Thursday, August 22, 2019

स्वाद भरे...शक्ति भरे...बरसो से





पार्ले बिस्कीटांची चव चार ते पाच पिढ्यांनी अनुभवली आणि अनुभवत आहेत. देशात अनेक मल्टीनॅशनल कंपन्या त्यांची चकाचक प्रॉडक्ट घेऊन आल्या. पण पार्लेचा मार्केटमधला शेअर आणि जिभेवरची चव यांना धक्का देऊ शकल्या नाही. देशातल्या कोणत्याही गावात आणि दुर्गम ठिकाणीही पार्ले बिस्कीट मिळतात. मुंबई असो की मेळघाट पार्ले जी बिस्कीट मिळतंच. आणि अवघ्या पाच रुपयातही मिळणाऱ्या पार्लेची चव काय वर्णावी ? वाफाळलेल्या चहासोबत या बिस्कीटाची चव तर अमृतालाही लाजवेल अशीच असते. तुम्हीच आठवा, कडक थंडीत तुम्ही प्यायलेला चहा आणि त्याला पार्लेनं दिलेली चवदार साथ. असं जबरदस्त आणि स्वस्त कॉम्बिनेशन जगात कुठे तरी मिळत असेल का ? स्वस्त बिस्कीट असताना त्यातही 20 ते 25 टक्के फ्री देणारी अशी कंपनी जगात असणं अशक्यच.
पार्ले जी बिस्कीटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे बिस्कीट चहा आणि दुधात मिक्स करूनही पिता येतं. लहानपणीचा हा माझा आवडीचा छंद. चहाच्या कपात तीन ते चार बिस्कीट टाकून ती चमच्यानं चाखण्याची मजा काही औरच होती. आता हा छंद तसा कमी झालाय. पण चहात पार्लेचं बिस्कीट हवंच असतं. नाही म्हणायला काही गुड डे या बिस्कीटांनी पार्ले समोर काही काळ थोडं आव्हान निर्माण केलं होतं. पण गुड डे बिस्कीटांचा अतिकडकपणा आणि जास्त किंमत यामुळे त्यांचा लवकरच बॅड डे झाला. तसंच राष्ट्रप्रमानं टिच्चून भरलेली पतंजलीची बिस्कीटही चाखून बघितली. देशासाठी तर एवढं आपण करू शकतोच. पण देशभक्तीचा डोस देऊनही पतंजलीची बिस्कीटं पार्लेसमोर टिकली नाही ती नाहीच.
जीएसटीमुळे आर्थिक संकट गडद झाल्यानं पार्ले कंपनी दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची बातमी आल्यानंतर देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. पण पार्ले कंपनीत एकूण किती कर्मचारी काम करतात ? हा प्रश्न निर्माण झालाय. पार्ले कंपनीत तर एकूण साडेचार हजार कर्मचारी असताना दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कसं काढणार असा प्रश्न काही नेटिझन्सनी उपस्थित केला. अर्थात यात काय खरं आणि काय खोटं, हे आता तरी कळायला मार्ग नाही.
पार्ले बिस्कीटांसोबत माध्यमातल्या अनेक सहकाऱ्यांची आठवण आहे. तुळशीदास भोईटे सर हे नेहमीच त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चहापान करत असताना पार्ले बिस्कीटांचं वाटप करतात. झी २४ तासपासून त्यांचा सुरू झालेला हा स्वाद भरे...शक्ति भरे...बरसो से प्रवास अनेकांनी चाखलाय. भोईटे सरांचं हे बिस्कीट वाटप आणि पार्ले कंपनीतल्य कर्मचाऱ्यांची नोकरी अशीच सुरू राहावी. #संगो #parleg

Tuesday, August 13, 2019

पुरती 'शोभा' झाली !

नेहमीच वादात अडकणाऱ्या लेखिका शोभा डे यांच्या विरोधात ट्विटरवर जोरदार ट्रेंड सुरू आहे. पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डे यांनी भारत सरकारच्या विरोधात लेख लिहल्याची धक्कादायक माहिती उच्चायुक्तपदी राहिलेले अब्दुल बासित यांनी दिली. परिणामी शोभा डे यांचा देशभरात निषेध केला जात आहे. ट्विटरवर तर नेटिझन्स शोभा डे यांचा खरपूस समाचार घेत आहेत.लेखिका शोभा डे यांच्यावर सोशल मीडियात ट्रोल होण्याची वेळ आली. ॲंटी नॅशनल असा शब्द वापरण्याऐवजी 'आंटी नॅशनल' अशा शब्दात शोभा डे यांची खिल्ली उडवली जातेय. शोभा डे यांचं लिखाण तसं थ्री पेज कल्चरमध्येच वाचलं जातं. त्यांचा कोणताही लेख संपूर्णपणे वाचायचा म्हटला तरी वाचला जात नाही, इतकं ते सुमार दर्जाचं असतं. मात्र पाकिस्तानसाठी लिहलेल्या, 'Burhan Wani is dead but he'll live on till we find out what Kashmir really wants' या लेखासाठी शोभा डे यांनी चांगलीच 
मेहनत घेतली. एकंदरीतच त्यांचा लिखाणानाचा आवाका पाहता, लेखाची स्क्रिप्टही पाकिस्तानातूनच तर आली नाही ना ? अशीही शंका मनात येते. बुऱ्हाण वाणीवर लिहलेला हा पाकमय लेख द टाईम्स ऑफ इंडियानं छापला होता. 17 जुलै 2016 रोजी टाईम्स ऑफ इंडियानं छापलेला लेख, त्यांनी का छापला ? असाही प्रश्न आता उपस्थित होतोय.बुऱ्हान वाणीला ठार मारल्यानंतर अब्दुल बासित यांनी भारतीय पत्रकारांची भेट घेतली. त्या भेटीत डे यांना लेख लिहण्याविषयी विनंती करण्यात आली. ती विनंती त्यांनी मान्य करून डे यांनी लेख खरडल्याचं बासित यांनी सांगितलं. तर  अब्दुल बासित यांची एकदाच भेट झाल्याचं शोभा डे यांनी सांगितलं. मात्र बासित पूर्णपणे खोटं बोलत असल्याचं स्पष्ट करत, हा माझा अपमान असल्याचं शोभा डे म्हणाल्या आहेत.
भारतातले लेखक पाकिस्तानच्या इशाऱ्यावर लिखाण करत असतानाच दुसरीकडे पाकिस्तानचीही शोभा झाली. काश्मीरच काय तर पाकिस्तानही भारताचा भाग आहे. भारत हा इस्लामपेक्षाही जुना आहे मान्य करायला हवं, असं मत ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी व्यक्त केलं. काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानला कोणत्याही देशाकडून मदत मिळत नाही. त्यातच ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी पाकिस्तानचा बुरखाच फाडला. "पाकिस्तान आणि काश्मीर दोन्ही भारताचेच भाग आहेत. तिथले हिंदू त्यांचा धर्म सोडून इस्लाममध्ये आले असले तरी संपूर्ण भूभाग हा हिंदूंचा आहे. हे सत्य बदलता येणार नाही. भारत हा पाकिस्तानच काय तर इस्लामपेक्षा जुना आहे. हे मान्य करायलाच हवं", अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानचा नक्शा उतरवला.ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असणाऱ्या तौवहिदी यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. तसंच या मुद्यावरून त्यांनी काँग्रेसवर टीकाही केली होती. "राहुल गांधी हे अत्यंत वाईट राजकारणी आहेत. मोदींना विरोध करण्यासाठी ते शत्रूंची सोबत करतात. सोनिया गांधीही तशाच आहेत. गाझामधील कट्टरतावाद्यांशी असलेले त्यांचे संबंध विसरता येणार नाहीत. हे दोघे स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि नंतर कॅमेरासमोर येऊन रडतात. हे मुरब्बी राजकारणी नाहीत," असा आरोप तौवहिदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला होता. एकंदरीतच कलम ३७० वरून भारताला जगभरातून समर्थन मिळत असताना पाकिस्तान एकाकी पडलाय. तर इस्लामी नेत्यांनीही समर्थन केल्यानं भारताचं पारडं जड झालंय. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानला अमेरिका, चीनसह कोणत्याचा देशाचा पाठिंबा मिळताना दिसत नाही. इस्लामी देशही पाकिस्तानसोबत नाही. यामुळे पाकिस्तानचं वैफल्य वाढत चाललंय.
एकंदरीतच पाकिस्तानच्या अब्दुल बासितमुळे डे यांची शोभा झाली. तर इमाम मोहम्मद तौवहिदी यांच्यामुळे पाकिस्तानची शोभा झाली. आता झालेल्या या शोभेमुळं तरी डे आणि पाकिस्तानला काही अक्कल यायला हवी, हीच सदिच्छा. 

Sunday, August 11, 2019

पत्रकारितेतला वैचारिक दहशतवाद !


'तुम्ही संघवाले आईच्या पोटातच का नाही मेला ?' काँग्रेसी विचारसरणीच्या एका पत्रकाराचं हे वाक्य. मी ज्या चॅनेलध्ये काम करत होतो त्याच ठिकाणी माझ्यासमोर त्या पत्रकारानं एका सहकाऱ्याला हा प्रश्न विचारला. त्या बिचाऱ्याचा दोष इतकाच होता की, तो संघ विचारांचा समर्थक होता. ही घटना 2014च्या आधीची आहे. त्यावेळी मोदी भक्तांचा जन्म व्हायचा होता. परिणामी त्या काळात नेहरूभक्त, केतकरभक्त, एनडीटीव्हीभक्त, जेएनयूभक्त, डावेभक्त यांचा उन्माद सुरू होता. ही सर्व भक्तमंडळी संघ, भाजप, शिवसेनेच्या नेत्यांचा उद्धार करायची. नव्हे तर हा उद्धार केला नाही तर तुम्ही पत्रकारच नाहीत असा समज प्रचलित होता. पत्रकार हा नेहरूभक्त, केतकरभक्त, एनडीटीव्हीभक्त, जेएनयूभक्त किंवा डाव्यांचाभक्त असावा. पण पत्रकार कधीही हिंदूत्ववादी असू नये असा अलिखित नियम होता. (काही) डावे पत्रकार तर इतके टोकाचे असतात की, ते फुटिरतावादी काश्मीरी नेते आणि फुटिरतावादी काश्मीरींच्या बाजूनं असतात.(काही) डावे पत्रकार चीनच्या बाजूनं असतात. पण ते कधीही भारताच्या बाजूने नसतात. त्यामुळे या पुरोगामी आणि डावेभक्त पत्रकारांना मुस्लीम दहशतवाद, रस्त्यावरील नमाज, मशिंदीवरील भोंगे, काश्मीरी पंडित हे विषय वर्ज्य असतात. असल्या विषयांवर भक्त पुरोगामी पत्रकार काहीच लिहित नव्हती. राष्ट्रवाद हा शब्द उच्चारला तरी त्या भक्तांचा तिळपापड व्हायचा. हा सर्व प्रकार म्हणजे पुरोगामी पत्रकारितेचा दहशतवाद का म्हणू नये ?

पण कोणतीच परिस्थिती कायम राहत नाही. मौका सभी को मिलता हैं, या उक्तीप्रमाणे घडलं. 2014 मध्ये सरकार बदललं. पुरोगामी पत्रकारांचा दहशतवाद संपूष्टात आला नाही मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झाला. जी पत्रकारमंडळी बॅकफूटवर होती ती आता मोदीभक्त म्हणून हायलाईट झाली, पुढे आली. पत्रकारितेचा बुरखा काढून पण माध्यमांमध्ये राहून खुलेआमपणे मोदीभक्त म्हणवून घेऊ लागली. परिणामी पुरोगामी पत्रकारांनंतर मोदीभक्त पत्रकारांचा दहशतवाद सुरू झाला. कोण देशभक्त ? कोण देशद्रोही ? याचे घाऊक प्रमाणात सर्टिफिकेट दिलं जाऊ लागलं. सरकारच्या विरोधात बोलण्याची सोय राहिली नाही. सरकारला प्रश्न विचारण्याची सोय राहिली नाही. सरकारच्या विरोधात काही बोललं की, कुत्री जशी मागे लागतात तसे भक्तांचे ट्रोलर्स मागे लागतात. विकासाचे प्रश्न मागे पडून फक्त राष्ट्रवादाचाच ज्वर वाढत राहिल, अशीच काळजी मोदीभक्त पत्रकारांकडून घेतली जाते. एखादा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देण्याऐवजी मोदीभक्त पत्रकार आधी काय झालं होतं, याचे दाखले देत बसतात. त्यामुळे मोदीभक्त पत्रकार हे पत्रकार आहेत की आणि भाजपचे प्रवक्ते ? असा प्रश्न निर्माण झालाय.
एकंदरीतच नेहरूभक्त, केतकरभक्त, एनडीटीव्हीभक्त, जेएनयूभक्त, डावेभक्त विरूद्ध मोदीभक्त पत्रकारांमुळे नुकसान होतंय ते पत्रकारितेचं. पत्रकारितेतला हा दोन्ही बाजूंचा दहशतवाद माध्यमांची विश्वासार्हता घालवू लागलाय. माध्यमांची पत टिकवायची असेल तर दोन्ही बाजूंनी भक्ताच्या भूमिकेतून बाहेर पडण्याची गरज निर्माण झालीय. #संगो

Monday, August 5, 2019

बाळासाहेबांचं स्वप्न शाहांनी साकारलं !

काश्मीर प्रश्नावर देशात सर्वात आक्रमक भूमिका घेतली ती शिवसेाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. काश्मीरी पंडितांवरील अन्यायाच्या विरोधात बोलणारा एकमेव नेता म्हणजे शिवसेनाप्रमुखच. कलम ३७० हटवण्याची मागणी बाळासाहेब ठाकरेंनी सातत्यानं केली होती. माझ्या हाती जर सत्ता दिली तर कलम ३७० रद्द करेन असं शिवसेनाप्रमुख अनेक जाहीर सभांमध्ये म्हटलं. अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्न अमित शाहांनी साकारलं. काश्मीर प्रश्न आणि दहशतवादावर शिवसेनाप्रमुखांनी त्यांची परखड मतं व्यक्त केली होती. त्यावरून अनेकदा वादही निर्माण झाला होता. पण आता केंद्रातल्या एनडीए सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे राज्यभरात शिवसैनिक जल्लोष करताहेत. शिवसेनाप्रमुखांची इच्छा पूर्ण झाली. दहशतवादामुळे काश्मीरी जनता आणि काश्मीरी पंडित यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पण त्या विषयावर बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणीच भाष्य करत नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही या क्षणी बाळासाहेबांचीच आठवण आली. राज्यभरात रस्त्यांवर शिवसैनिकांचा जल्लोष, मुंबईत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आणि तिकडे दिल्लीत संजय राऊतांनीही राज्यसभेत आनंद व्यक्त केला. संजय राऊत राज्यसभेत बोलत असताना इतर सदस्यही त्यांच्या वक्तव्यांना जोरदार दाद देत होते. 
शिवसेना भाजप ही देशातली सर्वात जुनी युती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी ही युती साकारली. हिंदूत्व आणि काश्मीरच्या प्रश्नावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेत्यांचं एकमत होतं.
शिवसेना भाजपमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होतात. पण अनेक महिन्यांनी दोन्ही पक्षांचं एकमत झालं. शिवसेनेनं दिलखुलासपणे भाजपचं अभिनंदन केलं. एकंदरीतच मिशन काश्मीरच्या निमित्तानं दोन्ही पक्षाचं युतीचं नंदनवन पुन्हा बहरलं, असंच म्हणावं लागेल.
तर दुसरीकडे अमित शाह यांच्या मास्टरस्ट्रोकनं देशातलं वातावरणच बदलून गेलं. देशभरात जल्लोष सुरू झाला. काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत देश जल्लोषात बुडून गेला. मुंबईत शिवसेना भवनसमोरही शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलम ३७० हटवण्यासाठी नेहमीच आग्रही होते. काश्मीरच्या मुद्यावरून बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा काँग्रेस आणि पाकिस्तानवर टीका केली. पण शिवसैनिकांसह देशातल्या नागरिकांना जल्लोष करण्याची संधी दिली ती अमित शाह यांनी. अमित शाह हे अत्यंत कठोर निर्णय घेणारे नेते आहेत.  मागील आठवडाभरापासून काश्मीरमधला बंदोबस्त वाढवण्यात आला होता. काश्मीरविषयी मोठा निर्णय घेतला जाणार याची तेव्हाच जाणिव झाली होती. काश्मीरच्या प्रश्नावर भाजपनं नेहमीच आक्रमक भूमिका घेतलीय. अखेर भाजपनं त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याची हिंमत दाखवली. काश्मीरमध्ये असंच घडायला हवं अशी जनतेची इच्छा होती. अखेर तब्बल ७० वर्षांनंतर भळभळती जखमी भरली गेली. त्यामुळे जनता बेभान होऊन जल्लोष करायला लागली. देशात आता पर्यंत काश्मीरविषयी कठोर निर्णय घेण्याची हिंमत कोणीच दाखवली नव्हती. पण अमित शाह यांनी हा निर्णय घेतला. अमित शाह यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधक गर्भगळीत झाले. देशहिताचा आणि देशवासीयांच्या मनात जे आहे ते शाह यांनी करून दाखवलं. भाजपला या निर्णयाचा कितपत राजकीय फायदा होईल, हा पुढचा भाग राहिला. मात्र अमित शाह आणि भाजप विरोधकांच्या फार पुढे गेला हे नक्की.
दहशतवाद हा चर्चेनं नव्हे तर बंदूकीच्या गोळीनं संपतो, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची रोखठोक विचारसरणी. अमित शाह हे भाजपचे असले तरी त्यांची विचारसरणी आणि कृती ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रभावित असल्याचं जाणवतं. ३७० तर सुरूवात आहे. आगामी काळात समान नागरी कायदा देशात लागू होईल, यात आता शंका उरली नाही.