अजित पवार त्यांच्या दिलदार, मिश्किल आणि माफ करण्याच्या स्वभावामुळे कायम लक्षात राहतील. एक खंबीर नेते म्हणूनही अजित पवार लक्षात राहतील. कारण 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर अजित पवारांची प्रचंड बदनामी झाली होती. मात्र तरीही अजित पवार डगमगले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसिंगचा इशारा दिला होता. भाजपनं बैलगाडी भरून पुरावे चितळे समितीला दिले होते. त्यामुळे अजित पवार जनतेत खलनायक झाले होते. मी सुद्धा पाच वर्ष अजित पवारांना अटक होण्यासाठी फेसबुकवर सलग पोस्ट टाकत होतो. मात्र अजित पवारांवर चक्की पिसिंगची वेळ आलीच नाही.
ज्यांनी आरोप केले त्यांच्यासोबतच अजित पवार सत्तेत आले. घासून नाही तर ठासून आले. इतकंच नव्हे तर ज्या भाजपनं त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्याच भाजपवर अजित पवारांनीही पलटवार केला. युतीचं सरकार असताना 1995 मध्ये पुरंदर योजनेतून पार्टी फंडसाठी 100 कोटी रुपये काढण्यात आले होते, असा आरोप अजित पवारांनी केला होता. अजित पवारांवर मागील चौदा वर्षांपासून सिंचन घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपवरच दादांनी डाव उलटवला होता. अजित पवारांच्या या बेधडक शैलीमुळे 'मौका सभी को मिलता है' हा डायलॉग पुन्हा एकदा आठवला.
'ज्यांनी माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय.' एवढ्यावरच अजित पवार थांबले नाही तर, 'भाजपची राक्षसी भूक शहरातली परिस्थिती बिघडवत आहे' अशी जळजळीत टीकाही अजित पवारांनी केली होती. 'कुत्र्यांच्या नसबंदीत पैसे खाल्ले. मिळेल तिथे पैसे खायचा सपाटा लावला. सत्तेचा माज आल्यामुळे अशी कामं करतात', असा घणाघात अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात केला होता.
मात्र अजित पवारांनी त्यांच्यावर प्रचंड आरोप झाल्यानंतरही कुणाचा द्वेष केला नाही. आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर खालच्या पातळीवरून टीका केली नाही. सिंचन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्यांना अजित पवारांनी माफ केलं होतं. त्यामुळेच की काय, सिंचन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या भाजपला अजित पवारांच्या श्रद्धांजलीची जाहिरात द्यावी लागली. खोट्या आरोपांसाठी भाजप अजित पवारांची माफी मागणार की नाही? हे माहित नाही. मात्र मी, 'सिंचन घोटाळा करणाऱ्यांना अटक कधी?' या पोस्टसाठी अजित पवारांची मनापासून माफी मागतो.
दिलदार अजित पवारांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दृढ मैत्री होती. त्यामुळेच दोन्ही नेत्यांनी आधी झालेले आरोप-प्रत्यारोप मागे सोडत पुढे वाटचाल सुरू केली होती.
राज्याच्या राजकारणात समतोल राखणारा एक नेता आपण गमावला. विकासाच्या योजनांमध्ये अजित पवार राजकारण करत नव्हते, असं खुद्द विरोधी पक्षातील नेत्यांनीच सांगितलं. प्रचंड उज्ज्वल राजकीय भविष्य असलेला आणि विकासाचं व्हिजन असलेला हा नेता राज्यासाठी मोठी संपत्ती होता. अजित पवारांकडून आतापर्यंत अनेक कामं झाली होती. अनेक कामांना अजित पवार गती देणार होते, तशी त्यांच्यात क्षमता होती. शरद पवारांनी ज्या प्रकारे सहकार आणि राजकारणाची सांगड घालत विकास कामांवर भर दिला होता, तशाच पद्धतीनं अजित पवारांची वेगानं वाटचाल सुरू होती. मात्र नियतीला हे मंजूर नव्हतं. वेगानं वाटचाल करणाऱ्या अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला अन् पवार नावाभोवती फिरणाऱ्या राजकारणाची गतीच मंदावली. भविष्यात राज्यातील राजकारण पवार या नावाभोवती आधीसारखं फिरेल का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
#संगो #अजितपवार


No comments:
Post a Comment