Sunday, July 31, 2022

राजकारणातला 'सेफ गेम'

 

शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीनं ताब्यात घेतलं. मात्र दबाव दहशतीला घाबरणार नसल्यानं संजय राऊत यांनी निक्षून सांगितलं. ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी हात उंचावून त्यांचे इरादे जाहीर केले होते. गळ्यातील भगवा गमछा फिरवून आगामी काळातल्या संघर्षाला तयार असल्याचे संकेतच एक प्रकारे संजय राऊतांनी दिले. ईडीचे अधिकारी घेऊन जात असताना त्यांनी कारमधून उपस्थित शिवसैनिकांना अभिवादन केलं. ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना संजय राऊतांनी झुकणार नाही, याचा पुनरूच्चार केला. 

शिवसेना महाराष्ट्र कमजोर होणार नाही. संजय राऊत झुकणार नाही. पक्ष सोडणार नाही. संजय राऊतांनी यावेळी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे. राजकीय लढाई आणि कारवाईला सामोरं जाणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. ईडीच्या भीतीनं अनेक नेते शिंदे गटात गेले, तर काही भाजपमध्ये गेले. अर्जुन खोतकरांनी तर अडचणीत असल्यामुळे सेफ होत असल्याचं माध्यमांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं. ईडीला घाबरून शिवसेनेचे आमदार, खासदार आणि बडे नेते शिंदे गटात दाखल होत असल्याची टीका मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही त्यावर बोलावं लागलं. घर सेफ करण्याऐवजी संजय राऊत ईडीच्या कारवाईला सामोरे गेले. राऊतांनी भाजपसोबत संघर्ष सुरू ठेवला, शिंदे गटातही राऊत गेले नाही. अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, भावना गवळी यांच्यावर आणि अशा अनेक नेत्यांना ईडीच्या कारवाईची भीती होती. या नेत्यांनी शिंदे गटात जाऊन त्यांचं घर सेफ केलं.  मात्र या राजकीय लढाईत संजय राऊतांनी स्वत: पेक्षा आणि स्वत:च्या घराला सेप करण्यापेक्षा जास्त महत्व शिवसेनेला सेफ करायला दिलं. तर शिंदे गटातल्या आमदारांनी स्वत:ला सेफ करायला महत्त्व दिलं. शिंदे गटातील आमदार आणि संजय राऊत यांच्यातला हाच सर्वात मोठा फरक इथे दिसून आला. पक्ष आणि उद्धव ठाकरे अडचणीत असताना संजय राऊतांनी घेतलेली आक्रमक भूमिकाच आगामी काळात शिवसेनेला बळ देणारी ठरू शकते.

ईडीकडून अटक होणार असल्याचा अंदाज संजय राऊत यांना सहा महिन्यांपूर्वीच आला होता. त्याबाबत संजय राऊतांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहलं होतं. राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपचे दोन नेते ईडीच्या माध्यमातून धमकी देत होते, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामध्ये संजय राऊतांचा सिंहाचा वाटा होता. भाजपची मुख्यमंत्रीपदाची आणि सरकारची संधी संजय राऊतांमुळे हुकली होती. त्यामुळे संजय राऊत भाजप नेत्यांच्या सातत्यानं निशाण्यावर होते. मात्र दररोज सकाळी नित्यनेमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत भाजप नेत्यांना पुरून ऊरत होते. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर हल्ला करण्याची संधी सोडली जात नव्हती. आणि त्यातच पत्राचाळीचा मुद्दा भाजपच्या हाती लागला. त्या मुद्याचा कायदेशीर उपयोग करून भाजपनं संजय राऊतांना अडकवण्याची संधी साधली. मात्र या संकटात संजय राऊतांनीही राजकीय संधी साधली. शिवसेना कमजोर होणार नाही आणि झुकणार नाही, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.  राजकारणात शह आणि काटशह दिले जातात. राजकारणात कोणताच विजय किंवा पराभव हा शेवटचा नसतो. 2019 मध्ये संजय राऊतांनी मविआचं सरकार आणून भाजपला मात दिली होती. आता ईडीनं कारवाई केल्यानं संजय राऊतांना एकप्रकारे चेकमेटच देण्यात आलाय. आता पुढच्या राजकारणात कोण कोणावर कशी मात करेल हे सांगता येत नाही. कारण मौका सब को मिलता हैं. आता पुढचा मौका कोणाचा असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

संजय राऊत  यांच्यावर पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झाली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे 'ईडी'तील सूत्रांचं म्हणणे आहे. प्रवीण राऊत यांनी सर्व पैसा त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केले होते. यातील 83 लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले होते. त्याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला, असा 'ईडी'चा संशय आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांनाही 'ईडी'ने नोटीस बजावली होती. त्यावेळी वर्षा यांनी 55 लाख रुपये माधुरी यांना परत केले होते. परंतु त्यानंतर 'ईडी'ने पालघरमधील जमीन, दादर येथील फ्लॅट आणि किहीम येथील आठ भूखंडांवर टाच आणली होती. एकंदरीतच पत्राचाळीच्या माध्यमातून भाजपनं संजय राऊतांचा हिशेब चुकता केला. #संगो #SANJAYRAUT #EKNATHSHINDE #SHIVSENA #ED

Thursday, March 10, 2022

कॉमेडी आणि राजकारण

 

2008 मध्ये भगवंत मान द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये सहभागी झाले होते. आणि आता 2022 मध्ये मान मुख्यमंत्री होणार आहेत. म्हणजेच चौदा वर्षात कॉमेडी, टीव्ही आणि राजकारण असा प्रवास करत त्यांनी मोठा पल्ला गाठला आहे. चौदा वर्षांपूर्वी स्टार वन या वाहिनीवर द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज हा शो सुरू झाला होता. त्यातूनच कपिल शर्मा, सुनील पाल यांच्याप्रमाणे अनेक कॉमेडियन प्रसिद्ध झाले. 


भगवंत मान यांच्या प्रमाणेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा प्रवास झालाय. कायद्याचा अभ्यास करत असतानाच झेलेन्स्की कॉमेडी शो मध्ये सहभाग घेत होते. 17 वर्षांचे असताना झेलेन्स्की एका स्थानिक विनोदी स्पर्धेच्या टीममध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर युनायटेड युक्रेनियन संघ 'झापोरिझिया-क्रिवी रिह-ट्रान्झिट'मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. 1997 मध्ये ते मेजर लीगमध्ये काम करून विजयी झाले. 2008 मध्ये त्यांनी 'लव्ह इन द बिग सिटी', त्याचा सिक्वेल 'लव्ह इन द बिग सिटी 2' या चित्रपटात काम केलं. तर 2011 मध्ये 'अवर टाईम' या चित्रपटातही त्यांनी अभिनय केला. काही वर्षांपूर्वी कॉमेडी करणाऱ्या या नेत्यानं बलाढ्य रशियाला चांगलीच झुंज दिली.

झेलेन्स्की, भगवंत मान यांच्यावरच ही यादी थांबत नाही. तर द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज 2 राजीव निगम हा कॉमेडियन सध्या यू ट्यूबवर सक्रिय आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर व्हिडिओ तयार करून निगम ते यू ट्युबवर अपलोड करतात. ट्विटरवरही व्हिडिओ पोस्ट केले जातात. त्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळताना दिसतो.  श्याम रंगीला हा कॉमेडियन पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेत राहुल गांधी यांची हुबेहुब मिमिक्री करतो. काही दिवसांनी हे दोघेही राजकारणात आले तर नवल वाटणार नाही.

कॉमेडी सर्कस सिझन 2 मधील रेहमान खान हा कॉमेडियन अनेक स्टँडअप कॉमेडीमध्ये सहभागी होऊन केंद्र सरकारवर टीका करताना दिसतो. मुस्लिमांचे प्रश्न मांडून सरकारवर कॉमेडीच्या माध्यमातून रेहमान खान निशाणा साधतो. 

दक्षिण भारतात जयललिता, एन.टी. रामाराव, एम.जी. रामचंद्रन हे कलाकार राजकारणात यशस्वी झाले, मुख्यमंत्री झाले. नंतरच्या काळात कमल हासन आणि इतर कलाकारही राजकारणात आले. बॉलिवूडमधील धर्मेंद्र, हेमामालिनी, शत्रूघ्न सिन्हा यांच्यासारखे कलाकार लोकसभेवर निवडून गेले. मात्र भगवंत मान यांनी मिळवलेलं यश हे या सर्वांपेक्षा मोठं आहे. काही वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव यांनी राजकारणाचा विनोद केला होता. अर्थात राजकारणाचा विनोद आजही कमी-जास्त प्रमाणात कायम आहे. पण आता अनेक कॉमेडियन राजकारणात येत आहेत. त्यामुळे आधी राजकारणाचा विनोद झाला होता, आता विनोदाचं राजकारण होऊ नये, ही अपेक्षा. 

#संगो

Sunday, March 6, 2022

झुंड, दिवार आणि विजय

 

अमिताभ बच्चन यांच्या दिवार आणि झुंड सिनेमातील व्यक्तीरेखेचं नाव विजय आहे. दिवारमध्ये अँग्री यंग मॅन तर झुंडमध्ये प्रशिक्षक अशा व्यक्तीरेखेत विजय पाहायला मिळतो. झुंड सिनेमात दाखवण्यात आलेल्या कॉलेजच्या दिवारच्या (भिंत) एका बाजूला इंडिया तर दुसऱ्या बाजूला भारत (झोपडपट्टी) दाखवलेला आहे. इंडिया आणि भारत यांच्या असलेली ही भिंत पाडण्याचं काम अमिताभ बच्चन यांनी केलं.

झोपडपट्टी म्हणजे नाक मुरडण्याचा विषय. नावं ठेवण्याचा विषय. मात्र हाच विषय पडद्यावर दाखवण्याची हिंमत नागराज मंजुळे यांनी दाखवली. अमिताभ बच्चन यांचा या सिनेमातला वावर महानायकाचा वाटत नाही. अर्थात तो तसा असण्याची गरजही नाही. महानायकासमोर सामान्य चेहऱ्याच्या छोट्या कलाकारांनी केलेला अभिनय लक्षात राहतो. डॉन, बाबू, रितीक यांचे डायलॉग खळखळून हसवतात. आणि डोळ्याच्या कडाही पाणवतात. 

फेसबुकवर या सिनेमाविषयी बरंच नकारात्मक वाचण्यात आलं होतं. मात्र हा सिनेमा पाहताना त्या नकारात्मक पोस्ट कुठच्या कुठे उडून गेल्या. फँड्रीत जब्याने भिरकावलेला दगड अनेकांना लागला होता. या सिनेमात दगड भिरकावलेला नाही. तरीही त्या दगडानं अचूक मारा केला आहे. #संगो #झुंड # #jhund

Monday, February 21, 2022

पुन्हा 'तिसरा' गिअर?


 केंद्र सरकारच्या विरोधात पर्याय देण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. तिसऱ्या आघाडीचा पोलिटिकल गिअर टाकण्यात आला आहे. त्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतलाय. बिगर-भाजपशासित राज्यांनी एकत्र यावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्याचसाठी त्यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा दिला.  चंद्रशेखर राव यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. दिल्लीत बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक होणार आहे.

तिसऱ्या आघाडीसाठी टाकण्यात आलेल्या या गिअरमुळे भाजप विरोधातली गाडी किती सुसाट धावेल? या विषयी शंकाच आहे. कारण महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. तर बंगालमध्ये 42, तामिळनाडूत 39 आणि तेलंगणामध्ये 17 मतदारसंघ आहेत. म्हणजेच या चार राज्यात लोकसभेच्या एकूण 146 जागा आहेत. आणि त्यातल्या 100 जागा जरी तिसऱ्या आघाडीला मिळाल्या असं गृहित धरलं तरी केंद्रातल्या सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. तिसऱ्या आघाडीत काँग्रेसला घेणार की नाही? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय जनता दल, आप या पक्षांची काय भूमिका असेल? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. 

देशात आतापर्यंत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग कधीही यशस्वी झालेला नाही. सरकार स्थापलं तरी ते 5 वर्ष टिकलेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीविषयी मतदारांच्या मनात विश्वसनीयता निर्माण होत नाही. आणि समजा तिसरी आघाडी अस्तित्वात आली तरी त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असणार आहे. परिणामी चार मुख्यमंत्री एकत्र दिसत असले तरी पंतप्रधानपदाचा चेहरा स्पष्ट होत असल्यानं 'तिसरा' गिअर अडकण्याचीच शक्यता जास्त वाटते. #संगो

Sunday, February 6, 2022

तुम मुझे यूँ भुला ना पाओगे

 

लता मंगेशकरांच जीवनाचा प्रवास थांबला. मात्र त्यांचा आवाज जगभरात नेहमीच गुंजत राहणार आहे. जगभरातल्या नागरिकांवर असलेली त्यांच्या आवाजाची मोहिनी अशीच कायम राहणार आहे. कारण तो फक्त आवाज नाही. तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला काही तरी देणारा एक चिरंतन ठेवा आहे.
लता मंगेशकरांनी गायलेल्या गाण्यांना झालेला लतास्पर्श जीवनाचंच गाणं ठरतो. 'जब प्यार किया तो डरना क्या' हे गाणं तर प्रेमासाठी बंड करणाऱ्या तरूणाईचा आवाज आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला लतादीदींच्या स्वरानं नवी अनुभती दिली. उद्याची रात्र असेल किंवा नसेल अशा परिस्थितीत प्रियकराला गाण्यातून दिलेली साद हजारो वर्ष कोणीही विसरणार नाही.  लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो, हे गाणं ऐकताना प्रेमात पडलेली कोणतीही व्यक्ती शहारून गेली नसेल तरच नवल.  तारूण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी लतादीदींचं हे गीत हमखास असतंच. जब हम जवां होंगे, या गाण्यातून पाहिलेली भावी प्रेमाची स्वप्नं शब्दातून मांडण्याचं काम लताजींनी केलं. प्रेमात पडल्यावर प्रियकराला पत्र लिहताना प्रेयसीच्या मनात हेच गीत दाटून आलेलं असतं. जे लतादीदींनी गायलंय, हमने सनम को खत लिखा. प्रेमात बेभान झालेल्या प्रेयसीच्या भावनांना आवाज दिला तो लता दीदींनी. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा हैं, हे बेभान गाणं मृत्यूवर मात करून जीवन कसं जगावं याचाच संदेश होतं.  अर्थात प्रत्येकाचंच प्रेम यशस्वी होत नाही. प्रेमभंग सहन करणाऱ्या हृदयानं घातलेली साद ऐकावी ती लतादीदींच्या गाण्यातूनच. शिशा हो या दिल हो आखिर तूट जाता हैं, हे गाणं ऐकताना डोळ्यातून आपसूक अश्रू वाहू लागतात.  अनेक वर्षांनंतर आयुष्याच्या एका वळणावर भेटलेल्या प्रियकरासाठी लतादीदींनी दिलेल्या स्वरापेक्षा वेगळं काही असूच शकत नाही. तेरे बिना ज़िन्दगी से शिकवा नहीं, हे गाणं सर्व काही विसरून कोणतीही तक्रार करू नका, हा संदेश देतं असंच वाटत राहतं.
लतादीदींचा आवाज आयुष्य भरभरून जगण्याची प्रेरणा देतो. प्रेमात पडलेल्याचं जग सुंदर करण्याचं काम लतादीदींच्या आवाजनं केलं. त्यामुळे पुढील हजारो वर्ष हा स्वर्गीय आवाज सर्वांना प्रेमाची आणि जगण्याची अनुभती देणार आहे. तुम्ही निराशा व्हाल तेव्हा प्रसन्न करण्यासाठी लतादीदींचा आवाज आहे, प्रेमात पडाल तेव्हा तुमच्या हृदयाचा आवाज बनण्यासाठी लतादीदींचा आवाज आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तेव्हा तुमच्या हृदयाला समजावणारा लतादीदींचा आवाज. जीवनात संकटं येतील तेव्हा धीर देण्यासाठी लतादीदींचा आवाज आहे. जीवनातल्या कोणत्याही टप्प्यावर आवाज द्या, साद देण्यासाठी तुम्हाला लतादीदींचा आहे. फुलाच्या सुगंधाप्रमाणे हा आवाज आपलं जीवन असंच सुवासिक करणार आहे, लतादीदींनी गायलेल्या पुढील गाण्याप्रमाणे.... रजनीगंधा फुल तुम्हारे  यु ही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में...
#संगो

Saturday, January 15, 2022

आरोग्य आणि मनाचा 'योग'!

 


कोरोनाचा धोका कधी वाढतो तर कधी कमी होतो. ही परिस्थिती किती दिवस कायम राहिल हे सांगता येत नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपलं शरीर सज्ज असणं हीच आता मोठी गरज बनली आहे. त्यामुळे साधी, सरळ आणि कोणालाही करता येणारी योगासनं नक्की करा. सध्याच्या काळात त्याची नितांत गरज आहे. मागील वर्षी मला कोरोना झाला होता. त्यानंतर मी योगासनांकडे गांभीर्यानं वळलो. त्या आधी योगासनं करायचं मात्र त्यात सातत्य नव्हतं. आता दोन वर्षांपासून योगासनांमध्ये सातत्य असल्यानं त्याचे फायदे मला नक्कीच जाणवत आहेत. अर्थात त्यामुळे योगासनांकडे गांभीर्यानं नको तर आनंदाने वळा.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी योगासनं करून प्रतिकारशक्ती वाढवता येते. योगासनांमुळे शरीर आजारांशी समर्थपणे सामना करू शकतं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मन आनंदित राहण्यासाठी योगासनं करणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट असल्यास आपलं शरीर आजारांविरोधात लढण्यास सक्षम असते. गंभीर आजारांचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला सुरक्षा कवच प्रदान करण्याचं कार्य करते. जेणेकरून कोणत्याही आजाराचा संसर्ग सहजरित्या आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. दैनंदिन जीवनात व्यायाम, योगासने आणि प्राणायम करण्यासाठी वेळ काढणं आवश्यक आहे. 

वीरभद्रासन आणि त्यातील काही प्रकार शरीरासाठी लाभदायक आहेत. यामुळे हृदयास योग्य रक्तपुरवठा होतो. यामुळे शारीरिक ऊर्जा वाढण्यास मदत होते. यामुळे शरीर आजार-रोगांविरोधात सक्षमरित्या लढू शकतं. शिवाय, या आसनाच्या सरावामुळे छातीचे स्नायू, मान आणि पाठीचा कणा ताणला जातो. यामुळे अवयव बळकट होतात. नौकासन, वज्रासन, भुजंगासन, सर्वांगासन, हलासन, धनुरासन ही आसनं सोपी आहेत.

प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी त्रिकोणासनही फायद्याचं ठरतं. त्रिकोणासन केल्यानं शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होतो. या आसनामुळे कमरेचे स्नायू लवचिक आणि मजबूत होतात. पाय, गुडघे, पोटऱ्या, हात, खांदे आणि छातीचे स्नायूंना चांगला ताण मिळतो. मन, मेंदू, मज्जासंस्थेचं आरोग्य सुधारते. महत्त्वाचे म्हणजे मानसिक आणि शारीरिक समतोल प्राप्त होतो.

योगा म्हणजे भारतानं जगाला दिलेला अनमोल ठेवा आहे. योगासनांमुळे शरीर निरोगी आणि मन प्रसन्न ठेवण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्यानं या संकटात सर्वांनीच योगासनं करणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीर निरोगी राहून कोरोनाचा सामना करण्यात नक्कीच मदत होईल. आणि हो सूर्यनमस्कार केल्यानं अनेक फायदे होतात. त्याविषयी अधिक माहिती पुढील ब्लॉगमध्ये. #संगो


Friday, January 7, 2022

व्यायामाची साथ, कोरोनावर मात!

 

कोरोनाचं सावट कायम असल्यानं प्रत्येकाने शरिरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. कोरोनाच्या संकटात प्रत्येकाचं शरीर निरोगी असणं गरजेचं आहे. निरोगी शरिरात आणि भरपूर प्रतिकारशक्ती असेल तर कोरोनाच नव्हे तर कोणत्याही विषाणूंचा सामना करता येऊ शकतो.  व्यायाम कोणत्याही काळात शरीराला फिट ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही व्यायाम-प्रेमी नसाल, तरी आवश्‍यक तेवढा व्यायाम करायला सुरुवात करा. नियमित आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम लवकरात लवकर संरक्षक शक्ती वाढवतात. व्यायामाची सुरूवात करताना मध्यम प्रकारचा शारीरिक ताण देणारे आणि सुमारे 30 ते 45 मिनिटे असा व्यायाम करणे अतिशय योग्य ठरेल. 

कोरोनाचा वाढता संसर्ग, वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध पाहता जिममध्ये जाणं शक्य होत नाही. त्यामुळे घरच्या घरी करता येणारे व्यायाम तितकेच प्रभावी आहेत. सकाळ-संध्याकाळ दोन वेळा 10 मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्या तर साधारण 200 कॅलरी जळतात. एक तास दोरीवरच्या उड्या मारल्यामुळे सरासरी 700 हून अधिक कॅलरीज जळतात. दुसरा व्यायाम प्रकार म्हणजे एकप्रकारच्या उठाबशा आहेत. बर्पे हा जवळपास स्क्वाटसारखा व्यायाम आहे. याच्या सहाय्याने शरीरातील चरबी कमी करायला मदत होते. बर्पेस वेगवान हालचाल करतात, त्यामुळे ते तुमचे हृदयही पंप करतात.

घरात करण्यासाठी पुश अप हा व्यायाम अतिशय सोपा आहे. कमी जागेतदेखील तुम्ही हा व्यायाम करू शकता. पुश अप्स हा अतिशय सोपा व्यायाम असून 10 मिनिटांच्या व्यायामाने तुम्हाला खूप शक्ती मिळते.

प्लॅन्क हा व्यायाम पोटासाठी अतिशय उपयोगी आहे. फॅट्स कमी करण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर आहे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवून तुम्ही केवळ हातांच्या मदतीनं शरीरवर घ्यायचं आहे. दिवसातून 3 वेळा हा व्यायाम केल्यास तुम्हाला नक्कीच याचा फायदा होतो. साईड प्लॅन्क हा व्यायामची शरीराला अनेक फायदे देणारा आहे.

तर बाइसिकल क्रंचमुळे तुमच्या पूर्ण स्नायूंचा व्यायाम होतो. फॅट्स कमी होऊन अॅब्स बनवण्यासाठी हा व्यायाम केला जातो. या प्रकारामध्ये बेसिक क्रंच, रिव्हर्स क्रंच, डबल क्रंच असे तीन प्रकार असतात. ज्याप्रकारे आपण सायकल चालवण्यासाठी पाय वरखाली करतो त्याच पद्धतीने जमिनीवर झोपून आपण हा व्यायाम करू शकतो.

व्यायामाचा प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. अनेक संशोधनांद्वारे सिद्ध झालंय की फ्लू, न्यूमोनिया, इतर काही संसर्ग, मधुमेह किंवा हृदयविकारासारखे मोठे आजार व्यायामामुळे नियंत्रणात आले आहेत. कायम उत्साही राहिल्यामुळे जळजळ कमी होते, प्रतिकारक पेशींची संख्या वाढते. आतड्यातील मायक्रोब्सचा सकारात्मक परिणाम शरीराच्या संरक्षण संस्थेवर होतो. शरीरातील प्रतिकारक शक्तीचे नियमन होते. रोजच्या व्यायामामुळे ही संरक्षण संस्था सतत कार्यरत ठेवण्यास मदत होते. 

व्यायामाची आवड असो किंवा नसो फिट राहण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. व्यायाम परिणामकारक होण्यासाठी खूप वेळाचा, शक्तिदायक आणि न आवडणारा व्यायाम असला पाहिजे, असे नाही. घरातल्या किंवा सोसायटीच्या पायऱ्यांचा चढ-उतार करणे चांगला आणि उत्साहवर्धक व्यायाम आहे. 

भरभर चालणे, पळणे, सायकल चालवणे किंवा तासभर सर्वसामान्य ताकदीचा कोणताही व्यायाम चांगल्या प्रकाराची प्रतिकारशक्ती निर्माण करतो. त्यामुळे जर व्यायाम करत नसाल तर आताच करायला लागा. कारण फिट राहाल तरच कोणत्याही परिस्थितीत हिट राहाल. #संगो