राज्यातील एक राजकीय वैर संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. आदित्य ठाकरेंनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या बर्थ डे पार्टीला उपस्थिती लावली. आणि मागील पाच वर्षांपासून ठाकरे आणि कंबोज यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता. त्यामुळेच आदित्य ठाकरेंनी मोहित कंबोज यांच्या मुलीच्या बर्थ डे पार्टीला हजेरी लावली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. खरं तर त्या पार्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, मिलिंद नार्वेकरांनीही पायधुळ झाडली होती. एवढचं काय पण अभिनेता शाहरुख खानही या पार्टीसाठी अवर्जून हजर होता. मात्र आदित्य ठाकरेंची पार्टीतील उपस्थिती वेगळ्याच मुद्यावरून चर्चेत आली. त्याला कारण होतं, आधी झालेल्या एका पार्टीचं. कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान तेजस ठाकरेंनी दबाव टाकून हॉटेल सुरु करायला लावल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. त्या पार्टीचे व्हिडीओही त्यांनी व्हारल केले होते. 20 जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते. त्यातही मोहित कंबोज यांचं नावही चर्चेत आलं होतं. शिवसेनेतून फुटलेल्या आमदार आणि मंत्र्यांसोबत कंबोज यांनी घेतलेल्या गळाभेटीचे व्हिडीओ माध्यमांमध्ये झळकले होते. शिवसेना फोडण्याच्या राजकीय ऑपरेशनमध्ये कंबोजांचीही भूमिका होती.
मात्र हा सर्व घटनाक्रम विसरून आदित्य ठाकरे कंबोज यांच्या पार्टीत सहभागी झाले. अर्थात हे ही तितकंच खरं आहे की, जर कुणाच्या घरी वाढदिवस किंवा लग्न असेल आणि निमंत्रण मिळालं तर जायलाच हवं. जर वाद विसरून यजमान निमंत्रण देत असेल तर पाहुण्यांनीही मोठ्या मनानं जायलाच हवं, यात चुकीचं असं काहीच नाही. त्यामुळेच की काय, राजकारण वेगळं आणि वैयक्तिक संबंध वेगळे, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली.
कंबोज यांच्या पार्टीत आदित्य ठाकरेच नव्हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही पार्टीत सहभागी झाले होते. त्यावर अमित ठाकरेंनी 'राजसाहेब आणि मोहित कंबोज जुने मित्र आहेत', असं सांगितलं. भाजपच्या नेत्यांनीही 'कौटुंबिक कार्यक्रमात सगळेच जातात', अशी चाणाक्ष भूमिका घेतली.
मात्र 'भाजपकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत', अशा शब्दात शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंवर हल्लाबोल केला. सुजात आंबेडकर यांनी ट्विट करून तोफ डागली. 'ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी? भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. मविआचं सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात कंबोज यांचा हात होता. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारं ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करत आहेत', अशी तिखट भाषा सुजात आंबेडकर यांनी वापरली.
आदित्य ठाकरेंची पार्टीतील उपस्थिती हा केवळ कौटुंबिक स्नेह आहे की आगामी राजकीय समीकरणांची नांदी, हे आता आगामी काळात स्पष्ट होईल. एकीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये काही मुद्द्यांवरून (उदा. सातारा झेडपी) मतभेद वाढत चालले आहेत. तर दुसरीकडे भाजप नेत्याच्या घरच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे सहभागी होत आहेत. हे परस्पर विरोधी चित्र बरंच बोलकं आहे. याच पार्टीत अजून एक विसंगत चित्र होतं, ते म्हणजे अभिनेता शाहरूख खानच्या उपस्थितीचं. शाहरूखचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी मोहित कंबोज यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज रॅकेटचा आरोप केला होता. एनसीबीच्या कारवाईचं समर्थन करून शाहरूख खानवर अप्रत्यक्षपणे तोफ डागली होती. तरीह किंग खान अशी ओळख असलेला शाहरूख खान कोणत्या लाचारीमुळे गेला असेल? हे त्यालाच माहित. आता इतके सर्व पाहुणे निमंत्रित केले होते म्हटल्यावर कंबोज यांनी नवाब मलिक यांनाही बोलवायला काय हरकत होती?
एकंदरीतच आदित्य ठाकरे, शाहरूख खान यांची पार्टीतील उपस्थिती पाहून, 'कितने अजीब रिश्ते है यहाँ पे' हे पेज थ्री सिनेमातील गाणं नक्कीच आठवतं.

No comments:
Post a Comment