Sunday, August 11, 2019

पत्रकारितेतला वैचारिक दहशतवाद !


'तुम्ही संघवाले आईच्या पोटातच का नाही मेला ?' काँग्रेसी विचारसरणीच्या एका पत्रकाराचं हे वाक्य. मी ज्या चॅनेलध्ये काम करत होतो त्याच ठिकाणी माझ्यासमोर त्या पत्रकारानं एका सहकाऱ्याला हा प्रश्न विचारला. त्या बिचाऱ्याचा दोष इतकाच होता की, तो संघ विचारांचा समर्थक होता. ही घटना 2014च्या आधीची आहे. त्यावेळी मोदी भक्तांचा जन्म व्हायचा होता. परिणामी त्या काळात नेहरूभक्त, केतकरभक्त, एनडीटीव्हीभक्त, जेएनयूभक्त, डावेभक्त यांचा उन्माद सुरू होता. ही सर्व भक्तमंडळी संघ, भाजप, शिवसेनेच्या नेत्यांचा उद्धार करायची. नव्हे तर हा उद्धार केला नाही तर तुम्ही पत्रकारच नाहीत असा समज प्रचलित होता. पत्रकार हा नेहरूभक्त, केतकरभक्त, एनडीटीव्हीभक्त, जेएनयूभक्त किंवा डाव्यांचाभक्त असावा. पण पत्रकार कधीही हिंदूत्ववादी असू नये असा अलिखित नियम होता. (काही) डावे पत्रकार तर इतके टोकाचे असतात की, ते फुटिरतावादी काश्मीरी नेते आणि फुटिरतावादी काश्मीरींच्या बाजूनं असतात.(काही) डावे पत्रकार चीनच्या बाजूनं असतात. पण ते कधीही भारताच्या बाजूने नसतात. त्यामुळे या पुरोगामी आणि डावेभक्त पत्रकारांना मुस्लीम दहशतवाद, रस्त्यावरील नमाज, मशिंदीवरील भोंगे, काश्मीरी पंडित हे विषय वर्ज्य असतात. असल्या विषयांवर भक्त पुरोगामी पत्रकार काहीच लिहित नव्हती. राष्ट्रवाद हा शब्द उच्चारला तरी त्या भक्तांचा तिळपापड व्हायचा. हा सर्व प्रकार म्हणजे पुरोगामी पत्रकारितेचा दहशतवाद का म्हणू नये ?

पण कोणतीच परिस्थिती कायम राहत नाही. मौका सभी को मिलता हैं, या उक्तीप्रमाणे घडलं. 2014 मध्ये सरकार बदललं. पुरोगामी पत्रकारांचा दहशतवाद संपूष्टात आला नाही मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झाला. जी पत्रकारमंडळी बॅकफूटवर होती ती आता मोदीभक्त म्हणून हायलाईट झाली, पुढे आली. पत्रकारितेचा बुरखा काढून पण माध्यमांमध्ये राहून खुलेआमपणे मोदीभक्त म्हणवून घेऊ लागली. परिणामी पुरोगामी पत्रकारांनंतर मोदीभक्त पत्रकारांचा दहशतवाद सुरू झाला. कोण देशभक्त ? कोण देशद्रोही ? याचे घाऊक प्रमाणात सर्टिफिकेट दिलं जाऊ लागलं. सरकारच्या विरोधात बोलण्याची सोय राहिली नाही. सरकारला प्रश्न विचारण्याची सोय राहिली नाही. सरकारच्या विरोधात काही बोललं की, कुत्री जशी मागे लागतात तसे भक्तांचे ट्रोलर्स मागे लागतात. विकासाचे प्रश्न मागे पडून फक्त राष्ट्रवादाचाच ज्वर वाढत राहिल, अशीच काळजी मोदीभक्त पत्रकारांकडून घेतली जाते. एखादा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देण्याऐवजी मोदीभक्त पत्रकार आधी काय झालं होतं, याचे दाखले देत बसतात. त्यामुळे मोदीभक्त पत्रकार हे पत्रकार आहेत की आणि भाजपचे प्रवक्ते ? असा प्रश्न निर्माण झालाय.
एकंदरीतच नेहरूभक्त, केतकरभक्त, एनडीटीव्हीभक्त, जेएनयूभक्त, डावेभक्त विरूद्ध मोदीभक्त पत्रकारांमुळे नुकसान होतंय ते पत्रकारितेचं. पत्रकारितेतला हा दोन्ही बाजूंचा दहशतवाद माध्यमांची विश्वासार्हता घालवू लागलाय. माध्यमांची पत टिकवायची असेल तर दोन्ही बाजूंनी भक्ताच्या भूमिकेतून बाहेर पडण्याची गरज निर्माण झालीय. #संगो

1 comment:

  1. एकदम बरोबर पत्रकारिता विषयी आपण मत मांडलं, खरंतर ज्या चुका आदी काँग्रेसभक्त किंवा अन्य भक्त पत्रकारांनी केली ती आता करणे टाळलं पाहिजे, पण माझा एक प्रश्न आहे की पत्रकार पत्रकाराची भूमिका ठामपणे मांडत असेल परंतु तो ज्या संस्थेच्या अंतर्गत काम करतो आहे तिथे त्याने मांडलेली भूमिका साफ नाकारण्यात येते, कारण आज प्रत्येक वृत्तसंस्था कोणत्या ना कोणत्या पक्षाशी किंवा विचारसरणी सोबत जोडलेली आहे, त्यात पत्रकाराचा काय दोष आणि पूर्वी ज्यांनी भक्त बनून मलाई खाल्लेली आहे त्यांचं काय ?

    ReplyDelete