Thursday, July 23, 2026

साला एक कॉक्रोच...

 

साला एक कॉक्रोच स्टुडन्ट को क्रांतीकारी बनाता हैं,  एखाद्या सिनेमात हा डायलॉगही होऊ शकेल. त्याचं कारणही तसंच आहे. देशातील तरूणांच्या मनातील असंतोषाला आंदोलनाचं रूप देण्याचं काम कॉक्रोचनं केलं. सीजेआय सूर्यकांत यांनी युवकांच्या बाबत कॉक्रोच असा उल्लेख केल्यामुळे तरूणाई धुमसत होती. त्यातच जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील याचिकेवर तातडीची सुनावणी नकार देताना सूर्यकांत यांनी "Please don't waste our time" अशी टिप्पणी केली. त्यावरही वेगवेगळ्या प्रतक्रिया उमटत आहेत.

नीटसह इतर परीक्षांच्या पेपरफुटीच्या मालिकेमुळे लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास आधीच डळमळीत झाला होता. वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या भविष्याबद्दल असुरक्षित वाटू लागले होते. पेपरफुटी हा केवळ परीक्षा व्यवस्थेचा प्रश्न राहिला नाही, तर तो न्याय, समान संधी आणि विश्वासाचा प्रश्न बनला होता.

साला एक कॉक्रोच स्टुडन्ट को क्रांतीकारी बनाता हैं,  एखाद्या सिनेमात हा डायलॉगही होऊ शकेल. त्याचं कारणही तसंच आहे. देशातील तरूणांच्या मनातील असंतोषाला आंदोलनाचं रूप देण्याचं काम कॉक्रोचनं केलं. सीजेआय सूर्यकांत यांनी युवकांच्या बाबत कॉक्रोच असा उल्लेख केल्यामुळे तरूणाई धुमसत होती. त्यातच जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील याचिकेवर तातडीची सुनावणी नकार देताना सूर्यकांत यांनी "Please don't waste our time" अशी टिप्पणी केली. त्यावरही वेगवेगळ्या प्रतक्रिया उमटत आहेत.
नीटसह इतर परीक्षांच्या पेपरफुटीच्या मालिकेमुळे लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास आधीच डळमळीत झाला होता. वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या भविष्याबद्दल असुरक्षित वाटू लागले होते. पेपरफुटी हा केवळ परीक्षा व्यवस्थेचा प्रश्न राहिला नाही, तर तो न्याय, समान संधी आणि विश्वासाचा प्रश्न बनला होता.

याचदरम्यान, सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले. त्यामध्ये गणवेशात नसलेले, गुंडांसारखे दिसणारे काही जण विद्यार्थ्यांना काठ्यांनी मारहाण करत होते. एका व्हिडीओत काही पोलिस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनी असलेल्या आंदोलनकर्त्यांशी अयोग्य वर्तन केलं. मुलीच्या पार्श्वभागाला काठी लावून पोलीस हसत होते. काही विद्यार्थिनींचे कपडेही फाटले होते. यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला. त्यानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. इन्स्टाग्रामवर वेगवेगळे व्हिडीओ टाकून त्यांनी त्यांची कल्पकता दाखवून दिली. लक्षवेधी बॅनरच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांनी प्रश्न विचारले.
मुंबईत तर विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणारा पोलिसांचा व्हिडीओ आगीत तेल टाकणारा टाकला. खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती उघड झाल्यानं, विद्यार्थ्यांच्या संतापात भर पडली.
या सर्व घटनांची साखळी पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट होते, विद्यार्थी केवळ पेपरफुटीविरोधात रस्त्यावर उतरले नाहीत. तर त्यांना वाटणाऱ्या अन्याय, अपमान आणि दडपशाहीविरोधात त्यांनी आवाज उठवला.
Gen Z ही पिढी फक्त मोबाईल, रिल्स आणि सोशल मीडियापुरती मर्यादित आहे, अशी टीका केली जायची. मात्र या आंदोलनानं वेगळंच चित्र दाखवलं. हीच युवा पिढी हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरली. आंदोलनात सहभागी झाली. सोशल मीडियावर लाईक्स आणि शेअर पुरतीच मर्यादित असलेली ही युवा पिढी प्रश्न विचारायला लागली. त्यांच्या भविष्याबद्दलची चिंता सार्वजनिकपणे व्यक्त करायला.
लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज हा केवळ विरोधाचा आवाज नसतो. तो समाजाच्या भविष्यातील दिशेचा स्पष्ट संकेत असतो. त्यामुळे आंदोलनाकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहण्यापेक्षा, त्यामागील कारणे समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरेल.
आणि त्यामुळेच असं म्हणावं वाटतं की, "साला एक कॉक्रोच स्टुडन्ट को क्रांतीकारी बनाता हैं."

#संगो  #
GenZ #कॉक्रोच


Monday, March 30, 2026

'कितने अजीब रिश्ते है यहाँ पे'

 

राज्यातील एक राजकीय वैर संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. आदित्य ठाकरेंनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या बर्थ डे पार्टीला उपस्थिती लावली. आणि मागील पाच वर्षांपासून ठाकरे आणि कंबोज यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता. त्यामुळेच आदित्य ठाकरेंनी मोहित कंबोज यांच्या मुलीच्या बर्थ डे पार्टीला हजेरी  लावली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. खरं तर त्या पार्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार  सुप्रिया सुळे, मिलिंद नार्वेकरांनीही पायधुळ झाडली होती. एवढचं काय पण अभिनेता शाहरुख खानही या पार्टीसाठी अवर्जून हजर होता. मात्र आदित्य ठाकरेंची पार्टीतील उपस्थिती वेगळ्याच मुद्यावरून चर्चेत आली. त्याला कारण होतं, आधी झालेल्या एका पार्टीचं. कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान तेजस ठाकरेंनी दबाव टाकून हॉटेल सुरु करायला लावल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. त्या पार्टीचे व्हिडीओही त्यांनी व्हारल केले होते. 20 जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते. त्यातही मोहित कंबोज यांचं नावही चर्चेत आलं होतं. शिवसेनेतून फुटलेल्या आमदार आणि मंत्र्यांसोबत कंबोज यांनी घेतलेल्या गळाभेटीचे व्हिडीओ माध्यमांमध्ये झळकले होते. शिवसेना फोडण्याच्या राजकीय ऑपरेशनमध्ये कंबोजांचीही भूमिका होती.

मात्र हा सर्व घटनाक्रम विसरून आदित्य ठाकरे कंबोज यांच्या पार्टीत सहभागी झाले. अर्थात हे ही तितकंच खरं आहे की, जर कुणाच्या घरी वाढदिवस किंवा लग्न असेल आणि निमंत्रण मिळालं तर जायलाच हवं. जर वाद विसरून यजमान निमंत्रण देत असेल तर पाहुण्यांनीही मोठ्या मनानं जायलाच हवं, यात चुकीचं असं काहीच नाही. त्यामुळेच की काय, राजकारण वेगळं आणि वैयक्तिक संबंध वेगळे, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली.

कंबोज यांच्या पार्टीत आदित्य ठाकरेच नव्हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही पार्टीत सहभागी झाले होते. त्यावर अमित ठाकरेंनी 'राजसाहेब आणि मोहित कंबोज जुने मित्र आहेत', असं सांगितलं.  भाजपच्या नेत्यांनीही 'कौटुंबिक कार्यक्रमात सगळेच जातात', अशी चाणाक्ष भूमिका घेतली.

मात्र 'भाजपकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत', अशा शब्दात शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंवर हल्लाबोल केला.  सुजात आंबेडकर यांनी ट्विट करून तोफ डागली. 'ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी? भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. मविआचं सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात कंबोज यांचा हात होता. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारं ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करत आहेत', अशी तिखट भाषा सुजात आंबेडकर यांनी वापरली.

आदित्य ठाकरेंची पार्टीतील उपस्थिती हा केवळ कौटुंबिक स्नेह आहे की आगामी राजकीय समीकरणांची नांदी, हे आता आगामी काळात स्पष्ट होईल. एकीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये काही मुद्द्यांवरून (उदा. सातारा झेडपी) मतभेद वाढत चालले आहेत. तर दुसरीकडे भाजप नेत्याच्या घरच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे सहभागी होत आहेत. हे परस्पर विरोधी चित्र बरंच बोलकं आहे. याच पार्टीत अजून एक विसंगत चित्र होतं, ते म्हणजे अभिनेता शाहरूख खानच्या उपस्थितीचं. शाहरूखचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी मोहित कंबोज यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज रॅकेटचा आरोप केला होता. एनसीबीच्या कारवाईचं समर्थन करून शाहरूख खानवर अप्रत्यक्षपणे तोफ डागली होती. तरीह किंग खान अशी ओळख असलेला शाहरूख खान कोणत्या लाचारीमुळे गेला असेल? हे त्यालाच माहित. आता इतके सर्व पाहुणे निमंत्रित केले होते म्हटल्यावर कंबोज यांनी नवाब मलिक यांनाही बोलवायला काय हरकत होती? 

एकंदरीतच आदित्य ठाकरे, शाहरूख खान यांची पार्टीतील उपस्थिती पाहून, 'कितने अजीब रिश्ते है यहाँ पे' हे पेज थ्री सिनेमातील गाणं नक्कीच आठवतं.

#संगो 

Tuesday, February 10, 2026

एक अपघात, अनेक प्रश्न

 

'In politics, nothing happens by accident. If it happens, you can bet it was planned that way.'

संजय गांधी यांना इंदिरा गांधींनी मारलं होतं, हे लहानपणी अनेकदा ऐकलं आहे. संजय गांधींचा विमान अपघात घडवून आणण्यात आला होता, असं सर्रासपणे म्हटलं जात होतं. 11 जून 2000 रोजी राजेश पायलट यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्या अपघातावरही संशय व्यक्त करण्यात आला होता. 30 सप्टेंबर 2001 रोजी माधवराव शिंदे यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळीही घातपाताच्या चर्चा रंगल्या होत्या.

अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर घातपात, कट, भ्रष्टाचाराची फाईल असे अनेक अँगल समोर येत आहेत. अजित पवारांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. '1999 साली राज्यात जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारुढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले होते. तेव्हा, पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी ती फाईल पाहिली असता, त्यामध्ये या योजनेची रक्कम 310 कोटी रुपये असल्याचं आढळून आलं. मात्र, मी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचे सांगितले' अशी माहिती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली होती. 

अजित पवारांनी भाजपवर केलेले आरोप आणि त्यानंतर झालेला विमान अपघात, याची आता सांगड घातली जात आहे. अजित पवार त्या विमानात नव्हते, त्यांना कुठे तरी डांबून ठेवण्यात आलं आहे, अशी चर्चा ही सुरू आहे. अजित पवारांचं घड्याळ आणि डीएनए जुळवण्यासाठी काही रक्त विमानात ठेवण्यात आलं होतं, असाही अंदाज काही जणांनी वर्तवला.

त्यातच रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनीचा निष्काळजीपणा दाखवून दिला. पायलट, कट आणि आत्मघाती हल्ला अशी थेअरी रोहित पवारांनी मांडली. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले. 

'पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करावी असा आग्रह होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे', असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांभोवती संशय निर्माण केला. अर्थात हे सर्वांना पटेल असं नाही.

एकंदरीतच चौकशीत काय ते समोर येईलच. पण तो पर्यंत सुरू असलेल्या चर्चा थांबणार नाहीत, हे ही तितकंच खरं.


#संगो  #अजितपवार 


Friday, January 30, 2026

दिलखुलास दादा...


 अजित पवार त्यांच्या दिलदार, मिश्किल आणि माफ करण्याच्या स्वभावामुळे कायम लक्षात राहतील.  एक खंबीर नेते म्हणूनही अजित पवार लक्षात राहतील. कारण 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर अजित पवारांची प्रचंड बदनामी झाली होती. मात्र तरीही अजित पवार डगमगले नाहीत.  देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसिंगचा इशारा दिला होता. भाजपनं बैलगाडी भरून पुरावे चितळे समितीला दिले होते. त्यामुळे अजित पवार जनतेत खलनायक झाले होते. मी सुद्धा पाच वर्ष अजित पवारांना अटक होण्यासाठी फेसबुकवर सलग पोस्ट टाकत होतो. मात्र अजित पवारांवर चक्की पिसिंगची वेळ आलीच नाही. 

ज्यांनी आरोप केले त्यांच्यासोबतच अजित पवार सत्तेत आले. घासून नाही तर ठासून आले. इतकंच नव्हे तर ज्या भाजपनं त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्याच भाजपवर अजित पवारांनीही पलटवार केला. युतीचं सरकार असताना 1995 मध्ये पुरंदर योजनेतून पार्टी फंडसाठी 100 कोटी रुपये काढण्यात आले होते, असा आरोप अजित पवारांनी केला होता. अजित पवारांवर मागील चौदा वर्षांपासून सिंचन घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपवरच दादांनी डाव उलटवला होता. अजित पवारांच्या या बेधडक शैलीमुळे 'मौका सभी को मिलता है' हा डायलॉग पुन्हा एकदा आठवला.
'ज्यांनी माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय.' एवढ्यावरच अजित पवार थांबले नाही तर, 'भाजपची राक्षसी भूक शहरातली परिस्थिती बिघडवत आहे'  अशी जळजळीत टीकाही अजित पवारांनी केली होती. 'कुत्र्यांच्या नसबंदीत पैसे खाल्ले. मिळेल तिथे पैसे खायचा सपाटा लावला. सत्तेचा माज आल्यामुळे अशी कामं करतात', असा घणाघात अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात केला होता.
मात्र अजित पवारांनी त्यांच्यावर प्रचंड आरोप झाल्यानंतरही कुणाचा द्वेष केला नाही. आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर खालच्या पातळीवरून टीका केली नाही. सिंचन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्यांना अजित पवारांनी माफ केलं होतं. त्यामुळेच की काय, सिंचन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या भाजपला अजित पवारांच्या श्रद्धांजलीची जाहिरात द्यावी लागली. खोट्या आरोपांसाठी भाजप अजित पवारांची माफी मागणार की नाही? हे माहित नाही. मात्र मी, 'सिंचन घोटाळा करणाऱ्यांना अटक कधी?' या पोस्टसाठी अजित पवारांची मनापासून माफी मागतो.
दिलदार अजित पवारांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दृढ मैत्री होती. त्यामुळेच दोन्ही नेत्यांनी आधी झालेले आरोप-प्रत्यारोप मागे सोडत पुढे वाटचाल सुरू केली होती.
राज्याच्या राजकारणात समतोल राखणारा एक नेता आपण गमावला. विकासाच्या योजनांमध्ये अजित पवार राजकारण करत नव्हते, असं खुद्द विरोधी पक्षातील नेत्यांनीच सांगितलं. प्रचंड उज्ज्वल राजकीय भविष्य असलेला आणि विकासाचं व्हिजन असलेला हा नेता राज्यासाठी मोठी संपत्ती होता. अजित पवारांकडून आतापर्यंत अनेक कामं झाली होती. अनेक कामांना अजित पवार गती देणार होते, तशी त्यांच्यात क्षमता होती. शरद पवारांनी ज्या प्रकारे सहकार आणि राजकारणाची सांगड घालत विकास कामांवर भर दिला होता, तशाच पद्धतीनं अजित पवारांची वेगानं वाटचाल सुरू होती. मात्र नियतीला हे मंजूर नव्हतं. वेगानं वाटचाल करणाऱ्या अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला अन् पवार नावाभोवती फिरणाऱ्या राजकारणाची गतीच मंदावली. भविष्यात राज्यातील राजकारण पवार या नावाभोवती आधीसारखं फिरेल का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
#संगो #अजितपवार

Saturday, January 17, 2026

'देवा'ची करणी विजयाची हमी, विरोधक कुठे पडले कमी?


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत भाजपला पुन्हा नंबर केलं. मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचे तब्बल 89 उमेदवार जिंकले. संपूर्ण राज्यभरात हेच चित्र दिसलं. देवेंद्र फडणवीस यांनी जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेतल्या. पक्षाची सर्व टीम कामाला लावली. त्यामुळे मोठं यश मिळालं. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. 

 मागील तीन दशकांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नंबर वन असायची. शिवसेनेचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकत होता. आताही जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार, सहा आमदार आणि पालकमंत्री आहे. मात्र असं असूनही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. तर दुसऱ्या क्रमांकावर एमआएएमचे उमेदवार निवडून आले. परिणामी नंबर वन असलेल्या भाजपचा छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. जालना महापालिकेसाठी पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलं. भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यावर मात केली. परिणामी जालन्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरलेल्या भाजपचा महापौर बसणार यात आता कोणतीही शंका उरली नाही. जालन्या प्रमाणेच नांदेडमध्येही भाजपनं सर्वांना पिछाडीवर टाकत अव्वल क्रमांक पटकवलाय. असंच यश नाशिक, जळगाव, केडीएमसी, उल्हासनगर, नागपूरसह तब्बल 23 महापालिकांमध्ये भाजपनं मिळवलं.

2017 मध्ये मुंबई महापालिकेत भाजपचे 82 नगरसेवक होते. आता 2026 मध्ये भाजपचे 89 नगरसेवक आहेत. डबल इंजिन सरकार, कमकुवत विरोधक असतानाही 9 वर्षात भाजपचे सातच नगरसेवक वाढले. तर विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवणारी शिंदेंची शिवसेना ठाण्यात अव्वल राहिली. मुंबई परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार चांगल्या संख्येनं निवडून आले. मात्र मुंबईत शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेले होते, माजी नगरसेवकही शिंदेंसोबत होते. मात्र अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मुंबईत चांगली झुंज देत 71 उमेदवार निवडून आणले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मुंबईत महायुतीला कडवी झुंज दिली. उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. पक्षातील बडे नेते आणि अनेक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. मात्र संकटाच्या काळात सोबत आलेल्या राज ठाकरेंमुळे कठिण काळातही ठाकरे ब्रँड टिकून राहिला. मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला मिळालेल्या जागा त्यांचा आत्मविश्वास बळकट करणाऱ्या ठरणार आहेत. इतकंच नव्हे तर ठाकरेंमुळे विरोधी पक्षही सक्षम झालाय.

हातात कोणतीही सत्ता नसताना ठाकरे बंधूंनी मुंबईत त्यांची ताकद दाखवून दिली. तर महायुतीत भाजपच्या सोबत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईत तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवल्या. एकंदरीतच मुंबई महापालिकेवर महायुतीनं वर्चस्व निर्माण केलं. मात्र प्रतिकूल परिस्थितीत ठाकरेंनी यश मिळवलं. टायगर अभी जिंदा हैं, अशी डरकाळी फोडत आम्ही अजून मैदानात आहोत, असा संदेशच ठाकरे बंधूंनी दिला. मात्र मुंबईच्या बाहेरही महाराष्ट्र आहे. याचा बहुतेक ठाकरे बंधूंना विसर पडला असावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा काळ आणि करिष्मा वेगळा होता. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर, संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावतीमध्ये सभा घ्यायचे. मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनाप्रमुखांची युतीची शेवटची सभा मुंबईत शिवाजी पार्कवर व्हायची. वातावरण बदलायचं आणि युतीला यश मिळायचं. मात्र आता राजकारण बदललं आहे. भाजप हा पक्ष आणि त्यांचे नेते 24 X 7 इलेक्शन मोडवर असतात. त्यामुळे ठाकरे बंधू आणि आदित्य, अमित यांनाही ग्रामीण महाराष्ट्र आणि शहरी भागासोबत नाळ जोडावी लागेल. तरच त्यांचे पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतील. 

सत्तेत असूनही एकनाथ शिंदे मुंबईत मागे पडले. मुंबईत भाजपचा महापौर होणार हे आता स्पष्ट झालं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुंबईवरील शिवसेनेचा झेंडा जावून आता भाजपचा झेंडा लागणार, ही बाब एकनाथ शिंदेंसाठी चिंता वाढवणारी आहे. आणि बहुतेक हेच हेरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना जयचंद संबोधलं. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेचा झेंडा काढून भाजपचा झेंडा रोवायला मदत केली, असं जिव्हारी लागणारं वक्तव्य त्यामुळेच करण्यात आलं. एकनाथ शिंदेंना मुंबईच नव्हे तर मराठवाड्यातही अपयश आलं. मागील तीन दशकांपासून ताब्यात असलेली छत्रपती संभाजीनगरची सत्ता राखण्यात एकनाथ शिंदेंना अपयश आलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संभाजीनगर आणि मराठवाड्यावर मोठा प्रभाव होता. तो प्रभाव शिंदेंच्या शिवसेनेला टिकवता आला नाही. मुंबई ठाण्यानंतर शिवसेना सर्वात जास्त जोमानं वाढली ती छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये. मात्र या दोन्ही शहरांमध्ये आता भाजपचा महापौर होणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही शरमेची बाब आहे.  

महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कधीही एकत्र येतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण महापालिका निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावांवर अनेक महानगर पालिकांमध्ये झीरो जागा मिळवण्याचा विक्रम जमा झाला आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांवर भाजपनं मजबूत पकड मिळवली आहे. परिणामी कुटुंब म्हणून एकत्र असलेले दोन्ही पवार आगामी झेडपी, पंचायत समिती एकत्रितपणे लढवून कधी पक्षांचं विलिनीकरण कळतील हे कळणारही नाही.

सर्वात आश्चर्य आहे ते काँग्रेसचं. ना कुणाची सभा, ना कुणाचा रोड शो तरीही काँग्रेसनं लातूर, सोलापूर, कोल्हापूरमध्ये चांगली कामगिरी केली. एकंदरीतच महापालिका निवडणुकीच्या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट होते. जो मेहनत घेईल त्याला यश मिळेल. देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं राज्यभर मेहनत घेतली त्यांनी संपूर्ण राज्यात यश मिळालं. बिकट परिस्थितीत ठाकरे बंधूंनी मेहनत घेतली त्यांना मुंबईत दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्यानं पुढील राजकारण करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला.

भाजपचे कार्यकर्ते अकेला देवेंद्र क्या क्या करेगा, असं म्हणत असत असतात. त्यावर विरोधक अशी टीका करतात की, देवेंद्र सोबत ईडी, सीबीआय, सरकारी यंत्रणा आणि दुसऱ्या पक्षातून घेतलेले भ्रष्टाचारी नेते आहेत. मात्र असं असलं तरी विरोधकांना मेहनत करायला, राज्यभर सभा घ्यायला कुणीही रोखलेलं नाही. आता बघूयात लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणते पक्ष किती मेहनत घेतात, रस्त्यावर उतरतात, जनतेत मिसळतात. जो जनतेत जाईल, शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न हाती घेईल त्याचा मतदारांचा आशीर्वाद मिळेल.


#संगो #बाळासाहेबठाकरे #शिवसेना  #भाजप  #महापालिका  #मुंबई #ठाकरे #फडणवीस #शिंदे

Sunday, July 6, 2025

पवार, फडणवीसांना जमलं. ठाकरेंना जमेल?

 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. पण हे दोन्ही भाऊ त्यांचे दोघांचे पक्ष किती वाढवतील? राज्यात सातत्यानं किती दौरे करतील? इतर पक्षातील किती नेते त्यांच्या पक्षात आणतील? असे प्रश्न निर्माण होत आहेत. कारण पक्ष वाढवायचा असेल तर सातत्यानं दौरे करावे लागतात. कार्यकर्त्यांमध्ये मिसळावं लागतं. उदाहरणच द्यायचं झालं तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं देता येईल. 

शरद पवार या वयातही राज्याच्या विविध भागात दौरे करतात. कार्यकर्त्यांच्या भेटी घेतात. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. त्यांच्या पक्षातून कुणी दुसऱ्या पक्षात गेलं तर त्याला गद्दार म्हणत नाहीत. इतर पक्षातून कुणी आलं तर हुरळूनही जात नाही. नुकतंच आपण पाहिलं. विधानसभा निवडणुकीत अनेकांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश घेतला, निवडणूक लढवली. पराभूत झाल्यानंतर संदीप नाईकसह अनेक नेत्यांनी पुन्हा भाजपची वाट धरली. मात्र त्या बाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली नाही. नव्वदच्या दशकात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पप्पू कलानीला पवारांनी राजकीय आश्रय दिला होता.  बॉम्ब स्फोटातील आरोपींना विमानात सोबत आणल्याचा आरोपही शरद पवारांवर झाला होता. नंतरच्या काळात त्यांच्या सोबत असलेले अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल अशा अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण शरद पवारांनी त्याची पर्वा केली नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना बळ देत पक्ष वाढवण्यावर भर दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपला प्रचंड सशक्त केलं आहे. अनेक पक्षातील नेते त्यांनी भाजपमध्ये घेतले. नेत्यांना पक्षात घेताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर त्या नेत्यांनी आधी काय आरोप केले होते, याकडे लक्ष दिलं नाही. फडणवीस नावाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देऊ शकतो का? असं प्रश्न विचारून फडणवीसांच्या जातीकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नितेश राणेंनाही त्यांनी पक्षात घेतलं. ही सोबतची लिंक पाहा, यातून तुम्हाला सर्व कळेल.

https://www.facebook.com/watch/?ref=search&v=3861802557419897&external_log_id=67696409-9e7b-4f75-8368-a428f81d5d45&q=%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE%20%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87

नितेश राणेंची वडील नारायण राणेंनी तर भाजपला गुंडांचा पक्ष म्हटलं होतं. त्यावर विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंवरील गंभीर गुन्हेच वाचून दाखवले होते. सोबतची लिंक पाहा.

https://www.youtube.com/watch?v=d6fcR6uzi80

पक्ष वाढवायचा असेल तर मागील आरोप-प्रत्यारोप विसरून पुढे जायला देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिलं. अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण यांच्यासारखे अनेक बडे ईडीच्या कारवाईनंतर किंवा ईडीनं कारवाई करू नये यासाठी थेट भाजपमध्ये आले किंवा भाजपच्या सोबत आले. या सर्वांचं स्वागत देवेंद्र फडणवीस यांनी केलं. एकीकडे ईडी, सीबीआय, किरीट सोमय्या भ्रष्ट नेत्यांच्या मागे लागायचे. नंतर हे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरण यायचे. किरीट सोमय्या कसे हात धुवून मागे लागायचे, त्याचं एक उदाहरण पाहा.

https://www.loksatta.com/maharashtra/kirit-somaiya-aggressive-over-sunil-tatkare-in-irrigation-scam-1216811/

अर्थात यात चूक काय म्हणता येईल? कारण तत्व जपून पक्ष वाढत नाही. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी तत्वांचं राजकारण केलं. पण पक्ष वाढला नाही. नरेंद्र मोदी, अमित शाह सत्तेत आल्यानंतर त्यांनी पक्षाचा विस्तार करण्यावर भर दिला. हेमंत बिस्व सरमा, मुकल रॉय, सुवेंदू अधिकारी, अजय चौटाला, भुमा नागी रेड्डी या भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेण्यात आलं. हे करताना भाजपचं पार्टी विथ डिफन्स कुठच्या कुठे गळून पडलं, हे कळालंही नाही. महाराष्ट्रातही राणे कुटुंब, विखे कुटुंब, अशोक चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. ज्यांच्यावर आरोप केले होते त्यांनाच पक्ष मजबूत करण्यासाठी आणि विकासासाठी सोबत घेण्यात आलं. भ्रष्ट नेत्यांना सोबत घेणं हा रणनीतीचा भागही असू शकेल. मात्र त्या सोबतच कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, मेळावे, विकास कामं, चौफेर दोरे, कार्यकर्त्यांची कामं करणं, नेत्यांकडून कामं करून घेणं या सर्वांवर भर देवून देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा विस्तार केला. राज्यात परकीय गुंतवणूक कशी वाढेल, औद्योगिकीकरण, समृद्धी महामार्ग अशी अनेक कामंही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना शरद पवार आणि दवेंद्र फडणवीस यांच्या प्रमाणे कार्य करता येईल का? अर्थात ED, CBI, गृह खातं हाती नसल्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना पक्षविस्तार करताना नक्कीच मर्यादा आहेत. असं असलं तरी पक्षविस्तार अशक्यही नाही. पक्ष सोडून गेलेले मात्र पुन्हा येण्यास इच्छुक असलेल्यांना ठाकरे पक्षात घेतील का? मुंबई सोडून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, कोकण या भागात हे दोघे भाऊ सातत्यानं दौरे करणार आहेत का? ग्रामीण भागात जावून कार्यकर्त्यांना भेटणार आहेत का? ग्रामीण भागातील शिवसैनिक, मनसैनिक थेट मुंबईत येवून ठाकरेंना भेटू शकतील का? आदित्य ठाकरे, अमित ठाकरे रस्त्यावर उतरून युवकांचे प्रश्न मांडणार आहेत का? शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी ठाकरे आंदोलन करणार आहेत का?  कर्जमाफीसाठी ठाकरे पेटून उठतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तरच उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्यांच्या पक्षाचा विस्तार करू शकतील.

#संगो #उद्धवठाकरे #राजठाकरे #शरदपवार #देवेंद्रफडणवीस  #BJP #SHIVSENAUBT #ED 


Sunday, March 23, 2025

...आणि रिया जिंकली



मागील 5 वर्ष आरोपांचा सामना करणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती अखेर जिंकली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रियालाच अनेकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. मात्र आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहचा मृत्यू  आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून देशात जोरदार राजकारण झालं होतं. सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. तर त्याच्या 6 दिवस आधी म्हणजेच 8 जून 2020 रोजी दिशा सालियानचा मुंबईत मृत्यू झाला होता. दिशा ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती. दिशा पाठोपाठ सुशांतच्या मृत्यूमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू होऊन अनेक थिअरी मांडल्या जात होत्या. परिणामी सदर मृत्यूचं प्रकरण प्रथमदर्शनी आत्महत्या वाटत असतानाही काही संशयामुळे सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. मात्र आता सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला हिंदी आणि इंग्रजी माध्यमांनी तर अक्षरश: खलनायिका ठरवलं होतं. मीडिया ट्रायलच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली. 8 सप्टेंबर 2020 रोजी रियाला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. तर 7 ऑक्टोबर 2020 रोजी तिला जामीन मंजूर झाला होता. त्यामुळे रियाची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. तर आता 22 मार्च 2025 रोजी रियाला क्लीन चिट मिळाली आहे.

मात्र रिया चक्रवर्तीला तर काही माध्यमांनी फक्त फासावर लटकवायचंच शिल्लक ठेवलं होतं. त्यात हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेल्स आघाडीवर होते. त्या काळात त्या चॅनेल्सच्या रिपोर्टर्सनी कसा उच्छाद मांडला होता, हे अजूनही नागरिकांच्या लक्षात आहेत. 


त्यातच 2020 च्या नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये निवडणुका होत्या. आणि सुशांत सिंह राजपूत बिहारचा असल्यानं हा मुद्दा तिथे प्रचारात मोठ्या प्रमाणात वापरला गेला. 'ना भूले हैं, ना भूलने देंगे' अशा घोषणा तिथं भाजपकडून देण्यात आल्या. 

मात्र आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमुळे रिया चक्रवर्तीला खऱ्या अर्थानं दिलासा मिळाला आहे. कारण माध्यमातील काही घटकांसह सोशल मीडियावरून रिया चक्रवर्तीवर आरोप करून तिची प्रतिमा मलिन करण्यात आली होती. बिहारमध्ये राजकीय फायद्यासाठी राजकीय पक्षांनीही रियावर चिकलफेक केली होती. मात्र मागील 5 वर्षात रिया चक्रवर्ती संयमानं या परिस्थितीला सामोरं गेली. रिया चक्रवर्तीनं ही लढाई जिंकली. आणि खोटे आरोप करणारा मीडिया, सोशल मीडिया, राजकीय पक्ष तोंडावर आपटले. अन् रिया चक्रवर्तीनं मोठी लढाई जिंकली. 

#संगो  #रियाचक्रवर्ती  #सुशांतसिंहराजपूत

Wednesday, December 4, 2024

फिर वही दिल लाया हूं

 

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले ते देवेंद्र फडणवीस. लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जोरदार मोर्चेबांधणी करून चित्र बदलून टाकलं. सलग तिसऱ्यांदा भाजपला शंभरीपार करण्याचा पराक्रम करून देवेंद्र फडणवीस बाजीगर ठरले.  2014, 2019 आणि 2024 अशा सलग तीन विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शंभर नंबरी कामगिरी केलीय. मात्र या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात तब्बल 30 जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा मिळाल्यानंतर मला मोकळं करा असं वक्तव्य करणाऱ्या फडणवीसांनी नंतर सगळ्यांनाच मोकळं केलं. विरोधकांना दणदणीत पराभव करून संपवलं. पक्षातील स्पर्धकही त्यांनी गलितगात्र करून टाकले. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे ही तशी जुनी उदाहरणं. तर विनोद तावडेंना हितेंद ठाकूर यांनी डांबून ठेवलं होतं. तावडेंची टिप भाजपमधूनच दिल्याची माहिती हितेंद्र ठाकूर यांनी दिली होती. (ती टिप कुणी दिली? टिप देणारा कुणाचा खास होता? ही माहिती ठाकूरांकडून मिळवा.)

लोकसभा निवडणुकीत सुमारे 165 मतदारसंघात महाविकास आघाडीला अॅडव्हान्टेज होता. तर दुसरीकडे मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजात नाराजी होती. मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर पुन्हा परिणामकारक ठरण्याची शक्यता होती. कपाशी आणि सोयाबीनचा भाव घसरल्यामुळे मराठवाडा, विदर्भातला शेतकरी सरकारवर खूश नव्हता. ही सर्व प्रतिकूल परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर होती.  मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला. जागावाटप ते प्रचारयंत्रणा राबवण्याचे सर्व अधिकार देवेंद्र फडणवीस यांना बहाल केले. देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना सोबत घेत त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण केला. राज्यभर प्रचाराचं नियोजन करून सरकारनं केलेली विकासकामं त्यांनी मतदारांसमोर मांडली. आणि सर्वात मोठा विजय साकार केला.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून व्होट जिहाद झाल्याचा मुद्दा महायुतीकडून सातत्यानं मांडण्यात येत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपनंही बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं या घोषणा देऊन हिंदू मतांचं ध्रुवीकरण केलं. विधानसभा निवडणूक महायुतीनं धर्मयुद्धाप्रमाणं लढवली.राज्यभरात यशस्वीपणे राबवलेली लाडकी बहीण योजना, राज्यात झालेली सर्वाधिक गुंतवणूक, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड याचा फायदा महायुतीला झाला. विकासाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची तयारी झालेली प्रतिमा महायुतीच्या यशात महत्त्वाची ठरली. 

देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे पक्षाचा आदेश पाळणे आणि वेळेनुसार भूमिका घेणे. 2022 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री राहणार नाही, असं जाहीर केलं होतं. मात्र पक्षाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. 2014 मध्ये युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद दिलं नव्हतं. उपमुख्यमंत्रिपद असंवैधानिक असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मात्र ही ताठरता त्यांनी 2022 मध्ये सोडली आणि लवचिक धोरण स्वीकारत उपमुख्यमंत्री झाले.  

राज्यातील मतदारांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर शिक्कामोर्तब केलंय. भाजपनं या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2014च्या निवडणुकीत मिळवलेल्या 123 जागांचा विक्रम मोडला. भाजप आणि महायुतीनं विजयाचा नवा अध्याय लिहिलाय. अर्थात यामागे मेहनत होती ती देवेंद्र फडणवीस यांची. परिणामी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बाजीगर ठरले.

#संगो #BJP #devendrafadanvis #CM #maharashtra

Friday, November 29, 2024

शिवसैनिक ते मुख्यमंत्री

 

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एकनाथ शिंदेंनी त्यांची छाप उमटवली. 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अर्थात हे शक्य झालं ते भाजपमुळे. उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजपसोबत युती करून लढलेल्या उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत जाऊन सरकार स्थापन केलं होतं. हा घाव भाजपच्या जिव्हारी लागला होता. त्या घावाचा बदला घेण्यासाठी भाजपनं एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं. हिंदूत्व, बाळासाहेबांचा विचार असा मुलामा एकनाथ शिंदेंच्या बंडाला देण्यात आला. गद्दारी, 50 खोके अशी टीका सहन करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. अडीच वर्ष एकनाथ शिंदें मुख्यमंत्री राहिले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं होतं. 

कितीही टीका झाली तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणावर स्वत:ची छाप उमटवण्यात यशस्वी ठरले.. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री अशी नवी ओळख निर्माण करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. एकनाथ शिंदेंनी ठाण्यातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू केली होती. धर्मवीर आनंद दिघेंचे पट्टशिष्य असलेले एकनाथ शिंदे यांनी दिघेंच्या कार्यशैलीप्रमाणेच ठाण्यात काम सुरू केलं होतं. शाखाप्रमुखापासून सुरू झालेला एकनाथ शिंदेंचा प्रवास मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. 

मागील 25 वर्षात एकनाथ शिंदेंनी ठाणे जिल्ह्यावरील भगवा झेंडा कायम फडकवत ठेवला. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेवर कायम शिवसेनेचं वर्चस्व राखण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. इतकंच नव्हे तर जिल्ह्यातील आमदार आणि खासदार निवडून आणण्यातही एकनाथ शिंदेंची मेहनत होती. इतकंच नव्हे तर राज्यभरात कुठेही आपत्ती कोसळली तर मदतीचा हात देताना सर्वात पुढे एकनाथ शिंदेच असायचे. कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना एकनाथ शिंदेंनी केलेली भरीव मदत राज्यानं पाहिली होती.

2004 पासून विधानसभेवर निवडून येणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या आयुष्यात 2022 मधील जून महिना महत्त्वाचा ठरला. 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रित लढले होते. मात्र निकालानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी स्थापन केली होती. अजित पवार निधी देत नाहीत, अजित पवार शिवसेना संपवायला निघाले, उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे भाजपच्या छावणीत दाखल झाले. 20 जून 2022 रोजी आमदार आणि मंत्र्यांसह त्यांनी सूरत गाठलं. परिणामी महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात गेलं. महायुतीसोबत जाऊन 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शपथ घेतल्याच्या क्षणापासून एकनाथ शिंदेंनी कामाला जोरदार सुरूवात केली. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट घटनास्थळी जाऊन मदतकार्यावर देखरेख ठेवली. इतकंच नव्हे तर इर्शाळवाडीतील नागरिकांचं पूनर्वसन आणि त्यांना नवी घरं देण्याची प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण केली. राज्यातील सर्वच जिल्ह्यांना एकनाथ शिंदेंनी भेट दिली. सामान्य नागरिकांसोबत संवाद साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न केले. मराठा समाजाला एसईबीसीमधून आरक्षण दिलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना मोठी मदत एकनाथ शिंदेंनी उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागातील महिलांना यामुळे आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. 

महिलांना एसटीच्या तिकीटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णयही दूरगामी परिणाम करणारा ठरला. या निर्णयामुळे एसटी महामंडळ नफ्यात आलं. तर विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवून महायुतीनं दणदणीत विजय मिळवला.  शिवसेनेचे तब्बल 57 उमेदवार निवडून आणले. मात्र एकनाथ शिंदेंना त्याग करावा लागला. काही महिन्यांपूर्वीच अमित शाह यांनी, त्याग करावा लागेल असं वक्तव्य एका बैठकीत केलं होतं. त्या बैठकीतील वक्तव्य माध्यमात आल्यानंतर, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट झालं होतं.

आता एकनाथ शिंदेंना छोट्या भावाच्या भूमिकेत वावरावं लागणार आहे. महायुतीत आधीच अजित पवार आल्यामुळे भाजपला एकनाथ शिंदेंची कितपत गरज आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना-भाजपचा हा प्रवास किती वर्ष सुरू राहणार? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण भाजपसोबत राहिलेल्या उद्धव ठाकरेंनी 'युतीत 25 वर्ष सडली' असं वक्तव्य केलं होतं. तशी वेळ एकनाथ शिंदेंवर येईल का? या प्रश्नाचं उत्तर आता भविष्यातच मिळेल. #संगो #शिवसेना  #एकनाथशिंदे #eknathshinde #cm

Sunday, December 31, 2023

एकाची एन्ट्री अन् दोन बाजीगर

 

2023 या मावळत्या वर्षात मनोज जरांगे-पाटील हे नवं नेतृत्व समोर आलं आहे. उपोषणकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील हिरो झालं. ज्या कुणी लाठीचार्जचा आदेश दिला त्याचे तर जरांगे पाटलांनी आभार मानायला हवे. गोळीबार झाल्याचा दावाही आंदोलकांकडून करण्यात आला होता. एकंदरीतच लाठीचार्जच्या घटनेनंतर मनोज जरांगे-पाटील यांचं नेतृत्व इतर कोणत्याही मराठा नेत्यांपेक्षा मोठं झालं आहे. राज्यातील सर्वपक्षीय मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यापुढे खुजे ठरल्याचं पाहायला मिळत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, अशोक चव्हाण, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण हे आणि असे अनेक मराठा नेते जरांगे पाटील यांच्या लोकप्रियतेशी तुलना करू शकत नाहीत, यात शंकाच नाही.


बड्या नेत्यांना घेता येणार नाहीत अशा लाखांच्या सभा मनोज जरांगे-पाटलांनी घेतल्या. शंभर एकरच्या मैदानात भरगच्च झालेली गर्दी, असा करिश्मा मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवला आहे. राज्यभरात कुठेही सभा घेतली तरी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचं कसब मनोज जरांगे-पाटील यांनी दाखवून दिलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. सरकारला मराठा आरक्षणासाठी तातडीनं कार्यवाही करण्याची वेळ आली. एकंदरीतच राज्याच्या राजकारणात नवा नेता म्हणून मनोज जरांगे पाटलांची एन्ट्री झाली.

दुसरीकडे अजित पवार सरत्या वर्षातील खरे बाजीगर ठरले. शिवसेना-भाजपनं 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करून अजित पवार यांची प्रतिमा मलिन केली होती. पण त्याच अजित पवारांसोबत शिवसेनेनं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. मविआचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवार हे एकनाथ शिंदें आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसले. अजित पवारांच्या घोटाळ्याचे पुरावे भाजपच्या नेत्यांनी दिले होते. सिंचन घोटाळ्यांची बैलगाडीभर कागदपत्रे भाजपने चितळे समितीचे माधवराव चितळे यांच्याकडे सादर केले होते. सिंचन घोटाळा संदर्भातील सुमारे 14 हजार पानाचे पुरावे 4 बॅगा भरून बैलगाडीवरून नेण्यात आले होते. संभाजीनगरमधील वाल्मीत चितळे समितीला हे पुरावे देण्यात आले होते. ज्यांनी बैलगाडीभर पुरावे दिले त्याच भाजप नेत्यांना अजित पवारांना आपल्या सत्तेच्या गाडीत घेण्याची वेळ आली.  

अजित पवार निधी देत नाहीत, शिवसेना संपवत आहेत असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केला होता. त्याच शिवसेना शिंदे गटासोबतही अजित पवार टेचात सरकारमध्ये सहभागी झाले. दुसरा एखादा नेता असता तर कोलमडून गेला असता. पण अजित पवारांनी ज्यांनी टीका केली, त्यांच्यावरच सोबत नेण्याची वेळ आणली. हरलेली बाजी जिंकत अजित पवार बाजीगर ठरले.

तर दुसरीकडे छगन भुजबळ महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील घोटाळ्या प्रकरणी अडीच वर्ष जेलमध्ये राहिले होते. तेलगी घोटाळ्यातही भुजबळांचं नाव आलं होतं. वांद्रे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये छगन भुजबळ यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार संस्थेचे उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी केली होती. मुंबईतल्या सांताक्रूझ मधील फर्नांडिस कुटुंबाचं घर लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या सर्व घोटाळ्याच्या आरोपांमुळे आणि जेलवारीमुळे छगन भुजबळ बदनाम झाले होते. पण मविआच्या काळात त्यांना पावन करून सरकारमध्ये मंत्री करण्यात आलं. त्यानंतर महा्युतीच्या सरकारमध्येही छगन भुजबळ मंत्री झाले. ज्यांनी जेलमध्ये टाकलं त्यांच्याच सोबत छगन भुजबळ बसले. इतकंच नव्हे तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळांनाच बळ देण्याचं काम सरकारला करावं लागलं, अशी चर्चा आहे. एकंदरीतच जेलवारी, घोटाळ्यांचे आरोप यावर मात करत छगन भुजबळ दुसरे बाजीगर ठरले.

राजकारणात कोणताच पराभव हा शेवटचा नसतो असं म्हटलं जातं. त्या सोबत आता असं म्हणावं लागेल की, कोणताही घोटाळा आणि जेलवारीमुळे राजकीय नेत्याचा शेवट होत नसतो. सरत्या वर्षानं हा दिलेला धडा आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. #संगो

Friday, June 30, 2023

'रिमझिम' आणि 'आरडी'

 

मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाल्यावर 'रिमझिम गिरे सावन' हे गाणं आपसूकच ओठांवर येतं. आणि याच पावसाळ्यात या गाण्याचे संगीतकार आर.डी. बर्मन यांचा जन्मदिवस. 27 जून हा आर. डी. बर्मन यांचा जन्मदिवस. पावसाळ्यात जन्मदिन असणाऱ्या या संगीतकाराचं चिंब पावसानं भरलेलं आणि मुंबईचं  सौंदर्य खुलवणारं रिमझिम गिरे सावन हे गाणं म्हणजे मास्टरपीसच. पंचमदांनी दिलेल्या सुमधूर संगीतानं ओथंबलेलं हे गाणं पावसात चिंब झालेल्या कोट्यवधी प्रेमिकांच्या मनात नेहमीच गुंजत असतं.  संगीतकार राहुल देव बर्मन हे आर.डी. बर्मन या नावानं सर्वांनाच माहित आहेत. आणि त्यांच्या जादुई संगीतामुळे त्यांना पंचमदा असंही म्हटलं जातं. पंचमदांच्या संगीताच्या जोरावर अनेक सिनेमे सुपरहिट झाले. काळाच्या पुढे असलेल्या या संगीतकाराच्या संगीताची जादू आजही कायम आहे. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरूणाईच्या ओठांवर असलेल्या गाण्याच्या भावना पंचमदांनी त्यांच्या संगीताच्या जादूनं प्रेममय करून टाकल्या. जब हम जवां होंगे, हे गाणं त्याची साक्ष देतं. 

थिरकवणाऱ्या संगीताचा साज देतानाच प्रेमिकांच्या मनाचा आवाजही आर.डी. बर्मन यांनी ओळखला. आणि प्रेमिकेच्या सौंदर्याची तारीफ करणाऱ्या गाण्याला अप्रतिम संगीताची साथ दिली. आर.डी. बर्मन यांच्या संगीताचं गारूड अनेक वर्षांनंतरही कायमच आहे. उलट जितके आर.डी. ऐकावे तितकंच त्यांचं संगीत अविट होत जातं. थिरकवणारं संगीत, प्रेमात पडलेल्यांना आवडणारं संगीत देणाऱ्या आर.डी. बर्मन यांनी गंभीर पठडीतल्या गाण्यांनाही साज चढवला. याचं उदाहरण म्हणजे, 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' हे गाणं आहे.

सिनेसृ्ष्टीत किती तरी संगीतकार आले आणि गेले. मात्र काळाच्या अतित असं संगीत देण्याची जादू केली ती फक्त आर.डी. बर्मन यांनी. त्यामुळेच पंचमदांचं संगीत बेभान करतं, तुम्हाला धुंद करतं आणि कायम तुमच्या ओठांवर राहतं. इतकंच नव्हे या पिढीतल्या संगीतकारांनाही पंचमदांचा संगीत खुणावतं. पंचमदांच्या गाण्यांचं रिमिक्स मोठ्या प्रमाणात करण्याचा मोह संगीतकारांना होतो. एकंदरीतच रिमिक्सच्या या जमान्यातही फिक्स असलेले एकमेव संगीतर आर. डी. बर्मनच आहेत आणि भविष्यातही राहतील यात शंकाच नाही. आर. डी. बर्मन म्हणजे बॉलिवूडला झिंग देणारा संगीतकार.  आर. डी. बर्मन पंचमदा या नावानंही ओळखले जातात. त्यांनी संगीत दिलेल्या शोले सिनेमातलं सर्वच  गाणी गाजली. मात्र असं संगीत पुन्हा होणं अशक्यच. 

आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि त्याला किशोरकुमारचा आवाज हे कॉम्बिनेशन म्हणजे सुपरहिटचा फॉर्म्युलाच. आणि हा फॉर्म्युला दोन सुपरस्टारसाठी लकी ठरला. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठीही पंचमदांचं संगीत, किशोरकुमारांचा स्वरसाज जादूई ठरला.  त्यामुळेच बेमिसाल सिनेमातली गाणी प्रचंड गाजली. काश्मीरचं सौंदर्य, किशोरकुमारांचा आवाज आणि आर.डी. बर्मन यांच्या संगीतानं 'कितनी खूब सुरत ये तस्बीर हैं' या गाण्याचं चित्र प्रत्येकाच्या मनात कायमचंच ठसलं. आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि त्याला आशा भोसलेंचा स्वर असेल तर ते गाणं कायमचंच रसिकांच्या हृदयात कोरलं जातं. 'दो लफ्जों की', हे गाणं रसिकांच्या मनात कायमचंच घर करून राहिलं आहे.

मागील सात दशकातील कोणताही सिनेमा पाहा आणि त्यातली गाणी ऐका. प्रत्येक सुपरहिट सिनेमातल्या गाण्यांना संगीत फक्त आर. डी. बर्मन यांचंच आहे. त्यातले काही सिनेमे तर फक्त आर.डी. बर्मन यांच्या जादुई संगीतामुळे हिट झालेत. आर. डी. बर्मन यांच्या संगीताच्या तालावर बॉलिवूडेच सुपरस्टार ठेका धरत सिनेमा सुपरहिट करून गेले. त्या सिनेमांच्या यादी पाहायची झाली तर ती खूप मोठी आहे. त्यामुळे त्यातल्या मोजक्याच सिनेमांची ही नावं पाहा.शोले, शान, दिवार, शक्ती,  द ग्रेट गॅम्बलर, सत्ते पे सत्ता, बॉम्बे टू गोवा,  अजनबी, कटि पतंग,  अमर प्रेम, आप की कसम,  मेरे जीवन साथी,  बहारों के सपने,   तीसरी मंजिल,  घर,  द ट्रेन,  आंधी, परिचय, अनामिका,  आंधी,  पडोसन, हम किसी से कम नहीं,  रामपूर का लक्ष्मण,  गोलमाल,  यादों की बारात, मासूम, सागर,  रॉकी,  लव्ह स्टोरी,  1942 अ लव्ह स्टोरी. ही नावं पाहूनच या सिनेमातली गाणी का हिट ठरली हे लक्षात येतं. कारण त्या सिनेमातल्या गाण्यांमध्ये संगीत नव्हे तर त्यात प्राण ओतण्याचं काम पंचमदांनी केलं होतं. पंचमदांनी तयार केलेली धून अवर्णनीय अशीच असायची. त्यांनी संगीत दिलेली गाणी अनेक गायक-गायिकांनी गायली. मात्र आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर असेल तर गाणं सुपरहिट होणारच यात कोणतीही शंकाच नव्हती. मात्र आशाताईं प्रमाणेच  आर.डी. बर्मन यांच्या संगीताचा साज स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जादूई आवाजालाही तितकाच परिसस्पर्श देणारा ठरला. 

थिरकायला लावणारं संगीत ही आर.डी. बर्मन यांच्या संगीताची जादू. हा संगीतकार काळाच्या खूप पुढे होता. त्यामुळेच की काय पंचमदा कधीही आऊटडेटेड होत नाहीत. म्हणूनच प्रत्येक पिढी जेव्हा प्रेमात पडते तेव्हा त्यांच्या सूराला संगीत देण्याचं काम पंचमदा करत असतात. हिंदी सिनेसृष्टीच्या संगीताला वेगळा टच देण्याचं काम आर.डी. बर्मन यांनी केलं. त्यांच्या संगीतावर आतापर्यंत पाच पिढ्या मंत्रमुग्ध झाल्या. आताच्या तरूण पिढीतही त्यांचीच गाणी जास्त प्रमाणात रिमिक्स केली जातात. तरूणाई कोणत्याही काळातली असो त्यांना थिरकवणारं संगीत हे फक्त पंचमदा यांचंच असतं. थिरकवणारं संगीत देणाऱ्या पंचमदा यांनी आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या गीतांनाही साज चढवला. आणि त्यामुळेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आर. डी. बर्मन यांनी दिलेलं संगीत प्रत्येकाच्या कानात गुंजत राहतं. पंचमदा जितके ऐकावेत तितकं त्यांचं संगीत अजून ऐकावं, असंच वाटत राहतं. #संगो

Saturday, February 18, 2023

शिवसेना : बाळासाहेब ते शिंदे

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. 56 वर्ष ज्यांची पकड होती त्या शिवसेनेवर आता ठाकरे कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं नाही. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर शिवसेनेची स्थापना केली होती. मुंबईत मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेनं आक्रमकपणे लढली. सुरवातीला मुंबई आणि ठाणे परिसरात जोमानं वाढलेली शिवसेना ऐंशीच्या दशकात राज्यात विस्तारासाठी सज्ज झाली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. 1995च्या विधानसबा निवडणुकीत शिवसेनेचे 75 आमदार निवडून आले होते. राज्यात पहिल्यांदाच बिगरकाँग्रेसी असलेलं युती सरकार सत्तेत आलं होतं. 

1999 नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राजकारणात जास्त सक्रीय नव्हते. कारण उद्धव ठाकरे पक्षात सक्रीय होऊ लागले होते. महाबळेश्वरमध्ये 2003ला शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलं. शिवसेनेसाठी हा मोठा टर्निंग पॉईंट होता. त्याचे पडसाद पुढच्या दोन वर्षातच उमटले. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली. तर 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली होती. शिवसेना या धक्क्यातूनही सावरली. 2014 मध्ये उद्धव ठाकरेंनी स्वबळावर 63 जागा जिंकल्या. 2019 मध्ये शिवसेना भाजपची पुन्हा युती झाली. शिवसेनेनं 56 जागा जिंकल्या. मात्र शिवसेनेनं भाजपची साथ सोडून मविआच्या साथीनं सत्ता स्थापन केली. हा शिवसेनेसाठी दुसरा मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या सत्तेमुळे शिवसेनेतील हिंदूत्ववादी नेते दुखावले. राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पक्षाला मारक ठरत असल्यानं एकनाथ शिंदेंनी दुसरा गट स्थापन करून भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टातली आणि निवडणूक आयोगातली लढाई सुरू झाली. निवडणूक आयोगातली लढाई एकनाथ शिंदेंनी जिंकली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं एकनाथ शिंदेंना मिळालं. पक्षावरील ठाकरे कुटुंबाची सत्ता संपुष्टात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतही शिवसेनेनं अनेक बंड पाहिले, पक्षांतरं पाहिली. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पण या आघातानंतरही शिवसेना वाढली. इतके सर्व बंड पचवणारी शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून सुरू झालेली शिवसेनेची वाटचाल आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सुरू झाली आहे.

आव्हान वाढलं...

उद्धव ठाकरे यांच्यासमोर आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान निर्माण झालं आहे. पक्ष आणि चिन्हं हे दोन्ही त्यांच्या हातून एकनाथ शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे आता शुन्यातून सुरूवात करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. उद्धव ठाकरेच नव्हे तर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरेंनीही मैदानात शड्डू ठोकला. पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी ठाकरे कुटुंबानं आता रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. शिवसैनिकांमध्ये पुन्हा जोश निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाषण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो अशा शब्दात त्यांनी निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन केलंय. मात्र हे आव्हान उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड खडतर असणार आहे.

कारण 40 आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. अनेक माजी खासदार, आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. धनुष्यबाण चिन्हं सर्वांच्या परिचयाचं आहे. त्यामुळे नवं चिन्ह घेऊन उद्धव ठाकरेंना मतदारांसमोर जावं लागणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले नेते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत मोठे नेते नाहीत. त्यामुळे मतदारांसमोर भाषण करायला उद्धव ठाकरेंसमोर दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे फक्त सामान्य शिवसैनिकांनाच सोबत घेऊन त्यांना लढाई लढावी लागणार आहे.

मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकाही एका वर्षावर आल्या आहेत. आणि त्या आधीच पक्ष आणि चिन्हं गेल्यानं उद्धव ठाकरेंना नव्यानं पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. एकंदरीतच ऐतिहासिक संकटावर उद्धव ठाकरे कशा प्रकारे मात करतात? यावर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे. #संगो

Sunday, July 31, 2022

राजकारणातला 'सेफ गेम'

 

शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीनं ताब्यात घेतलं. मात्र दबाव दहशतीला घाबरणार नसल्यानं संजय राऊत यांनी निक्षून सांगितलं. ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी हात उंचावून त्यांचे इरादे जाहीर केले होते. गळ्यातील भगवा गमछा फिरवून आगामी काळातल्या संघर्षाला तयार असल्याचे संकेतच एक प्रकारे संजय राऊतांनी दिले. ईडीचे अधिकारी घेऊन जात असताना त्यांनी कारमधून उपस्थित शिवसैनिकांना अभिवादन केलं. ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना संजय राऊतांनी झुकणार नाही, याचा पुनरूच्चार केला. 

शिवसेना महाराष्ट्र कमजोर होणार नाही. संजय राऊत झुकणार नाही. पक्ष सोडणार नाही. संजय राऊतांनी यावेळी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे. राजकीय लढाई आणि कारवाईला सामोरं जाणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. ईडीच्या भीतीनं अनेक नेते शिंदे गटात गेले, तर काही भाजपमध्ये गेले. अर्जुन खोतकरांनी तर अडचणीत असल्यामुळे सेफ होत असल्याचं माध्यमांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं. ईडीला घाबरून शिवसेनेचे आमदार, खासदार आणि बडे नेते शिंदे गटात दाखल होत असल्याची टीका मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही त्यावर बोलावं लागलं. घर सेफ करण्याऐवजी संजय राऊत ईडीच्या कारवाईला सामोरे गेले. राऊतांनी भाजपसोबत संघर्ष सुरू ठेवला, शिंदे गटातही राऊत गेले नाही. अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, भावना गवळी यांच्यावर आणि अशा अनेक नेत्यांना ईडीच्या कारवाईची भीती होती. या नेत्यांनी शिंदे गटात जाऊन त्यांचं घर सेफ केलं.  मात्र या राजकीय लढाईत संजय राऊतांनी स्वत: पेक्षा आणि स्वत:च्या घराला सेप करण्यापेक्षा जास्त महत्व शिवसेनेला सेफ करायला दिलं. तर शिंदे गटातल्या आमदारांनी स्वत:ला सेफ करायला महत्त्व दिलं. शिंदे गटातील आमदार आणि संजय राऊत यांच्यातला हाच सर्वात मोठा फरक इथे दिसून आला. पक्ष आणि उद्धव ठाकरे अडचणीत असताना संजय राऊतांनी घेतलेली आक्रमक भूमिकाच आगामी काळात शिवसेनेला बळ देणारी ठरू शकते.

ईडीकडून अटक होणार असल्याचा अंदाज संजय राऊत यांना सहा महिन्यांपूर्वीच आला होता. त्याबाबत संजय राऊतांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहलं होतं. राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपचे दोन नेते ईडीच्या माध्यमातून धमकी देत होते, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामध्ये संजय राऊतांचा सिंहाचा वाटा होता. भाजपची मुख्यमंत्रीपदाची आणि सरकारची संधी संजय राऊतांमुळे हुकली होती. त्यामुळे संजय राऊत भाजप नेत्यांच्या सातत्यानं निशाण्यावर होते. मात्र दररोज सकाळी नित्यनेमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत भाजप नेत्यांना पुरून ऊरत होते. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर हल्ला करण्याची संधी सोडली जात नव्हती. आणि त्यातच पत्राचाळीचा मुद्दा भाजपच्या हाती लागला. त्या मुद्याचा कायदेशीर उपयोग करून भाजपनं संजय राऊतांना अडकवण्याची संधी साधली. मात्र या संकटात संजय राऊतांनीही राजकीय संधी साधली. शिवसेना कमजोर होणार नाही आणि झुकणार नाही, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.  राजकारणात शह आणि काटशह दिले जातात. राजकारणात कोणताच विजय किंवा पराभव हा शेवटचा नसतो. 2019 मध्ये संजय राऊतांनी मविआचं सरकार आणून भाजपला मात दिली होती. आता ईडीनं कारवाई केल्यानं संजय राऊतांना एकप्रकारे चेकमेटच देण्यात आलाय. आता पुढच्या राजकारणात कोण कोणावर कशी मात करेल हे सांगता येत नाही. कारण मौका सब को मिलता हैं. आता पुढचा मौका कोणाचा असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

संजय राऊत  यांच्यावर पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झाली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे 'ईडी'तील सूत्रांचं म्हणणे आहे. प्रवीण राऊत यांनी सर्व पैसा त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केले होते. यातील 83 लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले होते. त्याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला, असा 'ईडी'चा संशय आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांनाही 'ईडी'ने नोटीस बजावली होती. त्यावेळी वर्षा यांनी 55 लाख रुपये माधुरी यांना परत केले होते. परंतु त्यानंतर 'ईडी'ने पालघरमधील जमीन, दादर येथील फ्लॅट आणि किहीम येथील आठ भूखंडांवर टाच आणली होती. एकंदरीतच पत्राचाळीच्या माध्यमातून भाजपनं संजय राऊतांचा हिशेब चुकता केला. #संगो #SANJAYRAUT #EKNATHSHINDE #SHIVSENA #ED

Thursday, March 10, 2022

कॉमेडी आणि राजकारण

 

2008 मध्ये भगवंत मान द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये सहभागी झाले होते. आणि आता 2022 मध्ये मान मुख्यमंत्री होणार आहेत. म्हणजेच चौदा वर्षात कॉमेडी, टीव्ही आणि राजकारण असा प्रवास करत त्यांनी मोठा पल्ला गाठला आहे. चौदा वर्षांपूर्वी स्टार वन या वाहिनीवर द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज हा शो सुरू झाला होता. त्यातूनच कपिल शर्मा, सुनील पाल यांच्याप्रमाणे अनेक कॉमेडियन प्रसिद्ध झाले. 


भगवंत मान यांच्या प्रमाणेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा प्रवास झालाय. कायद्याचा अभ्यास करत असतानाच झेलेन्स्की कॉमेडी शो मध्ये सहभाग घेत होते. 17 वर्षांचे असताना झेलेन्स्की एका स्थानिक विनोदी स्पर्धेच्या टीममध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर युनायटेड युक्रेनियन संघ 'झापोरिझिया-क्रिवी रिह-ट्रान्झिट'मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. 1997 मध्ये ते मेजर लीगमध्ये काम करून विजयी झाले. 2008 मध्ये त्यांनी 'लव्ह इन द बिग सिटी', त्याचा सिक्वेल 'लव्ह इन द बिग सिटी 2' या चित्रपटात काम केलं. तर 2011 मध्ये 'अवर टाईम' या चित्रपटातही त्यांनी अभिनय केला. काही वर्षांपूर्वी कॉमेडी करणाऱ्या या नेत्यानं बलाढ्य रशियाला चांगलीच झुंज दिली.

झेलेन्स्की, भगवंत मान यांच्यावरच ही यादी थांबत नाही. तर द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज 2 राजीव निगम हा कॉमेडियन सध्या यू ट्यूबवर सक्रिय आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर व्हिडिओ तयार करून निगम ते यू ट्युबवर अपलोड करतात. ट्विटरवरही व्हिडिओ पोस्ट केले जातात. त्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळताना दिसतो.  श्याम रंगीला हा कॉमेडियन पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेत राहुल गांधी यांची हुबेहुब मिमिक्री करतो. काही दिवसांनी हे दोघेही राजकारणात आले तर नवल वाटणार नाही.

कॉमेडी सर्कस सिझन 2 मधील रेहमान खान हा कॉमेडियन अनेक स्टँडअप कॉमेडीमध्ये सहभागी होऊन केंद्र सरकारवर टीका करताना दिसतो. मुस्लिमांचे प्रश्न मांडून सरकारवर कॉमेडीच्या माध्यमातून रेहमान खान निशाणा साधतो. 

दक्षिण भारतात जयललिता, एन.टी. रामाराव, एम.जी. रामचंद्रन हे कलाकार राजकारणात यशस्वी झाले, मुख्यमंत्री झाले. नंतरच्या काळात कमल हासन आणि इतर कलाकारही राजकारणात आले. बॉलिवूडमधील धर्मेंद्र, हेमामालिनी, शत्रूघ्न सिन्हा यांच्यासारखे कलाकार लोकसभेवर निवडून गेले. मात्र भगवंत मान यांनी मिळवलेलं यश हे या सर्वांपेक्षा मोठं आहे. काही वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव यांनी राजकारणाचा विनोद केला होता. अर्थात राजकारणाचा विनोद आजही कमी-जास्त प्रमाणात कायम आहे. पण आता अनेक कॉमेडियन राजकारणात येत आहेत. त्यामुळे आधी राजकारणाचा विनोद झाला होता, आता विनोदाचं राजकारण होऊ नये, ही अपेक्षा. 

#संगो

Sunday, March 6, 2022

झुंड, दिवार आणि विजय

 

अमिताभ बच्चन यांच्या दिवार आणि झुंड सिनेमातील व्यक्तीरेखेचं नाव विजय आहे. दिवारमध्ये अँग्री यंग मॅन तर झुंडमध्ये प्रशिक्षक अशा व्यक्तीरेखेत विजय पाहायला मिळतो. झुंड सिनेमात दाखवण्यात आलेल्या कॉलेजच्या दिवारच्या (भिंत) एका बाजूला इंडिया तर दुसऱ्या बाजूला भारत (झोपडपट्टी) दाखवलेला आहे. इंडिया आणि भारत यांच्या असलेली ही भिंत पाडण्याचं काम अमिताभ बच्चन यांनी केलं.

झोपडपट्टी म्हणजे नाक मुरडण्याचा विषय. नावं ठेवण्याचा विषय. मात्र हाच विषय पडद्यावर दाखवण्याची हिंमत नागराज मंजुळे यांनी दाखवली. अमिताभ बच्चन यांचा या सिनेमातला वावर महानायकाचा वाटत नाही. अर्थात तो तसा असण्याची गरजही नाही. महानायकासमोर सामान्य चेहऱ्याच्या छोट्या कलाकारांनी केलेला अभिनय लक्षात राहतो. डॉन, बाबू, रितीक यांचे डायलॉग खळखळून हसवतात. आणि डोळ्याच्या कडाही पाणवतात. 

फेसबुकवर या सिनेमाविषयी बरंच नकारात्मक वाचण्यात आलं होतं. मात्र हा सिनेमा पाहताना त्या नकारात्मक पोस्ट कुठच्या कुठे उडून गेल्या. फँड्रीत जब्याने भिरकावलेला दगड अनेकांना लागला होता. या सिनेमात दगड भिरकावलेला नाही. तरीही त्या दगडानं अचूक मारा केला आहे. #संगो #झुंड # #jhund

Monday, February 21, 2022

पुन्हा 'तिसरा' गिअर?


 केंद्र सरकारच्या विरोधात पर्याय देण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. तिसऱ्या आघाडीचा पोलिटिकल गिअर टाकण्यात आला आहे. त्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतलाय. बिगर-भाजपशासित राज्यांनी एकत्र यावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्याचसाठी त्यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा दिला.  चंद्रशेखर राव यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. दिल्लीत बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक होणार आहे.

तिसऱ्या आघाडीसाठी टाकण्यात आलेल्या या गिअरमुळे भाजप विरोधातली गाडी किती सुसाट धावेल? या विषयी शंकाच आहे. कारण महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. तर बंगालमध्ये 42, तामिळनाडूत 39 आणि तेलंगणामध्ये 17 मतदारसंघ आहेत. म्हणजेच या चार राज्यात लोकसभेच्या एकूण 146 जागा आहेत. आणि त्यातल्या 100 जागा जरी तिसऱ्या आघाडीला मिळाल्या असं गृहित धरलं तरी केंद्रातल्या सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. तिसऱ्या आघाडीत काँग्रेसला घेणार की नाही? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय जनता दल, आप या पक्षांची काय भूमिका असेल? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. 

देशात आतापर्यंत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग कधीही यशस्वी झालेला नाही. सरकार स्थापलं तरी ते 5 वर्ष टिकलेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीविषयी मतदारांच्या मनात विश्वसनीयता निर्माण होत नाही. आणि समजा तिसरी आघाडी अस्तित्वात आली तरी त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असणार आहे. परिणामी चार मुख्यमंत्री एकत्र दिसत असले तरी पंतप्रधानपदाचा चेहरा स्पष्ट होत असल्यानं 'तिसरा' गिअर अडकण्याचीच शक्यता जास्त वाटते. #संगो

Sunday, February 6, 2022

तुम मुझे यूँ भुला ना पाओगे

 

लता मंगेशकरांच जीवनाचा प्रवास थांबला. मात्र त्यांचा आवाज जगभरात नेहमीच गुंजत राहणार आहे. जगभरातल्या नागरिकांवर असलेली त्यांच्या आवाजाची मोहिनी अशीच कायम राहणार आहे. कारण तो फक्त आवाज नाही. तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला काही तरी देणारा एक चिरंतन ठेवा आहे.
लता मंगेशकरांनी गायलेल्या गाण्यांना झालेला लतास्पर्श जीवनाचंच गाणं ठरतो. 'जब प्यार किया तो डरना क्या' हे गाणं तर प्रेमासाठी बंड करणाऱ्या तरूणाईचा आवाज आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला लतादीदींच्या स्वरानं नवी अनुभती दिली. उद्याची रात्र असेल किंवा नसेल अशा परिस्थितीत प्रियकराला गाण्यातून दिलेली साद हजारो वर्ष कोणीही विसरणार नाही.  लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो, हे गाणं ऐकताना प्रेमात पडलेली कोणतीही व्यक्ती शहारून गेली नसेल तरच नवल.  तारूण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी लतादीदींचं हे गीत हमखास असतंच. जब हम जवां होंगे, या गाण्यातून पाहिलेली भावी प्रेमाची स्वप्नं शब्दातून मांडण्याचं काम लताजींनी केलं. प्रेमात पडल्यावर प्रियकराला पत्र लिहताना प्रेयसीच्या मनात हेच गीत दाटून आलेलं असतं. जे लतादीदींनी गायलंय, हमने सनम को खत लिखा. प्रेमात बेभान झालेल्या प्रेयसीच्या भावनांना आवाज दिला तो लता दीदींनी. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा हैं, हे बेभान गाणं मृत्यूवर मात करून जीवन कसं जगावं याचाच संदेश होतं.  अर्थात प्रत्येकाचंच प्रेम यशस्वी होत नाही. प्रेमभंग सहन करणाऱ्या हृदयानं घातलेली साद ऐकावी ती लतादीदींच्या गाण्यातूनच. शिशा हो या दिल हो आखिर तूट जाता हैं, हे गाणं ऐकताना डोळ्यातून आपसूक अश्रू वाहू लागतात.  अनेक वर्षांनंतर आयुष्याच्या एका वळणावर भेटलेल्या प्रियकरासाठी लतादीदींनी दिलेल्या स्वरापेक्षा वेगळं काही असूच शकत नाही. तेरे बिना ज़िन्दगी से शिकवा नहीं, हे गाणं सर्व काही विसरून कोणतीही तक्रार करू नका, हा संदेश देतं असंच वाटत राहतं.
लतादीदींचा आवाज आयुष्य भरभरून जगण्याची प्रेरणा देतो. प्रेमात पडलेल्याचं जग सुंदर करण्याचं काम लतादीदींच्या आवाजनं केलं. त्यामुळे पुढील हजारो वर्ष हा स्वर्गीय आवाज सर्वांना प्रेमाची आणि जगण्याची अनुभती देणार आहे. तुम्ही निराशा व्हाल तेव्हा प्रसन्न करण्यासाठी लतादीदींचा आवाज आहे, प्रेमात पडाल तेव्हा तुमच्या हृदयाचा आवाज बनण्यासाठी लतादीदींचा आवाज आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तेव्हा तुमच्या हृदयाला समजावणारा लतादीदींचा आवाज. जीवनात संकटं येतील तेव्हा धीर देण्यासाठी लतादीदींचा आवाज आहे. जीवनातल्या कोणत्याही टप्प्यावर आवाज द्या, साद देण्यासाठी तुम्हाला लतादीदींचा आहे. फुलाच्या सुगंधाप्रमाणे हा आवाज आपलं जीवन असंच सुवासिक करणार आहे, लतादीदींनी गायलेल्या पुढील गाण्याप्रमाणे.... रजनीगंधा फुल तुम्हारे  यु ही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में...
#संगो

Saturday, January 15, 2022

आरोग्य आणि मनाचा 'योग'!

 


कोरोनाचा धोका कधी वाढतो तर कधी कमी होतो. ही परिस्थिती किती दिवस कायम राहिल हे सांगता येत नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपलं शरीर सज्ज असणं हीच आता मोठी गरज बनली आहे. त्यामुळे साधी, सरळ आणि कोणालाही करता येणारी योगासनं नक्की करा. सध्याच्या काळात त्याची नितांत गरज आहे. मागील वर्षी मला कोरोना झाला होता. त्यानंतर मी योगासनांकडे गांभीर्यानं वळलो. त्या आधी योगासनं करायचं मात्र त्यात सातत्य नव्हतं. आता दोन वर्षांपासून योगासनांमध्ये सातत्य असल्यानं त्याचे फायदे मला नक्कीच जाणवत आहेत. अर्थात त्यामुळे योगासनांकडे गांभीर्यानं नको तर आनंदाने वळा.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी योगासनं करून प्रतिकारशक्ती वाढवता येते. योगासनांमुळे शरीर आजारांशी समर्थपणे सामना करू शकतं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मन आनंदित राहण्यासाठी योगासनं करणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट असल्यास आपलं शरीर आजारांविरोधात लढण्यास सक्षम असते. गंभीर आजारांचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला सुरक्षा कवच प्रदान करण्याचं कार्य करते. जेणेकरून कोणत्याही आजाराचा संसर्ग सहजरित्या आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. दैनंदिन जीवनात व्यायाम, योगासने आणि प्राणायम करण्यासाठी वेळ काढणं आवश्यक आहे. 

वीरभद्रासन आणि त्यातील काही प्रकार शरीरासाठी लाभदायक आहेत. यामुळे हृदयास योग्य रक्तपुरवठा होतो. यामुळे शारीरिक ऊर्जा वाढण्यास मदत होते. यामुळे शरीर आजार-रोगांविरोधात सक्षमरित्या लढू शकतं. शिवाय, या आसनाच्या सरावामुळे छातीचे स्नायू, मान आणि पाठीचा कणा ताणला जातो. यामुळे अवयव बळकट होतात. नौकासन, वज्रासन, भुजंगासन, सर्वांगासन, हलासन, धनुरासन ही आसनं सोपी आहेत.

प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी त्रिकोणासनही फायद्याचं ठरतं. त्रिकोणासन केल्यानं शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होतो. या आसनामुळे कमरेचे स्नायू लवचिक आणि मजबूत होतात. पाय, गुडघे, पोटऱ्या, हात, खांदे आणि छातीचे स्नायूंना चांगला ताण मिळतो. मन, मेंदू, मज्जासंस्थेचं आरोग्य सुधारते. महत्त्वाचे म्हणजे मानसिक आणि शारीरिक समतोल प्राप्त होतो.

योगा म्हणजे भारतानं जगाला दिलेला अनमोल ठेवा आहे. योगासनांमुळे शरीर निरोगी आणि मन प्रसन्न ठेवण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्यानं या संकटात सर्वांनीच योगासनं करणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीर निरोगी राहून कोरोनाचा सामना करण्यात नक्कीच मदत होईल. आणि हो सूर्यनमस्कार केल्यानं अनेक फायदे होतात. त्याविषयी अधिक माहिती पुढील ब्लॉगमध्ये. #संगो


Friday, January 7, 2022

व्यायामाची साथ, कोरोनावर मात!

 

कोरोनाचं सावट कायम असल्यानं प्रत्येकाने शरिरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. कोरोनाच्या संकटात प्रत्येकाचं शरीर निरोगी असणं गरजेचं आहे. निरोगी शरिरात आणि भरपूर प्रतिकारशक्ती असेल तर कोरोनाच नव्हे तर कोणत्याही विषाणूंचा सामना करता येऊ शकतो.  व्यायाम कोणत्याही काळात शरीराला फिट ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही व्यायाम-प्रेमी नसाल, तरी आवश्‍यक तेवढा व्यायाम करायला सुरुवात करा. नियमित आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम लवकरात लवकर संरक्षक शक्ती वाढवतात. व्यायामाची सुरूवात करताना मध्यम प्रकारचा शारीरिक ताण देणारे आणि सुमारे 30 ते 45 मिनिटे असा व्यायाम करणे अतिशय योग्य ठरेल. 

कोरोनाचा वाढता संसर्ग, वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध पाहता जिममध्ये जाणं शक्य होत नाही. त्यामुळे घरच्या घरी करता येणारे व्यायाम तितकेच प्रभावी आहेत. सकाळ-संध्याकाळ दोन वेळा 10 मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्या तर साधारण 200 कॅलरी जळतात. एक तास दोरीवरच्या उड्या मारल्यामुळे सरासरी 700 हून अधिक कॅलरीज जळतात. दुसरा व्यायाम प्रकार म्हणजे एकप्रकारच्या उठाबशा आहेत. बर्पे हा जवळपास स्क्वाटसारखा व्यायाम आहे. याच्या सहाय्याने शरीरातील चरबी कमी करायला मदत होते. बर्पेस वेगवान हालचाल करतात, त्यामुळे ते तुमचे हृदयही पंप करतात.

घरात करण्यासाठी पुश अप हा व्यायाम अतिशय सोपा आहे. कमी जागेतदेखील तुम्ही हा व्यायाम करू शकता. पुश अप्स हा अतिशय सोपा व्यायाम असून 10 मिनिटांच्या व्यायामाने तुम्हाला खूप शक्ती मिळते.

प्लॅन्क हा व्यायाम पोटासाठी अतिशय उपयोगी आहे. फॅट्स कमी करण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर आहे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवून तुम्ही केवळ हातांच्या मदतीनं शरीरवर घ्यायचं आहे. दिवसातून 3 वेळा हा व्यायाम केल्यास तुम्हाला नक्कीच याचा फायदा होतो. साईड प्लॅन्क हा व्यायामची शरीराला अनेक फायदे देणारा आहे.

तर बाइसिकल क्रंचमुळे तुमच्या पूर्ण स्नायूंचा व्यायाम होतो. फॅट्स कमी होऊन अॅब्स बनवण्यासाठी हा व्यायाम केला जातो. या प्रकारामध्ये बेसिक क्रंच, रिव्हर्स क्रंच, डबल क्रंच असे तीन प्रकार असतात. ज्याप्रकारे आपण सायकल चालवण्यासाठी पाय वरखाली करतो त्याच पद्धतीने जमिनीवर झोपून आपण हा व्यायाम करू शकतो.

व्यायामाचा प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. अनेक संशोधनांद्वारे सिद्ध झालंय की फ्लू, न्यूमोनिया, इतर काही संसर्ग, मधुमेह किंवा हृदयविकारासारखे मोठे आजार व्यायामामुळे नियंत्रणात आले आहेत. कायम उत्साही राहिल्यामुळे जळजळ कमी होते, प्रतिकारक पेशींची संख्या वाढते. आतड्यातील मायक्रोब्सचा सकारात्मक परिणाम शरीराच्या संरक्षण संस्थेवर होतो. शरीरातील प्रतिकारक शक्तीचे नियमन होते. रोजच्या व्यायामामुळे ही संरक्षण संस्था सतत कार्यरत ठेवण्यास मदत होते. 

व्यायामाची आवड असो किंवा नसो फिट राहण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. व्यायाम परिणामकारक होण्यासाठी खूप वेळाचा, शक्तिदायक आणि न आवडणारा व्यायाम असला पाहिजे, असे नाही. घरातल्या किंवा सोसायटीच्या पायऱ्यांचा चढ-उतार करणे चांगला आणि उत्साहवर्धक व्यायाम आहे. 

भरभर चालणे, पळणे, सायकल चालवणे किंवा तासभर सर्वसामान्य ताकदीचा कोणताही व्यायाम चांगल्या प्रकाराची प्रतिकारशक्ती निर्माण करतो. त्यामुळे जर व्यायाम करत नसाल तर आताच करायला लागा. कारण फिट राहाल तरच कोणत्याही परिस्थितीत हिट राहाल. #संगो


Tuesday, August 17, 2021

तालिबानची सत्ता, जगाला धोका


 अफगाणिस्तानचा राष्ट्रपती कोण होणार ? याकडे आता जगाचं लक्ष लागलं आहे. तालिबानच्या अव्वल चार नेत्यांपैकी एक जण राष्ट्रपती होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुल्ला हैबतुल्लाह अखुनजादाचं नाव राष्ट्रपतीपदासाठी आघाडीवर आहे. हैबतुल्लाह अखुनजादा हा तालिबानचा सर्वात मोठा नेता आहे. तोच अफगाणिस्तानाचा नवा राष्ट्रपती असेल असं बोललं जातंय. तालिबानच्या राजकीय, धार्मिक आणि अन्य बाबींवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे. तालिबानच्या राजकीय, धार्मिक आणि सैन्य विषयक बाबींवर त्याचा शब्द अंतिम मानला जातो. अख्तर मंसूर मारल्या गेल्यानंतर हैबतुल्लाह अखुनजादा याने तालिबानचं नेतृत्व सांभाळलं. हैबतुल्लाह याने तालिबानच्या विखुरलेल्या शक्तीला एकत्र केलं. हारलेल्या तालिबानींमध्ये त्याने विश्वास निर्माण केला. त्यामुळेच अवघ्या 103 दिवसात तालिबानींनी अफगाणिस्तान ताब्यात घेतलं.  मुल्ला हैबतुल्लाह अखुनजादा याच्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरादरचं नावही अफगाणिस्तानचा राष्ट्रपती होण्यासाठी आघाडीवर आहे. बरादर हा तालिबानच्या सहसंस्थापकांपैकी एक आहे. राजकीय कार्यालय प्रमुख आणि शांती वार्ता पथकाचा तो सदस्य आहे. तालिबानची राजकीय वाटचाल कशी असेल याचा निर्णय अब्दुल गनी बरादरकडे असणार आहे. 1980 मध्ये अफगाणी सरकारविरोधातल्या लढ्यात बरादर आघाडीवर होता. कंदहारच्या मदरशात कमांडर मोहम्मद उमरसह त्यानं काम केलंय. 1996 ते 2001 मध्ये हेरात प्रांताचा तो गव्हर्नर होता. सिराजुद्दीन हक्कानी तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता मानला जातो. हक्कानी नेटवर्क या नावानं कुख्यात असलेल्या नेटवर्कनं अमेरिका आणि नाटोला मोठा तडाखा दिला. मागील 20 वर्षात अमेरिका आणि नाटोच्या सैन्यावर अनेक आत्मघाती हल्ले करण्यात आले. हक्कानी नेटवर्कनं हे हल्ले केले होते. त्यामुळे  हक्कानीवर अमेरिकेनं 1 कोटी डॉलरचं बक्षिस जाहीर केलं. सिराजुद्दीन हक्कानी हा रशियाच्या विरोधात लढलेल्या जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा आहे. भारतीय दूतावासांवर हल्ले करण्यातही हक्कानी नेटवर्कचा हात होता.

सिराजुद्दीन हक्कानीनंतर मुल्ला मोहम्मद याकूब तालिबानमधला सर्वात प्रबळ नेता मानला जातो. तालिबानची स्थापना करणाऱ्या मुल्ला उमरचा याकूब हा मुलगा आहे. मुल्ला याकूबनं पाकिस्तानातल्या मदरशांमध्ये शिक्षण घेतलं. सध्या तो तालिबानच्या  मिलिट्री कमीशनचा प्रमुख आहे. त्याच्या अखत्यारीत अनेक कमांडर येतात. त्यांच्यावर विविध हल्ले करण्याची जबाबदारी दिली जाते. मुल्ला याकूब हा ऑपरेशनसाठी या कमांडरचा वापर करतो. मुल्ला उमरचा मुलगा असल्यानं याकूबला तालिबानमध्ये मोठा मान दिला जातो.  अफगाणिस्तानचा राष्ट्रपती या चार जणांपैकी कोणी तरी एक जण असणार आहे. तालिबान्यांनी रक्तरंजीत मार्गानं सत्ता हस्तगत केलीय. मात्र यानंतरचा काळ तिथल्या जनतेसाठी खडतर असणार आहे. तसंच तालिबानसमोरही अनेक आव्हानं आहेत.

अफगाणिस्तानवर विजय मिळवणं आणि त्यावर सत्ता गाजवणं कोणालाच शक्य झालं नाही. ब्रिटन, रशिया, अमेरिकेलाही अफगाणिस्तानात यश मिळालं नाही. अमेरिकेनं बॉम्बचा वर्षाव करून अफगाणिस्तान बेचिराख करून टाकला. मात्र तालिबानचा नायनाट करण्यात त्यांना अपयश आलं. जगावर वर्चस्व गाजवणाऱ्या महासत्ता अफगाणिस्तानात पराभूत झाल्या. 20 वर्ष अफगाणिस्तानमध्ये राहिल्यानंतरही अमेरिकेला तालिबानची पाळंमुळं उखडून फेकता आली नाही. अमेरिकेच्या आधी ब्रिटन आणि 90च्या दशकात रशियालाही इथून पराभूत होऊन परतावं लागंल. अफगाणिस्तानची भौगोलिक रचनाच अशी आहे की, त्यांच्या जमिनीवर त्यांचा पराभव होऊ शकत नाही. डोंगराळ भागावर हवाई हल्ले करता येतात. मात्र टोरा बोरासारख्या असंख्य पर्वत रांगांमध्ये तालिबानी लपून बसतात. हवाई हल्ल्यातही त्यांचं जास्त नुकसान होत नाही. अमेरिकेनं मागील 20 वर्षात अफगाणिस्तानच्या सैन्याला प्रशिक्षण दिलं. त्यांना अत्याधुनिक शस्त्रात्रं दिली. मात्र असं असूनही अफगाणिस्तानच्या सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त सैन्यानं तालिबानींचा प्रतिकार केला नाही. साठ हजार तालिबानींनी अवघ्या 103 दिवसात अफगाणिस्तान ताब्यात घेतला. अफगाणिस्तानच्या पळपुट्या सैनिकांनी रणांगणातून पळ काढला.

तालिबानला भारतानं अधिकृतरीत्या कधीच मान्यता दिली नाही. भारताचं तालिबानसोबत चर्चा करण्याचं आणखी एक सर्वात मोठं कारण आहे की, अफगाण सरकारसोबतच्या भारताच्या नात्यात वितुष्ट आलं असतं. भारत-अफगाणिस्तानमधील संबंध ऐतिहासिकदृष्ट्या चांगले राहिले आहेत. मात्र, आता स्थिती बदललीय. असं असलं तरी  गेल्या काही दिवसात तालिबानकडून भारतविरोधी कुठलंच वक्तव्य समोर आलेलं नाही. तालिबाननं अफगाणिस्तानच्या विकासातील भारताच्या भूमिकेलाही चूक म्हटलं नाही.

दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जवळपास 2611 किलोमीटर लांबीची सीमा आहे. आपल्या सीमेवर अफगाणिस्तानातून येणाऱ्या शरणार्थींची गर्दी होतेय की काय, याची चिंता पाकिस्तानला आहे.

तर चीनलाही चिंतेनं घेरलंय. चीनमधला शिनजियांग प्रांत संपन्न असून त्या प्रांताची अफगाणिस्तानसोबत जवळपास 8 किलोमीटरची सीमा आहे. तालिबाननं चीनच्या शिनजियांग प्रांतात सक्रिय असणाऱ्या ईस्ट तुर्किस्तान इस्लामिक मुव्हमेंट या फुटीरतावादी गटाला पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमेरिकन फौजा परत गेल्यानंतर अफगाणिस्तान इस्लामिक कट्टरतावादाचं केंद्र होईल अशी भीती रशियाला आहे. अफगाणिस्तानात इस्लामिक कट्टरतावाद वाढला तर पूर्ण मध्य आशियासाठी मोठा धोका निर्माण होईल आणि हिंसाचार झाला तर त्याचे पडसाद मॉस्कोपर्यंत पोहोचतली अशी भीती रशियाला आहे. जगातल्या सर्वच देशांना तालिबानच्या राजवटीमुळे धोका निर्माण झालाय. आता या सर्व धोक्यावर काय तोडगा निघणार, यावर सर्वांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.