मनसेच्या तिकीटावर निवडून आलेल्या रमेश वांजळेंच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या गोटात ओढून आणलं. रमेश वांजळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असं विधान सुप्रिया सुळे यांनी नागपूरात करून टाकलं होतं. रमेश वांजळेंबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सलोख्याचे संबंध होते, असं सांगण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र प्रेताच्या टाळूवरील लोणीही ओरबडून खाण्याची ही स्वार्थी राजकीय प्रवृत्ती सामान्य मतदारांना मुळीच पसंत पडली नाही.
हर्षदा वांजळे या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या होत्या. विधानसभा निवडणुकीत कै. रमेश वांजळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं. मात्र तिथं त्यांची हेटाळणी करण्यात आली. नंतर ते मनसेच्या तिकीटावर निवडूनही आले. अर्थात हा इतिहास सर्वांना माहित आहे. तोच इतिहास मतदारांच्याही लक्षात होता. त्यामुळे हर्षदा वांजळेंची राजकीय कोलांटउडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रेताच्या टाळूवरील लोणीही ओरबाडण्याच्या प्रवृत्तीचा मतदारांना वीट आला. आणि याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्याच बालेकिल्ल्यात दादा आणि ताईच्या साक्षीनं पराभवाला सामोरं जावं लागलं.


आता शिवसेना, भाजप, रिपाइं या महायुतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीय राजकारणाला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न न सोडवता दलित समाजाला झुलवण्याचं काम काँग्रेसनं केलं होतं, हा इतिहास इथं विसरता येणार नाही. आता त्याच काँग्रेसमधून फुटून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस जुना इतिहास साकारण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सुचवलेला मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा पर्याय सरकारने स्वीकारला. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामविस्तार सर्व जनतेनं स्वीकारला. आता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीय राजकारणाला रोखण्यासाठी 'दादर चैत्यभूमी' असा नामविस्तार करण्यात काय हरकत आहे ?