शिफ्ट मॉर्निंग असो की इव्हिनिंग, नाही तर नाईट. शिफ्ट या कधीच चुकत नाहीत. आणि चुकत नाहीत त्या ब्रेकिंग न्यूजही.
ब्रेकिंग न्यूज येते ती वादळासारखी. आणि एका क्षणात न्यूजरूममधलं वातावरण बदलून जातं. असाईनमेंटकडून एकाचवेळी ऑक्टोपसवर फ्लॅश टाकले जातात आणि तोंडीही ब्रेकिंग सांगितली जाते. ब्रेकिंग सांगण्याची ही नवी पद्धत आहे. (ऑक्टोपस हे एक सॉफ्टवेअर आहे. त्यात बुलेटिन लावलं जातं. स्क्रिप्ट केली जाते. ऑनलाईन ग्राफिक्स केलं जातं.) त्याचवेळी आऊटपूटची टीमही दणादण ब्रेकिंग बडवायला सुरुवात करते. बातमी फक्त आपल्याकडे आहे. आधी ब्रेक करा. व्हिज्युअल्स येत आहेत. अशी वर्दी असाईनमेंटकडून दिली जाते. एकच गोष्ट असाईनमेंटकडून तीन-चार जण चार-पाच वेळा ओरडून सांगत असतात. त्यालाही आऊटपूट जोरकसपणे उत्तर देत असतं. व्हिज्युअल्स कधी येणार ते नेमकं सांगा. फक्त रिपोर्टरचा फोनो नको. एक्सपर्टही द्या. नेहमीसारखे फोन कट होणार नाहीत, असं सुनावण्यासही आऊटपूटमधला एखादा मागे-पुढे पाहत नाही. फिल्डवरून लाईव्ह कधी मिळणार ते सांगा. मात्र ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नसते. त्यामुळे असाईनमेंट काही बोलत नाही. मात्र पुढे कधी तरी त्याचे उट्टे काढले जातात. चुकीला माफी कधीच नसते.
ब्रेकिंग न्यूजच्या वेळेस न्यूजरूममध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो. याला काही सहका-यांची अंधश्रद्धा तितकीच कारणीभूत आहे. जितका गोंधळ जास्त तितकं काम जास्त, अशी काही जणांची असलेली श्रद्धा या गोंधळास जास्त कारणीभूत आहे. चॅनेल कोणतंही असो. असे अंधश्रद्धाळू गोंधळी सगळीकडेच आहेत. अर्थात या गोंधळात शांतपणे काम करणारेच जास्त काम करत असतात. मात्र ते शांत असल्यानं स्वाभाविकपणे त्यांचा आवाज होत नाही. असो. त्यात जर संपादक न्यूजरूममध्ये असतील तर गोंधळ करणा-यांचा आवाज शिगेला पोहोचतो. हे दाखवण्याचं काम आहे, हे जाणकारांच्या लक्षात आलंच असेल.
न्यूजरूममध्ये खणाखणी सुरू असतानाच तिकडे पीसीआरमध्येही घणघोर लढाई सुरू असते. पीसीआरला एकाच वेळी न्यूजरूम, असाईनमेंट, एडिट फ्लोअर टॉक बॅकवरून वेगवेगळी माहिती देत असतो. फोनो, लाईव्ह थ्रू करण्याविषयी असाईनमेंट बोलत असतं. तर ब्रेकिंग, हेडर अपडेट करा. नवी व्हिज्युअल्स घ्या, जुनी घेऊ नका असा संदेश न्यूजरूम देत असतं. तर एडिट फ्लोअरही आलेली नवी व्हिज्युअल्स फटाफट एडिट करून देत असतं. त्यांचाही टॉक बॅकवरून पीसीआरला मारा सुरू असतो. हे सर्व सांभाळत पीसीआरची टीम बुलेटिन ऑन एअर करत असते. अँकरलाही कमांड देत असते. काही सहका-यांना न्यूजरूममध्ये घातलेला गोंधळ कमी वाटतो म्हणून ते पीसीआरमध्ये जाऊनही त्यांच्या शैलीत गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न करतात. मात्र पॅनल प्रोड्युसर खमक्या असेल तर या गोंधळातही बुलेटिन व्यवस्थितपणे करतोच.
तिकडे फिल्डवरून रिपोर्टर उन्हातान्हात फोनवर अपडेट देत असतात. लाईव्ह देत असतात. किती वेळ फोनो, लाईव्ह द्यावं लागेल याची शाश्वती नसते. ब्रेकिंग न्यूजच्या वेळी फिल्डवर रिपोर्टर माहिती देत असतो, त्यामुळेच बातमीला वजण मिळतं.
अशा घणघोर प्रसंगात न्यूजरूम, पीसीआर, असाईमेंट, रिपोर्टर पेटून काम काम करत असतात. त्याचवेळी -हस्व, दीर्घ हेरून खिंडीत पकडणारी एक स्वतंत्र ब्रिगेडही त्यांचं अस्तित्व दाखवून देत असते. अर्थात आपल्या चॅनेलवर काही चुकीचं जाऊ नये अशी त्यांची भूमिकाही असू शकते. कारण चुकलेल्या ब्रेकिंग न्यूजचे फोटो निघतात. त्यात प्रतिस्पर्धी चॅनेलमध्ये काम करणारे एकेकाळी आपले असलेले सहकारीच आघाडीवर असतात. आता चॅनेलवॉर म्हटल्यावर थोडीफार मारामार होणारच. मग व्हॉट्सअपवर त्या चुका फिरत राहतात. तेवढीच चर्चा होते. मात्र काम करताना थोडं फार इकडं-तिकडं व्हायचंच. कधी-कधी घाई गडबडीत चुकीचीही ब्रेकिंग दिली जाते. अशा वेळी आपल्या चॅनेलच्या इज्जतचा सवाल असल्यानं शांत बसायचं असतं. पण हीच चूक दुस-या चॅनेलनं केली की मग गावभर बोभाटा होणारच, हे सांगण्याची गरज नाही.
झी 24 तासमध्ये असताना प्रसाद घाणेकर हा आमचा टिकरवरचा सहकारी -हस्व, दीर्घमध्ये निष्णात होता. तो शिफ्टला असला म्हणजे वेलांटी पहिली की दुसरी, ऊकार कोणता द्यायचा ? हे सगळे त्यालाच विचारत. हळूहळू त्याची कीर्ती वाढली. मग त्याला डॉक्टर हे नाव पडलं. घाणेकर असला की ब्रेकिंग बिनचूक जाणार हे नक्की.
हल्ली प्रत्येक चॅनेलमध्ये -हस्व, दीर्घ समजणा-या व्यक्तीला डॉक्टर म्हणतात. घाणेकरला बातम्यांची समज होती. स्क्रिप्टही जमायचं. नंतर तो बुलेटिन प्रोड्युसर झाला, अर्थात त्यासाठी त्याला चॅनेल बदलावं लागलं. आता आमचा tv9 मधला सहकारी, डॉक्टर वैभव देसाई हाही चांगला तयार होत आहे.
आणि हो या -हस्व, दीर्घवरून एक भारी किस्सा आठवला. आमचे एक माजी सहकारी योगेश बिडवई यांनी ज्युनिअर्सला सूचनावजा इशारा दिला होता. विचारणा-याने वेलांटी, ऊकार हा पहिला की दुसरा असा विचारायचं. सांगणारा (म्हणजेच योगेश बिडवई) त्याचं उत्तर -हस्व की दीर्घ असं देणार.
असेच एक माजी सहकारी चंद्रकांत फुंदे यांनीही त्यांच्या स्क्रिप्टमधील फक्त -हस्व, दीर्घ तपासावे कंटेन्टला हात लावायचा नाही, असा थेट इशाराच दिला होता. बिडवई आणि फुंदे ही जोडी अण्णा आणि बाबा नावाने फेमस आहे.
झी 24 तासमध्ये असताना बुलेटिन काढणा-या प्रोड्युसरलाच पीसीआरमध्ये जाऊन फोनो आणि लाईव्ह थ्रू करण्याची काशी करावी लागायची. एकदा बुलेटिन लावल्यानंतर नेहमीप्रमाणे पीसीआरला गेलो. त्या दिवशी जय हो या गाण्यासाठी गुलझार यांना ऑस्कर मिळाला होता. नेहमीप्रमाणे वेगवेगळे फोनो घेतले जात होते. मीच फोनो थ्रू करत होतो. गुलझार यांच्यासारख्याच एका प्रसिद्ध गीतकाराला फोन करून प्रतिक्रिया मागितली. त्या गीतकाराने फोनो मागितल्यावर लगेच फोन आदळून दिला. मोठी व्यक्ती किती खोटी असू शकते हे त्या दिवशी कळालं. त्या मोठ्या व्यक्तीला पुन्हा खोटं पाडण्याची इच्छा नसल्यानं, त्यांच्या नावाचा इथं उल्लेख करत नाही.
झीमध्ये असाईनमेंटची टीम बुलेटिन प्रोड्युसरकडे फोन नंबर द्यायची. त्यातून कधी कधी मोठी गंमत व्हायची. तेव्हाचे मनसेचे आमदार राम कदम यांनी कोणतं तरी आंदोलन केलं होतं. त्यावर त्यांचा फोनो घ्यायचा होता. असाईनमेंटने दिलेल्या नंबरवर मी कॉल केला. म्हटलं सर तुम्ही जे आंदोलन केलंय त्यावर तुमचा फोनो हवा आहे. त्यावर पलीकडून आवाज आला, मी तर घरीच बसलो आहे. कोणतंही आंदोलन केलेलं नाही. मग मी विचारलं आपण राम कदम बोलत आहात का ? उत्तर आलं, रामदास कदम. मग मी सॉरी म्हणून फोन ठेवून दिला. बडे बडे चॅनेल में छोटी छोटी चूक होती रहती है. काय ?
ब्रेकिंग न्यूजमुळे न्यूजरूममध्ये असाईनमेंट आणि आऊटपूट एकाच वेळी कामाला (त्याला चॅनेलच्या बोलीभाषेत धंद्याला म्हणतात.) लागलेलं असतात. मात्र त्यावेळीही इतक्या गोंगाटात फिचर्स, स्पोर्टस् आणि इंटरटेन्मेंटची टीम शांत असते. त्यांच्यावर या गोंधळाचा काही परिणाम होत नाही. अर्थात ते काही टाईमपास करत नसतात. तेही त्यांच्या शोचं काम करत असतात. हेच त्यांच्या शांततेचं रहस्य असतं.
ब्रेकिंग न्यूजच्या वेळी खरा कस लागतो तो, अँकरचा. कारण सुरुवातीला आलेली बातमी अतिशय त्रोटक असते. एका लाईनच्या माहितीवर बुलेटिन खेचायचं असतं. अनुभवी अँकर या समरप्रसंगी त्यांचं कौशल्य दाखवून देतात. रिपोर्टर आणि तज्ज्ञांना विविध प्रश्न विचारून बुलेटिन प्ले अप केलं जातं. अर्थात कधी कधी प्रश्नांची पुनरावृत्तीही केली जाते, हा भाग वेगळा. आणि जर मोठ्या ब्रेकिंगच्या वेळी नवीन अँकर असेल तर प्रोड्युसर आणि वरिष्ठ अँकरला पीसीआरमध्ये धाव घ्यावी लागते. टॉकबॅकवरून प्रश्न सांगून वेळ मारून न्यावी लागते. काही वेळात ब्रेकिंग असणा-या न्यूजचे व्हिज्युअल्स येतात. मग त्यावर वॉटर मार्क टाकला जातो. रिपोर्टर घटनास्थळी पोहोचून लाईव्ह द्यायला सुरुवात करतात. लाईव्ह संपेपर्यंत डेस्कवरील सहकारी पॅकेज तयार करतात. आणि एका ब्रेकिंगपासून सुरू झालेला प्रवास पॅकेजवर संपतो. बातमी मोठी असेल तर दोन ते तीनही पॅकेज बदडले जातात.
मी एकदा नाईट शिफ्टला असताना उपोषणाला बसलेले बाबा रामदेव असेच पसार झाले होते. तेव्हा एकच हल्लकल्लोळ उडाला होता. मग काय रात्रीपासूनच ब्रेकिंग सुरू झाल्या होत्या. 2009 मध्ये पाकिस्तानात श्रीलंकेच्या टीमवर हल्ला झाला होता. त्यावेळी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत मी पीसीआरमध्येच होतो. तिथेच बसून फोनो आणि लाईव्ह थ्रू करत होतो. ना नाष्टा, ना जेवण, ना सुसू ब्रेक. पार वाट लागली होती. तसंच 9/11, त्सुनामी, राम मंदिराचा निकाल, लोकसभा-विधानसभा-पालिका निवडणुकांचे निकाल, विलासराव देशमुखांचं निधन, गोपीनाथ मुंडेंचं निधन या ब्रेकिंग करणं सोपं नव्हतं.
मात्र काही सहकारी यातही भाग्यवान आहेत. त्यांना ब्रेकिंग न्यूज येणार आहे याची आधीच माहिती असते का ? अशी शंका येते. कारण ज्या दिवशी ब्रेकिंग असते त्या दिवशी यांचा विकली ऑफ असतो किंवा ते रजेवर असतात.
ब्रेकिंगचं प्रेशर सर्वात जास्त असतं ते त्यावेळी रनडाऊनवर असलेल्या बुलेटिन प्रोड्युसरवर. कारण त्याला त्या क्षणी येणारी सर्व माहिती सेकंदात ऑन एअर करायची असते. त्याचवेळी संपादक, शिफ्ट इन्चार्ज, असाईनमेंट यांच्याकडून सातत्याने माहिती, सूचना यांचा मारा सहन करत ब्रेकिंग अपडेट करायची असते. फोनो, लाईव्ह फटाफट घ्यायचे असतात. एक ब्रेकिंग संपली म्हणजे काम संपत नाही. कारण पुढची ब्रेकिंग कोणत्याही क्षणी येणार असते.
Very true !!
ReplyDeleteAj kay breking garu sir
ReplyDeleteजबरदस्त सर...
ReplyDeleteमस्त आहे.
ReplyDeleteफरच छान
ReplyDelete