Wednesday, March 20, 2019

बिनमुद्याची लोकसभा निवडणूक !

2019 मधली ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. पण या निवडणुकीत महत्त्वाचे मुद्देच दिसत नाहीत. 'मैं भी चौकीदार' आणि 'चौकीदार चौर हैं' या सारख्या थिल्लर कॅम्पेनमध्ये ही निवडणूक अडकली आहे. त्यातच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर हळद आणि नारळ सारखे मुद्दे येतात. भाजपची जाहिरात कशी चुकली यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांना खिजवणा-या पोस्ट टाकल्या जातात. यामुळे सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस यांना खरोखरच निवडणुकीचं गांभीर्य राहिलेलं नाही हे स्पष्ट होतं.
भाजपनं शेतक-यांच्या मालाला हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण हा हमीभाव मिळाला का ? या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसनं का घेतलं नाही ? निवडणुकीत या मुद्यावरून काँग्रेस भाजपला जेरीस आणू शकली असती. पण तसं झालं नाही. देशात दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन पूर्ण झालं नाही. रोजगार निर्मिती का झाली नाही ? हा मुद्दाही काँग्रेसनं हाती घेतला नाही. देशात मागील पाच वर्षात किती नवीन कंपन्या, उद्योग आले याची आकडेवारी काँग्रेसनं सरकारला विचारली नाही. मागील पाच वर्षात देशात किती गुंतवणूक झाली ? हा आकडा काँग्रेसनं भाजपला का विचारला नाही. परदेशातलं किती काळं धन देशात आलं ? हा प्रश्न राहुल गांधी का विचारत नाहीत. नोटबंदी झाली पण दहशतवादी हल्ले का थांबले नाही ? हे अपयश कोणाचं ? पुलवामातला हल्ला हे कोणाचं अपयश ? हे सवाल काँग्रेस विचारणार नाही तर पाकिस्तान विचारणार आहे का ? वरील पैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर घेण्यात काँग्रेसला यश आलं नाही. राफेलवरून आरोपांची राळ उठवल्यानंतर आता काँग्रेसनं मौन का बाळगलंय ? हा प्रश्नही मतदारांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी काँग्रेस देशात कुठेही रस्त्यावर उतरली नाही. आंदोलन केलं नाही. चौकीदार चोर हैं, हे कॅम्पेन छान आहे. पण त्यामुळे मतं मिळतीलच याची गॅरंटी नाही.
सत्ताधारी भाजपला अडचणीचे ठरणारे हे प्रश्न आहेत. पण हे प्रश्न विचारण्याची हिंमत काँग्रेस दाखवू शकली नाही. कारण काँग्रेस पराभूत मानसिकतेत गेलेली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश,  छत्तीसगडमधल्या विजयानंतर काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं. पण हे चैतन्य लोकसभेच्या रणांगणा आधीच मावळलं आहे. काँग्रेसनं प्रियंका गांधी-वाड्रा यांना मैदानात उतरवलं आहे. पण त्याचाही फार फायदा होण्याची सध्या तरी चिन्हं दिसत नाहीत.
देशासमोरचे प्रश्न घेऊन विरोधकांनी लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचं असतं. तर सत्ताधा-यांनी केलेल्या कामांचा दाखला आणि भविष्यातला त्यांचा विकासाचा प्लॅन मतदारांना सांगायचा असतो. पण सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही मुद्दे नकोसे झाले आहेत, हे चित्र सध्या दिसून येतंय. देशासाठी ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मुद्यांऐवजी सवंग कॅम्पेन करत आहेत. या दोन्ही पक्षांनी मतदारांना गृहित धरलेलं आहे.
आता मतदारांनीच या दोन्ही पक्षांना, आमच्या विकासाचं काय ? विकासाच्या मुद्याचं काय ? हे प्रश्न विचारण्याची गरज आहे. मुद्यांपासून भरकलेल्या या दोन्ही पक्षांना, मुद्याचं बोला असं ठासून सांगण्याची गरज आहे. अर्थात या दोन्ही पक्षांकडून या प्रश्नांची उत्तर मिळतीलच असं म्हणता येत नाही. पण भाजप आणि काँग्रेसनं मुद्यापासून दूर जाणं हे त्यांचं अपयश आहे की मतदारांचं ? हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या प्रश्नाचं उत्तर जर मतदारांनीच शोधलं तर काही मार्ग निघू शकण्याची चिन्हं आहेत. #संगो

Tuesday, March 12, 2019

पोराचा व्याप...बापाला ताप !

महाराष्ट्रात 90 च्या दशकात घरोघरी एक वेगळं राजकारण पाहायला मिळत होतं. शहरी भागातली शिवसेना ग्रामीण भागात वेगानं पसरत होती. त्यामुळे ग्रामीण भागातले अनेक तरूण शिवसेनेकडे आकर्षित होत होते. ग्रामीण भाग म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. परिणामी वडील काँग्रेसमध्ये आणि मुलगा शिवसेनेत असं चित्र त्यावेळी अनेकांनी पाहिलेलं आहे. अर्थात वडील काँग्रेसमध्ये असले तरी ते कार्यकर्ते आणि मुलगा शिवसेनेत असला तरी तो कार्यकर्ताच. त्यामुळे यावर काही फार मोठी चर्चा झाली नाही.
आता 30 वर्षानंतर पुन्हा तशीच परिस्थिती पाहायला मिळतेय. पण इथं कार्यकर्ते नाही तर राज्यातल्या मातब्बर राजकीय घराण्यात ही परिस्थिती निर्माण झालीय. विखे कुटुंबात वडील काँग्रेसमध्ये तर मुलगा भाजपमध्ये, हे चित्र पाहायला मिळतं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय यानं थेट भाजपचा झेंडा हाती धरलाय. लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षनेत्याचा मुलगा भाजपमध्ये गेल्यानं काँग्रेसचं नाक कापलं गेलंय. तसं पाहिलं तर विखे कुटुंबासाठी युती काही अस्पृश्य नाही. शिवसेनेमुळं विखे कुटुंबाला पहिल्यांदा लाल दिवा मिळाला होता. राधाकृष्ण विखे पाटील युतीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री होते. तर बाळासाहेब विखे पाटलांना थेट केंद्रात शिवसेनेमुळं मंत्रीपद मिळालं होतं.आता शिवसेनेचा 'मित्र'पक्ष असलेल्या भाजपला सुजय विखे पाटील यांनी पसंती दिलीय. विखे कुटुंबानं या निमित्तानं युतीचं वर्तुळ पूर्ण केलं. पण राधाकृष्ण विखे पाटील यांचं दिल्ली दरबारी असलेलं वजन आता निश्चित कमी होणार यात शंका नाही.
कोकणातले बडे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांचं प्रकरणही याच वळणाचं आहे. नारायण राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण त्यांचे पुत्र नितेश राणे हेच वडिलांच्या पक्षात नाहीत. नितेश राणे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. नारायण राणेंना भाजपनं राज्यसभेचं सदस्यत्व दिलंय. कोकणातल्या राजकारणातला हा व्यापही तसा तापदायकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही मुलगा, पुतण्या यांची सोय करायला प्राधान्य दिलेलं आहे. मुलगा आमदार तर पुतण्या माजी खासदार. आणि नंतरही त्यांनाच तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न. असं असेल तर कार्यकर्त्यांना राजकीय भवितव्य उरतं का ?
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी तर चक्क, मुलांसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलं आहे. सध्याचं वातावरण पुढच्या पिढीसाठी चिंताजनक असल्याचं प्रिया दत्त यांना वाटतं. पण त्यासाठी इतर कोणीही कार्यकर्त्यानं निवडणूक लढवावी असं त्यांना वाटत नाही. तर निवडणूक स्वत:च लढवावी असं प्रिया दत्त यांना वाटतं.
कुटुंबातल्या सगळ्यांची राजकीय सोय लावणं हेच जणू नेत्यांचं कार्य असावं, अशी सध्याची स्थिती आहे.  नेत्यांनी त्यांची मुलं, सुना आणि आता नातवंडं यांना राजकीय सोयीसाठी राजकारण आणलं आहे. नेत्यांचं हे सोयीचं राजकारण कार्यकर्त्यांसाठी मात्र गैरसोयीचं ठरू लागलंय. नेत्यांची मुलंच जर खासदार, आमदार होणार असतील तर सतरंज्या उचलायच्या आणि घोषणा द्यायच्या हेच कार्यकर्त्यांच्या नशिबी असणार आहे.
सर्वच पक्षातल्या राजकीय नेत्यांना कार्यकर्ते हवेत ते फक्त हाणामा-या करण्यासाठी. कार्यकर्त्यांनी घोषणा द्याव्या आणि खांद्यावर झेंडे घेऊन प्रचार करावा असा त्यांना वाटतं. पण घोषणांची भाकरी होत नाही आणि झेंड्यांचे कपडे होत नाहीत. कार्यकर्ता निष्ठेनं काम करतो. पण पद आणि तिकीट कोणाला द्यायचं हा मुद्दा ज्यावेळी येतो त्यावेळी नेत्यांकडून कार्यकर्त्यांचा विचार होत नाही. परिणामी किती दिवस नेत्यांच्या पिढ्यान पिढ्या खांद्यावर घेऊन नाचवायच्या याचा विचार आता कार्यकर्त्यांनी करण्याची गरज निर्माण झालीय.
निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभासाठी असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. इतर वेळी पक्षनिष्ठा, धर्मनिरपेक्षता यांची माळ जपली जाते. पण निवडणुका आल्यावर ही माळ अडगळीत टाकली जाते. इलेक्टिव्ह मेरिट आणि निवडून यायचंच या हव्यासातून अनेक व्याप आणि ताप मतदारांना बघायला मिळतील.
 #संगो

Friday, March 1, 2019

अलविदा tv9 मराठी !

17 डिसेंबर 2012 रोजी सुरू झालेला tv9 मराठीतला प्रवास आज 1 मार्च 2019 रोजी संपला. 6 वर्ष 2 महिने 12 दिवसांचा हा प्रवास थांबला. सहा वर्ष म्हणजे काही फार मोठा काळ नाही. पण खासगी चॅनेलमध्ये इतकी वर्ष नोकरी करणं या क्षेत्रात मोठं मानलं जातं.
17 डिसेंबर 2012 या दिवशी tv9च्या अंधेरीतल्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं. पण इथं कधीच नवखेपणा जाणवला नाही. ई टीव्हीतले अनेक जुने सहकारी आणि सीनिअर्स इथं आधीपासून होते, तर काही नंतर जॉईन झाले. अभिजित कांबळे, गजानन कदम, धनंजय कोष्टी, चंद्रकांत फुंदे, नरेश बोभाटे, निखिल देशपांडे, सुनील बोधनकर, माणिक मुंढे, कृष्णा आजगावकर, रमेश जोशी, शंकरन सर हे सर्व ई टीव्हीयन्स पुन्हा भेटले. त्यांच्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली.
तर झी 24 तासमध्ये ज्यांच्यासोबत काम केलं ते डॉक्टर प्रसाद घाणेकर, विशाल पाटील, विनीत डंभारे, गणेश रूपाले, किरण खुटाळे, आशिष काटकर, ऋषी देसाई, रघू या सहका-यांसोबतही पुन्हा tv9 मध्ये भेट झाली.
tv9ची सर्वात मोठी स्ट्रेन्थ म्हणजे, नो ऑफिस पॉलिटिक्स. या ऑफिसमध्ये कोणतेही गट, गॉसिप्स हे फालतू प्रकार नाहीत. इथं फक्त आवाज असतो तो कामाचाच. सहका-यांमधला सौहार्द हे या चॅनेलचं बलस्थान आहे, यात वाद नाही.

ब्रेकींग न्यूज क्षणात उतरवणं, ती प्ले अप करणं, आक्रमकपणे मांडणं यात इथले सहकारी निष्णात आहेत.
मी इथं काम केलं ते रन डाऊनवर. अनेक बुलेटिन प्रोड्युस केली. अर्ध्या तासाचे स्पेशल शो, स्पेशल बुलेटिन केली. टॉक शो केले. यावेळी अनेकांचं सहकार्य लाभलं. शरद जाधव, पंकज भनारकर, गिरीश गायकवाड, अंकिता शिंदे, श्रद्धा देसाई, श्रद्धा पवार, अनिता, संतोष थळे हे सर्व सहकारी नेहमीच आठवणीत राहतील.
प्रॉडक्शन एक्झिक्युटीव्ह, व्हिडीओ एडिटर आणि ग्राफिक्सची टीम क्षणात व्हिज्युअल्स, बाईट, पॅकेज आणि ग्राफिक्स तयार करून देतात. यांच्यामुळेच tv9 मध्ये सर्वात जास्त न्यूज पॅकेज तयार होतात. या सहका-यांमुळे अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेष म्हणजे संतोष परब, अमान, अब्बासजी, अभिषेक, परेश सपकाळ या व्हिडीओ एडिटर्सकडून अर्ध्या किंवा एक तासाचा स्पेशल प्रोग्राम अवघ्या पाच तासात कसा एडिट करता येऊ शकतो हे गुप्त ज्ञानही शिकायला मिळालं. भविष्यात त्याचा फायदा होईलच यात शंका नाही.
विनायक कुंदराम, दुर्गा यांची ग्राफिक्सची टीम म्हणजे मायानगरी तयार करण्यात वाकबगार आहे. कोणतंही ग्राफिक्स अर्ध्या तासाच्या आत देण्याची क्षमता त्यांच्या टीममध्ये आहे. प्रॉडक्शनच्या टीममध्ये अनेक सहकारी आहेत, अनेक जण सोडून गेलेत. सर्वांची नावं टाकत नाही, पण नावापेक्षा त्यांचं कामच जास्त बोलतं. पण प्रमोद जगताप, दुर्गेश राजमाने, अर्जुन, सुशील, सोनी मगर, गौरी, कुणाल सिंग, अश्विनी, पूजा यांना विसरता येणं अशक्य.
ब्रेकींग न्यूजच्या वेळी जसा गोंधळ न्यूजरूममध्ये असतो, तसाच गोंधळ पीसीआरमध्येही असतो. पण अशा वेळी संयमानं काम करणारे पीसीआरमधले सहकारी यांना विसरणं शक्यच नाही. विजय, गौतम यांची टीम आणीबाणीच्या वेळी सर्व परिस्थिती संयमानं हाताळत असतात.
प्रोमो डिपार्टमेंट एकहातीपणे सांभाळणारी रसिका डायालकर तर उत्साहाचा अखंड धबधबाच. रसिका असल्याने प्रोमो, क्रोमा, स्टिंग, डाऊन बॅंडचं कधी टेन्शन घ्यावं लागलं नाही.
tv9 हे नेहमीच सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात टीका करण्यात आघाडीवर राहिलेलं आहे. 2012 मध्ये मी इथं जॉईन झालो त्यावेळी राज्यात आणि केंद्रात काँग्रेस आघाडीचं सरकार होतं. सिंचन घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा यासह इतर घोटाळ्यांवरून काँग्रेसला सळो की पळो करून सोडलं होतं. 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतरही tv9च्या कार्यशैलीत फरक पडला नाही. केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांवरही तुटून पडताना कोणतीही कसर tv9नं सोडली नाही.
श्रीनिवास रेड्डी, उमेश कुमावत, निलेश खरे, रोहित विश्वकर्मा या सर्व सिनीअर्सकडून बातमी आक्रमकपणे कशी प्रझेंट करायची हे शिकायला मिळालं. कामाचं स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. कोणतीही बातमी आल्यानंतर ती या पक्षाची आहे म्हणून थांबवा आणि त्या पक्षाची आहे म्हणून चालवा असा प्रकार कधी घडला नाही. हा आवडता नेता, तो ना आवडता नेता अशी कोणतीही कॅटेगिरी इथं नाही. त्यामुळे बातमी आली की, ती क्षणात उतरवली जाते. जो चुकला तो ठोकला, ही इथली निती.
tv9चं असाईनमेंट अत्यंत जलद आहे. क्षणात फोनो जोडणं, लाईव्ह उपलब्ध करून देणं ही सर्व प्रोसेस सर्वात फास्ट केली जाते. tv9चे सर्व रिपोर्टर्स ब्रेकींग न्यूज देण्यात निष्णात आहेत. कोणतीही ब्रेकींग न्यूज tv9च्या रिपोर्टरकडे सर्वात आधी असते, त्यामुळे tv9वर सर्वात जास्त न्यूज ब्रेक केल्या जातात. परिणामी tv9चा स्क्रिन हा 24 तास हलत असतो. ब्रेकींग न्यूज आल्यानंतर ऑनएअर असणारे अँकर्स त्या बातमीला न्याय देतात. यात निखिला म्हात्रे जर ऑनएअर असतील तर बुलेटिन प्रोड्युसरला फार काही कष्ट करावे लागत नाहीत. असाच अनुभव इतर अँकर्सचाही आहे.
सहा वर्षांमध्ये करिअरमधला अतिशय सुंदर अनुभव इथं मिळाला. आज थांबण्याची वेळ आली आहे. खरंच मन भरून आलं आहे. असे सहकारी पुन्हा मिळतीलच असं म्हणता येत नाही. एचआर डिपार्टमेंटचे रणजीत सर, रिसेप्शन वरील कविता मॅडम, बॅक ऑफीस, फॅसिलिटी, कॅन्टीन या सर्वांच्याच आठवणी मनात आहेत. आयुष्यातला चांगला काळ इथं घालवला. मनात सर्वांच्या आठवणी घेऊन जात आहे. तुमचे आशीर्वाद कायम असू द्या. माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या सोबत आहेत.
शेवट या गाण्याच्या ओळींनी करतो...

भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर...

मित्रांनो या वळणावर निरोप घेण्याची वेळ आली आहे. या वळणावर नवा प्रवास सुरू करतोय. धन्यवाद. तुमचाच गारू...संतोष गोरे...#संगो #tv9