राज्यात निवडणुकीचा बिगूल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. त्या पार्श्वभूमीवर 12 पक्षांच्या 12 भानगडी पाहूयात. त्याची सुरूवात करूयात भाजपपासून.
पहिली भानगड, भाजप - गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील कदाचित जगातही सर्वात शक्तिशाली पक्ष म्हणजे भाजपच. राज्यात एकेकाळी भाजप छोटा भाऊ होता. पण आता हा पक्ष मोठा भाऊ झाला आहे. आईच्या पोटी जन्म घेतल्यानंतर मोठा भाऊ मोठाच राहतो. आणि छोटा भाऊ छोटाच राहतो. पण राजकीय पक्ष म्हणून जन्म घेतल्यावर काहीही होऊ शकतं. अशा या मोठ्या भावानं स्वबळावर लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या छोट्या भावाला हिंदूत्वाची गोळी देऊन युतीसाठी राजी केलं. विधानसभेला 50-50 जागा असं स्वप्नही छोट्या भावाला दाखवण्यात आलं. पण आता मोठी भानगड झाली. 144 जागा देण्याऐवजी मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला म्हणजे शिवसेनेला 115 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही. परिणामी भाजपची ही भानगड स्वबळाच्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरी भानगड, शिवसेना - भाजपला कमळाबाई असं हिणवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा पक्ष. पण आता कमळाबाई घराची मालकीणबाई झालीय. मोठा भाऊ असलेला शिवसेना छोटा भाऊ झाला. लोकसभा निवडणुकीच्या दिलेली हिंदूत्त्वाची गोळी चघळूण झाली. पण आता 50-50 जागांचा फॉर्म्युला अस्तित्वात आला नाही तर शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वबळाची भानगड मोठं लफडं होणार, हे नक्की.
तिसरी भानगड, काँग्रेस - गावातला राबता असलेला मोठा वाडा भग्न झाल्यानंतर जसा दिसतो तशी सध्या काँग्रेसची परिस्थिती झालीय. भानगड करायलाही काँग्रेसमध्ये कोणी उरलेलं नाही. त्यामुळे कालचा 'वंचित' काँग्रेसची राजकीय छेड काढताना दिसतो.
चौथी भानगड, राष्ट्रवादी काँग्रेस - आयात नेत्यांच्या जीवावर आणि सत्तेच्या टॉनिकवर हा पक्ष राज्यात पसरला. पवारांच्या पॉवरबाज पक्षाचं सत्तेचं टॉनिक संपलं आणि आयात नेत्यांची निर्यात सुरू झालेली. दणादण पक्षांतर झाल्यानं घड्याळाचे काटे निखळले. बडे नेते बाहेर पडल्यानं आता शरद पवारांनाच मैदानात उतरावं लागलं. त्यातच जर छगन भुजबळ जर शिवसेनेत परतले तर राष्ट्रवादी काँग्रेसची भानगड शेवटच्या घटका मोजण्याची वेळ येऊ शकते.
पाचवी भानगड, म.स्वा.प. - म.स्वा.प. वाचून ही नेमकी भानगड काय, हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल. म.स्वा.प. म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष. एकेकाळी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे यांचा प्रचंड मोठा पक्ष. या पक्षाचा एकही आमदार नाही. खुद्द नारायण राणे भाजपच्या जीवावर राज्यसभा सदस्य झाले. तसं असलं तरी हा पक्ष मोठाच. भाजपमध्ये अनेक नेते गेले. पण नारायण राणे त्यांच्या म.स्वा.प. या पक्षासह भाजपमध्ये प्रवेश करून, त्यांची भानगड कायमचीच संपवणार यात शंका नाही. पण भाजपला राणेंची भानगड भाजपला कितपत परवडेल, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
सहावी भानगड, VBA - VBA म्हणजे वंचित बहुजन आघाडी. लोकसभेला या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पण वंचितच्या जीवावर एमआयएमचा खासदार झाला. ते म्हणतात ना, मेहनत करे मुर्गा अंडा खाये फकीर असा प्रकार घडला. अंडा खाणाऱ्या एमआयएमला बाजूला करून वंचित सर्व जागा लढवणार आहे. वंचितमुळे भानगड झाली ती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. दुष्काळात तेरावा महिना, ही म्हण आठवण्याची वेळ आघाडीवर आलीय.
सातवी भानगड, MIM - हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणारे खासदार इम्तियाज जलील यांचा हा पक्ष. एमआयएमला रझाकारांविषयी सहानुभूती असल्याचा आरोप केला जातो. त्या आरोपाला बळ देण्याचं काम एमआयएमच्या कृतीतूनच दिसून येतं. मात्र आता वंचितनं एमआयएमची साथ सोडली आहे. वंचितची मतं एमआयएमला मिळतात. मात्र एमआयएमची मतं वंचितला मिळत नाहीत यामुळे दोन्ही पक्ष वेगळे झाले. परिणामी निवडणुकीच्या तोंडावर ही भानगड एमआयएमसाठी अपशकून ठरली.
आठवी भानगड, स्वा.शे.प. - स्वाभिमानी शेतकरी पक्ष. हा पक्ष 2014 मध्ये युती सोबत. मात्र भाजपसोबत भानगड झाल्यानं हा पक्ष आता आघाडीसोबत आहे. माजी खासदार राजू शेट्टी हेच या पक्षाचे एकमेव नेते.
नववी भानगड, रयत क्रांती संघटना - राजू शेट्टी यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी त्यांचं रयत क्रांती संघटना हे छोटं दुकान सुरू केलं. खोत सध्या सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र स्वत:च्या दुकानातून लढण्याऐवजी भाजप या मोठ्या मॉलच्या तिकीटावर खोत लढणार आहेत. त्यामुळे ही भानगड तशी भाजपच्या फायद्याची ठरणार आहे.
दहावी भानगड, शेकाप - शेतकरी कामगार पक्ष, ज्या प्रकारे सध्या शेतकरी आणि कामगारांना किंमत राहिलेली नाही त्या प्रकारे या पक्षालाही किंमत राहिलेली नाही. हा पक्ष आघाडीसोबत असल्याची चर्चा आहे. रायगड जिल्ह्यातल्या काही भागात अस्तित्व असलेल्या या पक्षाची भानगड तशी अदखलपात्र झालीय.
अकरावी भानगड, रिपाइं (आ) - जायकवाडी धरणासारखी रामदास आठवलेंच्या या पक्षाची भानगड. मराठवाड्यात पाऊस पडला नाही, तरी औरंगाबादमधलं जायकवाडी धरण 100 टक्के भरलं. त्याच प्रकारे पक्षाचा एकही आमदार, खासदार नसताना मंत्री होण्याची भानगड जमवण्यात रामदास आठवलेंना यश आलं. भाजपसोबत असलेल्या या पक्षाला विधानसभा निवडणुकीत पडणाऱ्या जागा देण्याची भानगड भाजपकडून केली जाते. यावेळी काय होतं हे निवडणुकीनंतर लक्षात येईल.
बारावी भानगड, सपा-बसपा - उत्तर प्रदेशातली ही भानगड महाराष्ट्रात काही चालत नाही. अर्थात त्यांचं आता यूपीतही काही चालत नाही. सपा हा पक्ष आघाडी सोबत आहे. भिवंडी आणि गोवंडी अशा दोन जागा मिळाल्या तर सपाची भानगड उरत नाही. तर एकही जागा मिळत नसली तरी प्रत्येक निवडणूक उत्साहानं का लढतात, ही बसपाची भानगड काही कळत नाही.
#संगो #BJP #SHIVSENA #CONGRESS #NCP #VBA #MIM #SP #BSP #RPI
No comments:
Post a Comment