Monday, April 6, 2020

इशारों को अगर समझो...


या दोन फुलांनी हिंदी सिनेमामध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे. साठच्या दशकात जेव्हा हिंदी सिनेमा आजच्या इतका 'खुलला' नव्हता. त्यावेळी प्रेमाचे प्रसंग खुलवण्याची मोठी जबाबदारी या दोन फुलांनी पार पाडली. ही दोन फुलं पडद्यावर आली म्हणजे हिरो-हिरोईन काय करत असतील, याचा प्रत्येकानं आपापल्या बुद्धीप्रमाणे अंदाज लावायचा. एकंदरीतच प्रेक्षकांच्या बुद्धीला चालना देण्याचं काम त्या काळातल्या हिंदी सिनेमानं केलं, असं म्हटलं तरी चालेल.
हिरो हिरोईन बागभर नाचत गाणी म्हणायचे. पण प्रेमाला पुढे नेण्यासाठी बागेतल्या याच दोन फुलांचा आधार घ्यावा लागायचा. फुलं ही प्रेमाचं प्रतिक आहेत. गुलाबाचं एक फुल देऊन हिरोईनला प्रपोज करणं, हे तर आपण अनेकदा पडद्यावर काय प्रत्यक्षातही पाहिलेलं. अनेकांनी तसं केलंही असेल.
ते जाऊ द्या. मूळ मुद्यावर येऊयात. फुलातून जसा प्रेमाचा इशारा सूज्ञ प्रेक्षकांना मिळतो तसाच इशारा गरम पाण्याच्या पातेल्यातूनही मिळायचा. आलं का लक्षात. जुन्या सिनेमात गरोदर हिरोईनची हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी व्हायची नाही. मग तो सिन असा असायचा, रात्रीचा अंधार आणि घराबाहेर ताटकळत बसलेले लोक. त्याचवेळी दरवाजा उघडतो एक महिला लगबगीनं बाहेर येते आणि गरम पाण्याचं पातेलं घेऊन आत जाते. काहीच वेळात बाळाचा रडण्याचा आवाज येतो. मग हिरो, हिरोचे आई-वडील खूश होतात. मिठाई वाटली जाते. गरम पाण्याचं पातेलं पाहिलं की, त्या काळातल्या सूज्ञ प्रेक्षकांना पुढे काय होणार याचा अंदाज यायचा. 
ऐंशीच्या दशकात दूरदर्शन ही एकमेव वाहिनी घरोघरी पाहिली जायची. त्यावेळी आठवड्यातून एकदा रविवारी हिंदी सिनेमा दाखवला जायचा. मनोरंजनाचं एकमेव साधन असल्यानं हिंदी सिनेमानं शिकवलेला हा सूज्ञपणा माझ्या अंगी आला. अर्थात त्याकाळी दूरदर्शनवर सिनेमा पाहिलेल्या सगळ्यांनाच हा सूज्ञपणा प्राप्त झाला.
सांकेतिक फुलांप्रमाणेच खऱ्या फुलांनीही हिंदी सिनेमाचा पडदा चांगलाच खुलवला. सिलसिला सिनेमात अमिताभ आणि रेखाच्या सोबतीला असलेल्या फुलांनी सजलेला फुलांचा 'सिलसिला' रसिक प्रेक्षकांच्या हृदयात जीवंत आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, सिनेमातली पिवळी फुलं ऑल टाईम हिट आहेत. 
साठच्या दशकात प्रेमासाठी फुलांचा आधार घ्यावा लागला. नंतरच्या काळात हिरो-हिरोईन 'खुलत' गेले. त्यामुळे सांकेतिक भाषेची गरजच राहिली नाही. परिणामी इशाऱ्यांची ती भाषा आता इतिहासजमा झालीय.
#संगो

Tuesday, January 14, 2020

रजनीकांतचा 'दरबार' भरला !

रजनीकांतचा सिनेमा हाऊसफुल्ल थिएटरमध्ये तमिळ ऑडियन्सबरोबर पाहणं हा एक अदभूत जीवंत अनूभव आहे. हा अनूभव मी मुंबईत माझ्या मुलासह माटुंग्यातल्या अरोरा थिएटरमध्ये अनुभवला. साऊथमध्ये ज्या प्रमाणे हिरोचे मोठे कटआऊट लावले जातात. हिरोच्या कटआऊटला अभिषेक केला जातो. मुंबईतल्या अरोरा थिएटरमध्यही असेच कटआऊट  रविवारच्या शोची तिकीट तीन दिवस आधीच बूक केली होती. साडेसहाचा शो होता, मात्र आम्ही सहा वाजताच थिएटरला पोहोचलो. आमच्या आधीच अनेक रजनीभक्त तिथं आले होते. तमिळ नागरिक बहुतेक सहकुटुंब सहपरिवार रजनीमय होत असावेत. कारण सहकुटुंब आलेल्या प्रेक्षकांची संख्या इथं जास्त होती. अगदी 70 वर्षाची वृद्धा ते आईच्या कुशीत विसावलेलं बाळ अशी कुटुंब इथं पाहायला मिळाली. रजनीचं बाळकडू पाजायचं असेल तर, दुसरा कोणता पर्यायच नाही.
काहीच वेळात सिंगल स्क्रिन असलेल्या अरोरा थिएटरचे दरवाजे उघडले. सर्व रजनी रसिकांनी आत प्रवेश केला. स्टॉल आणि बाल्कनी अशी वर्गवारी इथं होती. बाल्कनीचं तिकीट असल्यानं आम्ही पायऱ्यांवरून भारावलेल्या वातावरणात बाल्कनीत खूर्ची गाठली. काही क्षणात जाहिरातींना सुरूवात झाली. रजनी फॅन्सला वाटलं की सिनेमा सुरू होतोय. त्यांनी शिट्ट्या वाजवायला सुरूवात केली. असं सात आठ वेळा झालं. अखेर दरबारचं सर्टिफिकेट आलं आणि त्या पाठोपाठ SUPER STAR R A J N I ही अक्षरं फूल टू बॅकग्राऊंड म्युझिकच्या दणदणाटात स्क्रिनवर झळकली. शिट्ट्या, टाळ्या आणि आरोळ्या पर्मोच्च शिखरावर पोहोचल्या. 
सिनेमाच्या सुरूवातीलाच एका भाईची पार्टी सुरू झाली. पार्टीत चर्चा होती ती फक्त पोलीस कमिशनर आदित्य अरूणाचलमची म्हणजेच रजनीकांतची. मग काय जिथं पार्टी सुरू होती त्या हॉलवर टाकलेलं लोखंडी पत्रे दबायला सुरूवात झाली. पाऊलं पुढे धावायला लागली गुंडांनी गोळीबार सुरू केला. जाळीतून रजनीकांतचं दर्शन झालं, फॅन्स बेभान झाले. तोच रजनी सर्व गुंडांच्या आत पोहोचला. पापणी लवते न लवते तोच रजनी स्टाईलनं गुंडांचा खात्मा सुरू झाला. बुक्की, तलवार आणि बंदुकीच्या गोळ्यांनी सुमारे 60 ते 70 गुंड धारातीर्थी पडले.
मग एक गाणं झालं. ऑडियन्स पुन्हा बेभान झाली. गाणं झाल्यानंतर आदित्य अरूणाचलमची मुंबईला बदली होते. मुंबईत येऊन रजनीकांत ड्रग्ज माफियांचा सफाया करायला सुरूवात करतो. गंमत म्हणजे माटुंग्याच्या अरोरा थिएटरमध्ये सिनेमा सुरू असतो आणि पडद्यावरही माटुंगा भागात रजनीकांत रेड टाकत असतो. रजनीकांतचं मोठं नाव होतं. एवढं काम केल्यावर थकवा येणारच. त्यामुळे एक सुंदर अभिनेत्री आणि रजनीकांतची प्रेमकहाणी सुरू होते. काही गाणी होतात. आणि इथंच स्टोरीत ट्विस्ट येतो. रजनीकांतच्या मुलीचं अपघातात निधन होतं. मग चिडलेला रजनीकांत इतर पोलिसांना घेऊन एका मीडिया सेंटरच्या इमारतीत लपलेल्या गुंडांच्या टोळीचा नायनाट करतो. त्यानंतर मोठा व्हिलन सुनील शेट्टीला ढगात पाठवतो. आणि सिनेमा संपतो.
तमिळ भाषेतला हा सिनेमा भाषा कळत नसूनही समजला. अर्थात इथं भाषा समजण्याची गरजच नव्हती. सुपरस्टार रजनी समजला की, अशक्य असं काहीच नसतं. सिनेमा सुरू असताना सातत्यानं सुरू असलेल्या शिट्ट्या आणि फॅन्सचा जल्लोष बाहेर पडतानाही कानात गुंजत असतो. तर डोक्यात फक्त रजनीच्या अॅक्शन असतात.
आणि एक महत्त्वाचं म्हणजे मल्टिप्लेक्समध्ये जशी लूट होते तशी सिंगल स्क्रीनमध्ये होत नाही. 40 रुपयात दोन समोसे, 10 रुपयात पाण्याची बॉटल आणि 50 रुपयात पॉपकॉर्न मिळतं. त्यामुळे सिनेमा बघताना सिंगल स्क्रिनला प्राधान्य देणं फायद्याचं ठरणारं आहे.  #संगो #RAJNIKANT #DARBAR

Saturday, November 2, 2019

संजयचं ‘महाभारत’ !


सामनाचे संपादक, खासदार आणि शिवेसनेचे नेते अशा तीन आघाड्यांवर कामगिरी बजावणाऱ्या संजय राऊतांनी सध्या चांगलाच धुरळा उडवून दिलाय. राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष तीव्र झालेला असताना संजय राऊतांनी शिवसेनेसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुख्यमंत्रीपदाच्या समसमान वाटणीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. शिवसेनेकडून या लढाईचं नेतृत्व सरदार संजय राऊतांकडे देण्यात आलं आहे.
शिवसेनेकडून ही लढाई एकहातीपणे संजय राऊतांकडे दिल्याचं स्पष्टपणे दिसतंय. लेखणीचे 'रोखठोक' सपासप वार करणाऱ्या संजय राऊतांनी त्यांच्या 'सच्चाई'च्या बाईटनं भाजपच्या नेतृत्वाला जेरीस आणलं आहे. सध्याच्या काळात सगळ्या न्यूज चॅनेल्सवर संजय राऊतांचेच बाईट दिसत आहेत. एकट्या संजय राऊत यांनी भाजपला सळो की पळो करून सोडलं आहे. भाजपचे बडे नेते, प्रवक्ते या सर्वांची संजय राऊतांना उत्तर देताना दमछाक होत आहे.
सामनाचे 30 वर्षांपासून संपादक असलेले संजय राऊत शिवसेनेचे नेतेही आहेत. संजय राऊतांच्या लिखाणाचे राज्यात लाखो चाहते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना सुरू केला. शिवसेनाप्रमुखांच्या जहाल अग्रलेख आणि व्यंगचित्रांमुळे सामना लोकप्रिय झाला. तर नंतरच्या काळात सामनाला ब्रॅण्ड करण्यात संजय राऊतांचं योगदान आहे. संजय राऊत यांचं ज्वलंत लिखाण हे सामनाला ब्रॅण्ड करण्यासाठी फायद्याचं ठरलं. याच सामनातून केंद्र आणि राज्यातल्या भाजपवर बाण सोडण्यात आले. सामनातल्या अग्रलेखांमुळे भाजपचा प्रचंड तडफडाट झाल्याचं जगानं पाहिलं. संजय राऊतांमुळे शिवसेना अडचणीत येते, असा आरोपही केला जातो. मात्र अनेकदा अडचणीच्या काळात संजय राऊत शिवसेनेचा किल्ला लढवतात. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांवर शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले. शिवसेना अनेकदा बॅकफूटवर दिसली. त्यावेळी संजय राऊतांनी सामनातल्या बातम्या आणि अग्रलेखांनी राणेंना जेरीस आणलं. त्यावेळी राज्यात पक्ष सत्तेत नसताना शिवसैनिकांच्या मनात अंगार पेटवला. आताही सत्तेच्या संग्रामात शिवसेनेची भूमिका संजय राऊत आक्रमकपणे मांडताना दिसताहेत.
उद्धव ठाकरेंच्या आदेशाशिवाय संजय राऊत इतकी आक्रमक भूमिका घेणार नाहीत, हे ही तितकंच खरं आहे. संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनीच फ्री हँड दिलाय यात शंका नाही.
समाजात जागृती आणनं, अन्यायाला वाचा फोडणं हे संपादकांचं काम. मात्र आता बदलत्या परिस्थितीत राजकीय पक्षांचं मुखपत्र असलेल्या दैनिकांमधल्या संपादकांना जनजागृतीपेक्षा सत्ताजागृती महत्त्वाची झाली आहे. आणि त्यामुळेच अग्रलेख लिहणारे संजय राऊत सत्तेच्या कुरूक्षेत्रात राजकीय महाभारत घडवत आहेत. 
#संगो #SHIVSENA #शिवसेना

Thursday, October 24, 2019

मी पुन्हा येईन, आम्हीही येणार !



मी पुन्हा येईन, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द खरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळवलं. मात्र पुन्हा येताना भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. चार-पाच वेळा मेगाभरती करूनही भाजपला 2014 मिळवलेल्या 122 जागा मिळवता आल्या नाही. शिवसेनेलाही 2014 मध्ये मिळवलेल्या 63 जागा राखता आल्या नाही.
मात्र निकाल लागल्यानंतर राज्यभरात शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. युतीनं सत्ता राखण्याचा पराक्रम केल्यानं कार्यकर्ते बेभान झाले. भाजपनं सेंच्युरी पार केली. तर शिवसेनाही साठीत पोहोचली. मात्र 2014 मध्ये दोन्ही पक्षांनी स्वबळावर मिळवलेल्या जागांपेक्षा हा आकडा कमीच होता. युती करूनही दोन्ही पक्षांना 2014च्या तुलनेत दमदार यश मिळवता  आलं नाही. राजकारणात एक अधिक एक दोन होईल असं नसतं, असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती या निवडणुकीत आली. शिवसेना भाजपनं एकत्र निवडणुका लढूनही त्यांच्या जागा कमी झाल्या. भाजपनं निवडणुका जाहीर होण्याच्या आधी आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतरही मेगाभरतीचा सपाटा लावला. सर्वच पक्षातल्या आजी माजी आमदारांची भाजपचा झेंडा हाती घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक सरदार भाजपच्या गोटात सामील झाले. पण निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेले सरदार भाजपला सत्तेच्या लढाईत चांगली साथ देऊ शकले नाही. भाजपप्रमाणेच शिवसेनेतही निवडणुकीच्या तोंडावर जोरदार इनकमिंग झालं, अनेकांनी शिवबंधन बांधलं. पण नव्यानं पक्षात आलेले सैनिक आधीच्या शिवसैनिकांसारखे लढवय्ये निघले नाही. ऐन मोक्याच्या लढाईत नव्या सैनिकांनी कच खाल्ली. परिणामी 2014च्या तुलनेत शिवसेनेच्या जागा कमी झाल्या.

तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या. त्यामुळे आता आघाडीचे नेते आम्हीही येणार असं म्हणू लागले आहेत. काँग्रेसनं जिंकलेल्या जागांचा आकडा पाहून राहुल गांधीनांही धक्का बसला असेल. काहीही न करता काँग्रेसनं 50चा आकडा गाठला. काँग्रेसनं जरी काही केलं नसलं तरी शरद पवारांनी राज्यभर घेतलेल्या सभा, जिगरबाजपणे पावसात केलेलं भाषण याचा फायदा काँग्रेसलाही झाला. निवडणुका जाहीर होण्याच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रितपणे 40 जागाही मिळतील असं वाटत नव्हतं. मात्र शरद पवारांमुळे हवा बदलली. आघाडीचा आकडा शंभरच्या पलीकडे पोहोचला. या विजयामुळे राज्यातल्या आगामी पालिका आणि झेडपी निवडणुका सत्ताधाऱ्यांना सोप्या जाणार नाहीत. पवारांनी आघाडीत आत्मविश्वास निर्माण केला. राज्यात विरोधकांना शक्ति मिळाल्यानं सरकारवरही अंकुश राहिल. परिणामी आता सरकारला चांगलं काम करावंच लागेल. नाही तर पवारांच्या हाती असलेला आसूड सत्ताधाऱ्यांच्या पाठीवर ओढला जाईल. #संगो

Sunday, September 29, 2019

नायक नहीं महानायक !

मला जेव्हा कळायला लागलं, तेव्हा अमिताभ बच्चन यांचा उतरता काळ सुरू झाला होता. (मला बरंच लवकर कळायला लागलं, हा भाग वेगळा) चित्रपटसृटीतला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाल्यानंतर त्यांच्याविषयी काही लिहावसं वाटलं. बच्चन यांच्या उतरत्या काळानंच सुरूवात करूया. 
1988 मध्ये अमिताभ यांचा शहंशाह हा सिनेमा प्रदर्शित झाला. 'रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं', हा डायलॉग आणि 'जाने दे जाने दे मुझे जाना हैं' हे गाणं हिट झालं. पण मिनाक्षी शेषाद्रीसोबत अमिताभ यांची जोडी मॅच होत नव्हती. त्यानंतर  जादुगर, तुफान निराशाजनक ठरले. त्यातल्या त्यात बरा निघाला तो आज का अर्जुन.  1990 सालच्या अग्निपथनं अमिताभ बच्चन यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला. अमिताभ नावाची जादू चालली. मात्र अग्निपथ हिट म्हणता येणार नाही. पण त्या नंतरचे अजुबा, अकेला, हम, इंद्रजित फ्लॉप ठरले. हममध्ये तर रजनीकांत, गोविंदा असूनही तो सिनेमा प्रचंड हिट ठरला नाही. त्या नंतरचा खुदा गवाह थोडासा सुसह्य होता. मात्र नंतरच्या काळात आलेले लाल बादशाह, मृत्यूदाता पाहून तर चाहत्यांना धक्काच बसला. मेजर साब, हिंदुस्थान की कसम, कोहरामही आपटले. बडे मियां छोटे मियां थोडा चालला, पण त्याचं क्रेडिट गोविंदाला मिळालं. याच काळातच अमिताभ यांची एबीसीएल कंपनीही तोट्यात गेली. उतरता काळ असेल तर कशातही यश येत नाही.

मात्र जिगरबाज अमिताभ यांनी हार मानली नाही. 3 July 2000 रोजी इतिहास घडला. स्टार प्लसवर कौन बनेगा करोडपती सुरू झाला. टेलिव्हिजनच्या इतिहासात क्रांती झाली. अमिताभ यांची लोकप्रियता पुन्हा प्रचंड वाढायला लागली. प्रश्नोत्तर आणि उत्तर देणाऱ्याला बक्षीस असा हा कार्यक्रम, मात्र तो प्रचंड लोकप्रिय झाला. अजूनही कौन बनेगा करोडपती सुरू आहे. अमिताभ यांची स्पर्धकांसोबत संवाद साधण्याची शैली या कार्यक्रमाचं बलस्थान. स्टार प्लस चॅनेल हिट झालं आणि अमिताभ यांचे सितारेही बुलंद झाले. एक दशक अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या अमिताश यांच्या यशाची दुसरी जबरदस्त इनिंग सुरू झाली. सर्व अपयश धुऊन काढलं.

मोहब्बते, कभी खुशी कभी गम, बागबान, ब्लॅक, पा, बंटी और बबली, सरकार, चिनी कम, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा अनेक सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन यांनी दमदार अभिनय साकारला. सिल्व्हर स्क्रिनवर अमिताभ बच्चन यांनी विजय ही व्यक्तीरेखा अनेकदा साकारली. कारकिर्दीला उतरती कळा लागल्यावरही खचून न जाता, 'विजय'नं बाजी पलटवली. अँग्री यंग मॅन बनून स्क्रिनवर गुंडांना बदडणारा विजय हा प्रत्येकाच्या मनात असतो. त्यामुळेच विजय कधी पराभूत होत नाही. त्यामुळे हेच म्हणावसं वाटतं, 'डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन हैं.' 
#संगो #amitabh #falkeaward #kbc

Monday, September 23, 2019

रोजचा सवाल थांबला !

#रोजचासवाल - 1787 दिवस झाले, सिंचन घोटाळा करणा-यांना अटक कधी ? टोलमुक्त महाराष्ट्र कधी ? शेतक-यांच्या पिकाला चांगला भाव (हमी भाव) कधी ? धनगर समाजाला आरक्षण कधी ? शिवसमुद्रात शिव शिवस्मारक कधी ? इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी?(देवेंद्र फडणवीस यांनी 31-10-2014 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याला एक दिवस झाल्यानंतर म्हणजे 1-11-2014 पासून, निवडणुकीच्या काळात दिलेल्या विविध आश्वासनांवर प्रश्न विचारायला सुरूवात केली आहे. उत्तर मिळेपर्यंत.) #cmfadanvis @Dev_Fadnavis #संगो

1 नोव्हेंबर 2014 पासून फेसबुकवर सरकारला फेस आणणारा रोजचा सवाल सुरू करण्यात आला. 22 सप्टेंबर 2019 रोजी विचारलेला 1787वा सवाल हा शेवटचा सवाल. सलग पाच वर्ष रोजचा सवाल फेसबुकवर सुरू होता. तसंच मागील तीन वर्षांपासून ट्विटरवरूनही रोजचा सवाल सुरू करण्यात आला. मात्र आता आचारसंहिता लागू झालीय, त्यामुळे भाजपनं दिलेली आश्वासनं आता काही पूर्ण होतील असं वाटत नाही. मात्र मागील 5 वर्षात कशाला हा ताप ? हा सवाल मला अनेकांनी विचारला. भक्त तर चेकाळलेच. आधीच्या सरकारला विचारला होता का सवाल ? असा सवाल मला विचारण्यात आला.
पण निवडणुकीच्या काळात दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना भुलून मतदार मतदान करत असतात. मात्र दिलेल्या आश्वासनांचं काय झालं ? हे कोणीच विचारत नाही. पाच वर्ष झाल्यानंतर कोणती आश्वासनं दिली होती, याची कोणाला आठवणही राहत नाही. अगदी माध्यमांमध्येही याचा अनुभव येतो. त्यामुळे सत्तेत आलेल्यांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्याचं काम करावं हा हेतू होता.
विधानसभा निवडणुकीत भाजपनं टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं आश्वासन दिलं. विनोद तावडेंनी आली रे आली आता तुझी बारी आली असा टोला अजित पवारांना लगावला होता. सिंचन घोटाळा अजित पवारांनी केल्याचा आरोप भाजपकडून व्हायचा. पाच वर्ष सत्ता असताना राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला अटक झाली नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला दीडपट भाव देऊ असं खुद्द पंतप्रधान म्हणाले. मात्र पिक मालाला भाव मिळालाच नाही. धनगर समाजालाही आरक्षण मिळालं नाही. शिवसमुद्रात शिव स्मारकाची एक विटही रचली गेली नाही. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू झालं नाही.
म्हणजेच भाजपनं दिलेली ही आश्वासनं पूर्ण झालीच नाहीत. मग आता भाजपवाले कोणत्या तोंडानं मतं मागणार ? पण दिलेल्या आश्वासनांवर मतं देणारे मतदारही जाब विचारताना दिसत नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी पुन्हा नव्यानं आश्वासनं देणार यात शंका नाही. त्यामुळे सर्वांनीच सरकारला दिलेल्या आश्वासनांवर प्रश्न विचारण्याची गरज आहे. प्रश्न विचारली तरच उत्तरं मिळतील.
रोजचा सवाल मला फेसबुकवर नव्हे तर चॅनेलवर सुरू करायचा होता. 2014 मध्ये मी जिथे काम करत होतो तिथल्या वरिष्ठांना ही कल्पना सांगितली. पण रोज स्क्रिनवर बगच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारणं शक्य नाही, असं सांगण्यात आलं. त्यामुळे हा रोजचा सवाल फेसबुकवर सुरू करण्यात आला. रोजचा सवाल आता बंद झालाय. पण 'रोजचा सवाल - 2' येणार आहे. सरकार कोणतंही असो, प्रश्न विचारले जातील. आता रोजचा सवाल थेट असेल. तो फेसबुकवर नव्हे तर ट्विटरवर असेल. तर मग लवकरच भेटूयात, ट्विटरवर.

Wednesday, September 18, 2019

1 निवडणूक 12 भानगडी !


राज्यात निवडणुकीचा बिगूल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. त्या पार्श्वभूमीवर 12 पक्षांच्या 12 भानगडी पाहूयात. त्याची सुरूवात करूयात भाजपपासून.

पहिली भानगड, भाजप - गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील कदाचित जगातही सर्वात शक्तिशाली पक्ष म्हणजे भाजपच. राज्यात एकेकाळी भाजप छोटा भाऊ  होता. पण आता हा पक्ष मोठा भाऊ झाला आहे. आईच्या पोटी जन्म घेतल्यानंतर मोठा भाऊ मोठाच राहतो. आणि छोटा भाऊ छोटाच राहतो. पण राजकीय पक्ष म्हणून जन्म घेतल्यावर काहीही होऊ शकतं. अशा या मोठ्या भावानं स्वबळावर लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या छोट्या भावाला हिंदूत्वाची गोळी देऊन युतीसाठी राजी केलं. विधानसभेला 50-50 जागा असं स्वप्नही छोट्या भावाला दाखवण्यात आलं. पण आता मोठी भानगड झाली. 144 जागा देण्याऐवजी मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला म्हणजे शिवसेनेला 115 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही. परिणामी भाजपची ही भानगड स्वबळाच्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुसरी भानगड, शिवसेना - भाजपला कमळाबाई असं हिणवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा पक्ष. पण आता कमळाबाई घराची मालकीणबाई झालीय. मोठा भाऊ असलेला शिवसेना छोटा भाऊ झाला. लोकसभा निवडणुकीच्या दिलेली हिंदूत्त्वाची गोळी चघळूण झाली. पण आता 50-50 जागांचा फॉर्म्युला अस्तित्वात आला नाही तर शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वबळाची भानगड मोठं लफडं होणार, हे नक्की.

तिसरी भानगड, काँग्रेस - गावातला राबता असलेला मोठा वाडा भग्न झाल्यानंतर जसा दिसतो तशी सध्या काँग्रेसची परिस्थिती झालीय. भानगड करायलाही काँग्रेसमध्ये कोणी उरलेलं नाही. त्यामुळे कालचा 'वंचित' काँग्रेसची राजकीय छेड काढताना दिसतो.

चौथी भानगड, राष्ट्रवादी काँग्रेस - आयात नेत्यांच्या जीवावर आणि सत्तेच्या टॉनिकवर हा पक्ष राज्यात पसरला. पवारांच्या पॉवरबाज पक्षाचं सत्तेचं टॉनिक संपलं आणि आयात नेत्यांची निर्यात सुरू झालेली. दणादण पक्षांतर झाल्यानं घड्याळाचे काटे निखळले. बडे नेते बाहेर पडल्यानं आता शरद पवारांनाच मैदानात उतरावं लागलं. त्यातच जर छगन भुजबळ जर शिवसेनेत परतले तर राष्ट्रवादी काँग्रेसची भानगड शेवटच्या घटका मोजण्याची वेळ येऊ शकते.

पाचवी भानगड, म.स्वा.प. - म.स्वा.प. वाचून ही नेमकी भानगड काय, हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल. म.स्वा.प. म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष. एकेकाळी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे यांचा प्रचंड मोठा पक्ष. या पक्षाचा एकही आमदार नाही. खुद्द नारायण राणे भाजपच्या जीवावर राज्यसभा सदस्य झाले. तसं असलं तरी हा पक्ष मोठाच. भाजपमध्ये अनेक नेते गेले. पण नारायण राणे त्यांच्या म.स्वा.प. या पक्षासह भाजपमध्ये प्रवेश करून, त्यांची भानगड कायमचीच संपवणार यात शंका नाही. पण भाजपला राणेंची भानगड भाजपला कितपत परवडेल, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

सहावी भानगड, VBA - VBA म्हणजे वंचित बहुजन आघाडी. लोकसभेला या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पण वंचितच्या जीवावर एमआयएमचा खासदार झाला. ते म्हणतात ना, मेहनत करे मुर्गा अंडा खाये फकीर असा प्रकार घडला. अंडा खाणाऱ्या एमआयएमला बाजूला करून वंचित सर्व जागा लढवणार आहे. वंचितमुळे भानगड झाली ती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. दुष्काळात तेरावा महिना, ही म्हण आठवण्याची वेळ आघाडीवर आलीय.

सातवी भानगड, MIM - हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणारे खासदार इम्तियाज जलील यांचा हा पक्ष. एमआयएमला रझाकारांविषयी सहानुभूती असल्याचा आरोप केला जातो. त्या आरोपाला बळ देण्याचं काम एमआयएमच्या कृतीतूनच दिसून येतं. मात्र आता वंचितनं एमआयएमची साथ सोडली आहे. वंचितची मतं एमआयएमला मिळतात. मात्र एमआयएमची मतं वंचितला मिळत नाहीत यामुळे दोन्ही पक्ष वेगळे झाले. परिणामी निवडणुकीच्या तोंडावर ही भानगड एमआयएमसाठी अपशकून ठरली.

आठवी भानगड, स्वा.शे.प. - स्वाभिमानी शेतकरी पक्ष. हा पक्ष 2014 मध्ये युती सोबत. मात्र भाजपसोबत भानगड झाल्यानं हा पक्ष आता आघाडीसोबत आहे. माजी खासदार राजू शेट्टी हेच या पक्षाचे एकमेव नेते.

नववी भानगड, रयत क्रांती संघटना - राजू शेट्टी यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी त्यांचं रयत क्रांती संघटना हे छोटं दुकान सुरू केलं. खोत सध्या सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र स्वत:च्या दुकानातून लढण्याऐवजी भाजप या मोठ्या मॉलच्या तिकीटावर खोत लढणार आहेत. त्यामुळे ही भानगड तशी भाजपच्या फायद्याची ठरणार आहे.

दहावी भानगड, शेकाप - शेतकरी कामगार पक्ष, ज्या प्रकारे सध्या शेतकरी आणि कामगारांना किंमत राहिलेली नाही त्या प्रकारे या पक्षालाही किंमत राहिलेली नाही. हा पक्ष आघाडीसोबत असल्याची चर्चा आहे. रायगड जिल्ह्यातल्या काही भागात अस्तित्व असलेल्या या पक्षाची भानगड तशी अदखलपात्र झालीय.

अकरावी भानगड, रिपाइं (आ) - जायकवाडी धरणासारखी रामदास आठवलेंच्या या पक्षाची भानगड. मराठवाड्यात पाऊस पडला नाही, तरी औरंगाबादमधलं जायकवाडी धरण 100 टक्के भरलं. त्याच प्रकारे पक्षाचा एकही आमदार, खासदार नसताना मंत्री होण्याची भानगड जमवण्यात रामदास आठवलेंना यश आलं. भाजपसोबत असलेल्या या पक्षाला विधानसभा निवडणुकीत पडणाऱ्या जागा देण्याची भानगड भाजपकडून केली जाते. यावेळी काय होतं हे निवडणुकीनंतर लक्षात येईल.

बारावी भानगड, सपा-बसपा - उत्तर प्रदेशातली ही भानगड महाराष्ट्रात काही चालत नाही. अर्थात त्यांचं आता यूपीतही काही चालत नाही. सपा हा पक्ष आघाडी सोबत आहे. भिवंडी आणि गोवंडी अशा दोन जागा मिळाल्या तर सपाची भानगड उरत नाही. तर एकही जागा मिळत नसली तरी प्रत्येक निवडणूक उत्साहानं का लढतात, ही बसपाची भानगड काही कळत नाही.

#संगो #BJP #SHIVSENA #CONGRESS #NCP #VBA #MIM #SP #BSP #RPI