Friday, October 23, 2020

सत्ता आणि निष्ठा

 

एकनाथ खडसे यांनी कमळाचं फूल बाजूला सारत अखेर हातावर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बांधलंच. कोणत्याही नेत्याच्या पक्षांतराच्या वेळी समुद्राच्या भरती ओहोटीची आठवण येते. कारण निसर्गाचा हा नियम राजकारणालाही लागू पडतो. ज्या भाजपमध्ये सहा वर्षांपूर्वी सर्वपक्षीय भरती सुरू होती, त्याच भाजपमधून आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे बाहेर पडले. अर्थात राजकारणात पक्षांतर करणं काही नवी गोष्ट नाही. या आधीही अनेक नेत्यांनी पक्ष बदलले आहेत. शिवसेनेनं मुख्यमंत्री केलेले नारायण राणे यांच्यावरही पक्ष बदलण्याची वेळ आली. (त्यांनी तर दोनदा पक्ष बदलला, स्वत:चाच पक्ष काढून विसर्जितही केला ही बाब वेगळी.) छगन भुजबळ, गणेश नाईक अशा अनेक नेत्यांनी दोनदा पक्ष बदलले. जुन्या पक्षात गोची होत असेल, पंख छाटले जात असतील किंवा नव्या पक्षात मोठी संधी मिळत असेल तर पक्षांतर करण्यात चूक तरी काय ? अर्थात चूक काहीच नाही. त्यामुळे 2014च्या विधानसभा निवडणुकी आधी विखे, मोहिते, मधुकरराव पिचड, गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील असे अनेक बडे नेते भाजपच्या छावणीत दाखल झाले. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासारख्या बाहेरून आलेल्यांचा भाजपमध्ये उत्कर्ष सुरू झाला. 

एकनाथ खडसे तर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र 2014 मध्ये खडसेंचे ज्युनिअर असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. पक्ष वाढवण्यासाठी ज्या नेत्यांनी हयात घालवली त्यात एकनाथ खडसेंचं नाव आघाडीवर होतं. मात्र मुख्यमंत्रीपदी डावलण्यात आल्यानं त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ही नाराजी भाजपच्या नेतृत्वाला आवडली नाही. मोदी-शाह यांच्या नव्या भाजपमध्ये वाजपेयी, अडवाणी, मुंडे, महाजन यांच्या बरोबर काम करणाऱ्या खडसेंचा पडता काळ सुरू झाला. खडसेंना महसूलमंत्री करण्यात आलं. मात्र भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणावरून 4 जून 2016 रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला. अनेक मंत्र्यांना क्लीनचिट मिळत असताना खडसेंना मात्र बाजूला सारण्यात आलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत तर खडसेंना तिकीटही नाकारण्यात आलं. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांचाही पत्ता कापण्यात आला. पंकजा मुंडेंना तिकीट मिळालं, मात्र त्यांचा पराभव झाला. अर्थात मधल्या काळात एकनाथ खडसेंनी अनेकदा त्यांची नाराजी व्यक्त केली. 'नानासाहेब फडणवीस बारभाई कारस्थान' हे पुस्तक लिहूणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. पक्ष सोडत असताना त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच त्यांनी टीका केली.

आघाडीचं सरकार असताना विरोधी पक्षनेते असलेल्या एकनाथ खडसेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला होता. खडसेंचा तिखट हल्ला राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर, एकनाथ खडसेंवर तोडपाणीचा आरोप केला होता. ज्या खडसेंवर तोडपाणीचे आरोप केले होते, तेच खडसे आता राष्ट्रवादीत आले आहेत. राजकारणात अशा अनेक घटना घडतात. सिंचन घोटाळ्यावरून भाजपनं अजित पवारांवर टीका केली होती. त्यांना तुरूंगात टाकू असंही निवडणुकीच्या प्रचारात सांगितलं गेलं. मात्र त्याच अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली.


नारायण राणे आणि नितेश राणे यांनीही काँग्रेसमध्ये असताना भाजप-शिवसेनेच्या सरकारवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंचा राजकीय बळी घेतल्याचं ट्विट नारायण राणेंनी केलं होतं. बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


राणेंचे पुत्र नितेश राणे यांनीही काँग्रेसमध्ये असताना भाजपवर टीका केली होती. मराठा आरक्षण आणि बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण दिल्याच्या मुद्यावरून त्यांनी प्रचंड थयथयाट केला होता. बाबासाहेब पुरंदरेंबद्दल अपमानास्पद वक्तव्य केली होती. संभाजी भिडेंचा एकेरी उल्लेख केला होता. पुण्यातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणा-यास 5 लाख रुपये रोख देऊन जंगी सत्कार करु अशी वादग्रस्त घोषणाही नितेश राणेंनी केली होती. मात्र आता ज्यांच्यावर बहुजन नेतृत्वाला टार्गेट केल्याचा आरोप केला त्याच भाजपमध्ये राणेंनी मुक्काम ठोकला आहे.

राजकारणात आता निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते कमी होत चालले आहेत. प्रत्येकाला आपला उत्कर्ष साधायचा आहे. त्यासाठी सत्तेत असलेल्या पक्षात प्रवेश करायचा आणि हेतू साधायचा हा सरळ हिशेब आहे. भाजप सत्तेत होती तेव्हा नेत्यांनी भाजपची वाट धरली. आता महाविकास आघाडी सत्तेत असल्यानं नेत्यांची पाऊलं इकडे वळू लागली आहेत. #संगो #bjp #eknathkhadse

Sunday, September 6, 2020

'क्वीन'चा नवा 'पंगा'

 

शिवसेना आणि मुंबईचं नातं वेगळं सर्वांनाच माहित आहे. शिवसेनेचा ठसा असलेल्या या मुंबईत हिंदी सिनेमाची इंडस्ट्री चांगलीच बहरली. मुंबईतलं बॉलिवूड आपल्या देशाची ओळख आहे. एकाच शहरात शिवसेना आणि बॉलिवूडचं साम्राज्य आहे. मात्र अनेकदा  हे दोन्ही साम्राज्य एकमेकांना भिडतात तेव्हा मोठा वाद निर्माण होता. यावेळी शिवसेना आणि बॉलिवूडची क्वीन यांच्यात चांगलीच खणाखणी सुरू झाली. 

शिवसेनेची मुंबई शहरावर अनेक वर्षांपासून सत्ता आहे. राज्यात सत्ता कोणाचीही असली तरी मुंबईच्या रस्त्यांवर साम्राज्य असतं ते शिवसेनेचं.  शिवसेनेची धाक, दहशत, दरारा ही कार्यपद्धती. शिवसेना मुंबईची किंग आहे. तर या किंगच्या विरोधात आता बॉलिवूडची क्वीन सरसावलीय. मणिकर्णिका सिनेमात कंगना राणावतनं झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका ताकदीनं वठवली होती. अनेक राज्यांमध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला होता. कंगनाच्या लक्ष्मीबाईच्या भूमिकेची प्रचंड तारीफ झाली. सिनेमाच्या पडद्यावर तलवार घेऊन लढाई करणाऱ्या कंगनानं आता सोशल मीडियाच्या रणांगणात ट्विट करून शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. 

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून कंगनानं बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका केली होती. बॉलिवूडमधल्या बड्या प्रोडक्शन्सवर कंगनानं गंभीर आरोप केले होते. बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनवर निशाणा साधून कंगनानं मोठी खळबळ उडवू दिली. कंगना आणि बॉलिवूड असा वाद पेटलेला असतानाच कंगनानं मुंबईवरून ट्विट केलं आणि सर्व परिस्थितीच बदलली. कंगना आणि बॉलिवूडचा वाद थेट राजकीय वेळणावर गेला. मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतीय ? असा सवाल ट्वीटच्या माध्यमातून कंगनानं विचारल्यानं तिचा थेट शिवसेनेसोबत सामना सुरू झाला.

'मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.' असं ट्विट करून संजय राऊतांनी शिवसेनेचे इरादे जाहीर केले. दुसरीकडे राज्यभरात कंगनाच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. संजय राऊतांनीही  कंगनानं ट्विटर हँडल स्वतः वापरायला शिकावं, असा टोला लगावत भाजपकडे अंगुलीनिर्देश केला. भाजपनंही कंगना राणावतची पाठराखण करण्याची भूममिका सोडून देत यू टर्न घेतला. त्यामुळे कंगणानंही नरमाईची भूमिका घेतली. मुंबई आपल्यासाठी यशोदामाता असल्याचं तिनं एका  ट्विटमध्ये म्हटलं.  मला ओळखणाऱ्यांना माझ्या बोलण्याचा हेतू माहीत आहे, असंही तिनं म्हटलं. 'मुंबई आपली  कर्मभूमी असल्याचं सांगतानाचं मुंबईवर माझं प्रेम असून मला ते सिद्ध करण्याची गरज नसल्याचंही तिनं ट्विटमध्ये स्पष्ट केलं. 

राजकारण, समाजकारण आणि बॉलिवूड तिन्ही भिन्न क्षेत्र आहेत. एक प्रकारे त्यांची लक्ष्मण रेषा आखण्यात आलेली आहे. जेव्हा एखादा कलाकार राजकारण किंवा समाजकारणावर बोलतो तेव्हा त्याचं मत राजकीय वादात अडकतं. म्हणजेच आखून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडल्यास वाद होणार हे निश्चित. जो पर्यंत लक्ष्मण रेषेच्या आत राहून प्रत्येक जण त्याच्या क्षेत्रात काम करतो तेव्हा कोणालाच अडचण नसते. मात्र कलाकारांनी राजकीय भाष्य केल्यास वाद झाल्याशिवाय राहात नाही, हे आपल्या देशातलं कटू वास्तव आहे.

कलाकारांनी पडद्यावर अभिनय करावा अशीच राजकीय पक्षांची इच्छा असते. कलाकारांनी राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीवर भाष्य केल्यास राजकीय पक्ष कलाकारांवर टीका करतात. कलाकार राजकारण करत असल्याचा आरोप करतात. राजकारण करण्याऐवजी कलाकारांनी थेट राजकारणात यावं अशीही भाषा केली जाते. शिवसेना वगळून मुंबईचा विचार केला जावू शकत नाही. तसंच बॉलिवूडशिवायही मुंबईचा विचार करता येत नाही. शिवसेना आणि बॉलिवूड या शहरातच मोठे झाले. मात्र जेव्हा एखादा कलाकार शिवसेनेनं आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी वाद होतोच. हा आता पर्यंतचा इतिहास आहे. आणि या इतिहासाला कंगनाही अपवाद नाही.

Thursday, July 23, 2020

EVERGREEN आशिकी @ 30

आशिकी सिनेमा रिलीज होऊन तीस वर्ष झाली. मात्र त्यातली गाणी आजही तितकीच फ्रेश आहेत. नव्वदच्या दशकातील तरूणांच्या ओठांवर असलेली गाणी आजच्या तरूणाईलाही तितकीच प्रिय आहेत. दशक कोणतंही असो आशिकीतली  गाणी प्रत्येक दशकातल्या प्रेमींचं प्रेमगीत ठरली आहेत. 23 जुलै 1990 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमानं इतिहास रचला. 'धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना' या गाण्यातला धीरे धीरे शब्द मागे टाकत आशिकी सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. देशातल्या शेकडो सिनेमागृहांमध्ये आशिकीचे शो हाऊसफुल्ल चालले. त्या काळात आशिकी सिनेमाच्या तब्बल एक कोटीपेक्षा जास्त कॅसेट्स विकल्या गेल्या. आशिकी सिनेमाच्या पोस्टरवर LOVE MAKES LIFE LIVE हे शब्द ठळकपणे छापलेले होते. सिनेमात राहुल रॉय, अनू अग्रवाल ही फ्रेश जोडी. कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांचा सुश्राव्य आणि प्रेमात पाडणारा आवाज. तर देहभान विसरायला लावणारं नदीम-श्रवणचं संगीत. गीतकार समीर आणि राणी मलिक यांनी हृदयापासून लिहलेली गाणी. आणि महेश भट यांचं जादूई दिग्दर्शन. हे सर्व अनुभवण्यासाठी अनेक शहरांमध्ये सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत आशिकीचे सात शो लावण्यात आले. 

सिनेमाच्या पोस्टरवर ठळक अक्षरात छापलेले LOVE MAKES LIFE LIVE हे शब्द आजही तितकेच खरे आहेत. प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी आशिकी चित्रपटातली गाणी जणू काही प्रेमग्रंथच आहेत. आशिकीतल्या
गाण्यांमध्ये काय नाही ? प्रेमात पडलेला, प्रेमभंग झालेला, प्रेमात पडू पाहणारा या सर्वांना भावतील अशा गाण्यांची रेलचेल या सिनेमात आहे. या सिनेमातली गाणी सिनेरसिकांनी आणि प्रेमिकांनी हृदयाच्या गुलाबी कप्प्यात कस्तूरी
प्रमाणं जपून ठेवली आहेत. जसं पहिलं प्रेम विसरता येत नाही. तशीच या चित्रपटातली गाणीही मनातून जात नाहीत. त्यामुळेच ही गाणी कायमच जिगर के पास आहेत. त्यामुळेच या सिनेमातलं नजर के सामने जिगर के पास, हे गाणं खास ठरतं.प्रत्येक दशकातल्या प्रेमवीराला आशिकीतली गाणी तितकीच प्रिय वाटतात. यामुळेच 1990 मधली आशिकी आजही तितकीच एव्हरग्रीन आहे.
आशिकी रिलीज झाल्यानंतर राहुल रॉय रातोरात स्टार झाला. राहुल रॉयची हेअर स्टाईल प्रचंड लोकप्रिय झाली. हजारो तरूणांनी त्याच्या सारखी हेअर स्टाईल केली. तर अनू अग्रवालनं सिनेमात वापरलेल्या रिबनची तर
तरूणींमध्ये प्रचंड क्रेझ होती. त्या रिबनचं नावच आशिकी रिबन असं पडलं. राहुल रॉय सारखी हेअर स्टाईल करून तेव्हाचा युवक रिबन लावलेली त्याच्या मनातली अनु अग्रवाल शोधत होता.
आशिकी सिनेमा हा त्यातल्या स्टोरी प्रमाणे पुढे जात नव्हता. तर त्यातल्या गाण्यांप्रमाणे सिनेमा सुश्राव्य गीतांनी पुढे सरकत होता. प्रेमात बुडालेला सिनेमाचा नायक सर्व जगालाही विसरून जाण्यासाठी तयार झाला. त्यामुळेच मैं दुनिया भूला दुंगा तेरी चाहत में, हे गाणं चपखल बसतं. प्रेमात पडल्यावर सगळं जग सुंदर दिसायला लागतं. आपण पाहिलेलं जग नवनवं भासायला लागतं. पण अनेकदा प्रेमात गैरसमज निर्माण होतो. अर्थात आशिकी सिनेमाही त्याला अपवाद ठरला नाही. परिणामी हिरोवर अब तेरे बिन जी लेंगे हम, असं म्हणण्याची वेळ येते. प्रेमिकांचा एकमेकांवर विश्वास असेल तर निर्माण झालेले गैरसमजही दूर होतात. आणि प्रेमी युगुल पुन्हा जवळ येतात. या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये हिरो-हिरोईन कोटनं त्यांचा चेहरा झाकतात आणि सिनेमाचा द एन्ड होतो. अडीच तासांचा सिनेमा इथं संपतो. मात्र या आशिकीनं नव्वदीतल्या गाण्यांच्या ट्रेंडच बदलून टाकला. आशिकीनंतर अनेक म्युझिकल सिनेमे रिलीज झाले. कुमार सानू, अनुराधा पौडवाल यांच्या गाण्यांसाठी रसिक आतूर झाले. राहुल रॉय आणि अनू अग्रवाल ही फ्रेश जोडी सिनेसृष्टीला मिळाली. तीन दशकात शेकडो सिनेमे रिलीज झाले. अनेक गाणी हिट झाली. पण आशिकीतली गाणी आजही सर्वांच्या ओठांवर आहेत. कारण ही आशिकी प्रत्येकाला आपली वाटली. आणि प्रत्येकाची आपली आशिकी ही नेहमीच एव्हरग्रीन असते. या आशिकी सिनेमासारखी.  #संगो


Tuesday, June 16, 2020

ग्लॅमर, सक्सेस आणि सुसाईड !

बॉलिवूडमध्ये ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी सर्व काही आहे. या रूपेरी दुनियेत अनेक जण त्यांची स्वप्नं साकारण्यासाठी येतात. काहींची स्वप्न साकार होतात. मात्र अधिक प्रसिद्धी, मोठं यश मिळवण्याची इर्षा असते. अपयश मिळाल्यानं येणारं नैराश्य पचवण्याची ताकद सगळ्यांकडेच नसते. आणि मग त्याचा शेवट होतो तो आत्महत्येत.
मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. या मायानगरीतलं बॉलिवूड कोणालाही क्षणात स्टार करू शकतं. हीच स्टार होण्याची नशा दररजो हजारो युवकांना मुंबईत आणते. इथल्या बॉलिवूडमध्ये अभिनय करणं, टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये छाप पाडणं, मॉडेलिंगच्या क्षेत्रात यश मिळवणं हे त्यांचं ध्येय असतं. हेच सुशांत सिंह राजपूतचं ध्येय होतं. ते ध्येय साकारण्यात तो यशस्वीही झाला. बॉलिवूडमधला लंबी रेस का घोडा म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. मात्र वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी त्यानं आत्महत्या केली. नैराश्यातून त्यानं केलेल्या आत्महत्येनं अवघा देश हळहळला.
मात्र बॉलिवूडमधली ही काही पहिलीच आत्महत्या नाही. १९६४ मध्ये अभिनेते गुरूदत्त यांच्या आत्महत्येनं देशभरात खळबळ उडाली होती. तर यशाच्या शिखरावर असतानाच अभिनेत्री दिव्या भारतीचा मृत्यू झाला होता. दिव्या भारतीचा मृत्यू हा आत्महत्या होता की हत्या ? हा प्रश्न अनेक वर्ष चर्चेत होता. अभिनेत्री परवीन बॉबीला स्किझोफेनियानं ग्रासलं होतं. प्रचंड यश मिळवणाऱ्या परवीन बाबीचा मृतदेह तिच्या घरात दोन दिवस पडून होता. जगभर फॅन्स असलेली परवीन बाबी घरात मात्र एकटीच होती.
या शिवाय अभिनेत्री जिया खान, साऊथची फेमस अभिनेत्री सिल्क स्मिता, टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री प्रित्युषा बॅनर्जी, प्रेक्षा मेहता, राहुल दीक्षित, कुलजीत रंधावा, 'फेमिना मिस इंडिया यूनिवर्स असलेली नफीसा,  प्रसिद्ध मॉडेल विवेका बाबाजी यांच्या आत्महत्येनंही सर्वसामान्यांना धक्का बसला होता.
बॉलिवूड सर्वांनाच यश देत नाही. ज्यांना यश मिळतं त्यांनाही ते टिकवता येईल की नाही, हे सांगता येत नाही. आणि त्यामुळेच यशाला तडा गेल्यानंतर येणाऱ्या नैराश्याचा अनेक जण सामना करू शकत नाहीत. यश हे क्षणभुंगूर असलं तरी जीवन हे अमर्याद आहे. ते भरभरून जगायला हवं, हेच बॉलिवूड विसरत चाललंय. #संगो
स्टार्स आणि सेलिब्रिटी हे अनेकांचे रोल मॉडल असतात. मात्र हेच स्टार्स अपयश पचवू शकत नाहीत. नैराश्याचा सामना करू शकत नाहीत. जीवनात प्रत्येकालाच आव्हानांचा सामना करावा लागतो. आयुष्य हे कधीच सरळ नसतं. संकटं परीक्षा घेतात हे खरं. मात्र हिच संकटं संधी ही देतात. संकटात पाय रोवून उभं राहणं महत्त्वाचं असतं. वेळ कोणतीही असो ती कायम राहत नाही. काळ चांगला असो की वाईट तो जाणारच असतो. फक्त काळाच्या कसोटीवर टिकणं महत्त्वाचं आहे.

Thursday, May 14, 2020

डिंग डाँग ते धक धक

1988 मध्ये एक चमत्कार घडला. त्या वर्षी शाळेतही जात नसलेली तीन-चार वर्षांची मुलं 1 ते 13 अंक घरबसल्या शिकली. कारण त्या वर्षी माधुरी दीक्षितच्या तेजाब सिनेमातलं, एक दो तीन चार...हे गाणं चांगलंच हिट झालं होतं. गाणं आणि सिनेमाही हिट झाला. बॉलिवूडला नवी हिरोईन मिळाली. माधुरीचं त्या सिनेमातलं नाव मोहिनी होतं. त्या मोहिनीची रसिकांवरील मोहिनी आजही कायम आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. 
तसं पाहिलं तर 1984 मध्ये अबोध सिनेमातून माधुरी दीक्षितचं पदार्पण झालं होतं. पण याचा कोणाला फारसा बोध झाला नव्हता. 11 नोव्हेंबर 1988 ला तेजाब रिलीज झाला आणि धमाकाच झाला. लव्ह स्टोरी, कॉमेडी आणि जबरदस्त फायटिंगचा मसाला असलेल्या तेजाबनं बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम केले. मात्र  एक महिना आधीच 21 ऑक्टोबर 1988 रोजी दयावान रिलीज झाला होता. तो सिनेमा जास्त हिट नव्हता, मात्र त्यातलं, 'आज फिर तुम पे प्यार आया है' हे गाणं चांगलंच गाजलं. पण त्या गाण्यात थोराड दिसणाऱ्या विनोद खन्नासोबत माधुरीला पाहणं एखादी शिक्षाच वाटत होती.
मात्र ही शिक्षाही माधुरीचे चाहते लवकरच विसरले. रामलखन, दिल, किशन कन्हैय्या, त्रिदेव, साजन, बेटा, थानेदार, खलनायक, राजा, हम आपके है कोन, दिल तो पागल है, प्रेमग्रंथ, देवदास अशा एका पेक्षा हिट सिनेमांचा धडाकाच माधुरीनं उडवून दिला. साजन सिनेमातलं 'तू शायर है मैं तेरी शायरी', 'बहोत प्यार करते हैं तुमको सनम' या गाण्यानं तर रसिकांना घायाळ केलं. तर बेटा सिनेमातल्या 'धक धक करने लगा', गाण्यानं रसिकांच्या काळजाची वाढलेली धडधड ते गाणं आठवलं की आजही वाढते. रोमँटिक भूमिका, गंभीर भूमिका, कॉमेडी आणि नृत्य या सर्वांमध्ये पारंगत असल्यानं मागील तीन दशकांपासून मा्धुरी दीक्षितची मोहिनी कायम आहे. सिल्व्हर स्क्रीन गाजवणाऱ्या माधुरीनं छोटा पडदाही गाजवला. झलक दिखला जा सारख्या रिअॅलिटी शोची जज म्हणूनही माधुरीनं छाप उमटवली.
सदाबहार माधुरीचे चाहते देशातच नाहीत तर विदेशातही आहेत. माधुरीची ग्रीसमधील फॅन Katerina Korosidou हिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. माधुरीच्या गाण्यावर  Katerina Korosidou हिचं पदलालित्य पाहण्यासारखंच होतं. Katerina Korosidou सारखाच नव्हे पण थोडा वेगळा, असा माझाही किस्सा आहे. 1988 मध्ये मी सहावीत असताना तेजाब सिनेमा आला होता. चित्रहार, छायागीतमध्ये तेजाबमधली गाणी लागायची. सर्व हॉटेल्समध्येही डिंग डाँग डिंग डिंग डाँग डिंग डाँग सुरू असायचं. पण थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला मिळाला नव्हता. 1989 च्या उन्हाळ्याच्या मामाच्या गावाला म्हणजेच अंबेलोहळला (ता. गंगापूर) गेलो. तिथं दोन रुपयाचं तिकीट काढून व्हिडीओवर तेजाब पाहिला. (आणि आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडीओ पार्लरचं नाव अनिल होतं. सिनेमात हिरोही अनिल कपूरच होता.)  मग काय सारखी तेजाबमधलीच गाणी म्हणायचो. कह दो की तुम हो मेरी वरणा...हे गाणं नेहमीच म्हणत राहायचो. पण एके दिवशी मला रडायला यायला लागलं. माधुरी इतकी मोठी स्टार. ती मुंबईला राहते. तिच्याशी कधी भेटही होणार नाही, मग लग्न तर लांबच राहिलं. सिनेमात हिरोईनचा खडूस बाप ज्या प्रकारे डायलॉग म्हणतो कहाँ तूम और कहाँ हम त्याप्रमाणे कुठे माधुरी दीक्षित आणि कुठे संतोष गोरे अशी परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही डोळ्यांना धारा लागल्या. मीच माझी समजूत घातली. हळूहळू त्या धक्क्यातून सावरलो. आता मागील 12 वर्षांपासून मुंबईत आहे. पण म्हटलं जाऊ द्या, ती तिच्या संसारात सुखी आहे. आपण आपल्या संसारात सुखी आहोत. उगीच कशाला तिच्या आणि आपल्या संसारात 'तेजाब' टाकायचा ? असा विचार करून थांबलो. पण ते काही का असेना आज 15 मे रोजी माधुरीला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. #संगो #MADHURIDIXIT #HBDMADHURI

Sunday, May 10, 2020

पुराना जायेगा तभी तो नया आएगा...


कपिल शर्मा याने ओएलएक्सची जाहिरात केली होती. त्या जाहिरातीची टॅगलाईन होती, पुराना जायेगा तो नया आयेगा. आता राज्यातल्या भाजपनं त्या टॅगलाईननुसार काम करायला सुरूवात केलीय. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली नाही. प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तसं पाहिलं तर भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी मार्गदर्शक मंडळाच्या माध्यमातून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, सुमित्रा महाजन या ज्येष्ठांचा आधीच गुळाचा गणपती केला आहे.
मात्र भाजपनं पक्षासाठी खस्ता खाललेल्या एकनाथ खडसेंचा सन्मान राखायला हवा होता. भाजपला कोणी विचारत नव्हतं त्या काळात खडसेंनी पक्षाच्या वाढीसाठी श्रम घेतले. विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षासाठी किती काम केलं, हे त्यांच्या पक्षाला माहित असेलच. पण त्यांच्यावर अन्याय झाला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
एकनाथ खडसे अनेक वर्ष आमदार, मंत्री राहिले आहेत. त्यांची सून खासदार आहे, मुलीलाही विधानसभेचं तिकीट मिळालं होतं. असं असताना एकनाथ खडसेंवर अन्याय झाला, असं कसं म्हणता येईल ? पंकजा मुंडे मंत्री होत्या. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण त्यांची बहीण खासदार आहे. तरीही त्यांच्यावर अन्याय झाला, असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. अर्थात पंकजा मुंडे निवडून आल्या नसल्या तरी त्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेतच. (बहुतेक त्यामुळेच ही वेळ आली असावी, असंही बोललं जातं.)
पण यामुळे एक मुद्दा समोर येतो. याच नेत्यांना वर्षानुवर्ष आमदार-खासदार, मंत्री केल्यामुळे त्यांच्या पक्षातल्या इतर तरूणांना संधीच मिळत नाही. त्यामुळे भाजपचा निर्णय चुकीचा वाटत नाही. पण हा निर्णय घेताना फक्त हे चारच नेते बाजूला सारणं योग्य नाही. पुराना माल हटवायचा असेल तर, सगळाच पुराना माल मोडित काढायला हवा. फक्त राजकीय आकांक्षा आहेत, म्हणून सहकाऱ्यांचे पत्ते कापले जावू नयेत हे ही तितकंच म्हत्वाचं आहे.  
आता भाजप प्रमाणेच आता इतर पक्षांनीही वर्षानुवर्ष अनेक घराण्यांमध्येच दिली जाणारी पदं, उमेदवारी बदलावी असा विचार करण्याची गरज आहे. भाजपनं जशी (अल्प) धमक दाखवली तशी धमक  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दाखवू शकेल का  ? #संगो

Friday, May 8, 2020

मजूर, कामगारांचे तळतळाट भोवणार !


घराकडे निघालेले मजूर रेल्वे ट्रॅकवर झोपले. 45 किलोमीट चालून थकलेले मजूर काही वेळ विश्रांतीसाठी ट्रॅकवर विसावले. लॉकडाऊनमुळे ट्रेन बंद आहेत, असं वाटल्यानं त्यांनी काही वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरीकडे एक मालगाडी वेगानं येत होती. धडधडत आलेल्या मालगाडीच्या लोको पायलटनं ट्रॅकवरील मजूर बघितले. त्यामुळे त्यानं ब्रेक दाबला, पण तो पर्यंत उशीर झाला होता. मध्य प्रदेशातल्या गावाकडे निघालेल्या मजुरांच्या जीवनाचा प्रवास थांबला. मालगाडी खाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाला. करमाड जवळ झालेल्या या अपघातानं अवघा देश हळहळला.


घराकडे जाणाऱ्या मजुरांचे मृत्यू, मजुरांचं स्थलांतर हे आपल्या सर्वांचं अपयश आहे. हे माझं अपयश, हे यंत्रणांचं अपयश, हे राज्य सरकारचं अपयश, हे केंद्र सरकारचं अपयश आहे. कोरोनामुळे मृत्यू होऊ नये यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केला. एकदा नव्हे तर तीनदा लॉकडाऊन घोषित केला. देशातल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी हा लॉकडाऊन गरजेचाच आहे. मात्र आता कोरोनामुळे नव्हे तर लॉकडाऊनच्या अपयशामुळे नागरिकांचा जीव चालला आहे. केंद्र सरकारनं लॉकडाऊन आधीच घोषित केला असता आणि त्याआधी मजुर, कामगारांना त्यांच्या राज्यात परतण्याची संधी दिली असती तर आजच्या इतकं विदारक चित्र दिसलं नसतं. परदेशात गेलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार तत्परता दाखवत आहे. पण देशातल्या नागरिकांकडे तितकं लक्ष दिलं जात नाही. 
महामार्गांवरून मजूर आणि कामगार प्रखर उन्हातून पायी त्यांच्या घराकडे जात आहेत. लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला, खायला काही मिळत नाही. यामुळे आपल्याच या बांधवांवर पायी जाण्याची वेळ आलीय. अनेक जण हजार किलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त अंतरावरील त्यांचं घर जवळ करण्यासाठी पायी जात आहेत. या कामगारांसोबत त्यांची मुलं, पत्नी आहेत. या सर्वांचा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही. ज्या शहरात पोट भरण्यासाठी आले होते, त्या शहरात त्यांना मदत करणारा एकही हात मिळाला नाही. सरकार त्यांना मदत देऊ शकलं नाही. त्यामुळे छोट्या मुलांनाही पायी चालावं लागतंय. उपाशी मरण्यापेक्षा परप्रांतातल्या घरी जाऊ, असा विचार करून हजारो मजूर, कामगार देशभरातून स्थलांतर करत आहेत. हे स्थलांतर करताना अनेकांचा मृत्यूही झाला. उन्हाचे चटके सोसत, उपाशीपोटी हजारो किलोमीटर पायी चालणाऱ्यांचे तळतळाट सगळ्यांनाच भोवणार आहेत. एक नागरिक म्हणून हे माझं अपयश आहे. समाज म्हणून हे आपलं अपयश आहे. सरकार म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते, राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रमुखांचंही अपयश आहे. #संगो