Sunday, August 30, 2026

आधी मराठी भाषा मरेल, नंतर मराठी माणूस

 

संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांची मराठी एकीकरण समितीनं मुंबईत माफी मागितली. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचा मराठी एकीकरण समितीनं निषेध केला. मराठी भाषेच्या अस्मितेशी झालेली तडजोड मान्य नसल्याचं समितीनं स्प्ष्ट केलं. भोजपुरी गाण्यावरील नाच आणि ढोल-ताशा वाजवत झालेला जल्लोष, यावरून मराठी एकीकरण समितीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.


शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबईतील बोरिवली येथील कोरा केंद्र मैदानावर आयोजित केलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप सोहळ्यात भोजपूरी गाण्यांवर बीभत्स डान्स झाला. तर मराठी शिकायला एक वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर अमराठी चालकांनी ढोल ताशाांवर जल्लोष केला. या दोन्ही घटनांमुळे मराठी माणूस निश्चितच दुखावला गेला आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची ऐतिहासिक हुतात्मा स्मारक परिसरात जाऊन माफी मागण्यात आली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी ज्या 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, त्यांची भाषा मराठी होती. आणि त्याच मराठीला आता मुंबईत विरोध होत असल्याचं भीषण दृश्य महाराष्ट्रानं पाहिलं.

स्वातंत्र्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली. 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई राज्याची स्थापना झाली. त्यात मराठी-गुजराती भाषिक प्रदेशांचा समावेश होता आणि मुंबई राजधानी होती. 1956 ते 1960 या चार वर्षात संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक आंदोलनं झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीनं निवडणुकांमध्येही यश मिळवलं. 106 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं. परिणामी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना  झाली.
असा लढा देणाऱ्या मराठी भाषकांच्या राजधानीत आता मराठी शिकायला विरोध करून भोजपुरी गाण्यांवर जल्लोष होतोय, ही बाब मराठी माणसाच्या काळजाला डागण्या देणारी आहे.

मुंबई राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे मोरारजी देसाई यांनी गुजरातसाठी मराठी माणसांवर गोळीबार केला होता. आता यूपी, बिहारसाठी पुन्हा मराठी माणसावर गोळीबार होईल का? अर्थात तशी शक्यता आता नाही. कारण मराठी माणूस त्याच्या भाषेसाठी पेटून उठण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसात एकी होती. आता सत्ता आणि मतांसाठी राजकीय पक्ष बोटचेपी भूमिका घेत आहेत. त्यामुळे मराठी माणसाला लढा देण्यासाठी कोणतंही राजकीय नेतृत्व दिसत नाही. मुंबई आणि परिसरात तयार झालेली व्होट बँक मराठी माणूस, महाराष्ट्राच्या मुळावर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्वात आधी हा धोका ओळखून इशारा दिला होता. मात्र आता वेळ निघून गेली आहे.

एकंदरीतच, भाषा फक्त संवादाचं माध्यम नाही. भाषा संस्कृती टिकवून ठेवते. मुंबईवरील मराठी संस्कृतीचा ठसा कायम ठेवायचा असेल तर मराठीच या शहराची भाषा असायला हवी. मात्र मराठीला विरोध होत असेल, मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेतली जात असेल तर, मराठी भाषा टिकणार नाही, मराठी संस्कृतीही लयास जाईल. हे टाळायचं असेल तर, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांची मराठी भाषा मुंबईत बोललीच गेली पाहिजे.

#मराठी  #संगो  #मुंबई #मराठीमाणूस