Sunday, July 6, 2025

पवार, फडणवीसांना जमलं. ठाकरेंना जमेल?

 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. पण हे दोन्ही भाऊ त्यांचे दोघांचे पक्ष किती वाढवतील? राज्यात सातत्यानं किती दौरे करतील? इतर पक्षातील किती नेते त्यांच्या पक्षात आणतील? असे प्रश्न निर्माण होत आहेत. कारण पक्ष वाढवायचा असेल तर सातत्यानं दौरे करावे लागतात. कार्यकर्त्यांमध्ये मिसळावं लागतं. उदाहरणच द्यायचं झालं तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं देता येईल. 

शरद पवार या वयातही राज्याच्या विविध भागात दौरे करतात. कार्यकर्त्यांच्या भेटी घेतात. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. त्यांच्या पक्षातून कुणी दुसऱ्या पक्षात गेलं तर त्याला गद्दार म्हणत नाहीत. इतर पक्षातून कुणी आलं तर हुरळूनही जात नाही. नुकतंच आपण पाहिलं. विधानसभा निवडणुकीत अनेकांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश घेतला, निवडणूक लढवली. पराभूत झाल्यानंतर संदीप नाईकसह अनेक नेत्यांनी पुन्हा भाजपची वाट धरली. मात्र त्या बाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली नाही. नव्वदच्या दशकात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पप्पू कलानीला पवारांनी राजकीय आश्रय दिला होता.  बॉम्ब स्फोटातील आरोपींना विमानात सोबत आणल्याचा आरोपही शरद पवारांवर झाला होता. नंतरच्या काळात त्यांच्या सोबत असलेले अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल अशा अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण शरद पवारांनी त्याची पर्वा केली नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना बळ देत पक्ष वाढवण्यावर भर दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपला प्रचंड सशक्त केलं आहे. अनेक पक्षातील नेते त्यांनी भाजपमध्ये घेतले. नेत्यांना पक्षात घेताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर त्या नेत्यांनी आधी काय आरोप केले होते, याकडे लक्ष दिलं नाही. फडणवीस नावाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देऊ शकतो का? असं प्रश्न विचारून फडणवीसांच्या जातीकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नितेश राणेंनाही त्यांनी पक्षात घेतलं. ही सोबतची लिंक पाहा, यातून तुम्हाला सर्व कळेल.

https://www.facebook.com/watch/?ref=search&v=3861802557419897&external_log_id=67696409-9e7b-4f75-8368-a428f81d5d45&q=%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE%20%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87

नितेश राणेंची वडील नारायण राणेंनी तर भाजपला गुंडांचा पक्ष म्हटलं होतं. त्यावर विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंवरील गंभीर गुन्हेच वाचून दाखवले होते. सोबतची लिंक पाहा.

https://www.youtube.com/watch?v=d6fcR6uzi80

पक्ष वाढवायचा असेल तर मागील आरोप-प्रत्यारोप विसरून पुढे जायला देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिलं. अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण यांच्यासारखे अनेक बडे ईडीच्या कारवाईनंतर किंवा ईडीनं कारवाई करू नये यासाठी थेट भाजपमध्ये आले किंवा भाजपच्या सोबत आले. या सर्वांचं स्वागत देवेंद्र फडणवीस यांनी केलं. एकीकडे ईडी, सीबीआय, किरीट सोमय्या भ्रष्ट नेत्यांच्या मागे लागायचे. नंतर हे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरण यायचे. किरीट सोमय्या कसे हात धुवून मागे लागायचे, त्याचं एक उदाहरण पाहा.

https://www.loksatta.com/maharashtra/kirit-somaiya-aggressive-over-sunil-tatkare-in-irrigation-scam-1216811/

अर्थात यात चूक काय म्हणता येईल? कारण तत्व जपून पक्ष वाढत नाही. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी तत्वांचं राजकारण केलं. पण पक्ष वाढला नाही. नरेंद्र मोदी, अमित शाह सत्तेत आल्यानंतर त्यांनी पक्षाचा विस्तार करण्यावर भर दिला. हेमंत बिस्व सरमा, मुकल रॉय, सुवेंदू अधिकारी, अजय चौटाला, भुमा नागी रेड्डी या भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेण्यात आलं. हे करताना भाजपचं पार्टी विथ डिफन्स कुठच्या कुठे गळून पडलं, हे कळालंही नाही. महाराष्ट्रातही राणे कुटुंब, विखे कुटुंब, अशोक चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. ज्यांच्यावर आरोप केले होते त्यांनाच पक्ष मजबूत करण्यासाठी आणि विकासासाठी सोबत घेण्यात आलं. भ्रष्ट नेत्यांना सोबत घेणं हा रणनीतीचा भागही असू शकेल. मात्र त्या सोबतच कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, मेळावे, विकास कामं, चौफेर दोरे, कार्यकर्त्यांची कामं करणं, नेत्यांकडून कामं करून घेणं या सर्वांवर भर देवून देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा विस्तार केला. राज्यात परकीय गुंतवणूक कशी वाढेल, औद्योगिकीकरण, समृद्धी महामार्ग अशी अनेक कामंही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना शरद पवार आणि दवेंद्र फडणवीस यांच्या प्रमाणे कार्य करता येईल का? अर्थात ED, CBI, गृह खातं हाती नसल्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना पक्षविस्तार करताना नक्कीच मर्यादा आहेत. असं असलं तरी पक्षविस्तार अशक्यही नाही. पक्ष सोडून गेलेले मात्र पुन्हा येण्यास इच्छुक असलेल्यांना ठाकरे पक्षात घेतील का? मुंबई सोडून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, कोकण या भागात हे दोघे भाऊ सातत्यानं दौरे करणार आहेत का? ग्रामीण भागात जावून कार्यकर्त्यांना भेटणार आहेत का? ग्रामीण भागातील शिवसैनिक, मनसैनिक थेट मुंबईत येवून ठाकरेंना भेटू शकतील का? आदित्य ठाकरे, अमित ठाकरे रस्त्यावर उतरून युवकांचे प्रश्न मांडणार आहेत का? शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी ठाकरे आंदोलन करणार आहेत का?  कर्जमाफीसाठी ठाकरे पेटून उठतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तरच उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्यांच्या पक्षाचा विस्तार करू शकतील.

#संगो #उद्धवठाकरे #राजठाकरे #शरदपवार #देवेंद्रफडणवीस  #BJP #SHIVSENAUBT #ED 


Sunday, March 23, 2025

...आणि रिया जिंकली



मागील 5 वर्ष आरोपांचा सामना करणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती अखेर जिंकली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रियालाच अनेकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. मात्र आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहचा मृत्यू  आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून देशात जोरदार राजकारण झालं होतं. सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. तर त्याच्या 6 दिवस आधी म्हणजेच 8 जून 2020 रोजी दिशा सालियानचा मुंबईत मृत्यू झाला होता. दिशा ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती. दिशा पाठोपाठ सुशांतच्या मृत्यूमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू होऊन अनेक थिअरी मांडल्या जात होत्या. परिणामी सदर मृत्यूचं प्रकरण प्रथमदर्शनी आत्महत्या वाटत असतानाही काही संशयामुळे सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. मात्र आता सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला हिंदी आणि इंग्रजी माध्यमांनी तर अक्षरश: खलनायिका ठरवलं होतं. मीडिया ट्रायलच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली. 8 सप्टेंबर 2020 रोजी रियाला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. तर 7 ऑक्टोबर 2020 रोजी तिला जामीन मंजूर झाला होता. त्यामुळे रियाची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. तर आता 22 मार्च 2025 रोजी रियाला क्लीन चिट मिळाली आहे.

मात्र रिया चक्रवर्तीला तर काही माध्यमांनी फक्त फासावर लटकवायचंच शिल्लक ठेवलं होतं. त्यात हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेल्स आघाडीवर होते. त्या काळात त्या चॅनेल्सच्या रिपोर्टर्सनी कसा उच्छाद मांडला होता, हे अजूनही नागरिकांच्या लक्षात आहेत. 


त्यातच 2020 च्या नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये निवडणुका होत्या. आणि सुशांत सिंह राजपूत बिहारचा असल्यानं हा मुद्दा तिथे प्रचारात मोठ्या प्रमाणात वापरला गेला. 'ना भूले हैं, ना भूलने देंगे' अशा घोषणा तिथं भाजपकडून देण्यात आल्या. 

मात्र आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमुळे रिया चक्रवर्तीला खऱ्या अर्थानं दिलासा मिळाला आहे. कारण माध्यमातील काही घटकांसह सोशल मीडियावरून रिया चक्रवर्तीवर आरोप करून तिची प्रतिमा मलिन करण्यात आली होती. बिहारमध्ये राजकीय फायद्यासाठी राजकीय पक्षांनीही रियावर चिकलफेक केली होती. मात्र मागील 5 वर्षात रिया चक्रवर्ती संयमानं या परिस्थितीला सामोरं गेली. रिया चक्रवर्तीनं ही लढाई जिंकली. आणि खोटे आरोप करणारा मीडिया, सोशल मीडिया, राजकीय पक्ष तोंडावर आपटले. अन् रिया चक्रवर्तीनं मोठी लढाई जिंकली. 

#संगो  #रियाचक्रवर्ती  #सुशांतसिंहराजपूत