या प्रांताची अफगाणिस्तानसोबत जवळपास 8 किलोमीटरची सीमा आहे. तालिबाननं चीनच्या शिनजियांग प्रांतात सक्रिय असणाऱ्या ईस्ट तुर्किस्तान इस्लामिक मुव्हमेंट या फुटीरतावादी गटाला पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमेरिकन फौजा परत गेल्यानंतर अफगाणिस्तान इस्लामिक कट्टरतावादाचं केंद्र होईल अशी भीती रशियाला आहे. अफगाणिस्तानात इस्लामिक कट्टरतावाद वाढला तर पूर्ण मध्य आशियासाठी मोठा धोका निर्माण होईल आणि हिंसाचार झाला तर त्याचे पडसाद मॉस्कोपर्यंत पोहोचतली अशी भीती रशियाला आहे. जगातल्या सर्वच देशांना तालिबानच्या राजवटीमुळे धोका निर्माण झालाय. आता या सर्व धोक्यावर काय तोडगा निघणार, यावर सर्वांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

Tuesday, July 27, 2021

कार्याध्यक्ष ते मुख्यमंत्री!

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 62व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीत 28 नोव्हेंबर 2019 ही तारिख अत्यंत महत्त्वाची ठरली. कारण याच दिवशी उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं शक्तीस्थान असलेल्या ठाकरे घराण्यातील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मंत्री किंवा मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता. तसं त्यांनी जाहीरपणेही सांगितलं होतं. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. अर्थात त्या युती सरकारचा रिमोट कंट्रोल हा बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होता. मात्र यावेळी उद्धव ठाकरेंनी रिमोट कंट्रोल हाती घेण्याऐवजी थेट राज्याचीच सूत्रं हाती घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं शिवसेना सत्तेत आली.  संजय राऊत, शरद पवार, सोनिया गांधी आणि इतर महत्त्वाचे नेते यांच्यात मोठी चर्चा होऊन राज्याच्या राजकारणात नवं समीकरण उदयाला आलं. उद्धव ठाकरेंनी सत्तेची सूत्र हाती घेतली.

मात्र इथून पुढचा प्रवास मोठा खडतर होता. कारण त्याचवेळी राज्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यांना दिलासा आणि नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर होती. हे संकट संपत नाही तोच २०२० वर्ष उजाडलं ते कोरोनाचं संकट घेऊन. कोरोनानं सर्व जगाला जसा तडाखा दिला तसाच भारतालाही दिला. महाराष्ट्रात तर कोरोनामुळे बिकट स्थिती निर्माण झाली. पहिल्या लाटेत रूग्णांना बेड मिळत नव्हते. औषधींचा तुटवडा होता. लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती खडतर झाली. अनेकांचे रोजगार गेले. सरकारवर मोठी टिका सुरू झाली. हळूहळू लाट ओसरली अनलॉक सुरू झाला. थोडासा दिलासा मिळतोय असं वाटत असतानाच दुसरी लाट प्रचंड वेगानं पसरली. ऑक्सिजनच्या अभावी शेकडो जणांना जीव गमवावे लागले. पुन्हा बेड्सचा तुटवडा निर्माण झाला. रेमेडिसिव्हर सारख्या औषधीसाठी नागरिकांना रांगेत उभं राहावं लागलं. कित्येकांनी त्यांचे नातलग गमावले. दुसरी लाट आता आटोक्यात येऊ लागलीय. सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेल्या उपाययोजना यशस्वी झाल्या. कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आलं. महाराष्ट्रानं देशात लसीकरणात आघाडी घेतली. राज्याच्या आरोग्य खात्याचंच हे यश आहे. अशा अनेक यश-अपयशांचा सामना उद्धव ठाकरेंनी केलाय.

महाबळेश्वरमध्ये शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलं होतं. त्यानंतर 2007 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढवण्यात आली. त्यात शिवसेनेला यश मिळालं.  2009च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात युती मोठं यश मिळवणार असं वातावरण होतं. मात्र मुंबई, नाशिक, पुण्यात मनसेच्या उमेदवारांनी लाख-लाख मतं घेतली आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. 2012च्या पालिका निवडणुकीत बीएमसीवर पुन्हा शिवसेनेनं झेंडा फडकवला. 2014च्या निवडणुकीत शिवसेनेनं स्वबळावर 63 जागा मिळवल्या. 2017च्या पालिका निडणुकीतही बीएमसीत शिवसेना अव्वल ठरली. 

हे सर्व यश उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं मिळवलं. रिमोट कंट्रोलनं सरकारवर नियंत्रण ठेवण्याऐवजी फ्रंट सीटवर येऊन थेट राज्य चालवण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय शिवसेनेसाठी महत्वाचा ठरताना दिसतोय. कारण शिवसेना पुन्हा लोकप्रिय होऊ लागलीय. कोरोनाच्या कठिण काळात संयमानं कारभार करून उद्धव ठाकरेंनी नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला. नागरिकांचा हा विश्वासच त्यांच्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट असेल.

Wednesday, June 9, 2021

थेट दरवाज्याआडून...



 (दोन बड्या नेत्यांची भेट झाली. त्यावेळी सर्वांना चकवा देत मिळवलेली ही खास खबर. )


दिल्लीश्वर - आओनी मुंबईकर भाई


मुंबईकर - जय महाराष्ट्र. थांबा दरवाजा उघडा ठेवतो. किंबहुना उघडा ठेवायलाच हवा.


दिल्लीश्वर - कोई वांधा नहीं, राहू द्या बंद


मुंबईकर - नको, मागील वेळी मोटाभाई सोबत बंद दरवाज्याआड चर्चा केली होती. पुढे काय लफडं झालं तुम्हाला माहित आहे.


दिल्लीश्वर -  झालं गेलं माँ गंगेला मिळालं. माझ्याच मतदारसंघातून वाहते गंगा नदी


मुंबईकर - सर्व देश किंबहुना सर्व जगच तुमचे मतदारसंघ आहेत.


दिल्लीश्वर - मला टोमणे मारता काय ? (दोघांचं हास्य) बरं काय खाणार ? ढोकळा देऊ का ?


मुंबईकर - शिव वडापाव सोबत आणला आहे. मी ढोकळा खातो, तुम्ही वडापाव खा.


दिल्लीश्वर - चोक्कस. बरं सकाळीच मुंबईहून निघालात. वेळेत विमान मिळालं ?


मुंबईकर - अजित दादा सोबत होते. मागील दीड वर्षपासून त्यांना लवकर उठण्याची सवय लागली आहे. (पु्न्हा दोघांचं हास्य) त्यामुळे लवकर पोहोचलो.


दिल्लीश्वर - बरं, काय म्हणतात तुमचे नवे मित्र.


मुंबईकर - ज्यांचं बोट तुम्ही राजकारणात आला, त्यांचा हात पकडून आम्ही सत्तेत आलो. (पु्न्हा दोघांचं हास्य) पण आपली जुनी मैत्री अजूनही लक्षात आहे.


दिल्लीश्वर - मी तर नेहमीच मित्रों, असं म्हणत असतो. बाकी अजून काय म्हणता ?


मुंबईकर - GST मधला राज्याचा वाटा मिळाला नाही.


दिल्लीश्वर - जी एसटी येईल ती पकडायची. (पु्न्हा दोघांचं हास्य)


मुंबईकर - बरं, आता निघतो. जय महाराष्ट्र.


दिल्लीश्वर - येत राहा. चांगलं वाटतं. मेरा और महाराष्ट्र का बचपन से नाता रहा हैं.


मुंबईकर - होय. त्याच नात्यानं तुमच्याकडे, मी पुन्हा येईन.  (दोघांच्या हास्याचा स्फोट)


Friday, October 23, 2020

सत्ता आणि निष्ठा

 

एकनाथ खडसे यांनी कमळाचं फूल बाजूला सारत अखेर हातावर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बांधलंच. कोणत्याही नेत्याच्या पक्षांतराच्या वेळी समुद्राच्या भरती ओहोटीची आठवण येते. कारण निसर्गाचा हा नियम राजकारणालाही लागू पडतो. ज्या भाजपमध्ये सहा वर्षांपूर्वी सर्वपक्षीय भरती सुरू होती, त्याच भाजपमधून आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे बाहेर पडले. अर्थात राजकारणात पक्षांतर करणं काही नवी गोष्ट नाही. या आधीही अनेक नेत्यांनी पक्ष बदलले आहेत. शिवसेनेनं मुख्यमंत्री केलेले नारायण राणे यांच्यावरही पक्ष बदलण्याची वेळ आली. (त्यांनी तर दोनदा पक्ष बदलला, स्वत:चाच पक्ष काढून विसर्जितही केला ही बाब वेगळी.) छगन भुजबळ, गणेश नाईक अशा अनेक नेत्यांनी दोनदा पक्ष बदलले. जुन्या पक्षात गोची होत असेल, पंख छाटले जात असतील किंवा नव्या पक्षात मोठी संधी मिळत असेल तर पक्षांतर करण्यात चूक तरी काय ? अर्थात चूक काहीच नाही. त्यामुळे 2014च्या विधानसभा निवडणुकी आधी विखे, मोहिते, मधुकरराव पिचड, गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील असे अनेक बडे नेते भाजपच्या छावणीत दाखल झाले. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासारख्या बाहेरून आलेल्यांचा भाजपमध्ये उत्कर्ष सुरू झाला. 

एकनाथ खडसे तर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र 2014 मध्ये खडसेंचे ज्युनिअर असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. पक्ष वाढवण्यासाठी ज्या नेत्यांनी हयात घालवली त्यात एकनाथ खडसेंचं नाव आघाडीवर होतं. मात्र मुख्यमंत्रीपदी डावलण्यात आल्यानं त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ही नाराजी भाजपच्या नेतृत्वाला आवडली नाही. मोदी-शाह यांच्या नव्या भाजपमध्ये वाजपेयी, अडवाणी, मुंडे, महाजन यांच्या बरोबर काम करणाऱ्या खडसेंचा पडता काळ सुरू झाला. खडसेंना महसूलमंत्री करण्यात आलं. मात्र भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणावरून 4 जून 2016 रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला. अनेक मंत्र्यांना क्लीनचिट मिळत असताना खडसेंना मात्र बाजूला सारण्यात आलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत तर खडसेंना तिकीटही नाकारण्यात आलं. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांचाही पत्ता कापण्यात आला. पंकजा मुंडेंना तिकीट मिळालं, मात्र त्यांचा पराभव झाला. अर्थात मधल्या काळात एकनाथ खडसेंनी अनेकदा त्यांची नाराजी व्यक्त केली. 'नानासाहेब फडणवीस बारभाई कारस्थान' हे पुस्तक लिहूणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. पक्ष सोडत असताना त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच त्यांनी टीका केली.

आघाडीचं सरकार असताना विरोधी पक्षनेते असलेल्या एकनाथ खडसेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला होता. खडसेंचा तिखट हल्ला राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर, एकनाथ खडसेंवर तोडपाणीचा आरोप केला होता. ज्या खडसेंवर तोडपाणीचे आरोप केले होते, तेच खडसे आता राष्ट्रवादीत आले आहेत. राजकारणात अशा अनेक घटना घडतात. सिंचन घोटाळ्यावरून भाजपनं अजित पवारांवर टीका केली होती. त्यांना तुरूंगात टाकू असंही निवडणुकीच्या प्रचारात सांगितलं गेलं. मात्र त्याच अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली.


नारायण राणे आणि नितेश राणे यांनीही काँग्रेसमध्ये असताना भाजप-शिवसेनेच्या सरकारवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंचा राजकीय बळी घेतल्याचं ट्विट नारायण राणेंनी केलं होतं. बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


राणेंचे पुत्र नितेश राणे यांनीही काँग्रेसमध्ये असताना भाजपवर टीका केली होती. मराठा आरक्षण आणि बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण दिल्याच्या मुद्यावरून त्यांनी प्रचंड थयथयाट केला होता. बाबासाहेब पुरंदरेंबद्दल अपमानास्पद वक्तव्य केली होती. संभाजी भिडेंचा एकेरी उल्लेख केला होता. पुण्यातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणा-यास 5 लाख रुपये रोख देऊन जंगी सत्कार करु अशी वादग्रस्त घोषणाही नितेश राणेंनी केली होती. मात्र आता ज्यांच्यावर बहुजन नेतृत्वाला टार्गेट केल्याचा आरोप केला त्याच भाजपमध्ये राणेंनी मुक्काम ठोकला आहे.

राजकारणात आता निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते कमी होत चालले आहेत. प्रत्येकाला आपला उत्कर्ष साधायचा आहे. त्यासाठी सत्तेत असलेल्या पक्षात प्रवेश करायचा आणि हेतू साधायचा हा सरळ हिशेब आहे. भाजप सत्तेत होती तेव्हा नेत्यांनी भाजपची वाट धरली. आता महाविकास आघाडी सत्तेत असल्यानं नेत्यांची पाऊलं इकडे वळू लागली आहेत. #संगो #bjp #eknathkhadse

Sunday, September 6, 2020

'क्वीन'चा नवा 'पंगा'

 

शिवसेना आणि मुंबईचं नातं वेगळं सर्वांनाच माहित आहे. शिवसेनेचा ठसा असलेल्या या मुंबईत हिंदी सिनेमाची इंडस्ट्री चांगलीच बहरली. मुंबईतलं बॉलिवूड आपल्या देशाची ओळख आहे. एकाच शहरात शिवसेना आणि बॉलिवूडचं साम्राज्य आहे. मात्र अनेकदा  हे दोन्ही साम्राज्य एकमेकांना भिडतात तेव्हा मोठा वाद निर्माण होता. यावेळी शिवसेना आणि बॉलिवूडची क्वीन यांच्यात चांगलीच खणाखणी सुरू झाली. 

शिवसेनेची मुंबई शहरावर अनेक वर्षांपासून सत्ता आहे. राज्यात सत्ता कोणाचीही असली तरी मुंबईच्या रस्त्यांवर साम्राज्य असतं ते शिवसेनेचं.  शिवसेनेची धाक, दहशत, दरारा ही कार्यपद्धती. शिवसेना मुंबईची किंग आहे. तर या किंगच्या विरोधात आता बॉलिवूडची क्वीन सरसावलीय. मणिकर्णिका सिनेमात कंगना राणावतनं झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका ताकदीनं वठवली होती. अनेक राज्यांमध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला होता. कंगनाच्या लक्ष्मीबाईच्या भूमिकेची प्रचंड तारीफ झाली. सिनेमाच्या पडद्यावर तलवार घेऊन लढाई करणाऱ्या कंगनानं आता सोशल मीडियाच्या रणांगणात ट्विट करून शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. 

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून कंगनानं बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका केली होती. बॉलिवूडमधल्या बड्या प्रोडक्शन्सवर कंगनानं गंभीर आरोप केले होते. बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनवर निशाणा साधून कंगनानं मोठी खळबळ उडवू दिली. कंगना आणि बॉलिवूड असा वाद पेटलेला असतानाच कंगनानं मुंबईवरून ट्विट केलं आणि सर्व परिस्थितीच बदलली. कंगना आणि बॉलिवूडचा वाद थेट राजकीय वेळणावर गेला. मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतीय ? असा सवाल ट्वीटच्या माध्यमातून कंगनानं विचारल्यानं तिचा थेट शिवसेनेसोबत सामना सुरू झाला.

'मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.' असं ट्विट करून संजय राऊतांनी शिवसेनेचे इरादे जाहीर केले. दुसरीकडे राज्यभरात कंगनाच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. संजय राऊतांनीही  कंगनानं ट्विटर हँडल स्वतः वापरायला शिकावं, असा टोला लगावत भाजपकडे अंगुलीनिर्देश केला. भाजपनंही कंगना राणावतची पाठराखण करण्याची भूममिका सोडून देत यू टर्न घेतला. त्यामुळे कंगणानंही नरमाईची भूमिका घेतली. मुंबई आपल्यासाठी यशोदामाता असल्याचं तिनं एका  ट्विटमध्ये म्हटलं.  मला ओळखणाऱ्यांना माझ्या बोलण्याचा हेतू माहीत आहे, असंही तिनं म्हटलं. 'मुंबई आपली  कर्मभूमी असल्याचं सांगतानाचं मुंबईवर माझं प्रेम असून मला ते सिद्ध करण्याची गरज नसल्याचंही तिनं ट्विटमध्ये स्पष्ट केलं. 

राजकारण, समाजकारण आणि बॉलिवूड तिन्ही भिन्न क्षेत्र आहेत. एक प्रकारे त्यांची लक्ष्मण रेषा आखण्यात आलेली आहे. जेव्हा एखादा कलाकार राजकारण किंवा समाजकारणावर बोलतो तेव्हा त्याचं मत राजकीय वादात अडकतं. म्हणजेच आखून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडल्यास वाद होणार हे निश्चित. जो पर्यंत लक्ष्मण रेषेच्या आत राहून प्रत्येक जण त्याच्या क्षेत्रात काम करतो तेव्हा कोणालाच अडचण नसते. मात्र कलाकारांनी राजकीय भाष्य केल्यास वाद झाल्याशिवाय राहात नाही, हे आपल्या देशातलं कटू वास्तव आहे.

कलाकारांनी पडद्यावर अभिनय करावा अशीच राजकीय पक्षांची इच्छा असते. कलाकारांनी राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीवर भाष्य केल्यास राजकीय पक्ष कलाकारांवर टीका करतात. कलाकार राजकारण करत असल्याचा आरोप करतात. राजकारण करण्याऐवजी कलाकारांनी थेट राजकारणात यावं अशीही भाषा केली जाते. शिवसेना वगळून मुंबईचा विचार केला जावू शकत नाही. तसंच बॉलिवूडशिवायही मुंबईचा विचार करता येत नाही. शिवसेना आणि बॉलिवूड या शहरातच मोठे झाले. मात्र जेव्हा एखादा कलाकार शिवसेनेनं आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी वाद होतोच. हा आता पर्यंतचा इतिहास आहे. आणि या इतिहासाला कंगनाही अपवाद नाही.