Thursday, May 14, 2020

डिंग डाँग ते धक धक

1988 मध्ये एक चमत्कार घडला. त्या वर्षी शाळेतही जात नसलेली तीन-चार वर्षांची मुलं 1 ते 13 अंक घरबसल्या शिकली. कारण त्या वर्षी माधुरी दीक्षितच्या तेजाब सिनेमातलं, एक दो तीन चार...हे गाणं चांगलंच हिट झालं होतं. गाणं आणि सिनेमाही हिट झाला. बॉलिवूडला नवी हिरोईन मिळाली. माधुरीचं त्या सिनेमातलं नाव मोहिनी होतं. त्या मोहिनीची रसिकांवरील मोहिनी आजही कायम आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. 
तसं पाहिलं तर 1984 मध्ये अबोध सिनेमातून माधुरी दीक्षितचं पदार्पण झालं होतं. पण याचा कोणाला फारसा बोध झाला नव्हता. 11 नोव्हेंबर 1988 ला तेजाब रिलीज झाला आणि धमाकाच झाला. लव्ह स्टोरी, कॉमेडी आणि जबरदस्त फायटिंगचा मसाला असलेल्या तेजाबनं बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम केले. मात्र  एक महिना आधीच 21 ऑक्टोबर 1988 रोजी दयावान रिलीज झाला होता. तो सिनेमा जास्त हिट नव्हता, मात्र त्यातलं, 'आज फिर तुम पे प्यार आया है' हे गाणं चांगलंच गाजलं. पण त्या गाण्यात थोराड दिसणाऱ्या विनोद खन्नासोबत माधुरीला पाहणं एखादी शिक्षाच वाटत होती.
मात्र ही शिक्षाही माधुरीचे चाहते लवकरच विसरले. रामलखन, दिल, किशन कन्हैय्या, त्रिदेव, साजन, बेटा, थानेदार, खलनायक, राजा, हम आपके है कोन, दिल तो पागल है, प्रेमग्रंथ, देवदास अशा एका पेक्षा हिट सिनेमांचा धडाकाच माधुरीनं उडवून दिला. साजन सिनेमातलं 'तू शायर है मैं तेरी शायरी', 'बहोत प्यार करते हैं तुमको सनम' या गाण्यानं तर रसिकांना घायाळ केलं. तर बेटा सिनेमातल्या 'धक धक करने लगा', गाण्यानं रसिकांच्या काळजाची वाढलेली धडधड ते गाणं आठवलं की आजही वाढते. रोमँटिक भूमिका, गंभीर भूमिका, कॉमेडी आणि नृत्य या सर्वांमध्ये पारंगत असल्यानं मागील तीन दशकांपासून मा्धुरी दीक्षितची मोहिनी कायम आहे. सिल्व्हर स्क्रीन गाजवणाऱ्या माधुरीनं छोटा पडदाही गाजवला. झलक दिखला जा सारख्या रिअॅलिटी शोची जज म्हणूनही माधुरीनं छाप उमटवली.
सदाबहार माधुरीचे चाहते देशातच नाहीत तर विदेशातही आहेत. माधुरीची ग्रीसमधील फॅन Katerina Korosidou हिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. माधुरीच्या गाण्यावर  Katerina Korosidou हिचं पदलालित्य पाहण्यासारखंच होतं. Katerina Korosidou सारखाच नव्हे पण थोडा वेगळा, असा माझाही किस्सा आहे. 1988 मध्ये मी सहावीत असताना तेजाब सिनेमा आला होता. चित्रहार, छायागीतमध्ये तेजाबमधली गाणी लागायची. सर्व हॉटेल्समध्येही डिंग डाँग डिंग डिंग डाँग डिंग डाँग सुरू असायचं. पण थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला मिळाला नव्हता. 1989 च्या उन्हाळ्याच्या मामाच्या गावाला म्हणजेच अंबेलोहळला (ता. गंगापूर) गेलो. तिथं दोन रुपयाचं तिकीट काढून व्हिडीओवर तेजाब पाहिला. (आणि आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडीओ पार्लरचं नाव अनिल होतं. सिनेमात हिरोही अनिल कपूरच होता.)  मग काय सारखी तेजाबमधलीच गाणी म्हणायचो. कह दो की तुम हो मेरी वरणा...हे गाणं नेहमीच म्हणत राहायचो. पण एके दिवशी मला रडायला यायला लागलं. माधुरी इतकी मोठी स्टार. ती मुंबईला राहते. तिच्याशी कधी भेटही होणार नाही, मग लग्न तर लांबच राहिलं. सिनेमात हिरोईनचा खडूस बाप ज्या प्रकारे डायलॉग म्हणतो कहाँ तूम और कहाँ हम त्याप्रमाणे कुठे माधुरी दीक्षित आणि कुठे संतोष गोरे अशी परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही डोळ्यांना धारा लागल्या. मीच माझी समजूत घातली. हळूहळू त्या धक्क्यातून सावरलो. आता मागील 12 वर्षांपासून मुंबईत आहे. पण म्हटलं जाऊ द्या, ती तिच्या संसारात सुखी आहे. आपण आपल्या संसारात सुखी आहोत. उगीच कशाला तिच्या आणि आपल्या संसारात 'तेजाब' टाकायचा ? असा विचार करून थांबलो. पण ते काही का असेना आज 15 मे रोजी माधुरीला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. #संगो #MADHURIDIXIT #HBDMADHURI

Sunday, May 10, 2020

पुराना जायेगा तभी तो नया आएगा...


कपिल शर्मा याने ओएलएक्सची जाहिरात केली होती. त्या जाहिरातीची टॅगलाईन होती, पुराना जायेगा तो नया आयेगा. आता राज्यातल्या भाजपनं त्या टॅगलाईननुसार काम करायला सुरूवात केलीय. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली नाही. प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तसं पाहिलं तर भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी मार्गदर्शक मंडळाच्या माध्यमातून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, सुमित्रा महाजन या ज्येष्ठांचा आधीच गुळाचा गणपती केला आहे.
मात्र भाजपनं पक्षासाठी खस्ता खाललेल्या एकनाथ खडसेंचा सन्मान राखायला हवा होता. भाजपला कोणी विचारत नव्हतं त्या काळात खडसेंनी पक्षाच्या वाढीसाठी श्रम घेतले. विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षासाठी किती काम केलं, हे त्यांच्या पक्षाला माहित असेलच. पण त्यांच्यावर अन्याय झाला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
एकनाथ खडसे अनेक वर्ष आमदार, मंत्री राहिले आहेत. त्यांची सून खासदार आहे, मुलीलाही विधानसभेचं तिकीट मिळालं होतं. असं असताना एकनाथ खडसेंवर अन्याय झाला, असं कसं म्हणता येईल ? पंकजा मुंडे मंत्री होत्या. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण त्यांची बहीण खासदार आहे. तरीही त्यांच्यावर अन्याय झाला, असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. अर्थात पंकजा मुंडे निवडून आल्या नसल्या तरी त्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेतच. (बहुतेक त्यामुळेच ही वेळ आली असावी, असंही बोललं जातं.)
पण यामुळे एक मुद्दा समोर येतो. याच नेत्यांना वर्षानुवर्ष आमदार-खासदार, मंत्री केल्यामुळे त्यांच्या पक्षातल्या इतर तरूणांना संधीच मिळत नाही. त्यामुळे भाजपचा निर्णय चुकीचा वाटत नाही. पण हा निर्णय घेताना फक्त हे चारच नेते बाजूला सारणं योग्य नाही. पुराना माल हटवायचा असेल तर, सगळाच पुराना माल मोडित काढायला हवा. फक्त राजकीय आकांक्षा आहेत, म्हणून सहकाऱ्यांचे पत्ते कापले जावू नयेत हे ही तितकंच म्हत्वाचं आहे.  
आता भाजप प्रमाणेच आता इतर पक्षांनीही वर्षानुवर्ष अनेक घराण्यांमध्येच दिली जाणारी पदं, उमेदवारी बदलावी असा विचार करण्याची गरज आहे. भाजपनं जशी (अल्प) धमक दाखवली तशी धमक  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दाखवू शकेल का  ? #संगो

Friday, May 8, 2020

मजूर, कामगारांचे तळतळाट भोवणार !


घराकडे निघालेले मजूर रेल्वे ट्रॅकवर झोपले. 45 किलोमीट चालून थकलेले मजूर काही वेळ विश्रांतीसाठी ट्रॅकवर विसावले. लॉकडाऊनमुळे ट्रेन बंद आहेत, असं वाटल्यानं त्यांनी काही वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरीकडे एक मालगाडी वेगानं येत होती. धडधडत आलेल्या मालगाडीच्या लोको पायलटनं ट्रॅकवरील मजूर बघितले. त्यामुळे त्यानं ब्रेक दाबला, पण तो पर्यंत उशीर झाला होता. मध्य प्रदेशातल्या गावाकडे निघालेल्या मजुरांच्या जीवनाचा प्रवास थांबला. मालगाडी खाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाला. करमाड जवळ झालेल्या या अपघातानं अवघा देश हळहळला.


घराकडे जाणाऱ्या मजुरांचे मृत्यू, मजुरांचं स्थलांतर हे आपल्या सर्वांचं अपयश आहे. हे माझं अपयश, हे यंत्रणांचं अपयश, हे राज्य सरकारचं अपयश, हे केंद्र सरकारचं अपयश आहे. कोरोनामुळे मृत्यू होऊ नये यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केला. एकदा नव्हे तर तीनदा लॉकडाऊन घोषित केला. देशातल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी हा लॉकडाऊन गरजेचाच आहे. मात्र आता कोरोनामुळे नव्हे तर लॉकडाऊनच्या अपयशामुळे नागरिकांचा जीव चालला आहे. केंद्र सरकारनं लॉकडाऊन आधीच घोषित केला असता आणि त्याआधी मजुर, कामगारांना त्यांच्या राज्यात परतण्याची संधी दिली असती तर आजच्या इतकं विदारक चित्र दिसलं नसतं. परदेशात गेलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार तत्परता दाखवत आहे. पण देशातल्या नागरिकांकडे तितकं लक्ष दिलं जात नाही. 
महामार्गांवरून मजूर आणि कामगार प्रखर उन्हातून पायी त्यांच्या घराकडे जात आहेत. लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला, खायला काही मिळत नाही. यामुळे आपल्याच या बांधवांवर पायी जाण्याची वेळ आलीय. अनेक जण हजार किलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त अंतरावरील त्यांचं घर जवळ करण्यासाठी पायी जात आहेत. या कामगारांसोबत त्यांची मुलं, पत्नी आहेत. या सर्वांचा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही. ज्या शहरात पोट भरण्यासाठी आले होते, त्या शहरात त्यांना मदत करणारा एकही हात मिळाला नाही. सरकार त्यांना मदत देऊ शकलं नाही. त्यामुळे छोट्या मुलांनाही पायी चालावं लागतंय. उपाशी मरण्यापेक्षा परप्रांतातल्या घरी जाऊ, असा विचार करून हजारो मजूर, कामगार देशभरातून स्थलांतर करत आहेत. हे स्थलांतर करताना अनेकांचा मृत्यूही झाला. उन्हाचे चटके सोसत, उपाशीपोटी हजारो किलोमीटर पायी चालणाऱ्यांचे तळतळाट सगळ्यांनाच भोवणार आहेत. एक नागरिक म्हणून हे माझं अपयश आहे. समाज म्हणून हे आपलं अपयश आहे. सरकार म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते, राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रमुखांचंही अपयश आहे. #संगो