Thursday, October 5, 2017

राज back in action

#bulletraj
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा संताप मोर्चा यशस्वी झाला असंच म्हणावा लागेल. एलफिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर सामान्य नागरिकांच्या मनात संताप निर्माण झाला होता. त्या संतापाला राज ठाकरेंनी वाट करून दिली. मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले. मुंबईकरांना बुलेटट्रेन नको, तर आहे त्या लोकलच्या सुविधा चांगल्या प्रकारे देण्याची गरज आहे. हा संदेश देण्यात राज ठाकरे यशस्वी ठरले.
लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर पालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे मनसे बॅकफुटवर गेली होती. अगदी देश पातळीवर जरी पाहिलं तरी कोणताही पक्ष हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवत नाही. अर्थात त्याला अपवाद होता, तो फक्त उद्धव ठाकरेंचा. पण आता राज ठाकरेंनीही थेट नरेंद्र मोदींना विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. अच्छे दिन, मोदींनी दिलेली आश्वासनं,बुलेटट्रेन या मुद्यांवरून राज ठाकरे जेव्हा टीका करत होते, त्यावेळी उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि नेते दाद देत होते. त्यावरून आता भाजपला विरोध सुरू झाल्याचं दिसून येतं. भाजपला विरोध करून पर्याय देता येऊ शकतो, हा विश्वास मनसे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
टोलच्या मुद्यावर राज ठाकरेंनी आंदोलन सुरू केल्यानंतर, आघाडी सरकारने अनेक टोल बंद केले होते. पण राज ठाकरेंना हा मुद्दा तडीस नेता आला नाही. आता बुलेटट्रेनला राज ठाकरेंनी विरोध सुरू केला आहे. या वेळी हा मुद्दा तडीस नेण्यावर मनसेला भर द्यावा लागेल. अर्थात हे झालं मुंबईपुरतं. राज्यातही अनेक प्रश्न आहेत. कर्जमाफी अजून झालेली नाही, शेतक-यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे या प्रश्नांकडेही मनसेनं लक्ष देण्याची गरज आहे. राज ठाकरेंनी जर या विषयातही लक्ष घातलं तर, राज्यातली जनताही त्यांना सााथ देईल. राज ठाकरे पुन्हा जोरकसपणे मैदानात उतरल्यानं काही भाजप नेत्यांनी त्यांचा धसका घेतला आहे. तर काही भाजप नेत्यांना आनंदही झाला आहे. कारण आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मनसेचा जनाधार पुन्हा निर्माण झाला, तर त्याचा फायदा भाजपलाच होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण मनसे शिवसेनेची मतं खेचेल, असा भाजपचा कयास आहे. त्यामुळे या मुद्यावर आता शिवसेना आणि मनसे यांनी विचार करण्याची गरज आहे. कारण या दोन्ही पक्षांचा समान शत्रू हा भाजप आहे.

Sunday, October 1, 2017

अगर तुम न होते...

राजकीय नेते आणि पत्रकार, म्हणजे एक दुजे के लिये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (असून अडचण नसून खोळंबा ही म्हण इथे लागू होत नाही, याची कृपया टीकाकारांनी नोंद घ्यावी.) वृत्तपत्रांना बातम्यांसाठी नेते मंडळी हवी असते. पण त्यांचं कसं आहे की, नेते किेंवा प्रवक्त्यांना कॉल केला, बातमी केली. ती वेब एडिशनला किंवा दुस-या दिवशी वृत्तपत्रात छापून आली विषय संपला.
पण न्यूज चॅनेलचं तसं नाही. न्यूज चॅनेल सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अखंड सुरू असतात. (नशीब रात्री १२ नंतर रेकॉर्डेड कार्यक्रम असतात. नाही तर आम्ही नेते आणि प्रवक्त्यांना झोपूही दिलं नसतं.) दिवसभर (काही ना काही) बातम्या दाखवायच्या असतात. आमचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. सगळ्यात आधी सामनात काय छापून आलं ते बघायचं. अग्रलेखात सरकारवर टीका. लगेच सात वाजता ब्रेकींग करायची. तिकडे असाईनमेंट डेस्कही कामाला लागतो. आठच्या बुलेटिनला संजय राऊत यांचा फोनो. नेहमीचे प्रश्न, वेगवेगळे प्रश्न. आम्ही काहीही विचारलं तर उत्तरं मात्र राऊत यांना जी हवी आहेत तीच मिळतात. मग लगेच भाजपच्या प्रवक्त्याला फोन. आम्ही सांगतो बघा, बघा तुमच्या सरकारविषयी सामनात काय छापून आलं. लगेच माधव भंडार, मधू चव्हाण गरम आवाजात बोलायला लागतात. आमचा प्रयत्न असतो, राऊत आणि भाजपच्या प्रवक्त्याला भिडवून द्यायचं. पण तोपर्यंत संजय राऊत फोन कट करतात. मग पुढची पाच मिनीटं भाजपचे प्रवक्ते त्यांची खदखद बाहेर काढतात, सरकारला धोका नाही असं ते शेवटी निक्षूण सांगतात. मला तर असं वाटतं, आशिष शेलार, माधव भंडारी सकाळीच सामनावाचून काढत असतील. न्यूज चॅनेलमधून कॉल येण्याच्या आधीच कोणते मुद्दे मांडायचे याची तयारी ते आधीच करत असतील. या विषयावर काँग्रेसच्या नेते मंडळींचा फोनो घ्यायचा असतो. पण काँग्रेसमध्ये या विषयावर बोलणार कोण ? या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. लगेच राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचं नाव समोर येते. चांगले सदगृहस्थ. कधीही फोन करा, फक्त विषय सांगा. धन्यवाद, म्हणेपर्यंत बोलत राहतात. त्यांचं बोलणं होतं, आणि इकडं बुलेटिनही संपतं.
फोनो घेताना काही विषयांमध्ये तज्ज्ञ असे नेते आहेत. दहशतवाद, पाकिस्तान आणि काश्मीर म्हटलं तर संजय राऊत यांच्या शिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित घोटाळे असल्यावर डॉ. नीलम गो-हे (माझं आडनाव गोरे आहे. आमचं आडनाव थोडं सारखं असल्यानं, मी अनेकदा नीलम ताईंच्या फोनोला प्राधान्य देतो. आता म्हणा आडनावात काय आहे ?) दुर्दैवानं महिला अत्याचाराची बातमी आल्यावर डॉ. नीलम गो-हे, चित्रा वाघ, विजया रहाटकर यांची नावं प्राधान्यानं समोर येतात. सनातन, इशरत जहाँ, डेव्हिड हेडलीचा विषय आल्यावर जितेंद्र आव्हाड यांच्याशिवाय बोलणारा हुकुमी एक्का दुसरा कोणीच नसतो. छगन भुजबळांच्या विषयी फोनो घ्यायचा म्हटलं तर किरीट सोमय्यांशिवाय पानही हलत नाही. आता तर अशी परिस्थिती आहे की, आधी सोमय्यांचा फोनो होतो आणि नंतर ईडीची कारवाई होते.
एकनाथ खडसे यांच्याविषयी थोडंही खट्ट झालं की, अंजली दमानिया, प्रिती मेनन-शर्मा, नवाब मलिक दणक्यात फोनो देतात. चिक्की घोटाळ्याच्या वेळी तर किती फोनो घेतले असतील याची गणती नाही. भाजपचेच नेते असाईनमेंटला फोन करून सांगायचे, आमचे फोनो घ्या. त्यांना पंकजा मुंडेंना वाचवायचं होतं की गोत्यात आणायचं होतं, हे त्यांनाच ठाऊक.
पण फोनो देण्यात सर्वात अव्वल दर्जाचे नेते आणि प्रवक्ते भाजपचेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं ही मंडळी आता सत्तेत आहे म्हणून. त्यांनी दिलेले फोनो आजही सर्वच चॅनेलमध्ये काम करणा-यांच्या लक्षात आहेत. मला तर असं वाटतं फोनो, लाईव्ह, मुलाखती, 121, बाईट्स देऊन ही मंडळी सत्तेत बसली. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमय्या, माधव भंडारी, मधू चव्हाण, अवधूत वाघ या मंडळींना कधीही फोन केला आणि ते फोनोला नाही म्हटले हे आठवत नाही. आघाडी सरकारच्या विरोधात रान पेटवण्यात या मंडळींनी दिलेले फोनो आणि लाईव्ह महत्त्वाचे होते. लाईव्हसाठी तर ही मंडळी कुठूनही धावतपळत ऑफिसला पळत यायची. आता मात्र ओबीशिवाय ही मंडळी लाईव्हला बसत नाहीत.
हे असं आमचं नातं आहे. अगर तुम न होते, खरंच नेते मंडळी आणि प्रवक्ते मंडळी अगर तुम न होते तो हमारे बुलेटिन न निकलते. आणि हो एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, स्टुडिओत ऑनएअर एकमेकांवर जोरजोरात आरोप-प्रत्यारोप करणारे, ओरडणारे हे नेते आणि प्रवक्ते टॉक शो संपल्यावर हसत-हसत एकमेकांच्या गळ्यात हात घालून बाहेर पडतात. कधीकधी तर एकाच गाडीतूनही जातात. त्या दिवसाचा टॉक शो संपतो. रात्रीनंतर पुन्हा सकाळ होते. काही तरी घडतं, आणि पुन्हा सुरू होतात...फोनो...फोनो...फोनो...लाईव्ह...लाईव्ह...लाईव्ह.

Saturday, August 12, 2017

मराठा मोर्चाला पाकिस्तानातून कसा मिळाला पाठिंबा ?

8 ऑगस्टला रात्री 12 बारा वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानातल्या मराठा ट्राईबने त्यांच्या फेसबुक पेजवर मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देत असल्याची पोस्ट टाकली. मागील सहा महिन्यांपासून तिथल्या अनेक मराठ्यांच्या मी संपर्कात होतो. फेसबुक, मेसेन्जर आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून मी त्यांच्या संपर्कात होतो. zubair bugti आणि a badshah maratha हे दोघे मराठा ट्राईबचे क्रियाशील कार्यकर्ते संपर्कात होते. त्यातल्या zubair bugtiला मी पाठिंबा देण्यासाठी विनंती केली होती. त्याने विनंतीला मान देत त्यांच्या maratha tribeच्या पेजवर 8 ऑगस्टला पाठिंबा दिल्याची पोस्ट टाकली. पोस्ट टाकल्यावर त्याने मला मेसेज टाकला. लगेच रात्री साडेबाराच्या सुमारास मी आमच्या टीव्ही9च्या ग्रुपवर ही बातमी ब्रेक केली. सकाळी आठच्या बुलेटिनमध्ये ही बातमी घेण्यात आली. त्यानंतर निखिल देशपांडेनं ही हेडलाईन केली. प्रत्येक बुलेटिनमध्ये ही हेडलाईन सुरू होती. दुपारी 4 वाजता आणि रात्री 10 वाजताच्या 24 बातम्या 24 रिपोर्टर या बुलेटिनमध्ये ही बातमी घेण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता प्रत्येक मराठी चॅनेलमधील मित्र आणि पेपरमधील मित्र यांना व्हॉट्सऍपवर ही बातमी कळवली. प्रत्येकाला कॉल करताना आधी सांगायचो, संतोष गोरे बोलतोय टीव्ही 9 मधून. आम्ही पाकिस्तानातली पाठिंब्याची बातमी घेतली आहे. तुम्हीही घ्या. या बातमीचा कर्ताधर्ता मीच आहे, हे ही आवर्जन सांगायचो. (अर्थात माझं नाव कोणीच छापलं नाही. हा भाग वेगळा. इतरांचं काय बोलायचं, जिथं काम करतो तिथंही वेगळी परिस्थिती नव्हती.) एक-दोन अपवाद वगळता सर्वांनीच ही बातमी त्यांच्या ऑनलाईनला घेतली. तसंच वृत्तपत्रामध्येही छापून आली. हिंदी वृत्तपत्र आणि इंग्रजी वृत्तपत्रांनीही ही बातमी त्यांच्याकडे घेतली. माझ्या सहा महिन्यांच्या मेहनतीचं सार्थक झालं.
पत्रकार मित्रांना मोबाईलवर कॉल करून बातमी सांगताना एक गंमत झाली. बातमी सांगत असताना माझ्या बोलण्यात पाकिस्तानातल्या नागरिकांशी मैत्री, पाकिस्तानचा बराच उल्लेख होत होता. हे ऐकून माझी पत्नी घाबरली. ती म्हणाली, हे काय करताय ? पोलीस येऊन पकडून नेतील. मग  सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यावर तीची भीती दूर झाली.
छापून आलेल्या बातम्यांच्या इमेज, टीव्ही 9वरून टेलिकास्ट झालेल्या बातमीचा व्हिडीओ व्हॉट्सऍपवरून पाकिस्तानातल्या मित्रांना पाठवला. त्यांनी दिलेला पाठिंबा, इतकी मोठी बातमी झाली याचं त्यांनाही आश्चर्य वाटलं.
पानिपतच्या युद्धानंतर सुमारे वीस हजार मराठ्यांना अफगानीस्तानात नेलं जात होतं. हे वाचनात आलं होतं. त्यानंतर सहज फेसबुकवर शोध घेतल्यावर बलुचिस्तानातल्या डेरा बुग्टी, क्वेट्टा या शहरांमध्ये मराठे असल्याचं लक्षात आलं. त्यांच्याशी मैत्री केली.  एक मुद्दा अर्धवट राहिला. मराठ्यांना अफगानीस्तानात नेणं शक्य होत नसल्यानं त्यांना बलुचिस्तानात गुलाम म्हणून विकण्यात आलं. अर्थात तिथल्या मुस्लीम राजवटीत धर्मनिरपेक्ष चोचले नसल्यानं या मराठ्यांचं धर्मांतर करून त्यांना मुस्लीम करण्यात आलं. मारूनकुटून मुसलमान ही म्हण तर आपल्या माहित आहेच. त्याप्रमाणे जीव वाचवण्यासाठी त्या मराठ्यांसमोर पर्याय नव्हता. मुस्लीम झाले तरी त्यांनी त्यांच्या नावात मराठा नाव लावलं. मराठ्यांशी नाळ तुटली नाही, हे दाखवण्याचा हा केविलवाणाच प्रयत्न म्हणावा लागेल. कारण त्यांच्या मराठा ट्राईबच्या सगळ्या पोस्ट पाहिल्यावर त्यात भारतविरोधी, रॉविरोधी पोस्ट आहेत. अर्थात पाकिस्तानात राहून ते भारताचा जयजयकार करणंही शक्य नाही. तसं झालं तर सरकारी खर्चाने त्यांची कबर खोदली जाईल.
पाकिस्तानी मराठा मुस्लीमाने एकदा माझी चांगलीच गोची केली होती. मला मेसेन्जरवर ऊर्दूतून मजकूर पाठवला होता. मी त्याला विचारलं हे काय आहे ? त्यावर तो म्हणाला, आज पाक दिन है, इस्लाम कबूल करो. मग मी त्याला मैत्री धर्माचा दाखला दिला. बरं झालं एवढ्यावर त्याचं समाधान झालं. त्याने जर जास्त वटवट केली असती तर, भारी उत्तर तयार ठेवलं होतं. मुझे जिहादी आतंकी बनने का शौक नहीं, असं उत्तर देणार होतो. पण ती वेळ आली नाही, आणि मैत्रीही कायम राहिली.
पाकिस्तानातले हे मुस्लीम फक्त मराठा आहेत, म्हणून त्यांच्याशी आत्मीयता आहे. त्यांच्याशी फेसबुकवरून मैत्री केली. पण तोच न्याय इथंही लागू होतो. भारतात जे मुस्लीम आहेत, ते काही पाकिस्तान, सौदी अरेबिया, इराक, इराणमधले नाहीत. ते ही इथलेचं आहेत. मारूनकुटून किंवा जातीयवादाला कंटाळून ते मुस्लीम झाले असतील. पाकिस्तानातल्या मराठा मुस्लीमांशी मैत्री करतानाच आता आपल्या देशातल्या मुस्लीमांशीही मैत्री घट्ट करायची आहे. ती मैत्री करताना ते पूर्वाश्रमीचे हिंदू आहेत म्हणून नाही तर भारतीय आहेत, या नात्यानं ही मैत्री करायची आहे.
मनात बातमीचा हेतू ठेवून पाकिस्तानातल्या मराठा मुस्लीमांशी केलेली मैत्री या निमित्तानं बरंच काही शिकवून गेली.

Saturday, July 1, 2017

एक वाटी...शेजारधर्माची !

माझ्या सारखे अनेक जण त्यांचं मूळगाव सोडून नोकरी-धंद्यानिमीत्त बाहेर गावी राहत असतात. अनेकांना ते ज्या शहरात नोकरी-धंद्यानिमीत्त वास्तव्यास आहेत, त्या शहराला नाव ठेवण्याची खोड असते. अर्थात ही खोड माझ्यातही आहे, पण कमी प्रमाणात. हैदराबादला तर मुळीच नाव ठेवावं वाटत नाही. रेड्डी हे आमच्या घरमालकाचं आडनाव. दररविवारी त्यांच्याघरून बिर्याणीचं ताट आमच्या घरी यायचं. मग माझी पत्नी अंजली ही, तिनं केलेला जो काही स्पेशल मेनू असेल तो रेड्डी आन्टीकडे द्यायची. खीर, दाळबाटी, चिकन किंवा पालकपनीर यापैकी जे काही केलं असेल त्याची देवाणघेवाण व्हायची. या शेजारधर्मामुळे माझ्या पत्नीलाही हैदराबादी बिर्याणी चांगल्या प्रकारे करता यायला लागली. आपण हॉटेलमध्ये जी चिकन किंवा मटन बिर्याणी खातो, ती निव्वळ खिचडीच म्हणावी लागेल. कारण हैदराबादी बिर्याणी करण्यासाठी लागणारी मेहनत आणि वेळ हॉटेलवाले देणं शक्यच नाही.
हैदराबादनंतर अमरावतीमध्ये वर्षभर वास्तव्य होतं. त्या काळात शेजारच्या राऊत कुटुंबाबरोबरही अशीच देवाणघेवाण सुरू असायची. अमरावतीनंतरचा पुढील पाडाव होता, मुंबई. मागील दहा वर्षापासून याच शहरात वास्तव्य आहे. सुरूवातीला खारघर, त्यानंतर नेरूळ आणि आता साडेसहा वर्षांपासून सायन प्रतीक्षानगरमध्ये वास्तव्य आहे. दाटीवाटीच्या या शहरात कोणालाही शेजारधर्माची वाटी द्यावी वाटत नाही. अर्थात आपण वाटी दिली तर कोणी नाही म्हणणार नाही. खारघर आणि नेरूळच्या सीवूड्स या भागात जवळपास साडेतीन वर्ष वास्तव्य केलं. पण चुकूनही शेजा-यांनी शेजारधर्म म्हणून वाटी पाठवली नाही. बंद दरवाजे पाहण्याची सवय लागली होती. चुकून कोणाचं दार उघडलं तर लगेच आतून आवाज यायचा, दरवाजा बंद कर. घरात कोणी माणूसच काय तर हवाही यायला नको, असं त्यांना वाटत असावं. दरवाजा बंद कर, हे बहुतेक अस्सल मुंबईकरांचं ब्रीदवाक्य असावं.
आता साडेसहा वर्षापासून सायन प्रतीक्षानगरमध्ये वास्तव्य आहे. नाही म्हणायला मी ज्या फ्लोअरवर राहतो त्या फ्लोअरवर वाटी देवाणघेवाण करण्याची लुप्त होत चालली परंपरा सध्या तरी जीवंत आहे. शेजारच्या घावरे काकू, पवार आणि परब वहिनी यांच्याकडून शेजारधर्माची वाटी येते. श्रावण लागण्याच्या आधी खास कोंबडीवडे आणि मालवणी पद्धतीचे मासे  शेजारधर्माची पताका फडकवत आमच्या घरी येतात. मग आम्हीही मराठवाडा किंवा नगर स्टाईलने केलेल्या मटनाची वाटी माझा मुलगा वेदच्या हाती रवाना करतो.
बदलत्या पिढ्यांबरोबर आणि शहरीकरणाबरोबर काही गोष्टी या बदलतच जाणार आहेत. पण संभाजीनगरमध्ये लहानपणी आमच्या शेजारी वास्तव्यास असलेल्या गरड काकू, भालेराव काकू, जाधव काकू, बनकर काकू, फ्रान्सीस आंटी, तांगडे काकू, सूर्यवंशी काकू यांचा शेजारधर्म पाहायला मिळाला. तिथं शेजारधर्मासाठी रविवारची अट नव्हती. कोणत्याही दिवशी वाटीची देवाणघेवाण सुरू असायची. शेजारच्या काकूंच्या घरातून भाजीचा खमंग वास दरवळायचा. आणि काही वेळाने तीच भाजी वाटीतून आमच्या घरी यायची. आईने केलेली काळ्या मसाल्याची भाजी सर्वांच्या आवडीची असायची. त्या भाजीची वाटी घरोघरी पोहोचती करण्याचं काम कधी तरी माझ्याकडे असायचं. पण माझी बहीण कविता हिच्याकडेच भाजी पोहोचती करण्याची जबाबदारी असायची.
अजून एक आठवलं. लहानपणी नवे कपड परिधान केल्यावर शेजा-यांकडे जावून ते दाखवयाचे, ही एक प्रथा होती. आमचे शेजारचे मित्रही त्यांनी परिधान केलेले कपडे घरी येऊन दाखवायचे. मग छान छान, असं म्हणत कौतुक सोहळा व्हायचा. आता बंद दवाजांच्या या संस्कृतीत शेजारधर्मही दरवाजांच्या आत बंद झाला आहे. कोंडलेला शेजारधर्म पुन्हा बाहेर काढायला हवा.

Sunday, June 18, 2017

मातोश्रीगडाची लढाई

हिंदूस्थानच्या (अखंड नव्हे) दौ-यावर निघालेला अफझल खान तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर येणार अशी वार्ता माध्यमातून प्रकट जाहली होती. स्वराज्यावरील हे सर्वात मोठं संकट. २०१४ पासून हा अफझल्या आणि त्याच्या फौजांनी समस्त सैनिकांच्या जीवाला घोर लावला आहे. महाराष्ट्र मुलखात २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदा, नगर पालिका निवडणुकांमध्ये या फौजांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. इतकंच काय तर या वर्षी आधूनिक स्वराज्याची राजधानी बालेकिल्ला मुंबई नगरीतही या फौजांनी ८२ मोहरा (नगरसेवक) जिंकल्या होत्या.
१९६६ पासून मुंबई इलाक्यात श्रीमान शिवसेनाप्रमुखांची डरकाळी सर्वांच्या परिचयाची होती. १९९० नंतर ही डरकाळी महाराष्ट्रात पसरली. १९९५ मध्ये राज्यात पुन्हा शिवशाही आली होती. अखंड हिंदस्थानात कट्टर हिंदूत्ववादी नेते अशी त्यांची ओळख होती. त्या काळात अफझल खानाचे पूर्वज मातोश्री गडावर मांजरीसारखे दबकत जाऊन मुजरा ठोकायचे. मात्र म्हणतात ना प्रत्येक कुत्र्याचा दिवस येतो. अगदी तसं झालं. दिवस नाही त्यांची वर्ष आली. मातोश्रीगडासमोर माना झुकवणारे आता ललका-या द्यायला लागले.
तीन दिवसांच्या दौ-यात अफझल त्याच्या दौ-याच्या तिस-या दिवशी मातोश्री गडावर येणार असल्याची वार्ता ब्रेकींग न्यूजच्या दवंडीतून पिटली गेली. मातोश्रीगडावर लागलीच सरदारांची बैठक झाली. कलानगरच्या पायथ्याशी मोठा शामियाना उभारावा, अशी कल्पना सूचवण्यात आली. पण ती मान्य झाली नाही. नाही तर सगळ्यांना प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारलेल्या शामियान्याची आठवण झाली असती. असो. मातोश्रीगडावरच भेटण्याचा कार्यक्रम ठरला. दोन्ही बाजूंकडून प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील असं ठरलं. त्यातील एक जण शामियान्याबाहेर थांबेल आणि इतर दूर राहतील असं ठरलं. त्यानुसार अफझल फौजेतल्या प्रदेशाध्यक्षाला मुख्य बैठकीत नेलं गेलं नाही. या महाराष्ट्र इलाक्याचा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफझलसोबत बैठकीला गेला. मातोश्रीगडाचे उद्धवराजे आणि बालराजे यांच्या सोबत अफझलची एक तास खलबतं झाली. दिल्लीच्या तख्तावर कोणाची निवड करावी,यावर खलबतं झाली. या काळात स्वबळ, खिशातील राजीनामे हे विषय चर्चेला येणार नाहीत याची आधीच बोलणी झाली होती. त्यामुळं वाघनखं आणि बिचवा बाहेर निघाले नाही. मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी वाघनखं, बिचवा बाहेर निघतील. तो पर्यंत स्वराज्यावरील संकट दूर झालं आहे.

Sunday, April 9, 2017

या मेसेजचं करायचं काय ?

एखादा सण जवळ आल्यावर आधी खूप आनंद वाटायचा. मात्र आता एखादा सण जवळ आल्यावर पोटात गोळा उठतो. कारण फक्त सण जवळ आला रे आला की, व्हॉट्सऍपवर शुभेच्छांचा जोरदार मारा सुरू होतो. ग्रुपमधले सगळेच सदस्य दणादण मेसेज, इमेज आणि व्हिडीओमधून शुभेच्छांचा मारा सुरू करतात. दिवस म्हणू नका की रात्र म्हणू नका, बिचारा मोबाईल टुंगटुंग वाजत मेसेजेस आल्याची वर्दी देत राहतो.
दिवाळी, दसरा, होळी, गणेशोत्सव, नवरात्री, हॅप्पी न्यू ईअर या काळात शुभेच्छांचा मारा परमोच्च शिखरावर असतो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला प्रखर राष्ट्रभक्तीसह मेसेज येत असतात. मग हे मेसेज डिलीट करायचे कधी, वाचायचे कधी अशा समस्या निर्माण होतात.
कोणत्याही धर्माचे सण त्याला अपवाद नाहीत. उगीच एकांगी वाटू नये म्हणून स्पष्ट करतो. महाशिवरात्रीच्याही शुभेच्छा नुकत्याच भक्तीभावाने दिल्या गेल्या. त्यामुळे आगामी काळात शनी अमावस्या, ग्रहण यांच्याही शुभेच्छा दिल्या जाऊ शकतात.
सणांनंतर थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी या काळातही व्हॉट्सऍपवर मेसेजचा पूर येतो. अनेक जण तर शुभेच्छांवर न थांबता महापुरूषांचे कोट्स, त्यांचे लेख फॉरवर्ड करत असतात. पण एवढं सारं साहित्य वाचायचं कधी, हा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे.
सण आणि जयंती एकवेळ समजून घेवू. पण काही मित्र आणि सहका-यांना तर असं वाटतं, जणू यांनी शुभ सकाळचे मेसेज पाठवले नाही तर सूर्यच उगवणार नाही. आता या सकाळमध्येही भगवी, निधी, हिरवी सकाळ असे विविध रंगही असतात.
सध्याच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात अनेक संस्कार हरवत चालले आहेत. याची काही व्हॉट्सऍप बहाद्दरांना जाणिव आहे. त्यामुळे आई-वडिलांचा आदर, गुरूजनांचे उपकार, मुलांना चांगलं शिक्षण या आशयाचे मेसेज पाठवले जातात. हे मेसेज जर पाठवले नाही तर समाजात उरलेली नितीमत्ता कायमचीच हरवेल अशी भीती हे मेसेज पाठवणा-यांना वाटत असावी.
आता एका दिवसावर हनुमान जयंती आली आहे. त्यामुळे सर्व व्हॉट्सऍप बहाद्दर जणू काही तेच सूर्य गिळायला निघाले या आवेशाने शुभेच्छांचे मेसेज टाकतील. हे आणि असे हजारो मेसेज वाचण्याची, सहन करण्याची आणि डिलीट करण्याची शक्ती हनुमान सगळ्यांना देवो, ही प्रार्थना.

Wednesday, March 22, 2017

ही माझी शिवसेना आहे का ?


जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी सोयीचं राजकारण केलं. जे एकमेकांना पाण्यात पाहात होते, ती नेते मंडळी सत्तेसाठी एकत्र आली. सर्व महाराष्ट्रात हेच चित्र होतं. यामुळे सर्वच पक्षांचे सच्चे कार्यकर्ते (जर उरले असतील तर) नाराज झाले असतील.
मी आता कार्यकर्ता नसलो तरी शिवसेनेचा चाहता नक्कीच आहे. जॉब आणि करिअरसाठी (म्हणजे पोटापाण्यासाठी) संभाजीनगर सोडून आता 14 वर्ष होत आली. पण संभाजीनगरमधल्या शिवसेनेसाठी माझा अजूनही सॉफ्ट कॉर्नर आहे. संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर निवडून आल्या. मात्र यामुळे माझ्यातल्या शिवसैनिकाला वेदना झाला. कारण देवयानी डोणगावकर या गंगापूर तालुक्यातले मूळचे काँग्रेस नेते कृष्णा डोणगावकर यांच्या पत्नी. माझं मूळ गावही गंगापूर तालुक्यात असल्यामुळे हा ब्लॉग प्रपंच.
कृष्णा डोणगावकर यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. 1990 पूर्वी डोणगावकर घराण्याची गंगापूर तालुक्यावर हुकूमत होती. पण शिवसेनेनं या घराण्याची राजकीय धुळधाण केली. 1990च्या विधानसभा निवडणुकीत गंगापूर तालुक्यात शिवसैनिक सायकलवरून प्रचार करत होते. गंगापूरहून शिवसैनिक सायकलवर खुलताबादपर्यंत जावून प्रचार करायचे. शिवसेनेचे नवखे उमेदवार कैलास पाटलांनी अशोक पाटील डोणगावकरांचा पराभव केला. तो पराभव काँग्रेसचा नव्हे तर डोणगावकर घराण्य़ाचा होता. शिवसैनिक असल्यामुळे ज्यांचे ऊस कारखान्यात नेले नाही त्यांचा तो विजय होता. सिंचनाच्या सोयी नसल्यामुळे कायम दुष्काळ पाहणा-या जनतेचा तो विजय होता. मात्र कैलास पाटील यांनी छगन भुजबळांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश करून माती खाल्ली होती. त्यानंतर कैलास पाटील यांच्या अंगावर काही विजयाचा गुलाल पडला नाही. 1990 नंतर गंगापूर तालुक्यानं झेडपी, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली. सामान्य घरातल्या शिवसैनिकांनी बलाढ्य काँग्रेसी नेत्यांशी लढा देऊन त्यांना घरी बसवलं होतं. तीच काँग्रेसी मंडळी आता शिवसेनेत आली आहेत. म्हणजे ज्यांना शिवसैनिकांनी संपवलं त्यांचं पुनर्वसन शिवसेनेच्या नेत्यांनी केलं, असं म्हणण्याची आता वेळ आली आहे.
राहायला संभाजीनगरला असलो तरी गंगापूर तालुक्यातल्या आमच्या सोलेगाव या मूळगावी लहाणपणी जायचोच. आता प्रमाण थोडं कमी झालं आहे. मात्र लहाणपणी गावाला गेल्यावर माझे काका अंकुश तात्या यांच्याशी राजकीय भांडण व्हायचच. हे मी तुम्हाला 1990च्या काळातलं म्हणजेच 27 वर्षांपूर्वीचं सांगत आहे. काकांना सगळेच तात्या म्हणतात. तात्या आता ह.भ.प.ही झाले आहेत. तर असे हे आमचे तात्या हार्डकोअर काँग्रेसी. मी काकांना जेव्हापासून पाहतोय, तेव्हापासून ते एकतर सरपंच किंवा ग्राम पंचायत सदस्य. पण तात्या, मला असं वाटतं मी लहाणपणी उगीचच तुमच्याशी भांडत होतो. तुम्ही ज्या काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला ती मंडळी आता शिवसेनेत आली आहेत. आणि ज्या काँग्रेसींची मला घृणा वाटायची ते शिवसेनेच्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालत आहेत. तात्या आता, राजकारण जाऊ द्या चुलीत. आपण आपली नाती जपूया. तशी ती जपलेली पण आहेतच. पण राजकारणाशी आपल्या सारख्या सामान्यांचं नातं नाही, हे आता कळून चुकलं.

Sunday, January 29, 2017

शिवसेना काबिल, भाजप रईस

(सदरहू लेखकाने हा ब्लॉग प्रकाशित करण्याआधी काबिल आणि रईस हे दोन्ही चित्रपट पाहिले. त्यानंतर दोन्ही पक्षांना यात फिट बसवले. चित्रपटातले डायलॉग पक्ष आणि नेत्यांच्या तोंडी बसवले. या ब्लॉगमधलं सर्वच खरं असेल असं नाही. किंवा सर्वच खोटं असेल असंही नाही.)

राज्यात आता पालिका, झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडायाला सुरूवात झाली आहे. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय, ते मुंबई महापालिकेकडे. युती तोडण्याचा सर्जिकल स्ट्राईक करून उद्धव ठाकरेंनी भाजपला शिवसेनाप्रमुखांच्या स्टाईलमध्ये धोबीपछाड दिला. मुख्यमंत्र्यांनीही त्याच मैदानावर पाणी पित का होईना, पण पाणी पाजू असं स्पष्ट केलं.
आता वळू मुख्य विषयाकडे. काबिल चित्रपटाचं सर्व कथानक मुंबई शहरातलं आहे. तर रईस गुजरातमधला. शिवसेनेचं जन्मस्थान मुंबई. तर भाजपचे महत्त्वाचे नेते लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह ही मंडळी गुजरातची. हवं तर रईसच्या गाववाले म्हणा. त्यामुळे बरेच गुण जुळूही शकतात.
काबिल चित्रपटात राजकीय गुंड कम नेता दाखवला आहे. त्याचं नाव आहे माधवराव शेलार. लगेच भांडारींची आठवण आली. माधवरावचा लहाना भाऊ, अमित. लगेच आठवण आली, ती शाह यांची. एका क्षणी तर असं वाटलं की, माधवरावचं नाव आशिष का ठेवलं नसेल ? तर चित्रपटातली ही गुंड मंडळी. ही मंडळी काबिल असलेल्या हृतिक रोशनच्या वैवाहिक आयुष्याला नजर लावतात. अंध दाम्पत्य असलं तरी त्यांच्या पारदर्शक संसारात विष कालवतात. मग काय अंध आणि एकटा असला तरी हृतिक रोशन हा वसीम, अमित आणि माधवरावला ढगात पाठवतो.
पण हा चित्रपट पाहताना शिवसेना भाजपला बोलत आहे असं मला भासत होतं.  "यह खेल उन्होंने शुरू किया था, तमाशा आप लोगों ने देखा...खतम मैं करूंगा". विधानसभा निवडणुकीच्या आधी युती तोडून भाजपनं खेळ सुरू केला होता. आता पालिका निवडणुकीत हा खेळ शिवसेना संपवणार आहे, या प्रकारे हृतिकचा डायलॉग मला भासला. "आदमी का खुद पे भरोसा, उसकी ताकद होती है". म्हणजेच स्वबळ हीच ताकद आहे, हा आवाज सेना भवनमधून घुमत असल्याचा भास झाला. पण हृतिकच्या एका डायलॉगवर मात्र मला काहीच सूचलं नाही. "अँधेरे में अगर किसी का साथ हो ना, तो अँधेरा कम लगता है". या निवडणुकीच्या रणांगणात शिवसेनेकडे कोणताही मित्र पक्ष नाही. त्यामुळे अँधेरा कम होण्याची शक्यता काही दिसत नाही. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर अशी परिस्थिती उदभवू शकते. ज्यात हृतिक म्हणतो, "आप की आँखे तो खुली रहेंगी, लेकिन आप कुछ देख नहीं पायेंगे. आप के कान खुले रहेंगे, पर आप कुछ सून नहीं पायेंगे. आप का मुंह खुला रहेगा लेकिन आप कुछ बोल नहीं पायेंगे. " भाजपच्या मस्तवाल नेत्यांना मुंबईकरांनी दणका दिल्यावर, त्यांची वरील डायलॉगप्रमाणे मराठीत सांगायचं म्हणजे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी स्थिती होईल.
आता वळू या रईसकडे. शाहरूखचा चित्रपट म्हटल्यावर त्यात इतरांना महत्त्वच नसतं. अगदी भाजपसारखंच. सत्तेत आल्यावर सगळा फोकस आपल्यावर, मलईदार खाते आपल्याच पक्षाकडे, मित्रपक्षांना किंमत न देणे. गुजरात ही रईसच्या अवैध व्यवसायाची कर्मभूमी होती. अगदी संघाची प्रयोगशाळा म्हणून गुजरात ओळखला जातो तशीच. गुजरातमधला माफिया असलेल्या रईसनं सर्व गुजरातवर त्याचं वर्चस्व निर्माण झाल्यावर मुंबई बॉम्बस्फोटाला मदत केली होती. अर्थात चित्रपटात जरा वेगळंच दाखवलं. ते जाऊ द्या. पण रईसप्रमाणेच नरेंद्र मोदींनी सर्व गुजरातवर वर्चस्व निर्माण केल्यावर राष्ट्रीय पातळीवर प्रवेश करून थेट पंतप्रधानपद मिळवलं.
रईस चित्रपटात शाहरूख जेव्हा, "बनिये का दिमाग", हा डायलॉग फेकतो तेव्हा बनिया अमित शाह डोळ्यासमोर येतात. लोकसभा निवडणुकीत त्यांनी लावलेला दिमाग, सर्व देशाने पाहिलेला आहे. "अम्मी जान कहती थी. कोई धंदा छोटा नहीं होता. और धंदे से बडा कोई धर्म नहीं होता". बस्स, लगेच डोळ्यासमोर आली राष्ट्रवादी काँग्रेस. स्थिर सरकारसाठी भाजपला पाठींबा देणारी राष्ट्रवादी. फडणवीसांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेली राष्ट्रवादी. आणि मग शाहरूखचा डायलॉग पुढील प्रमाणे भासला. "साहेब कहते है, कोई राजकारण छोटा नहीं होता. और राजकारण से बडा कोई धंदा नहीं होता."
"जो धंधे के लिये सही वो सही...जो धंधे के लिये गलत वो गलत...इससे ज्यादा कभी सोचा नहीं". या डायलॉगनंतर डोळ्यासमोर आले नरेंद्र मोदी. शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो, असं मोदी बोलले होते. ते आठवून गहिवरून गेलो. मग वरील डायलॉग मोदी म्हणताहेत असा भास झाला. "जो राजनिती के लिये सही वो सही...जो राजनिती के लिये गलत वो गलत...इससे ज्यादा कभी सोचा नहीं."
आणि मास्टरस्ट्रोक होता तो पुढेच. रईस म्हणतो, "दिन और लोगो के होते है..मजूमदार साहिब...शेरों का जमाना होता है". या डायलॉगनंतर डोळ्यासमोर आले ते थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि मग ते त्यांच्या ठाकरी शैलीत म्हणाले, "लाट ही काही पक्षांची असते, नरेंद्र भाई. महाराष्ट्रात डरकाळी असते ती फक्त वाघाची"
हा माझा जरा फिल्मी अंदाज होता. आता मतदारांना शिवसेना काबिल वाटते की भाजपवाले रईसजादे वाटतात ? हे निकालानंतर कळेलच. तो पर्यंत हे छोटंसं मनोरंजन. दोन्ही चित्रपटात कोण बदला घेतो, आणि कोण मरतो हे प्रेक्षकांनी पाहिलंच आहे. पण काबिल आणि रईस मी पुन्हा पाहणार आहे. कारण पहिल्यांदा पाहताना त्यात, नेते मंडळी आली होती. पुन्हा दोन्ही चित्रपट पाहीन.
       आपलाच प्रेक्षक आणि समीक्षक - संतोष गोरे.




Saturday, January 7, 2017

बालपण आणि शालेय जीवन !

बालपणीच्या आणि शालेय जीवनातल्या काही आठवणी मनात आहेत. त्या आठवणी मांडण्याचा हा प्रयत्न. अर्थात सगळं काही आठवत नाही. पण थोडं-थोडं इथं मांडणार आहे.
११ जून १९७७ ही माझी जन्म तारीख. माझे वडील तेव्हा कृषी विद्यापीठ परभणी येथे नोकरी करत होते. माझ्या जन्मानंतर वडिलांची संभाजीनगरला (तेव्हाचं औरंगाबाद. अजून कोर्टात केस सुरू आहे.) बदली झाली. हा माझा पायगुणही म्हणता येईल. संभाजीनगरला पैठण रोडला असलेल्या कृषी विद्यालयाच्या सरकारी निवासस्थानांमध्ये मी एक-एक पाऊल पुढे टाकलं. अगदी शहरात असलेला हा कृषी विद्यालयाचा परिसर अजूनही निसर्गरम्य असाच आहे. बहुतेक तीन वर्षांचा असताना मला जागृती प्राथमिक शाळेत टाकण्यात आलं. मी आणि माझ्याबरोबर संभाजी शिरसाट आम्हा दोघांना कृषी विद्यालयात लेबर म्हणून असलेले काका सायकलवर शाळेत सोडायचे. फार जास्त काही आठवत नाही, पण माझा बालवाडीत पहिला नंबर आला असं आई अजूनही सांगते. कुलकर्णी आडनावाच्या शिक्षिकेने हे आईला सांगितलं होतं. पण नंतर हा नंबर मला मिळवता आला नाही. बहुतेक नंबर आणि ज्ञानाचा संबंध नसतो, हे मला तेव्हाच कळालं असावं.
कृषी विद्यालयाच्या सरकारी निवासस्थानांमध्ये लहानपणीचे माझे मित्र संभाजी, धनंजय, सुशील, शरद अजूनही संपर्कात आहोत. लक्ष्मीकांत जाधव आणि मी तर साडूभाऊ झालो. कृषी विद्यालयाच्या परिसरातल्या शेतातून भरपूर फिरलो. दांडाच्या पाण्यातही खेळलो. संध्याकाळी वडील आणि त्यांचे मित्र फिरायला निघायचे. तेव्हा आम्ही सगळी मुलं पेढे, केळी, जिलेबी, द्राक्ष असं जेवढं काही आठवेल तेवढं आणायला सांगायचो.
 मी दुसरीत  असताना असताना माझा लहाना भाऊ बालवाडीत होता. पावसाळ्याचे दिवस असल्यानं आम्हाला घ्यायला येणारे काका वेळेत आले नव्हते. तो पर्यंत हा लहाना पठ्ठ्या शाळेपासून तब्बल तीन किलोमीटर चालत घरी गेला. मी शाळेतच थांबलेलो.  रवींद्र घरी गेल्यावर आईने विचारले भाऊ (मला माझा लहानाभाऊ, बहीण लहानपणापासूनच भाऊ म्हणतात.) कुठे आहे ? रवींद्रने उत्तर दिलं, तो हॉटेलमध्ये चहा पितोय. मग वडिलांनी सायकल दामटली. मी शाळेतच होतो. शाळेतल्या हरणाबाई या वडील येईपर्यंत थांबून राहिल्या होत्या. मग घरी गेल्यानंतर बहुतेक रवींद्रची धुलाई झाली होती. 
तिसरीत असताना वडिलांची कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पात बदली झाली. त्यामुळे सरकारी निवासस्थान सोडावं लागलं. त्यानंतर आम्ही राहायला गेलो पदमपुऱ्यात. तिथे कुमावत समाजाची मोठी वस्ती होती. त्यामुळे मी तिसरीतच हिंदी बोलायचा शिकलो. वडिलांचे मित्र शिरसाट काका हे ही पदमपु-यात राहायला आले होते. त्यामुळे संभाजी त्याचा भाऊ मंगेश आम्ही पुन्हा एकत्र आलो. तिथेही आम्हाला बरेच मित्र मिळाले. पदमपु-यात बहुतेक श्री नावाचं एक मंगल कार्यालय होतं. तिथं कोणाचंही लग्न असलं तरी ब-याचवेळा आम्ही जेवायला जायचो. संक्रांतींच्या वेळेस या भागात पतंग मोठ्या प्रमाणात उडवले जायचे. कटलेला पतंग पकडणे, फुलपाखरू पकडणे यात आमचा बराच वेळ जायचा.
पाचवीत मला पदमपु-यातल्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये टाकलं. पाचवी ते सातवी पर्यंत मी महात्मा फुले शाळेत होतो. तिथे मला संजय पंढरे, सोमनाथ पंढरे आणि संतोष पंढरे हे जिगरी मित्र मळाले.  सहावीत असताना आम्ही नक्षत्रवाडीला राहायला गेलो. तिथे तर फुल धमाल. क्रिकेट खेळण्यासाठी भरपूर जागा. बाजूला शेतं. क्रिकेट खेळायचं शेतात जाऊन पेरू खायचे, पाणी प्यायचं पुन्हा क्रिकेट खेळायचं. आता नक्षत्रवाडीतही शेतं राहिली नाहीत. जिथं आम्ही खेळायचो तिथं टाऊनशिप झाल्या आहेत. नक्षत्रवाडीत सर्व मध्यमवर्गीय वस्ती. तिथं खूप मित्र मिळाले. सुधीर निकम, राजू शिंदे, रिंकू त्रिवेदी, अशोक गायकवाड, गजू लंबे, गोकूळ गायकवाड आणि अजूनही भरपूर मित्र परिवार. संभाजीनगरला गेल्यावर सर्वांना आजही आवर्जून भेटतोच. सातवीत असताना आमची मुंबईला सहल गेली होती. तिथं मी आणि दिनेश कुंडलवाल सहलीची बस उभी असताना रोड ओलांडून कपडे घेण्यासाठी गेलो. आमचे शिक्षक तेव्हा बसमध्ये नव्हते. आम्ही पुन्हा रोड ओलांडून बसकडे यायला आणि मगरे सर येण्याचा टायमिंग साधला गेला. मुंबईत भररस्त्यात मगरे सरांनी मला आणि दिनेशला चोप दिला होता. आता मागील नऊ वर्षांपासून मुंबईत राहतो. पण रस्ता ओलांडताना मगरे सरांचा आजही भास होतो. याच शाळेत चित्रकलेला पाटील सर होते. ते इतके जोक करायचे की, सगळा वर्ग हसत राहायचा.

आठवीत माझी पुन्हा शाळा बदलली. औरंगपु-यातल्या आनंद कृष्ण वाघमारे शाळेत मला टाकण्यात आलं. त्याच शाळेत रवींद्रनं सहावीत प्रवेश घेतला. तर आमची लहानी बहिण कविताला शारदा मंदिरमध्ये चौथ्या वर्गात प्रवेश मिळाला. मी, रवींद्र आणि सर्व मित्रमंडळी सकाळी सिटी बसने शाळेत निघायचो. तेव्हा स्कूल बस सारखं शाळांचं व्यापारीकरण झालेलं नव्हतं. आमच्या सगळ्यांचे पास होते. बसमध्ये जर कोणी चुकून पुस्तक काढून वाचायला बसलं तर त्याला अभ्यासू म्हणून चिडवायचे. त्यामुळे पुस्तक वाचण्याच्या भानगडीत कोणी पडायचं नाही. नक्षत्रवाडीच्या पुढचा स्टॉप होता, कांचननगर. हा जर उच्च मध्यमवर्गीय लोकांचा एरिया होता. इथली मंडळी पुस्तकात डोकं घालणारी होती. मुली जरा जास्तच दीड शहाण्या होत्या. त्या दीड शहाण्या बसमध्ये पुढे बसायच्या. मग आम्ही एक आयडिया करायचो. आम्ही सर्व मुलं पहिल्याच स्टॉपला सर्व विंडो बळकवून टाकायचो. मग त्यांना झक मारत आमच्या शेजारी बसावं लागायचं.
आधीची महात्मा फुले हायस्कूल आणि आताची आनंद कृष्ण वाघमारे प्रशाला यात मोठं अंतर होतं. त्यामुळे मला लवकर जुळवून घेता आलं नाही. आधीचीच महात्मा फुले हायस्कूल मला जास्त आठवायची.
पण नंतर हळूहळू रूळलो. आठवीत असताना मला रेडिओवर विविधभारती ऐकण्याची सवय लागली होती. मग वडिलांनी माझ्या वर्गशिक्षिका सराफ मॅडम यांच्याकडे तक्रार केली. सराफ मॅडमने भर वर्गात माझा असा काही कान पिरगळला की, विविधभारतीवर गाणं ऐकणंच बंद झालं. सराफ मॅडम भूगोल आणि हिंदी शिकवायच्या. पृथ्वीचा आकार गोल नसून जिऑईड आहे, हे माझ्या आजही लक्षात आहे. आठवीत मेरा प्रिय नेता या विषयावर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर निबंध लिहला होता. सराफ मॅडम शाळेतल्या कोणत्याच विद्यार्थ्याला हातात घड्याळ घालू द्यायच्या नाही. त्या सवयीचा असा परिणाम झाला की, मी आजही हातात घड्याळ घालत नाही.

शिक्षा करण्यात मुख्याध्यापक सौंदनकर सर आघाडीवर असायचे. ते बाजूला उभं राहून असा काही चिमटा काढायचे की, अजून ती कळ आठवते. विद्यार्थ्यांमध्ये माने सरही लोकप्रिय होते. ज्या वर्गातून विद्यार्थ्यांचा जास्त आवाज यायचा त्या वर्गात माने सर आहेत, हे लक्षात यायचं. प्रशालेतल्या सर्वात विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणजे वादे मॅडम. त्यांचा तास असल्यावर वर्गात उल्हासाचं वातावरण असायचं.
याच काळात बहुतेक सर्वच मुलं (एकतर्फी) प्रेमात पडायचे. कधी-कधी तर दोघे जण एका मुलीच्या प्रेमात पडायचे. तिच्यावरून मारामा-याही व्हायच्या. पण त्या बिचारीला आपल्या प्रेमावरून काय लढाई सुरू आहे, याची माहितीही नसायची. जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील, जाधव या आडनावाच्या मुलींवरच सर्वात जास्त एकतर्फी प्रेम केलं जात असावं, असा माझा तेव्हाचा अंदाज होता. सध्या काय परिस्थिती आहे, याची मला माहिती नाही.
गुलमंडीवर गेल्यावर वडील हमखासपणे उत्तम मिठाई भांडारमधली इम्रती खाऊ घालायचे. आजही गुलमंडीवर गेल्यावर इम्रती खाल्ल्याशिवाय पाय निघत नाही. शहरातली स्टेट आणि मोहन थिएटर वेगळ्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध होती. तिथून कधी गेल्यावर थिएटरवरच्या पोस्टरकडे मान फिरायचीच. अजून एक गंमत म्हणजे, त्या थिएटरमधून बाहेर पडणारे माना खाली घालून तर रस्त्यावरील लोक थिएटरकडे मान फिरवून चालायचे.
वाघमारे प्रशालेमध्ये माझा सर्वात जिगरी मित्र शैलेश जैस्वाल, नितीन बिडवे. निलेश राजपूत, पप्पू त्रिवेदी, अनिल पाका, शैलेंद्र खडके यांच्याशी जरा जास्त सलगी होती. एकदा शाळेच्या सहलीत बसमधून परतीच्या प्रवासात आम्ही सर्वांच्या बुटाच्या लेस रात्रीच्या अंधारात अशा काही अडकवल्या होत्या की, सकाळी सगळेच धडपडले होते.
आठवीत मी हिंदी घेतल्यानं मला ब वर्ग मिळाला होता. तर रवींद्रने संस्कृत घेतल्यामुळे त्याला अ वर्ग मिळाला होता. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांमध्ये रवींद्र चांगलंच नाव कमवत होता. त्यामुळे त्याला शाळेत रोज सकाळी पेपरमधील हेडलाईन्स वाचायला लावायचे. कोणत्याही वक्तृत्व स्पर्धेत जाण्याअगोदर रवींद्रला आमच्या ब वर्गात सरावासाठी आणलं जायचं. मात्र माझे वर्गमित्र असा काही गोंधळ घालायचे की, भाषण करणं अवघड होऊन जायचं.
संस्कृतवाले अ तुकडीत आणि आम्ही हिंदीवाले ब तुकडीत. अ पेक्षा ब तुकडीमध्ये जीवंतपणा जास्त होता. शिक्षा मिळण्याचं प्रमाणही ब तुकडीत जास्त होतं. अ आणि ब अशी आंतरराष्टीय सीमारेषा होती. अ वाल्यांचं संस्कृत असल्यानं भाषण करणारी मंडळी त्यांच्याकडे होती. अ वालेच सुभाषित म्हणायचे. स्पर्धेला जायचे. त्यात राहुल बोधनकर, वैशाली बोधनकर, माधवी हे सर्व आघाडीवर असायचे. ब तुकडीतली मंडळी खो-खो स्पर्धेत सर्व कसर भरून काढायचे. खोखोमध्ये ब तुकडीच जिंकायची.
पण आता सुमारे 26 वर्षानंतर गेट टू गेदरच्या निमित्तानं अ आणि ब तुकडीतले सर्व मित्र एकत्र जमतो. आता कोणतीही सीमारेषा नाही. शैलेश नरवय्ये. मयुर कोटस्थाने, उमेश संचेती, संतोष निकम, महेश देशपांडे, टीना पाटणी, सपना खांडेकर, वंदना पिंगळे, आसावरी, उमेश मुळे, रघू वाडेकर, मुकेश बसैय्ये, सागर पाटील, सतीश घेवारे हे सर्व मित्र दरवर्षी एकत्र भेटतो. अर्थात हे भेटणं शक्य होतं त्या आमच्या ऍडमीन कश्मीरा कुलकर्णी यांच्यामुळे. कश्मीरा उत्कृष्ट फोटोग्राफर असल्यानं गेट टू गेदरचे फोटो काढण्याचं टेन्शन नसतं. आणि विशेष म्हणजे फोटोग्राफर चांगला असल्यानं आमचे फोटोही चांगले येतात. एकत्र येऊन सगळे शाळेतल्या आठवणींना उजाळा देतो.
शाळेत असताना दूरदर्शन हेच एकमेव मनोरंजनाचं साधन होतं. त्यामुळे चित्रहार, छायगीत आणि रंगोली एकदम लोकप्रिय. त्यात दाखवलेलीच गाणी दुस-या दिवशी सगळे गुणगुणायचे. त्या काळात गणेशोत्सवात गणेश मंडळं व्हिडीओवर चित्रपट दाखवले जायचे. आम्ही ते सर्व चित्रपट बघायचो.

दहावीत असताना ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली गेली. त्यावेळी आम्ही शाळेत होते. शहरात दंगल उसळली. शाळा लवकर सोडण्यात आली. तणावाच्या वातावरणात घराकडे निघालो. भीती म्हणजे काय असते, याचा भीषण अनुभव घेत होतो. सर्वांचेच पालक चिंतेत होते. घरी गेल्यानंतर आईने आम्हाला कवटाळलंच. सहावी-सातवीपासून जात कळायला लागली होती. मात्र या दंगलीमुळे धर्मही कळायला लागला. १९९३च्या मार्च महिन्यात दहावीची परिक्षा झाली. त्या आधी मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते. शालेय जीवन संपतानाच दहशतवादाची सुरूवातही बघायला मिळाली. शालेय जीवनाचा शेवट झाला, पण या दहशतवादाचा शेवट होईल का ?