Sunday, March 23, 2025

...आणि रिया जिंकली



मागील 5 वर्ष आरोपांचा सामना करणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती अखेर जिंकली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रियालाच अनेकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. मात्र आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहचा मृत्यू  आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून देशात जोरदार राजकारण झालं होतं. सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. तर त्याच्या 6 दिवस आधी म्हणजेच 8 जून 2020 रोजी दिशा सालियानचा मुंबईत मृत्यू झाला होता. दिशा ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती. दिशा पाठोपाठ सुशांतच्या मृत्यूमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू होऊन अनेक थिअरी मांडल्या जात होत्या. परिणामी सदर मृत्यूचं प्रकरण प्रथमदर्शनी आत्महत्या वाटत असतानाही काही संशयामुळे सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. मात्र आता सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला हिंदी आणि इंग्रजी माध्यमांनी तर अक्षरश: खलनायिका ठरवलं होतं. मीडिया ट्रायलच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली. 8 सप्टेंबर 2020 रोजी रियाला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. तर 7 ऑक्टोबर 2020 रोजी तिला जामीन मंजूर झाला होता. त्यामुळे रियाची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. तर आता 22 मार्च 2025 रोजी रियाला क्लीन चिट मिळाली आहे.

मात्र रिया चक्रवर्तीला तर काही माध्यमांनी फक्त फासावर लटकवायचंच शिल्लक ठेवलं होतं. त्यात हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेल्स आघाडीवर होते. त्या काळात त्या चॅनेल्सच्या रिपोर्टर्सनी कसा उच्छाद मांडला होता, हे अजूनही नागरिकांच्या लक्षात आहेत. 


त्यातच 2020 च्या नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये निवडणुका होत्या. आणि सुशांत सिंह राजपूत बिहारचा असल्यानं हा मुद्दा तिथे प्रचारात मोठ्या प्रमाणात वापरला गेला. 'ना भूले हैं, ना भूलने देंगे' अशा घोषणा तिथं भाजपकडून देण्यात आल्या. 

मात्र आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमुळे रिया चक्रवर्तीला खऱ्या अर्थानं दिलासा मिळाला आहे. कारण माध्यमातील काही घटकांसह सोशल मीडियावरून रिया चक्रवर्तीवर आरोप करून तिची प्रतिमा मलिन करण्यात आली होती. बिहारमध्ये राजकीय फायद्यासाठी राजकीय पक्षांनीही रियावर चिकलफेक केली होती. मात्र मागील 5 वर्षात रिया चक्रवर्ती संयमानं या परिस्थितीला सामोरं गेली. रिया चक्रवर्तीनं ही लढाई जिंकली. आणि खोटे आरोप करणारा मीडिया, सोशल मीडिया, राजकीय पक्ष तोंडावर आपटले. अन् रिया चक्रवर्तीनं मोठी लढाई जिंकली. 

#संगो  #रियाचक्रवर्ती  #सुशांतसिंहराजपूत

Wednesday, December 4, 2024

फिर वही दिल लाया हूं

 

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले ते देवेंद्र फडणवीस. लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जोरदार मोर्चेबांधणी करून चित्र बदलून टाकलं. सलग तिसऱ्यांदा भाजपला शंभरीपार करण्याचा पराक्रम करून देवेंद्र फडणवीस बाजीगर ठरले.  2014, 2019 आणि 2024 अशा सलग तीन विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शंभर नंबरी कामगिरी केलीय. मात्र या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात तब्बल 30 जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा मिळाल्यानंतर मला मोकळं करा असं वक्तव्य करणाऱ्या फडणवीसांनी नंतर सगळ्यांनाच मोकळं केलं. विरोधकांना दणदणीत पराभव करून संपवलं. पक्षातील स्पर्धकही त्यांनी गलितगात्र करून टाकले. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे ही तशी जुनी उदाहरणं. तर विनोद तावडेंना हितेंद ठाकूर यांनी डांबून ठेवलं होतं. तावडेंची टिप भाजपमधूनच दिल्याची माहिती हितेंद्र ठाकूर यांनी दिली होती. (ती टिप कुणी दिली? टिप देणारा कुणाचा खास होता? ही माहिती ठाकूरांकडून मिळवा.)

लोकसभा निवडणुकीत सुमारे 165 मतदारसंघात महाविकास आघाडीला अॅडव्हान्टेज होता. तर दुसरीकडे मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजात नाराजी होती. मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर पुन्हा परिणामकारक ठरण्याची शक्यता होती. कपाशी आणि सोयाबीनचा भाव घसरल्यामुळे मराठवाडा, विदर्भातला शेतकरी सरकारवर खूश नव्हता. ही सर्व प्रतिकूल परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर होती.  मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला. जागावाटप ते प्रचारयंत्रणा राबवण्याचे सर्व अधिकार देवेंद्र फडणवीस यांना बहाल केले. देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना सोबत घेत त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण केला. राज्यभर प्रचाराचं नियोजन करून सरकारनं केलेली विकासकामं त्यांनी मतदारांसमोर मांडली. आणि सर्वात मोठा विजय साकार केला.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून व्होट जिहाद झाल्याचा मुद्दा महायुतीकडून सातत्यानं मांडण्यात येत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपनंही बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं या घोषणा देऊन हिंदू मतांचं ध्रुवीकरण केलं. विधानसभा निवडणूक महायुतीनं धर्मयुद्धाप्रमाणं लढवली.राज्यभरात यशस्वीपणे राबवलेली लाडकी बहीण योजना, राज्यात झालेली सर्वाधिक गुंतवणूक, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड याचा फायदा महायुतीला झाला. विकासाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची तयारी झालेली प्रतिमा महायुतीच्या यशात महत्त्वाची ठरली. 

देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे पक्षाचा आदेश पाळणे आणि वेळेनुसार भूमिका घेणे. 2022 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री राहणार नाही, असं जाहीर केलं होतं. मात्र पक्षाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. 2014 मध्ये युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद दिलं नव्हतं. उपमुख्यमंत्रिपद असंवैधानिक असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मात्र ही ताठरता त्यांनी 2022 मध्ये सोडली आणि लवचिक धोरण स्वीकारत उपमुख्यमंत्री झाले.  

राज्यातील मतदारांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर शिक्कामोर्तब केलंय. भाजपनं या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2014च्या निवडणुकीत मिळवलेल्या 123 जागांचा विक्रम मोडला. भाजप आणि महायुतीनं विजयाचा नवा अध्याय लिहिलाय. अर्थात यामागे मेहनत होती ती देवेंद्र फडणवीस यांची. परिणामी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बाजीगर ठरले.

#संगो #BJP #devendrafadanvis #CM #maharashtra

Friday, November 29, 2024

शिवसैनिक ते मुख्यमंत्री

 

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एकनाथ शिंदेंनी त्यांची छाप उमटवली. 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अर्थात हे शक्य झालं ते भाजपमुळे. उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजपसोबत युती करून लढलेल्या उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत जाऊन सरकार स्थापन केलं होतं. हा घाव भाजपच्या जिव्हारी लागला होता. त्या घावाचा बदला घेण्यासाठी भाजपनं एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं. हिंदूत्व, बाळासाहेबांचा विचार असा मुलामा एकनाथ शिंदेंच्या बंडाला देण्यात आला. गद्दारी, 50 खोके अशी टीका सहन करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. अडीच वर्ष एकनाथ शिंदें मुख्यमंत्री राहिले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं होतं. 

कितीही टीका झाली तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणावर स्वत:ची छाप उमटवण्यात यशस्वी ठरले.. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री अशी नवी ओळख निर्माण करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. एकनाथ शिंदेंनी ठाण्यातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू केली होती. धर्मवीर आनंद दिघेंचे पट्टशिष्य असलेले एकनाथ शिंदे यांनी दिघेंच्या कार्यशैलीप्रमाणेच ठाण्यात काम सुरू केलं होतं. शाखाप्रमुखापासून सुरू झालेला एकनाथ शिंदेंचा प्रवास मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. 

मागील 25 वर्षात एकनाथ शिंदेंनी ठाणे जिल्ह्यावरील भगवा झेंडा कायम फडकवत ठेवला. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेवर कायम शिवसेनेचं वर्चस्व राखण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. इतकंच नव्हे तर जिल्ह्यातील आमदार आणि खासदार निवडून आणण्यातही एकनाथ शिंदेंची मेहनत होती. इतकंच नव्हे तर राज्यभरात कुठेही आपत्ती कोसळली तर मदतीचा हात देताना सर्वात पुढे एकनाथ शिंदेच असायचे. कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना एकनाथ शिंदेंनी केलेली भरीव मदत राज्यानं पाहिली होती.

2004 पासून विधानसभेवर निवडून येणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या आयुष्यात 2022 मधील जून महिना महत्त्वाचा ठरला. 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रित लढले होते. मात्र निकालानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी स्थापन केली होती. अजित पवार निधी देत नाहीत, अजित पवार शिवसेना संपवायला निघाले, उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे भाजपच्या छावणीत दाखल झाले. 20 जून 2022 रोजी आमदार आणि मंत्र्यांसह त्यांनी सूरत गाठलं. परिणामी महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात गेलं. महायुतीसोबत जाऊन 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शपथ घेतल्याच्या क्षणापासून एकनाथ शिंदेंनी कामाला जोरदार सुरूवात केली. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट घटनास्थळी जाऊन मदतकार्यावर देखरेख ठेवली. इतकंच नव्हे तर इर्शाळवाडीतील नागरिकांचं पूनर्वसन आणि त्यांना नवी घरं देण्याची प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण केली. राज्यातील सर्वच जिल्ह्यांना एकनाथ शिंदेंनी भेट दिली. सामान्य नागरिकांसोबत संवाद साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न केले. मराठा समाजाला एसईबीसीमधून आरक्षण दिलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना मोठी मदत एकनाथ शिंदेंनी उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागातील महिलांना यामुळे आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. 

महिलांना एसटीच्या तिकीटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णयही दूरगामी परिणाम करणारा ठरला. या निर्णयामुळे एसटी महामंडळ नफ्यात आलं. तर विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवून महायुतीनं दणदणीत विजय मिळवला.  शिवसेनेचे तब्बल 57 उमेदवार निवडून आणले. मात्र एकनाथ शिंदेंना त्याग करावा लागला. काही महिन्यांपूर्वीच अमित शाह यांनी, त्याग करावा लागेल असं वक्तव्य एका बैठकीत केलं होतं. त्या बैठकीतील वक्तव्य माध्यमात आल्यानंतर, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट झालं होतं.

आता एकनाथ शिंदेंना छोट्या भावाच्या भूमिकेत वावरावं लागणार आहे. महायुतीत आधीच अजित पवार आल्यामुळे भाजपला एकनाथ शिंदेंची कितपत गरज आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना-भाजपचा हा प्रवास किती वर्ष सुरू राहणार? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण भाजपसोबत राहिलेल्या उद्धव ठाकरेंनी 'युतीत 25 वर्ष सडली' असं वक्तव्य केलं होतं. तशी वेळ एकनाथ शिंदेंवर येईल का? या प्रश्नाचं उत्तर आता भविष्यातच मिळेल. #संगो #शिवसेना  #एकनाथशिंदे #eknathshinde #cm

Sunday, December 31, 2023

एकाची एन्ट्री अन् दोन बाजीगर

 

2023 या मावळत्या वर्षात मनोज जरांगे-पाटील हे नवं नेतृत्व समोर आलं आहे. उपोषणकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील हिरो झालं. ज्या कुणी लाठीचार्जचा आदेश दिला त्याचे तर जरांगे पाटलांनी आभार मानायला हवे. गोळीबार झाल्याचा दावाही आंदोलकांकडून करण्यात आला होता. एकंदरीतच लाठीचार्जच्या घटनेनंतर मनोज जरांगे-पाटील यांचं नेतृत्व इतर कोणत्याही मराठा नेत्यांपेक्षा मोठं झालं आहे. राज्यातील सर्वपक्षीय मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यापुढे खुजे ठरल्याचं पाहायला मिळत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, अशोक चव्हाण, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण हे आणि असे अनेक मराठा नेते जरांगे पाटील यांच्या लोकप्रियतेशी तुलना करू शकत नाहीत, यात शंकाच नाही.


बड्या नेत्यांना घेता येणार नाहीत अशा लाखांच्या सभा मनोज जरांगे-पाटलांनी घेतल्या. शंभर एकरच्या मैदानात भरगच्च झालेली गर्दी, असा करिश्मा मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवला आहे. राज्यभरात कुठेही सभा घेतली तरी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचं कसब मनोज जरांगे-पाटील यांनी दाखवून दिलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. सरकारला मराठा आरक्षणासाठी तातडीनं कार्यवाही करण्याची वेळ आली. एकंदरीतच राज्याच्या राजकारणात नवा नेता म्हणून मनोज जरांगे पाटलांची एन्ट्री झाली.

दुसरीकडे अजित पवार सरत्या वर्षातील खरे बाजीगर ठरले. शिवसेना-भाजपनं 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करून अजित पवार यांची प्रतिमा मलिन केली होती. पण त्याच अजित पवारांसोबत शिवसेनेनं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. मविआचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवार हे एकनाथ शिंदें आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसले. अजित पवारांच्या घोटाळ्याचे पुरावे भाजपच्या नेत्यांनी दिले होते. सिंचन घोटाळ्यांची बैलगाडीभर कागदपत्रे भाजपने चितळे समितीचे माधवराव चितळे यांच्याकडे सादर केले होते. सिंचन घोटाळा संदर्भातील सुमारे 14 हजार पानाचे पुरावे 4 बॅगा भरून बैलगाडीवरून नेण्यात आले होते. संभाजीनगरमधील वाल्मीत चितळे समितीला हे पुरावे देण्यात आले होते. ज्यांनी बैलगाडीभर पुरावे दिले त्याच भाजप नेत्यांना अजित पवारांना आपल्या सत्तेच्या गाडीत घेण्याची वेळ आली.  

अजित पवार निधी देत नाहीत, शिवसेना संपवत आहेत असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केला होता. त्याच शिवसेना शिंदे गटासोबतही अजित पवार टेचात सरकारमध्ये सहभागी झाले. दुसरा एखादा नेता असता तर कोलमडून गेला असता. पण अजित पवारांनी ज्यांनी टीका केली, त्यांच्यावरच सोबत नेण्याची वेळ आणली. हरलेली बाजी जिंकत अजित पवार बाजीगर ठरले.

तर दुसरीकडे छगन भुजबळ महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील घोटाळ्या प्रकरणी अडीच वर्ष जेलमध्ये राहिले होते. तेलगी घोटाळ्यातही भुजबळांचं नाव आलं होतं. वांद्रे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये छगन भुजबळ यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार संस्थेचे उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी केली होती. मुंबईतल्या सांताक्रूझ मधील फर्नांडिस कुटुंबाचं घर लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या सर्व घोटाळ्याच्या आरोपांमुळे आणि जेलवारीमुळे छगन भुजबळ बदनाम झाले होते. पण मविआच्या काळात त्यांना पावन करून सरकारमध्ये मंत्री करण्यात आलं. त्यानंतर महा्युतीच्या सरकारमध्येही छगन भुजबळ मंत्री झाले. ज्यांनी जेलमध्ये टाकलं त्यांच्याच सोबत छगन भुजबळ बसले. इतकंच नव्हे तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळांनाच बळ देण्याचं काम सरकारला करावं लागलं, अशी चर्चा आहे. एकंदरीतच जेलवारी, घोटाळ्यांचे आरोप यावर मात करत छगन भुजबळ दुसरे बाजीगर ठरले.

राजकारणात कोणताच पराभव हा शेवटचा नसतो असं म्हटलं जातं. त्या सोबत आता असं म्हणावं लागेल की, कोणताही घोटाळा आणि जेलवारीमुळे राजकीय नेत्याचा शेवट होत नसतो. सरत्या वर्षानं हा दिलेला धडा आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. #संगो

Friday, June 30, 2023

'रिमझिम' आणि 'आरडी'

 

मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाल्यावर 'रिमझिम गिरे सावन' हे गाणं आपसूकच ओठांवर येतं. आणि याच पावसाळ्यात या गाण्याचे संगीतकार आर.डी. बर्मन यांचा जन्मदिवस. 27 जून हा आर. डी. बर्मन यांचा जन्मदिवस. पावसाळ्यात जन्मदिन असणाऱ्या या संगीतकाराचं चिंब पावसानं भरलेलं आणि मुंबईचं  सौंदर्य खुलवणारं रिमझिम गिरे सावन हे गाणं म्हणजे मास्टरपीसच. पंचमदांनी दिलेल्या सुमधूर संगीतानं ओथंबलेलं हे गाणं पावसात चिंब झालेल्या कोट्यवधी प्रेमिकांच्या मनात नेहमीच गुंजत असतं.  संगीतकार राहुल देव बर्मन हे आर.डी. बर्मन या नावानं सर्वांनाच माहित आहेत. आणि त्यांच्या जादुई संगीतामुळे त्यांना पंचमदा असंही म्हटलं जातं. पंचमदांच्या संगीताच्या जोरावर अनेक सिनेमे सुपरहिट झाले. काळाच्या पुढे असलेल्या या संगीतकाराच्या संगीताची जादू आजही कायम आहे. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरूणाईच्या ओठांवर असलेल्या गाण्याच्या भावना पंचमदांनी त्यांच्या संगीताच्या जादूनं प्रेममय करून टाकल्या. जब हम जवां होंगे, हे गाणं त्याची साक्ष देतं. 

थिरकवणाऱ्या संगीताचा साज देतानाच प्रेमिकांच्या मनाचा आवाजही आर.डी. बर्मन यांनी ओळखला. आणि प्रेमिकेच्या सौंदर्याची तारीफ करणाऱ्या गाण्याला अप्रतिम संगीताची साथ दिली. आर.डी. बर्मन यांच्या संगीताचं गारूड अनेक वर्षांनंतरही कायमच आहे. उलट जितके आर.डी. ऐकावे तितकंच त्यांचं संगीत अविट होत जातं. थिरकवणारं संगीत, प्रेमात पडलेल्यांना आवडणारं संगीत देणाऱ्या आर.डी. बर्मन यांनी गंभीर पठडीतल्या गाण्यांनाही साज चढवला. याचं उदाहरण म्हणजे, 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' हे गाणं आहे.

सिनेसृ्ष्टीत किती तरी संगीतकार आले आणि गेले. मात्र काळाच्या अतित असं संगीत देण्याची जादू केली ती फक्त आर.डी. बर्मन यांनी. त्यामुळेच पंचमदांचं संगीत बेभान करतं, तुम्हाला धुंद करतं आणि कायम तुमच्या ओठांवर राहतं. इतकंच नव्हे या पिढीतल्या संगीतकारांनाही पंचमदांचा संगीत खुणावतं. पंचमदांच्या गाण्यांचं रिमिक्स मोठ्या प्रमाणात करण्याचा मोह संगीतकारांना होतो. एकंदरीतच रिमिक्सच्या या जमान्यातही फिक्स असलेले एकमेव संगीतर आर. डी. बर्मनच आहेत आणि भविष्यातही राहतील यात शंकाच नाही. आर. डी. बर्मन म्हणजे बॉलिवूडला झिंग देणारा संगीतकार.  आर. डी. बर्मन पंचमदा या नावानंही ओळखले जातात. त्यांनी संगीत दिलेल्या शोले सिनेमातलं सर्वच  गाणी गाजली. मात्र असं संगीत पुन्हा होणं अशक्यच. 

आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि त्याला किशोरकुमारचा आवाज हे कॉम्बिनेशन म्हणजे सुपरहिटचा फॉर्म्युलाच. आणि हा फॉर्म्युला दोन सुपरस्टारसाठी लकी ठरला. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठीही पंचमदांचं संगीत, किशोरकुमारांचा स्वरसाज जादूई ठरला.  त्यामुळेच बेमिसाल सिनेमातली गाणी प्रचंड गाजली. काश्मीरचं सौंदर्य, किशोरकुमारांचा आवाज आणि आर.डी. बर्मन यांच्या संगीतानं 'कितनी खूब सुरत ये तस्बीर हैं' या गाण्याचं चित्र प्रत्येकाच्या मनात कायमचंच ठसलं. आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि त्याला आशा भोसलेंचा स्वर असेल तर ते गाणं कायमचंच रसिकांच्या हृदयात कोरलं जातं. 'दो लफ्जों की', हे गाणं रसिकांच्या मनात कायमचंच घर करून राहिलं आहे.

मागील सात दशकातील कोणताही सिनेमा पाहा आणि त्यातली गाणी ऐका. प्रत्येक सुपरहिट सिनेमातल्या गाण्यांना संगीत फक्त आर. डी. बर्मन यांचंच आहे. त्यातले काही सिनेमे तर फक्त आर.डी. बर्मन यांच्या जादुई संगीतामुळे हिट झालेत. आर. डी. बर्मन यांच्या संगीताच्या तालावर बॉलिवूडेच सुपरस्टार ठेका धरत सिनेमा सुपरहिट करून गेले. त्या सिनेमांच्या यादी पाहायची झाली तर ती खूप मोठी आहे. त्यामुळे त्यातल्या मोजक्याच सिनेमांची ही नावं पाहा.शोले, शान, दिवार, शक्ती,  द ग्रेट गॅम्बलर, सत्ते पे सत्ता, बॉम्बे टू गोवा,  अजनबी, कटि पतंग,  अमर प्रेम, आप की कसम,  मेरे जीवन साथी,  बहारों के सपने,   तीसरी मंजिल,  घर,  द ट्रेन,  आंधी, परिचय, अनामिका,  आंधी,  पडोसन, हम किसी से कम नहीं,  रामपूर का लक्ष्मण,  गोलमाल,  यादों की बारात, मासूम, सागर,  रॉकी,  लव्ह स्टोरी,  1942 अ लव्ह स्टोरी. ही नावं पाहूनच या सिनेमातली गाणी का हिट ठरली हे लक्षात येतं. कारण त्या सिनेमातल्या गाण्यांमध्ये संगीत नव्हे तर त्यात प्राण ओतण्याचं काम पंचमदांनी केलं होतं. पंचमदांनी तयार केलेली धून अवर्णनीय अशीच असायची. त्यांनी संगीत दिलेली गाणी अनेक गायक-गायिकांनी गायली. मात्र आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर असेल तर गाणं सुपरहिट होणारच यात कोणतीही शंकाच नव्हती. मात्र आशाताईं प्रमाणेच  आर.डी. बर्मन यांच्या संगीताचा साज स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जादूई आवाजालाही तितकाच परिसस्पर्श देणारा ठरला. 

थिरकायला लावणारं संगीत ही आर.डी. बर्मन यांच्या संगीताची जादू. हा संगीतकार काळाच्या खूप पुढे होता. त्यामुळेच की काय पंचमदा कधीही आऊटडेटेड होत नाहीत. म्हणूनच प्रत्येक पिढी जेव्हा प्रेमात पडते तेव्हा त्यांच्या सूराला संगीत देण्याचं काम पंचमदा करत असतात. हिंदी सिनेसृष्टीच्या संगीताला वेगळा टच देण्याचं काम आर.डी. बर्मन यांनी केलं. त्यांच्या संगीतावर आतापर्यंत पाच पिढ्या मंत्रमुग्ध झाल्या. आताच्या तरूण पिढीतही त्यांचीच गाणी जास्त प्रमाणात रिमिक्स केली जातात. तरूणाई कोणत्याही काळातली असो त्यांना थिरकवणारं संगीत हे फक्त पंचमदा यांचंच असतं. थिरकवणारं संगीत देणाऱ्या पंचमदा यांनी आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या गीतांनाही साज चढवला. आणि त्यामुळेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आर. डी. बर्मन यांनी दिलेलं संगीत प्रत्येकाच्या कानात गुंजत राहतं. पंचमदा जितके ऐकावेत तितकं त्यांचं संगीत अजून ऐकावं, असंच वाटत राहतं. #संगो

Saturday, February 18, 2023

शिवसेना : बाळासाहेब ते शिंदे

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. 56 वर्ष ज्यांची पकड होती त्या शिवसेनेवर आता ठाकरे कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं नाही. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर शिवसेनेची स्थापना केली होती. मुंबईत मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेनं आक्रमकपणे लढली. सुरवातीला मुंबई आणि ठाणे परिसरात जोमानं वाढलेली शिवसेना ऐंशीच्या दशकात राज्यात विस्तारासाठी सज्ज झाली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. 1995च्या विधानसबा निवडणुकीत शिवसेनेचे 75 आमदार निवडून आले होते. राज्यात पहिल्यांदाच बिगरकाँग्रेसी असलेलं युती सरकार सत्तेत आलं होतं. 

1999 नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राजकारणात जास्त सक्रीय नव्हते. कारण उद्धव ठाकरे पक्षात सक्रीय होऊ लागले होते. महाबळेश्वरमध्ये 2003ला शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलं. शिवसेनेसाठी हा मोठा टर्निंग पॉईंट होता. त्याचे पडसाद पुढच्या दोन वर्षातच उमटले. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली. तर 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली होती. शिवसेना या धक्क्यातूनही सावरली. 2014 मध्ये उद्धव ठाकरेंनी स्वबळावर 63 जागा जिंकल्या. 2019 मध्ये शिवसेना भाजपची पुन्हा युती झाली. शिवसेनेनं 56 जागा जिंकल्या. मात्र शिवसेनेनं भाजपची साथ सोडून मविआच्या साथीनं सत्ता स्थापन केली. हा शिवसेनेसाठी दुसरा मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या सत्तेमुळे शिवसेनेतील हिंदूत्ववादी नेते दुखावले. राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पक्षाला मारक ठरत असल्यानं एकनाथ शिंदेंनी दुसरा गट स्थापन करून भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टातली आणि निवडणूक आयोगातली लढाई सुरू झाली. निवडणूक आयोगातली लढाई एकनाथ शिंदेंनी जिंकली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं एकनाथ शिंदेंना मिळालं. पक्षावरील ठाकरे कुटुंबाची सत्ता संपुष्टात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतही शिवसेनेनं अनेक बंड पाहिले, पक्षांतरं पाहिली. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पण या आघातानंतरही शिवसेना वाढली. इतके सर्व बंड पचवणारी शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून सुरू झालेली शिवसेनेची वाटचाल आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सुरू झाली आहे.

आव्हान वाढलं...

उद्धव ठाकरे यांच्यासमोर आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान निर्माण झालं आहे. पक्ष आणि चिन्हं हे दोन्ही त्यांच्या हातून एकनाथ शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे आता शुन्यातून सुरूवात करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. उद्धव ठाकरेच नव्हे तर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरेंनीही मैदानात शड्डू ठोकला. पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी ठाकरे कुटुंबानं आता रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. शिवसैनिकांमध्ये पुन्हा जोश निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाषण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो अशा शब्दात त्यांनी निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन केलंय. मात्र हे आव्हान उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड खडतर असणार आहे.

कारण 40 आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. अनेक माजी खासदार, आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. धनुष्यबाण चिन्हं सर्वांच्या परिचयाचं आहे. त्यामुळे नवं चिन्ह घेऊन उद्धव ठाकरेंना मतदारांसमोर जावं लागणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले नेते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत मोठे नेते नाहीत. त्यामुळे मतदारांसमोर भाषण करायला उद्धव ठाकरेंसमोर दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे फक्त सामान्य शिवसैनिकांनाच सोबत घेऊन त्यांना लढाई लढावी लागणार आहे.

मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकाही एका वर्षावर आल्या आहेत. आणि त्या आधीच पक्ष आणि चिन्हं गेल्यानं उद्धव ठाकरेंना नव्यानं पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. एकंदरीतच ऐतिहासिक संकटावर उद्धव ठाकरे कशा प्रकारे मात करतात? यावर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे. #संगो

Sunday, July 31, 2022

राजकारणातला 'सेफ गेम'

 

शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीनं ताब्यात घेतलं. मात्र दबाव दहशतीला घाबरणार नसल्यानं संजय राऊत यांनी निक्षून सांगितलं. ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी हात उंचावून त्यांचे इरादे जाहीर केले होते. गळ्यातील भगवा गमछा फिरवून आगामी काळातल्या संघर्षाला तयार असल्याचे संकेतच एक प्रकारे संजय राऊतांनी दिले. ईडीचे अधिकारी घेऊन जात असताना त्यांनी कारमधून उपस्थित शिवसैनिकांना अभिवादन केलं. ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना संजय राऊतांनी झुकणार नाही, याचा पुनरूच्चार केला. 

शिवसेना महाराष्ट्र कमजोर होणार नाही. संजय राऊत झुकणार नाही. पक्ष सोडणार नाही. संजय राऊतांनी यावेळी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे. राजकीय लढाई आणि कारवाईला सामोरं जाणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. ईडीच्या भीतीनं अनेक नेते शिंदे गटात गेले, तर काही भाजपमध्ये गेले. अर्जुन खोतकरांनी तर अडचणीत असल्यामुळे सेफ होत असल्याचं माध्यमांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं. ईडीला घाबरून शिवसेनेचे आमदार, खासदार आणि बडे नेते शिंदे गटात दाखल होत असल्याची टीका मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही त्यावर बोलावं लागलं. घर सेफ करण्याऐवजी संजय राऊत ईडीच्या कारवाईला सामोरे गेले. राऊतांनी भाजपसोबत संघर्ष सुरू ठेवला, शिंदे गटातही राऊत गेले नाही. अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, भावना गवळी यांच्यावर आणि अशा अनेक नेत्यांना ईडीच्या कारवाईची भीती होती. या नेत्यांनी शिंदे गटात जाऊन त्यांचं घर सेफ केलं.  मात्र या राजकीय लढाईत संजय राऊतांनी स्वत: पेक्षा आणि स्वत:च्या घराला सेप करण्यापेक्षा जास्त महत्व शिवसेनेला सेफ करायला दिलं. तर शिंदे गटातल्या आमदारांनी स्वत:ला सेफ करायला महत्त्व दिलं. शिंदे गटातील आमदार आणि संजय राऊत यांच्यातला हाच सर्वात मोठा फरक इथे दिसून आला. पक्ष आणि उद्धव ठाकरे अडचणीत असताना संजय राऊतांनी घेतलेली आक्रमक भूमिकाच आगामी काळात शिवसेनेला बळ देणारी ठरू शकते.

ईडीकडून अटक होणार असल्याचा अंदाज संजय राऊत यांना सहा महिन्यांपूर्वीच आला होता. त्याबाबत संजय राऊतांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहलं होतं. राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपचे दोन नेते ईडीच्या माध्यमातून धमकी देत होते, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामध्ये संजय राऊतांचा सिंहाचा वाटा होता. भाजपची मुख्यमंत्रीपदाची आणि सरकारची संधी संजय राऊतांमुळे हुकली होती. त्यामुळे संजय राऊत भाजप नेत्यांच्या सातत्यानं निशाण्यावर होते. मात्र दररोज सकाळी नित्यनेमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत भाजप नेत्यांना पुरून ऊरत होते. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर हल्ला करण्याची संधी सोडली जात नव्हती. आणि त्यातच पत्राचाळीचा मुद्दा भाजपच्या हाती लागला. त्या मुद्याचा कायदेशीर उपयोग करून भाजपनं संजय राऊतांना अडकवण्याची संधी साधली. मात्र या संकटात संजय राऊतांनीही राजकीय संधी साधली. शिवसेना कमजोर होणार नाही आणि झुकणार नाही, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.  राजकारणात शह आणि काटशह दिले जातात. राजकारणात कोणताच विजय किंवा पराभव हा शेवटचा नसतो. 2019 मध्ये संजय राऊतांनी मविआचं सरकार आणून भाजपला मात दिली होती. आता ईडीनं कारवाई केल्यानं संजय राऊतांना एकप्रकारे चेकमेटच देण्यात आलाय. आता पुढच्या राजकारणात कोण कोणावर कशी मात करेल हे सांगता येत नाही. कारण मौका सब को मिलता हैं. आता पुढचा मौका कोणाचा असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

संजय राऊत  यांच्यावर पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झाली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे 'ईडी'तील सूत्रांचं म्हणणे आहे. प्रवीण राऊत यांनी सर्व पैसा त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केले होते. यातील 83 लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले होते. त्याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला, असा 'ईडी'चा संशय आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांनाही 'ईडी'ने नोटीस बजावली होती. त्यावेळी वर्षा यांनी 55 लाख रुपये माधुरी यांना परत केले होते. परंतु त्यानंतर 'ईडी'ने पालघरमधील जमीन, दादर येथील फ्लॅट आणि किहीम येथील आठ भूखंडांवर टाच आणली होती. एकंदरीतच पत्राचाळीच्या माध्यमातून भाजपनं संजय राऊतांचा हिशेब चुकता केला. #संगो #SANJAYRAUT #EKNATHSHINDE #SHIVSENA #ED