Monday, December 7, 2015

चहा आणि मी !

पहिलं प्रेम सगळ्यांना आठवतं. मात्र पहिला चहा कधी प्यायलो हे कोणालाही आठवणार नाही. मलाही आठवत नाही. पण बहुतेक दुधाचे दात पडल्यानंतर चहाच्या बशीला तोंड लावलं असण्याची शक्यता आहे. प्रत्येक पालकांना त्यांचं मुलं गुटगटीत असावं असं वाटतं. त्यामुळे चहा पिऊ नये, हे बिंबवलं जातं. बोर्नव्हिटा टाकून दिलं जाणारं दूध मी लहानपणी प्यायचो. अर्थात त्यामुळे माझी प्रकृती काही सुधारली नाही. पण बोर्नव्हिटाचा खोटेपणा उघड झाला. बोर्न असताना आपण जे असतो तेच खरं, बाकी व्हिटा-बिटाचं काही खरं नसतं.
लहानपणी कोणाच्या घरी गेल्यावर चहा प्यायचा नाही, असं बजावून सगळे बाहेर पडायचो. मी कितीही आग्रह केला तरी चहा घ्यायचो नाही. मात्र माझा लहाना भाऊ नाही-नाही म्हणत बशी ओढायचा. अर्थात घरी आल्यानंतर त्याला त्याच्या चहाकर्माची फळं मिळायची.
सहावीत असताना मी चहा तयार करायला शिकलो. आमच्या शेजारी राहणा-या गरड काकू, जाधव काकू, बनकर काकू आईकडे गप्पा मारायला यायच्या. मी त्यांना चहा करायचो. काकू मंडळीही 'संतोष चांगला चहा करतो', असं म्हणायच्या. मग मी अधिक उत्साहाने विलायची, अद्रक टाकून मस्त चहा करायचो. कधी-कधी गवती चहाही टाकायचो. आमच्या छोट्या गल्लीत माझं मोठं नाव झालं.
सकाळी शाळेत जाताना थंडीत आईने करून दिलेल्या चहाची चव आजही आठवते. शाळेत असताना पॉकेट मनी ही संकल्पना आमच्या घरात रूढ झालेली नव्हती. परिचितांपैकी कोणाकडेही तसले फॅड नव्हते. त्यामुळे कधी तरी मिळालेले पैसे वाचवून हिवाळ्यात शाळे शेजारच्या टपरीवर चहा पिताना भारीच मजा वाटायची. साधारणपणे आठवी-नववीत असताना बाहेरचा चहा सुरू झाला.
अकरावीत कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या कॅन्टीनवर नियमीतपणे चहा घ्यायला सुरूवात झाली. मात्र चहाचं बिल कोणी द्यायचं यावरून बराच वेळ मित्रांची वादावादी व्हायची. चहाच्या चवीबरोबर गप्पा रंगत जायच्या. आता कॉलेजमध्ये कोणत्या गप्पा रंगतात त्याचा उल्लेख न करताही तुन्हाला ते कळेलच. मित्रांबरोबर फिरताना शहरात कोणत्या ठिकाणी चहा चांगला मिळतो हे ही कळायला लागलं. कधी-कधी जालन्याला माझा मित्र संभाजी शिरसाठकडे जाणं व्हायचं. तोही अट्टल चहाबाज. जालन्यातल्या सर्व फेमस ठिकाणी चहा घेण्याचा योग आला. अमरावतीमध्ये नोकरीच्या निमित्ताने चहाची सर्व चांगली ठिकाणी पादाक्रांत करून चहाचा आस्वाद घेतला. अर्थात या कामात आशिष यावलेची मदत झाली. आशिष चहा घेत नव्हता, मात्र चहा कुठे चांगला मिळतो हे त्याला माहित होते. एक सांगतो, गावाकडे गेल्यानंतर चुलीवर जो चहा केला जातो त्या चहाची लज्जत काही औरच.
चहा हा चहाच असतो. मात्र घरचा चहा वेगळा. ऑफिसच्या कॅन्टीनचा सर्वात वेगळा. ऑफिसच्या कॅन्टीनचा चहा म्हणजे कधीतरी चांगला होणार चहा असंच म्हणावं लागेल. मला वाटतं सर्व ऑफिसमध्ये असाच अनुभव येत असेल. चहा सर्वत्र मिळतो पण त्या ठिकाणानुसार त्याची चव बदलते. वाईट अनुभव येतो तो रेल्वे प्रवासात मनमाडला. दरवेळी तिथला तोंडाची चव बिघडवणारा चहा मी नव्या उत्साहानं घेतो, आणि तो चहा दरवेळी माझा उत्साहघात करतो.
मुंबईतही अनेक ठिकाणी चहा घेतला. पण चिंचपोकळी परिसरात गवतीचहा आणि अद्रक टाकून तयार केलेला जो चहा मनाला भावला तसा चहा मुंबईत इतरत्र कुठेही मिळाला नाही. आणि हो मी अजूनही घरी रोज चहा करतो. मुंबईत प्रतीक्षानगरला आलात तर घरी या. मग आपण चहा घेऊ.

1 comment:

  1. चहा भारी झालाय.. संतोषराव

    ReplyDelete