Thursday, August 22, 2019

स्वाद भरे...शक्ति भरे...बरसो से





पार्ले बिस्कीटांची चव चार ते पाच पिढ्यांनी अनुभवली आणि अनुभवत आहेत. देशात अनेक मल्टीनॅशनल कंपन्या त्यांची चकाचक प्रॉडक्ट घेऊन आल्या. पण पार्लेचा मार्केटमधला शेअर आणि जिभेवरची चव यांना धक्का देऊ शकल्या नाही. देशातल्या कोणत्याही गावात आणि दुर्गम ठिकाणीही पार्ले बिस्कीट मिळतात. मुंबई असो की मेळघाट पार्ले जी बिस्कीट मिळतंच. आणि अवघ्या पाच रुपयातही मिळणाऱ्या पार्लेची चव काय वर्णावी ? वाफाळलेल्या चहासोबत या बिस्कीटाची चव तर अमृतालाही लाजवेल अशीच असते. तुम्हीच आठवा, कडक थंडीत तुम्ही प्यायलेला चहा आणि त्याला पार्लेनं दिलेली चवदार साथ. असं जबरदस्त आणि स्वस्त कॉम्बिनेशन जगात कुठे तरी मिळत असेल का ? स्वस्त बिस्कीट असताना त्यातही 20 ते 25 टक्के फ्री देणारी अशी कंपनी जगात असणं अशक्यच.
पार्ले जी बिस्कीटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे बिस्कीट चहा आणि दुधात मिक्स करूनही पिता येतं. लहानपणीचा हा माझा आवडीचा छंद. चहाच्या कपात तीन ते चार बिस्कीट टाकून ती चमच्यानं चाखण्याची मजा काही औरच होती. आता हा छंद तसा कमी झालाय. पण चहात पार्लेचं बिस्कीट हवंच असतं. नाही म्हणायला काही गुड डे या बिस्कीटांनी पार्ले समोर काही काळ थोडं आव्हान निर्माण केलं होतं. पण गुड डे बिस्कीटांचा अतिकडकपणा आणि जास्त किंमत यामुळे त्यांचा लवकरच बॅड डे झाला. तसंच राष्ट्रप्रमानं टिच्चून भरलेली पतंजलीची बिस्कीटही चाखून बघितली. देशासाठी तर एवढं आपण करू शकतोच. पण देशभक्तीचा डोस देऊनही पतंजलीची बिस्कीटं पार्लेसमोर टिकली नाही ती नाहीच.
जीएसटीमुळे आर्थिक संकट गडद झाल्यानं पार्ले कंपनी दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची बातमी आल्यानंतर देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. पण पार्ले कंपनीत एकूण किती कर्मचारी काम करतात ? हा प्रश्न निर्माण झालाय. पार्ले कंपनीत तर एकूण साडेचार हजार कर्मचारी असताना दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कसं काढणार असा प्रश्न काही नेटिझन्सनी उपस्थित केला. अर्थात यात काय खरं आणि काय खोटं, हे आता तरी कळायला मार्ग नाही.
पार्ले बिस्कीटांसोबत माध्यमातल्या अनेक सहकाऱ्यांची आठवण आहे. तुळशीदास भोईटे सर हे नेहमीच त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चहापान करत असताना पार्ले बिस्कीटांचं वाटप करतात. झी २४ तासपासून त्यांचा सुरू झालेला हा स्वाद भरे...शक्ति भरे...बरसो से प्रवास अनेकांनी चाखलाय. भोईटे सरांचं हे बिस्कीट वाटप आणि पार्ले कंपनीतल्य कर्मचाऱ्यांची नोकरी अशीच सुरू राहावी. #संगो #parleg

1 comment:

  1. पार्ले जी बिस्कीटने आठवणी दिल्या हे मात्र खरं !

    ReplyDelete