Sunday, June 26, 2016

भाजपा के शोले


(स्थळ 120 रुपयात गुजराती थाळी मिळणारं हॉटेल)

गब्बर शहा - दसरा कब है दसरा ?

सांबा माधव - पण सिनेमात तर होळी होती ना ?

गब्बर शहा - हमारी संघपर निष्ठा हैं. और दसरा ही हमारे लिये सबसे बडा त्यौहार है. ये तुम कभी मत विसरा.

सांबा माधव - चुकीला माफी असावी सरदार.

गब्बर शहा - अरे वो सांबा, कितने चुनाव जिते है हम ?

सांबा माधव - लोकसभा आणि त्यानंतरच्या सुमारे 6 विधानसभा जिंकलोत सरदार. (सांबाला हरलेल्या विधानसभा सांगायच्या असतात पण सरदार खुश होणार नाही, म्हणून मनोगत दाबून ठेवतो.)

गब्बर शहा - सुअर के बच्चो. महाराष्ट्र में रोज हमारी सच्चाई का सामना हो रहा हैं.

सांबा माधव - सरदार, मी मनोगतमधून रोखठोक दणके दिले आहेत.

गब्बर शहा - तुम्हाला काय वाटलं सरदार खुश होईल ? शाबासकी देईल ?

सांबा माधव - सरदार मी आपलं मीठ खाल्लंय.

गब्बर शहा - आता खाकरा खा, भूल्यो गोली खा.

तितक्यात जयची एन्ट्री होते.

जय फडणवीस - सरदार तुम्ही निझामाच्या बापासारखी कृती करू नका. एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब छोटे सरदार आहेत. त्यात तुम्हालाही सरदार म्हणायचं. मोठा गोंधळ उडतोय आमचा.

एकनाथ ठाकूर - सरदार हे पाहा. जय अजून गोंधळलेलाच आहे. आणि माझा महसूल तोडून तुम्ही माझे हातच तोडून टाकलेत.

जय फडणवीस - वीरू या संकटात मला हात दे.

वीरू बापट - आता मी कोणालाही हात देणार नाही. किंवा कोणाचाही हात हातात घेणार नाही.

गब्बर शहा - 50-50 मैल अंतरावर जेव्हा कोणी मोठी व्यक्ती झोपत नाही तेव्हा त्याला तुझ्या अकाऊंटला 15 लाख जमा होणार असल्याची बतावणी करून झोपी लावतात. आणि तुम्ही त्या 'उठा'ला आडवा करू शकत नाही.

सुरमा सोमय्या - सरदार, बीएमसीतल्या घोटाळ्याची चौक्शी करण्यासाठी एसआयटी स्थापन करा. लोकलचे डबे भरून पुरावे देण्याची माझीई तैय्यारी आहे.

रामूकाका दानवे - म्या सांबाला सांगितलं होतं, तुह्या मनोगतानं वाघवाले फक्त बिचकले पाह्यजे. पण सांब्यानं वाघाच्या शेपटावर पाय टाकून महाच चकवा केला राव.

गब्बर शहा - आता माझा गुजराती सल्ला ऐका. वाघवाल्यांना आपल्या दुकानातून पाह्यजे तितका माल उधारीवर द्या. उधारी वाढू द्या. वाघ काय पळून जाणार नाही. मग नंतर हिशेब पुरा करू..

तितक्यात वेटर बिल घेऊन येतो. जय मीटिंग असल्याचं सांगून काढता पाय घेतो. गाडीची चावी माझ्याकडे असल्याचं सांगत वीरू पाय काढतो. तितक्यात सुरमाला कोणत्या तरी चॅनेलवर फोनोसाठी थ्रू केलं जातं. सांबा त्याची काळी-पांढरी दाढी खाजवत मनोगतसाठी दुसरा लेख लिहायला बसतो. ठाकूरला हात नसल्यानं तो खिशात हात घालू शकत नाही. तर रामूकाका दानवे कधीच चकवा देऊन गायब झालेले असतात.

गब्बर शहा - (स्वगत) हे बिल मला द्यावं लागतंय. ही माझी फौज चांगलीच बिलंदर निघाली. गुजरात्याला बिल द्यायला लावू शकतात तर हे बिलंदर अजून बरंच काही करू शकतात, या विचारात गब्बर गढून जातो.

Sunday, February 14, 2016

असुरक्षित भारत !


जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये देशाच्या विरोधात झालेली घोषणाबाजी, अफजल गुरू आणि मकबूल भटचा शहीद असा केलेला उल्लेख हा आगामी काळात देशात यादवी माजू शकते याचीच चिन्हं म्हणावी लागतील.
जेएनयूत अफजल गुरूसाठी झालेल्या कार्यक्रमाला  पाकिस्तानातला दहशतवादी हफीज सईदचा पाठिंबा होता. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिलीय. त्यामुळे जेएनयूतल्या राष्ट्रद्रोह्यांचे धागे-दोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचलेले असल्याचं स्पष्ट होतं. मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड आहे.
श्रीनगरमध्ये दर शुक्रवारी युवक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरतात. तिथं पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकावले जातात. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. मात्र आपले जवान त्या देशद्रोह्यांवर फक्त अश्रूधुराचा मारा करतात. यामुळे दिवसेंदिवस राष्ट्रद्रोही शक्तींची हिंमत वाढत चालली आहे. श्रीनगरमधल्या देशद्रोह्यांना गोळ्या घातल्या असत्या तर, जेएनयूमधली पाकिस्तान धार्जिणी पिलावळ वळवळली नसती. अफजल गुरू आणि मकबूल भटचे फोटो खुलेआमपणे मिरवले नसते. "काश्मीर की आझादी तक जंग चलेगी, भारत की बरबादी तक जंग चलेगी", अशी घोषणा देण्याची हिंमत झाली नसती.
देशद्रोह्यांची हिंमत अशीच वाढत गेली तर देशात सशस्त्र उठाव होण्याची भीती नाकारता येत नाही.
विद्यापीठांमध्ये राष्ट्रद्रोही कार्यरत आहेत. यावरून राष्ट्रद्रोह्यांची संख्या किती वाढली आहे, याचा अंदाज करता येतो. पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राची तर ही भारतातली मोठी 'संपत्ती'च म्हणावी लागेल. पाकिस्तानने जर भारतावर हल्ला केला तर, त्यांना साथ देण्यासाठी हेच राष्ट्रद्रोही पुढे सरसावणार नाहीत हे कशावरून ? नाही तरी त्यांनी दिलेली, "भारत की बरबादी तक जंग चलेगी" ही घोषणा तेच सांगते. भारतापुढे मोठं भीषण संकट उभं ठाकलेलं आहे. राष्ट्रद्रोही, देशाच्या एकात्मतेवर उठलेले (काही) पुरोगामी, देशातल्या अतिरेकी संघटना, त्यांचे स्लीपर सेल, अतिरेक्यांचे समर्थक, नक्षलवादी, माओवादी, बांगलादेशातून आलेले घुसखोर, ईशान्य भारतात वाढलेले बांगलादेशी या सर्व भारतविरोधी  शक्ती उठाव करण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही.
भारतात नेहमी घातपाती कारवाया करणारा पाकिस्तान या सर्वांना साथ देतोच आहे. कारण या देशाचे तुकडे करणे हा पाकिस्तानचा हेतू लपलेला नाही. आणि देशातच निपजलेल्या राष्ट्रद्रोह्यांनाही देशाचे तुकडेच करायचे आहेत. राजकीय पक्षांमधले मतभेदही पाकिस्तानच्या पथ्यावरच पडणारे आहेत. जेएनयूमध्ये गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चकार शब्दानंही अफजल गुरूचा उदोउदो करणारे, देशविरोधी घोषणा देणारे यांचा निषेध केला नाही. ही बाबही सर्व देशवासियांना धक्का देणारी होती.
ज्या देशात अफजल गुरू, मकबूल भट, इशरत जहाँला शहीद संबोधणारी औलाद पैदा होते, त्या देशाचा भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे, असं म्हणता येईल का ?

Friday, February 12, 2016

जेएनयूतले राष्ट्रद्रोही


"काश्मीर की आझादी तक जंग चलेगी, भारत की बरबादी तक जंग चलेगी‘...ही घोषणा पाकिस्तानात नव्हे तर जेएनयूच्या कॅम्पसमध्ये खुलेआमपणे देण्यात आली. ‘द कंट्री विदाउट ए पोस्ट ऑफिस’ या शिर्षकाखाली जेएनयूमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केल्याचा दावा विद्यार्थी करत होते. मात्र सांस्कृतिक कार्यक्रमाची झूल पांघरूण देशविरोधी वक्तव्य तिथं केली गेली. त्यासाठी मुहूर्त निवडला गेला होता तो, 9 फेब्रवारीचा. याच दिवशी तीन वर्षांपूर्वी अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आलं होतं. अफजल गुरू हा भारतीय न्यायव्यवस्थेचा बळी असल्याचा आरोप करण्यात आला. इतक्यावरच ही राष्ट्रद्रोही मंडळी थांबली नाही. 'अफजल हम तुम्हारे अरमानो को मंजिलों तक पहूँचायेंगे', अशी घोषणाबाजी करून संसदेवर पुन्हा हल्ला करण्याची गर्भित धमकीच देण्यात आली.
 11 फेब्रुवारी 1984 रोजी दहशतवादी मकबूल भटला फासावर लटकवण्यात आलं होतं. भारतीय विमानाचं अपहरण, ब्रिटनमधल्या भारतीय उच्चायुक्तातील अधिकारी रवींद्र म्हात्रे यांची हत्या यात मकबूल भटचा सहभाग होता. तर संसदेवरील हल्ल्यात अफजल गुरू दोषी होता. मात्र या दोन्ही दहशतवाद्यांचं उदात्तीकरण सुरू होतं.
भारत सरकार देत असलेल्या निधीतून हे विद्यार्थी जेएनयूमध्ये शिक्षण घेतात. हा निधी सामान्य जनतेनं दिलेल्या कराच्या रूपातून येतो. आणि घेतलेल्या या शिक्षणाचा वापर हे विद्यार्थी देशाच्या विरोधात करतात, असंच यातून स्पष्ट होतं. भारतीयांच्या पैशावर पोसलेली ही औलाद आता देशाच्या विरोधातच गरळ ओकू लागली आहे. विद्यापीठ म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं ठिकाण होय. मात्र या ठिकाणी तर चक्क राष्ट्रविरोधी शक्ती एकत्र येत असल्याचं चित्र आहे. सियाचीनमध्ये सीमेचं रक्षण करताना बर्फाखाली गाडले गेलेले हणमंतप्पांवर दिल्लीत त्यावेळी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढत होते. तर दुसरीकडे फ्रीडम ऑफ स्पिचच्या नावाखाली जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी शक्ती देशाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात धन्यता मानत होती. या असल्या राष्ट्रविरोधी शक्तींवर सरकारने कठोर कारवाई करून त्यांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे. ज्यामुळे नंतर कोणी अशी हिंमत करण्याचं स्वप्नही पाहणार नाही.

Wednesday, January 13, 2016

ब्रेकिंग न्यूज !



शिफ्ट मॉर्निंग असो की इव्हिनिंग, नाही तर नाईट. शिफ्ट या कधीच चुकत नाहीत. आणि चुकत नाहीत त्या ब्रेकिंग न्यूजही.
ब्रेकिंग न्यूज येते ती वादळासारखी. आणि एका क्षणात न्यूजरूममधलं वातावरण बदलून जातं. असाईनमेंटकडून एकाचवेळी ऑक्टोपसवर फ्लॅश टाकले जातात आणि तोंडीही ब्रेकिंग सांगितली जाते. ब्रेकिंग सांगण्याची ही नवी पद्धत आहे. (ऑक्टोपस हे एक सॉफ्टवेअर आहे. त्यात बुलेटिन लावलं जातं. स्क्रिप्ट केली जाते. ऑनलाईन ग्राफिक्स केलं जातं.) त्याचवेळी आऊटपूटची टीमही दणादण ब्रेकिंग बडवायला सुरुवात करते. बातमी फक्त आपल्याकडे आहे. आधी ब्रेक करा. व्हिज्युअल्स येत आहेत. अशी वर्दी असाईनमेंटकडून दिली जाते. एकच गोष्ट असाईनमेंटकडून तीन-चार जण चार-पाच वेळा ओरडून सांगत असतात. त्यालाही आऊटपूट जोरकसपणे उत्तर देत असतं. व्हिज्युअल्स कधी येणार ते नेमकं सांगा. फक्त रिपोर्टरचा फोनो नको. एक्सपर्टही द्या. नेहमीसारखे फोन कट होणार नाहीत, असं सुनावण्यासही आऊटपूटमधला एखादा मागे-पुढे पाहत नाही. फिल्डवरून लाईव्ह कधी मिळणार ते सांगा.  मात्र ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नसते. त्यामुळे असाईनमेंट काही बोलत नाही. मात्र पुढे कधी तरी त्याचे उट्टे काढले जातात. चुकीला माफी कधीच नसते.
ब्रेकिंग न्यूजच्या वेळेस न्यूजरूममध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो. याला काही सहका-यांची अंधश्रद्धा तितकीच कारणीभूत आहे. जितका गोंधळ जास्त तितकं काम जास्त, अशी काही जणांची असलेली श्रद्धा या गोंधळास जास्त कारणीभूत आहे. चॅनेल कोणतंही असो. असे अंधश्रद्धाळू गोंधळी सगळीकडेच आहेत. अर्थात या गोंधळात शांतपणे काम करणारेच जास्त काम करत असतात. मात्र ते शांत असल्यानं स्वाभाविकपणे त्यांचा आवाज होत नाही. असो. त्यात जर संपादक न्यूजरूममध्ये असतील तर गोंधळ करणा-यांचा आवाज शिगेला पोहोचतो. हे दाखवण्याचं काम आहे, हे जाणकारांच्या लक्षात आलंच असेल.
न्यूजरूममध्ये खणाखणी सुरू असतानाच तिकडे पीसीआरमध्येही घणघोर लढाई सुरू असते. पीसीआरला एकाच वेळी न्यूजरूम, असाईनमेंट, एडिट फ्लोअर टॉक बॅकवरून वेगवेगळी माहिती देत असतो. फोनो, लाईव्ह थ्रू करण्याविषयी असाईनमेंट बोलत असतं. तर ब्रेकिंग, हेडर अपडेट करा. नवी व्हिज्युअल्स घ्या, जुनी घेऊ नका असा संदेश न्यूजरूम देत असतं. तर एडिट फ्लोअरही आलेली नवी व्हिज्युअल्स फटाफट एडिट करून देत असतं. त्यांचाही टॉक बॅकवरून पीसीआरला मारा सुरू असतो. हे सर्व सांभाळत पीसीआरची टीम बुलेटिन ऑन एअर करत असते. अँकरलाही कमांड देत असते. काही सहका-यांना न्यूजरूममध्ये घातलेला गोंधळ कमी वाटतो म्हणून ते पीसीआरमध्ये जाऊनही त्यांच्या शैलीत गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न करतात. मात्र पॅनल प्रोड्युसर खमक्या असेल तर या गोंधळातही बुलेटिन व्यवस्थितपणे करतोच.
तिकडे फिल्डवरून रिपोर्टर उन्हातान्हात फोनवर अपडेट देत असतात. लाईव्ह देत असतात. किती वेळ फोनो, लाईव्ह द्यावं लागेल याची शाश्वती नसते. ब्रेकिंग न्यूजच्या वेळी फिल्डवर रिपोर्टर माहिती देत असतो, त्यामुळेच बातमीला वजण मिळतं.
अशा घणघोर प्रसंगात न्यूजरूम, पीसीआर, असाईमेंट, रिपोर्टर पेटून काम  काम करत असतात. त्याचवेळी   -हस्व, दीर्घ हेरून खिंडीत पकडणारी एक स्वतंत्र ब्रिगेडही त्यांचं अस्तित्व दाखवून देत असते. अर्थात आपल्या चॅनेलवर काही चुकीचं जाऊ नये अशी त्यांची भूमिकाही असू शकते. कारण चुकलेल्या ब्रेकिंग न्यूजचे फोटो निघतात. त्यात प्रतिस्पर्धी चॅनेलमध्ये काम करणारे एकेकाळी आपले असलेले सहकारीच आघाडीवर असतात. आता चॅनेलवॉर म्हटल्यावर थोडीफार मारामार होणारच. मग व्हॉट्सअपवर त्या चुका फिरत राहतात. तेवढीच चर्चा होते. मात्र काम करताना थोडं फार इकडं-तिकडं व्हायचंच. कधी-कधी घाई गडबडीत चुकीचीही ब्रेकिंग दिली जाते. अशा वेळी आपल्या चॅनेलच्या इज्जतचा सवाल असल्यानं शांत बसायचं असतं. पण हीच चूक दुस-या चॅनेलनं केली की मग गावभर बोभाटा होणारच, हे सांगण्याची गरज नाही.
झी 24 तासमध्ये असताना प्रसाद घाणेकर हा आमचा टिकरवरचा सहकारी -हस्व, दीर्घमध्ये निष्णात होता. तो शिफ्टला असला म्हणजे वेलांटी पहिली की दुसरी, ऊकार कोणता द्यायचा ? हे सगळे त्यालाच विचारत. हळूहळू त्याची कीर्ती वाढली. मग त्याला डॉक्टर हे नाव पडलं. घाणेकर असला की ब्रेकिंग बिनचूक जाणार हे नक्की.
हल्ली प्रत्येक चॅनेलमध्ये -हस्व, दीर्घ समजणा-या व्यक्तीला डॉक्टर म्हणतात. घाणेकरला बातम्यांची समज होती. स्क्रिप्टही जमायचं. नंतर तो बुलेटिन प्रोड्युसर झाला, अर्थात त्यासाठी त्याला चॅनेल बदलावं लागलं. आता आमचा tv9 मधला सहकारी, डॉक्टर वैभव देसाई हाही चांगला तयार होत आहे.
आणि हो या -हस्व, दीर्घवरून एक भारी किस्सा आठवला. आमचे एक माजी सहकारी योगेश बिडवई यांनी ज्युनिअर्सला सूचनावजा इशारा दिला होता. विचारणा-याने वेलांटी, ऊकार हा पहिला की दुसरा असा विचारायचं. सांगणारा (म्हणजेच योगेश बिडवई) त्याचं उत्तर -हस्व की दीर्घ असं देणार.
असेच एक माजी सहकारी चंद्रकांत फुंदे यांनीही त्यांच्या स्क्रिप्टमधील फक्त -हस्व, दीर्घ तपासावे कंटेन्टला हात लावायचा नाही, असा थेट इशाराच दिला होता. बिडवई आणि फुंदे ही जोडी अण्णा आणि बाबा नावाने फेमस आहे.
झी 24 तासमध्ये असताना बुलेटिन काढणा-या प्रोड्युसरलाच पीसीआरमध्ये जाऊन फोनो आणि लाईव्ह थ्रू करण्याची काशी करावी लागायची. एकदा बुलेटिन लावल्यानंतर नेहमीप्रमाणे पीसीआरला गेलो. त्या दिवशी जय हो या गाण्यासाठी गुलझार यांना ऑस्कर मिळाला होता. नेहमीप्रमाणे वेगवेगळे फोनो घेतले जात होते. मीच फोनो थ्रू करत होतो. गुलझार यांच्यासारख्याच एका प्रसिद्ध गीतकाराला फोन करून प्रतिक्रिया मागितली. त्या गीतकाराने फोनो मागितल्यावर लगेच फोन आदळून दिला. मोठी व्यक्ती किती खोटी असू शकते हे त्या दिवशी कळालं. त्या मोठ्या व्यक्तीला पुन्हा खोटं पाडण्याची इच्छा नसल्यानं, त्यांच्या नावाचा इथं उल्लेख करत नाही.
झीमध्ये असाईनमेंटची टीम बुलेटिन प्रोड्युसरकडे फोन नंबर द्यायची. त्यातून कधी कधी मोठी गंमत व्हायची. तेव्हाचे मनसेचे आमदार राम कदम यांनी कोणतं तरी आंदोलन केलं होतं. त्यावर त्यांचा फोनो घ्यायचा होता. असाईनमेंटने दिलेल्या नंबरवर मी कॉल केला. म्हटलं सर तुम्ही जे आंदोलन केलंय त्यावर तुमचा फोनो हवा आहे. त्यावर पलीकडून आवाज आला, मी तर घरीच बसलो आहे. कोणतंही आंदोलन केलेलं नाही. मग मी विचारलं आपण राम कदम बोलत आहात का ? उत्तर आलं, रामदास कदम. मग मी सॉरी म्हणून फोन ठेवून दिला. बडे बडे चॅनेल में छोटी छोटी चूक होती रहती है. काय ?
ब्रेकिंग न्यूजमुळे न्यूजरूममध्ये असाईनमेंट आणि आऊटपूट एकाच वेळी कामाला (त्याला चॅनेलच्या बोलीभाषेत धंद्याला म्हणतात.) लागलेलं असतात. मात्र त्यावेळीही इतक्या गोंगाटात फिचर्स, स्पोर्टस् आणि इंटरटेन्मेंटची टीम शांत असते. त्यांच्यावर या गोंधळाचा काही परिणाम होत नाही. अर्थात ते काही टाईमपास करत नसतात. तेही त्यांच्या शोचं काम करत असतात. हेच त्यांच्या शांततेचं रहस्य असतं.
ब्रेकिंग न्यूजच्या वेळी खरा कस लागतो तो, अँकरचा. कारण सुरुवातीला आलेली बातमी अतिशय त्रोटक असते. एका लाईनच्या माहितीवर बुलेटिन खेचायचं असतं. अनुभवी अँकर या समरप्रसंगी त्यांचं कौशल्य दाखवून देतात. रिपोर्टर आणि तज्ज्ञांना विविध प्रश्न विचारून बुलेटिन प्ले अप केलं जातं. अर्थात कधी कधी प्रश्नांची पुनरावृत्तीही केली जाते, हा भाग वेगळा. आणि जर मोठ्या ब्रेकिंगच्या वेळी नवीन अँकर असेल तर प्रोड्युसर आणि वरिष्ठ अँकरला पीसीआरमध्ये धाव घ्यावी लागते. टॉकबॅकवरून प्रश्न सांगून वेळ मारून न्यावी लागते. काही वेळात ब्रेकिंग असणा-या न्यूजचे व्हिज्युअल्स येतात. मग त्यावर वॉटर मार्क टाकला जातो. रिपोर्टर घटनास्थळी पोहोचून लाईव्ह द्यायला सुरुवात करतात. लाईव्ह संपेपर्यंत डेस्कवरील सहकारी पॅकेज तयार करतात. आणि एका ब्रेकिंगपासून सुरू झालेला प्रवास पॅकेजवर संपतो. बातमी मोठी असेल तर दोन ते तीनही पॅकेज बदडले जातात.

मी एकदा नाईट शिफ्टला असताना उपोषणाला बसलेले बाबा रामदेव असेच पसार झाले होते. तेव्हा एकच हल्लकल्लोळ उडाला होता. मग काय रात्रीपासूनच ब्रेकिंग सुरू झाल्या होत्या. 2009 मध्ये पाकिस्तानात श्रीलंकेच्या टीमवर हल्ला झाला होता. त्यावेळी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत मी पीसीआरमध्येच होतो. तिथेच बसून फोनो आणि लाईव्ह थ्रू करत होतो. ना नाष्टा, ना जेवण, ना सुसू ब्रेक. पार वाट लागली होती. तसंच 9/11, त्सुनामी, राम मंदिराचा निकाल, लोकसभा-विधानसभा-पालिका निवडणुकांचे निकाल, विलासराव देशमुखांचं निधन, गोपीनाथ मुंडेंचं निधन या ब्रेकिंग करणं सोपं नव्हतं.
मात्र काही सहकारी यातही भाग्यवान आहेत. त्यांना ब्रेकिंग न्यूज येणार आहे याची आधीच माहिती असते का ? अशी शंका येते. कारण ज्या दिवशी ब्रेकिंग असते त्या दिवशी यांचा विकली ऑफ असतो किंवा ते रजेवर असतात.
ब्रेकिंगचं प्रेशर सर्वात जास्त असतं ते त्यावेळी रनडाऊनवर असलेल्या बुलेटिन प्रोड्युसरवर. कारण त्याला त्या क्षणी येणारी सर्व माहिती सेकंदात ऑन एअर करायची असते. त्याचवेळी संपादक, शिफ्ट इन्चार्ज, असाईनमेंट यांच्याकडून सातत्याने माहिती, सूचना यांचा मारा सहन करत ब्रेकिंग अपडेट करायची असते.  फोनो, लाईव्ह फटाफट घ्यायचे असतात. एक ब्रेकिंग संपली म्हणजे काम संपत नाही. कारण पुढची ब्रेकिंग कोणत्याही क्षणी येणार असते.

Monday, December 7, 2015

चहा आणि मी !

पहिलं प्रेम सगळ्यांना आठवतं. मात्र पहिला चहा कधी प्यायलो हे कोणालाही आठवणार नाही. मलाही आठवत नाही. पण बहुतेक दुधाचे दात पडल्यानंतर चहाच्या बशीला तोंड लावलं असण्याची शक्यता आहे. प्रत्येक पालकांना त्यांचं मुलं गुटगटीत असावं असं वाटतं. त्यामुळे चहा पिऊ नये, हे बिंबवलं जातं. बोर्नव्हिटा टाकून दिलं जाणारं दूध मी लहानपणी प्यायचो. अर्थात त्यामुळे माझी प्रकृती काही सुधारली नाही. पण बोर्नव्हिटाचा खोटेपणा उघड झाला. बोर्न असताना आपण जे असतो तेच खरं, बाकी व्हिटा-बिटाचं काही खरं नसतं.
लहानपणी कोणाच्या घरी गेल्यावर चहा प्यायचा नाही, असं बजावून सगळे बाहेर पडायचो. मी कितीही आग्रह केला तरी चहा घ्यायचो नाही. मात्र माझा लहाना भाऊ नाही-नाही म्हणत बशी ओढायचा. अर्थात घरी आल्यानंतर त्याला त्याच्या चहाकर्माची फळं मिळायची.
सहावीत असताना मी चहा तयार करायला शिकलो. आमच्या शेजारी राहणा-या गरड काकू, जाधव काकू, बनकर काकू आईकडे गप्पा मारायला यायच्या. मी त्यांना चहा करायचो. काकू मंडळीही 'संतोष चांगला चहा करतो', असं म्हणायच्या. मग मी अधिक उत्साहाने विलायची, अद्रक टाकून मस्त चहा करायचो. कधी-कधी गवती चहाही टाकायचो. आमच्या छोट्या गल्लीत माझं मोठं नाव झालं.
सकाळी शाळेत जाताना थंडीत आईने करून दिलेल्या चहाची चव आजही आठवते. शाळेत असताना पॉकेट मनी ही संकल्पना आमच्या घरात रूढ झालेली नव्हती. परिचितांपैकी कोणाकडेही तसले फॅड नव्हते. त्यामुळे कधी तरी मिळालेले पैसे वाचवून हिवाळ्यात शाळे शेजारच्या टपरीवर चहा पिताना भारीच मजा वाटायची. साधारणपणे आठवी-नववीत असताना बाहेरचा चहा सुरू झाला.
अकरावीत कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या कॅन्टीनवर नियमीतपणे चहा घ्यायला सुरूवात झाली. मात्र चहाचं बिल कोणी द्यायचं यावरून बराच वेळ मित्रांची वादावादी व्हायची. चहाच्या चवीबरोबर गप्पा रंगत जायच्या. आता कॉलेजमध्ये कोणत्या गप्पा रंगतात त्याचा उल्लेख न करताही तुन्हाला ते कळेलच. मित्रांबरोबर फिरताना शहरात कोणत्या ठिकाणी चहा चांगला मिळतो हे ही कळायला लागलं. कधी-कधी जालन्याला माझा मित्र संभाजी शिरसाठकडे जाणं व्हायचं. तोही अट्टल चहाबाज. जालन्यातल्या सर्व फेमस ठिकाणी चहा घेण्याचा योग आला. अमरावतीमध्ये नोकरीच्या निमित्ताने चहाची सर्व चांगली ठिकाणी पादाक्रांत करून चहाचा आस्वाद घेतला. अर्थात या कामात आशिष यावलेची मदत झाली. आशिष चहा घेत नव्हता, मात्र चहा कुठे चांगला मिळतो हे त्याला माहित होते. एक सांगतो, गावाकडे गेल्यानंतर चुलीवर जो चहा केला जातो त्या चहाची लज्जत काही औरच.
चहा हा चहाच असतो. मात्र घरचा चहा वेगळा. ऑफिसच्या कॅन्टीनचा सर्वात वेगळा. ऑफिसच्या कॅन्टीनचा चहा म्हणजे कधीतरी चांगला होणार चहा असंच म्हणावं लागेल. मला वाटतं सर्व ऑफिसमध्ये असाच अनुभव येत असेल. चहा सर्वत्र मिळतो पण त्या ठिकाणानुसार त्याची चव बदलते. वाईट अनुभव येतो तो रेल्वे प्रवासात मनमाडला. दरवेळी तिथला तोंडाची चव बिघडवणारा चहा मी नव्या उत्साहानं घेतो, आणि तो चहा दरवेळी माझा उत्साहघात करतो.
मुंबईतही अनेक ठिकाणी चहा घेतला. पण चिंचपोकळी परिसरात गवतीचहा आणि अद्रक टाकून तयार केलेला जो चहा मनाला भावला तसा चहा मुंबईत इतरत्र कुठेही मिळाला नाही. आणि हो मी अजूनही घरी रोज चहा करतो. मुंबईत प्रतीक्षानगरला आलात तर घरी या. मग आपण चहा घेऊ.

Sunday, November 29, 2015

चहा, आमीर, माहेर





मुलगा रोज सकाळी साडेआठ वाजता शाळेत जातो. तसा साडेसात वाजता एक चहा होतो. पण तो घाई-गडबडीतला चहा. चहा पिणं ही सुद्धा एक शास्त्रोक्त कला आहे. त्यामुळे मुलगा शाळेच्या स्कूल बसमधून रवाना झाल्यानंतर दुसरा चहा घेणं क्रमप्राप्त ठरतं. चहाचे घोट घेताना पेपरमध्ये आलेल्या वेगवेगळ्या बातम्या वाचणंही सुरूच असतं. कितीही असहिष्णुतेची चर्चा असली तर पेपर वाचतोच. आमीर खानची पत्नीही पेपरमधल्याच बातम्या वाचून बेचैन झाली होती. ती मग आमीरला मुलांच्या सुरक्षिततेसाठी परदेशात जाऊ या का, असं म्हणाली. मग काय एकच गदारोळ उडाला.
घरातली गोष्ट बाहेर येऊ द्यायची नसते, या उक्तीचा प्रत्यय आमीरला (माहित असेल तर) आला असेल. संसारात झाकली मूठ महत्त्वाची असते. तसं पाहिलं तर हा आमीरचा दुसरा संसार. मोठा माणूस म्हटल्यावर संसाराची संख्याही वाढत जाऊ शकते. अर्थात तो काही नियम नाही. पण कितीही संसार झाले तरी पतीनं शांतपणे ऐकून घ्यावं आणि बाहेर बोलू नये, हे संसारातलं शाश्वत सत्य.हे सत्य मला पहिल्याच संसारात कळालं. 

त्यामुळे मी पत्नीला विचारलं, पेपरमधल्या बातम्या वाचून तूझं मत काय ? तेव्हा पत्नी म्हणाली, मुख्य पेपरला लगेच हात लावायचाच नाही. आधी पुरवणी वाचा. सखी, मैत्रीण, सई टाईपच्या पुरवण्या वाचा. मग विवा, आरोग्याचा ओवा वाचा. त्यानंतर हॅलो, टुडे सारखं इंग्रजी शिर्षक असलेलं काही तरी वाचा. त्यानंतर मुख्य पेपर वाचा आणि लगेच कामाला लागा. कारण पेपर काढणं हा एक बिझनेस आहे. तुम्ही नाही का चॅनेलमध्ये बुलेटिन काढता तसं. मग काय चहाने नाही, पण पत्नीच्या बोलण्याने किक बसली.
स्वत:ला सावरत पत्नीला विचारलं, या वातावरणात देश सोडून जावं असं तुला वाटतं का ? त्यावर पत्नी म्हणाली, फक्त दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी नेत जा. सामान्य पत्रकाराची सामान्य पत्नी.

Friday, October 30, 2015

युतीला सत्ता कळेना ? (अचूक मारा - 5)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने पंधरा वर्ष राज्यावर सत्ता गाजवली. त्यांच्यातही धुसफूस सुरू असायची. अनेक वादाचे प्रसंग यायचे. मात्र किती ताणायचं आणि कधी सोडायचं यात आघाडीवाले बनेल होते. यात वादच नाही. पंधरा वर्ष विरोधी बाकांवर बसलेले शिवसेना-भाजप सख्ख्या भावाप्रमाणे सरकारच्या विरोधात रान उठवायचे. मात्र आता सत्ता आल्यावर हे दोघे सख्खे भाऊ पक्के वैरी झालेत.
वर्षपूर्ती होत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र सरकारलाच रस्त्यावर आणण्याची भाषा केली आहे. भाजपचे मंत्री वर्षपूर्तीच्या सोहळ्यात रंगलेले असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपचा रंग खरडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. अर्थात याला भाजपचे बनेल नेतेही कारणीभूत आहेतच. मोदींच्या नेतृत्त्वात भाजपला लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. या यशानं उत्साहित झालेल्या भाजपनं राज्यातली शिवसेने बरोबरची युती तोडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. भाजपनं स्वबळावर 122 जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीनंही आश्चर्यकारकरित्या राज्यात स्थिर सरकारची भाषा सुरू केली. त्यामुळे 63 जागा मिळवूनही शिवसेनेला किंमत मिळाली नाही. भाजप आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेचा चांगलाच राजकीय गेम केला. मुख्यमंत्र्यांबरोबर फक्त भाजपच्याच मंत्र्यांचा शपथविधी झाला. नंतर विस्तारात शिवसेनेला सामावून घेण्यात आलं. त्यातही हवी ती खाती मिळाली नाही. मंत्र्यांची संख्याही कमी ठेवण्यात आली. यामुळे शिवसेना दुखावली गेली. शिवसेनेची धुसफूस सुरूच राहिली. वाढत्या महागाईमुळे जनतेतही सरकारच्या विरोधात रोष निर्माण झालाय. डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी त्यात तेल ओतण्याचं काम केलं. त्यामुळे आपण सरकारपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याची आयतीच संधी शिवसेनेला मिळाली. त्या बरोबरच गुलाम अलींच्या मैफलीला विरोध, पाकिस्तानी कलाकारांना विरोध, सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक ही जुनी विरोधाची हत्यारं बाहेर काढून भाजपचा होईल तितका मूखभंग करणंही शिवसेनेनं सुरूच ठेवलं. सरकारमध्ये दिलेला अल्प वाटा, वारंवार करण्यात आलेला अपमान याचा बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारला रस्त्यावर आणण्याचा इशारा दिल्याचं स्पष्टच आहे.  आता खरंच कोण कोणाला रस्त्यावर आणतं हे लवकरच स्पष्ट होईल.