मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत भाजपला पुन्हा नंबर केलं. मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचे तब्बल 89 उमेदवार जिंकले. संपूर्ण राज्यभरात हेच चित्र दिसलं. देवेंद्र फडणवीस यांनी जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेतल्या. पक्षाची सर्व टीम कामाला लावली. त्यामुळे मोठं यश मिळालं. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.
मागील तीन दशकांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नंबर वन असायची. शिवसेनेचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकत होता. आताही जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार, सहा आमदार आणि पालकमंत्री आहे. मात्र असं असूनही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. तर दुसऱ्या क्रमांकावर एमआएएमचे उमेदवार निवडून आले. परिणामी नंबर वन असलेल्या भाजपचा छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. जालना महापालिकेसाठी पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलं. भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यावर मात केली. परिणामी जालन्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरलेल्या भाजपचा महापौर बसणार यात आता कोणतीही शंका उरली नाही. जालन्या प्रमाणेच नांदेडमध्येही भाजपनं सर्वांना पिछाडीवर टाकत अव्वल क्रमांक पटकवलाय. असंच यश नाशिक, जळगाव, केडीएमसी, उल्हासनगर, नागपूरसह तब्बल 23 महापालिकांमध्ये भाजपनं मिळवलं.
2017 मध्ये मुंबई महापालिकेत भाजपचे 82 नगरसेवक होते. आता 2026 मध्ये भाजपचे 89 नगरसेवक आहेत. डबल इंजिन सरकार, कमकुवत विरोधक असतानाही 9 वर्षात भाजपचे सातच नगरसेवक वाढले. तर विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवणारी शिंदेंची शिवसेना ठाण्यात अव्वल राहिली. मुंबई परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार चांगल्या संख्येनं निवडून आले. मात्र मुंबईत शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेले होते, माजी नगरसेवकही शिंदेंसोबत होते. मात्र अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मुंबईत चांगली झुंज देत 71 उमेदवार निवडून आणले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मुंबईत महायुतीला कडवी झुंज दिली. उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. पक्षातील बडे नेते आणि अनेक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. मात्र संकटाच्या काळात सोबत आलेल्या राज ठाकरेंमुळे कठिण काळातही ठाकरे ब्रँड टिकून राहिला. मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला मिळालेल्या जागा त्यांचा आत्मविश्वास बळकट करणाऱ्या ठरणार आहेत. इतकंच नव्हे तर ठाकरेंमुळे विरोधी पक्षही सक्षम झालाय.
हातात कोणतीही सत्ता नसताना ठाकरे बंधूंनी मुंबईत त्यांची ताकद दाखवून दिली. तर महायुतीत भाजपच्या सोबत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईत तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवल्या. एकंदरीतच मुंबई महापालिकेवर महायुतीनं वर्चस्व निर्माण केलं. मात्र प्रतिकूल परिस्थितीत ठाकरेंनी यश मिळवलं. टायगर अभी जिंदा हैं, अशी डरकाळी फोडत आम्ही अजून मैदानात आहोत, असा संदेशच ठाकरे बंधूंनी दिला. मात्र मुंबईच्या बाहेरही महाराष्ट्र आहे. याचा बहुतेक ठाकरे बंधूंना विसर पडला असावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा काळ आणि करिष्मा वेगळा होता. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर, संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावतीमध्ये सभा घ्यायचे. मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनाप्रमुखांची युतीची शेवटची सभा मुंबईत शिवाजी पार्कवर व्हायची. वातावरण बदलायचं आणि युतीला यश मिळायचं. मात्र आता राजकारण बदललं आहे. भाजप हा पक्ष आणि त्यांचे नेते 24 X 7 इलेक्शन मोडवर असतात. त्यामुळे ठाकरे बंधू आणि आदित्य, अमित यांनाही ग्रामीण महाराष्ट्र आणि शहरी भागासोबत नाळ जोडावी लागेल. तरच त्यांचे पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतील.
सत्तेत असूनही एकनाथ शिंदे मुंबईत मागे पडले. मुंबईत भाजपचा महापौर होणार हे आता स्पष्ट झालं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुंबईवरील शिवसेनेचा झेंडा जावून आता भाजपचा झेंडा लागणार, ही बाब एकनाथ शिंदेंसाठी चिंता वाढवणारी आहे. आणि बहुतेक हेच हेरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना जयचंद संबोधलं. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेचा झेंडा काढून भाजपचा झेंडा रोवायला मदत केली, असं जिव्हारी लागणारं वक्तव्य त्यामुळेच करण्यात आलं. एकनाथ शिंदेंना मुंबईच नव्हे तर मराठवाड्यातही अपयश आलं. मागील तीन दशकांपासून ताब्यात असलेली छत्रपती संभाजीनगरची सत्ता राखण्यात एकनाथ शिंदेंना अपयश आलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संभाजीनगर आणि मराठवाड्यावर मोठा प्रभाव होता. तो प्रभाव शिंदेंच्या शिवसेनेला टिकवता आला नाही. मुंबई ठाण्यानंतर शिवसेना सर्वात जास्त जोमानं वाढली ती छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये. मात्र या दोन्ही शहरांमध्ये आता भाजपचा महापौर होणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही शरमेची बाब आहे.
महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कधीही एकत्र येतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण महापालिका निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावांवर अनेक महानगर पालिकांमध्ये झीरो जागा मिळवण्याचा विक्रम जमा झाला आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांवर भाजपनं मजबूत पकड मिळवली आहे. परिणामी कुटुंब म्हणून एकत्र असलेले दोन्ही पवार आगामी झेडपी, पंचायत समिती एकत्रितपणे लढवून कधी पक्षांचं विलिनीकरण कळतील हे कळणारही नाही.
सर्वात आश्चर्य आहे ते काँग्रेसचं. ना कुणाची सभा, ना कुणाचा रोड शो तरीही काँग्रेसनं लातूर, सोलापूर, कोल्हापूरमध्ये चांगली कामगिरी केली. एकंदरीतच महापालिका निवडणुकीच्या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट होते. जो मेहनत घेईल त्याला यश मिळेल. देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं राज्यभर मेहनत घेतली त्यांनी संपूर्ण राज्यात यश मिळालं. बिकट परिस्थितीत ठाकरे बंधूंनी मेहनत घेतली त्यांना मुंबईत दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्यानं पुढील राजकारण करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला.
भाजपचे कार्यकर्ते अकेला देवेंद्र क्या क्या करेगा, असं म्हणत असत असतात. त्यावर विरोधक अशी टीका करतात की, देवेंद्र सोबत ईडी, सीबीआय, सरकारी यंत्रणा आणि दुसऱ्या पक्षातून घेतलेले भ्रष्टाचारी नेते आहेत. मात्र असं असलं तरी विरोधकांना मेहनत करायला, राज्यभर सभा घ्यायला कुणीही रोखलेलं नाही. आता बघूयात लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणते पक्ष किती मेहनत घेतात, रस्त्यावर उतरतात, जनतेत मिसळतात. जो जनतेत जाईल, शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न हाती घेईल त्याचा मतदारांचा आशीर्वाद मिळेल.
#संगो #बाळासाहेबठाकरे #शिवसेना #भाजप #महापालिका #मुंबई #ठाकरे #फडणवीस #शिंदे
