Saturday, November 24, 2018

मुंबई टू अयोध्या

उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच अयोध्येला भेट दिली. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही अयोध्येला भेट दिली नव्हती. तरीही राम मंदिर प्रकरणात त्यांची नेहमीच चर्चा होते. कारण 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर देशभरात आगडोंब उसळला. मात्र मंदिर वहीं बनायेंगे अशी घोषणा देणारे भाजपचे नेते बॅकफूटवर आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मशीद पाडली नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
तर अयोध्येत न जाता फक्त मुंबईत बसून बाळासाहेब ठाकरेंनी बाजी पलटवून टाकली. "जर शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर त्यांचा अभिमान वाटतो", असं वक्तव्य करून बाळासाहेब ठाकरेंनी खळबळ उडवून दिली. देशासह जगभरातल्या मीडियात फक्त बाळासाहेब ठाकरेंची चर्चा सुरू झाली. भारतातले सर्वात मोठे हिंदूत्ववादी नेते अशी त्यांची ओळख जगभरात बनली.
अर्थात मराठी माणसाचा मुद्दा घेऊन जन्माला आलेल्या शिवसेनेला हिंदूत्वाचं कधीच वावगं नव्हतं. 1989 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी गर्व से कहो हम हिंदू हैं, असा नारा देत हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेतला. तर आता 26 वर्षांनंतर उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेताना 'पहले मंदिर फिर सरकार', ही घोषणा दिली. 
मराठीचा मुद्दा सत्तेवर येण्याइतकी मतं मिळवून देत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदूत्वाचा कैवार घेतलाय. त्यामुळे चलो अयोध्या, हा नारा देत उद्धव ठाकरे शिवसैनिकांसह अयोध्येत पोहोचले. तिथं त्यांचं जोरदार स्वागत झालं. अयोध्येत त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली. तसंच मंदिर बांधण्यासाठी सरकारनं विधायक आणावं, त्याला शिवसेना पाठींबा देईल असंही स्पष्ट केलं.
स्पष्ट बहुमत असूनही मंदिर बनत नाही, या मुद्याकडे लक्ष वेधून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली. मंदिर कधी बांधणार याची तारीख हवी, असं बोलून त्यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंदिर बांधून झाल्यावर भक्त होऊन दर्शनासाठी येईल असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. लक्ष्मण किलावर त्यांनी उपस्थिती लावली. पूजा केली. शरयू नदीवरील आरतीमध्येही त्यांनी सहभाग घेतला. एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी तिथं कारसेवाच केली. महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक त्यांनी अयोध्येत नेऊन शक्ति प्रदर्शन केलं. इतकंच नव्हे तर देशभरातल्या मीडियाचं लक्षही वेधून घेतलं.
शिवसेनाप्रमखांचा 1992 मधला कालखंड आणि आता 2018 मधला उद्धव ठाकरेंची अयोध्या भेट यात मोठा फरक आहे.  1989 पासून हा राम मंदिराचा मुद्दा तापायला सुरूवात झाली होती. त्यामुळे शिवसेनेनंही, हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व असा नारा दिला. राजकारणाची दिशा ओळखून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेतला. बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या. मुंबईतही मोठ्या प्रमाणात दंगल पेटली. त्यावेळी शिवसैनिकांनी हिंदूंचं रक्षण केलं असा दावा शिवसेनेकडून आजही केला जातो. दंगलींनंतर 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बारा बॉम्बस्फोट झाले. महाराष्ट्र आणि देशभरात धार्मिक राजकारण, दंगली यामुळे मतांचं ध्रवीकरण झालं. 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं राज्यात सर्वाधिक 75 जागा जिंकल्या. या यशाला किनार होती ती, बाबरी मशीद पाडणं, जातीय दंगली आणि मुंबईतल्या बॉम्बस्फोटांची. बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद, बॉम्बस्फोट, दंगली या मुद्दांचं त्यांच्या भाषणात चांगलंच भांडवल केलं. तेव्हा हे सर्व मुद्दे ताजे होते. निवडणुकांपर्यंत या मुद्यांची धग जाणवत होती. पण उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत तशी परिस्थिती नाही. राम मंदिराच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. मतदारांना मंदिर मशीद नव्हे तर विकासाचे मुद्दे हवे आहेत. त्यातच निवडणुकांना अजून पाच महिने तरी अवकाश आहे. त्यामुळे राम मंदिराचा हा मुद्दा निवडणुकीपर्यंत जीवंत ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे आहे. 
राजकारणात 26 वर्ष हा काही छोटा कालखंड नसतो. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. 26 वर्षांपूर्वीचा मुद्दा आता पुन्हा चालेलच याची कोणतीही खात्री नाही. 26 वर्षांपूर्वी देशात असलेली स्थिती आता बदलली आहे. आताची युवा पिढी ही करिअरवर लक्ष देणारी आहे. शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. जागतिकीकरणामुळे अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर - मशीद हे भावनिक मुद्दे आताच्या पिढीला तितकेसे आकर्षित करतील का ? याबद्दल साशंकताच आहे.
उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन शक्ति प्रदर्शन करण्यात यशस्वी झाले. त्यांनी सर्व मीडियाचा फोकस स्वत:वर केंद्रीत करण्यात यश मिळवलं. पण 1995 मध्ये बाबरीमुळे बाळासाहेब ठाकरेंना जसा फायदा झाला  तसा फायदा राम मंदिराच्या मुद्यामुळे उद्धव ठाकरेंना 2019 च्या निवडणुकीत होईल का ? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी काही काळ जावा लागेल.

Wednesday, October 24, 2018

दुष्काळातली समुद्र संजीवनी

राज्यावर असलेली दुष्काळाची छाया आता गडद होत चालली आहे. सरणारा प्रत्येक दिवस भीषण दुष्काळाकडे पाऊल टाकत चालला आहे. यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी बरसला. त्यामुळे राज्यावर मोठं संकट निर्माण झालं. राज्य सरकार जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसाठा तसंच जमिनीतील पाण्याची पातळी उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यंदा निसर्गानं साथ दिली नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी होणं अशक्यच आहे. निसर्गासमोर सगळेच हतबल आहेत. त्याला सरकारही अपवाद नाही.
पण याच निसर्गानं महाराष्ट्राला भला मोठा समुद्रकिनारा दिलेला आहे. हे पाणी वापरलं जाऊ शकतं. हे पाणी खारं असलं तरी अत्याधुनिक शोधांमुळे हेच पाणी पिण्यालायक करता येणं शक्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इस्त्रायलच्या दौ-यावर गेले होते. त्यावेळी एका यंत्रातून पिण्यालायक झालेलं समुद्राचं पाणी या दोन्ही नेत्यांनी प्यायलं होतं. त्याविषयीच्या बातम्या आणि फोटो जगभरात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर भारत दौ-यावर आलेले इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी, समुद्री जल शुद्धीकरणाचं ते यंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलं होतं. जीपमध्ये बसवण्यात आलेलं हे यंत्र गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात बीएसएफला देण्यात आलं.
इस्त्रायलनं लावलेला हा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून दोन्ही देशांमध्ये संरक्षण विषयक अनेक करारही झाले आहे. इस्त्रायलमधल्या कृषी तंत्रज्ञानानं महाराष्ट्राला मागील दोन दशकांपासून भूरळ घातलेली आहे. लहरी हवामानाचा फटका महाराष्ट्राला बसतोय. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. परिणामी आता ईस्त्रायलचं समुद्री जल शुद्धिकरणातलं तंत्रज्ञान महाराष्ट्रात व्यापक प्रमाणात वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. 

दोन्ही देशांमधली मैत्री पाहता हे तंत्रज्ञान भारताला देताना इस्त्रायलकडून कोणतीही अडचण येणार नाही.
राज्याला लाभलेल्या विस्तृत समुद्र किना-यांवर इस्त्रायलच्या मदतीनं मोठे प्रकल्प टाकून समुद्रातलं खारं पाणी शुद्ध करणं गरजेचं आहे. यातून मुंबईची तहान भागवता येईल. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या पालघर जिल्ह्यातील धरणांमधील पाणी इतर टंचाई असलेल्या जिल्ह्यांमधल्या नागरिकां पुरवता येईल. मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये असे प्रकल्प तयार करून ते पाणी राज्यात पुरवता येईल. अर्थात त्यासाठी होणारा खर्च हा मोठा असेल. पण राज्यातल्या दुष्काळग्रस्त नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी होणार हा खर्च परवडणारा आहे. 
महाराष्ट्रच नव्हे तर देशातील इतर राज्यांनाही मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्या भागांमध्येही समुद्री जल शुद्धिकरणाचे मोठे प्रकल्प तयार करता येऊ शकतील. अर्थात हा प्रकल्प किंवा उद्योग खर्चिक आहे, अशी टीकाही होऊ शकेल. त्यात चूक असं काहीच नाही. पण समुद्राचं पाणी विपूल प्रमाणात उपलब्ध आहे. तर दुसरीकडे आपलेच बांधव पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. मुक्या जीवांचेही हाल होत आहेत. शेतीचं मोठं नुकसान होत आहे. परिणामी हेच अमर्याद असलेलं समुद्राचं पाणी शुद्ध करून राज्यातल्या गरजूंपर्यंत लवकरात लवकर पोहोचवणं गरजेचं आहे. 

Monday, May 28, 2018

थर्ड क्लास !

सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याची मजाच काही और होती. मल्टिस्क्रिनमधला प्रेक्षक वर्ग हा हातचं राखून सिनेमा पाहणारा. ना शिट्ट्यांचा आवाज ना टाळ्यांचा. नाही म्हणायला मोठा आवाज होणार नाही, याची काळजी घेत हसणारा प्रेक्षक. तर याच्या उलट चित्र सिंगल स्क्रिनमध्ये असायचं. हिरोच्या एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाट, शिट्यांचा आवाज असायचा. पण वाढत्या मल्टिस्क्रिनमुळे दर्दी प्रेक्षक कमी होत चालला आहे. सिंगल स्क्रिनमध्ये तिकीटांचे दर जास्त नसायचे. बाल्कनी, फर्स्ट क्लास आणि थर्ड क्लास अशी तिकीटांची उतरंड होती. पण प्रत्येकाला परवडेल त्या प्रमाणे तिकीट काढता येत होतं. मल्टिस्क्रिनमधला माजोरडेपणा तिथं नव्हता. इंटर्व्हलमध्ये खाल्लेल्या दोन रुपयाच्या समोस्याची चव अजूनही आठवते. मुंबईत तर असं म्हणतात की, एका फेमस समोस्यावाल्याकडून २० रूपयात दोन समोसे खरेदी करतात. आणि तेच मल्टिप्लेक्समध्ये ६० रुपयाला विकतात. १२० रुपयात पॉपकॉर्न विकत घेऊन खरेदी करणा-याच्या जीवाची 'लाहीलाही' सिंगल स्क्रिनमध्ये होत नव्हती.
ते जाऊ द्या. कारण आपल्या ब्लॉगचा आजचा विषय हा काही अर्थकारणाचा नाही. तर थर्ड क्लासचा आहे. मैने प्यार किया हा सिनेमा मी आठवीत असताना थर्ड क्लासमध्ये पाहिला होता. संभाजीनगरला अंजली थिएटरमध्ये हा सिनेमा पाहिला होता. त्या काळी संभाजीनगरमधलं सर्वात भारी थिएटर म्हणजे अंजली थिएटर होते. ते मला खूप आवडायचं. त्यामुळे मला पत्नीही अंजली नावाचीच मिळाली.
सिनेमा तर बघायचा होता पण जवळ पैसे नव्हते. नेमकी तेव्हा दिवाळी होती. लक्ष्मीपूजन झालेलं होतं. नेमके तीन रुपये घेतले. (ढापले म्हणा किंवा चोरी केली म्हणा.) बसचा पास असल्यानं जाण्या-येण्याची पैशाची चिंता नव्हती. तडक अंजली थिएटर गाठलं. थर्ड क्लासच्या लाईनमध्ये उभा राहिलो. बुकींगवाल्याकडे पैसे दिले. पण चोरी पकडली गेलीच. पैशांना कुंकू लागलेलं होतं. बुकींगवाला हसत म्हणाला, लक्ष्मीपूजनाचे पैसे आणले का ?. पण त्यानं तिकीट दिलं. बहुतेक माझ्या आधी काही मुलं लक्ष्मीपूजनाचे पैसे घेऊन आले असतील. लाल रंगाचं तिकीट मिळालं. डिग्री मिळाल्यावर एखाद्याला जसा आनंद व्हावा तसा मला झाला. ते लाल तिकीट घेऊन सर्वात पुढे बसलो. मेरे रंग में रंगने वाली, या गाण्याचे रंग जवळून अनुभवता आले.
मी आणि माझा मित्र रिंकू त्रिवेदी कोळसे सर कडे ट्युशनला जायचो. कोळसे सर वाल्मीमध्ये (water and land management institute) नोकरीला होते. त्यांच्या ऑफिसकडून आम्हाला ते अजिंठ्याला नेणार होते. ऐनवेळी हा प्रोग्राम कॅन्सल झाला. पण अजिंठ्याला जायचं असल्यानं घरून पैसे घेतलेले होते. लगेच प्लॅन शिजला आमचा अवली मित्र राजू शिंदे याला बरोबर घेतलं. अंबा किंवा अप्सरा थिएटरला मिथूनचा प्रेम प्रतिज्ञा सिनेमा चित्रपट बघितला. दिवसभर खाण्यासाठी पैसे लागणार होते. त्यामुळे हा सिनेमाही थर्ड क्लासमध्ये पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
१९९१ मध्ये मी, माझा भाऊ रवींद्र, मित्र संभाजी शिरसाट, त्याचा भाऊ मंगेश असे सर्व २६ जानेवारी रोजी सिनेमा बघायला बाहेर पडलो. पण त्या दिवशी सर्व थिएटरवाल्यांनी बंद पुकारला होता. परिणामी सिनेमा तर काही बघायला मिळाला नाही. पण जाण्यायेण्यात आणि हॉटेलमध्ये पैसे खर्च झाले. थोडे पैसे उरले. दुस-या दिवशी मी आणि संभाजीनं प्लॅन केला. रवींद्र आणि मंगेशला काहीही न सांगता गुपचूप सिनेमा बघायला गेलो. पैसे कमी असल्यानं पुन्हा थर्ड क्लासचं तिकीट काढलं. मिथूनचा प्यार का देवता हा सिनेमा बघितला. मिथूनला गरिबांचा अमिताभ, का म्हणतात हे त्यामुळे लक्षात आलं.
पण मी आणि संभाजी सिनेमा बघायला गेलो, ही बातमी फुटलीच. आपल्याला सोडून भाऊ सिनेमा बघायला गेले याचा रवींद्र आणि मंगेशच्या बालमनावर मोठा परिणाम झाला. बरेच दिवस त्यांना अन्नपाणी गोड लागलं नाही.
काही महिन्यांनी संभाजी, मंगेश जालन्याला राहायला गेले. जालन्यातले थिएटर त्या काळी तरी काही धड नव्हते. १९९२ मध्ये माधुरी दीक्षितचा बेटा सिनेमा लागला होता. संभाजी माधुरीचा जबरदस्त फॅन. सिनेमा तो बघण्यासाठी संभाजी जालन्याहून आला. आम्ही दोघे सादिया थिएटरला पोहोचलो. संभाजीने येताना जास्त पैसे आणले होते. पण सिनेमा हाऊसफुल्ल झालेला होता. तिकीटं संपली होती. पण ब्लॅक वाल्यांकडे तिकीट होती. फर्स्ट क्लासचं तिकीट होतं १५ रुपयाला. दोघांचे मिळून ३० रुपये होत होते. पण संभाजीकडे ४०च रुपये होते. ब्लॅक वाल्याला परिस्थिती समजावून सांगितली. मित्र जालन्याहून आलेला आहे, पैसे कमी आहेत. आणि आश्चर्य घडलं. ब्लॅकवाल्यानं ३०ची दोन तिकीटं ४० रुपयात दिली. ब्लॅकवाला असला तरी त्याच्या मनात काळंबेरं नव्हतं.
पण कोणताच क्लास नसलेल्या अशा टुरिंग टॉकिज म्हणजेच तंबूतही सिनेमा पाहण्याचं भाग्य मला लाभलं. साधारणपणे चौथी किंवा पाचवीत असताना टुरिंग टॉकिजमध्ये सिनेमा पाहिलेले आहेत. गंगापूर तालुक्यातलं आमचं गाव सोलेगाव. तिथून जवळ असलेल्या रांजणगावमध्ये उन्हाळ्यात उर्स भरायचा. उर्सासाठी टूरिंग टॉकिज आलेल्या असायच्या. रात्री बैलगाडीतून काकासोबत आम्ही रांजणगावला निघायचो. माझे अंकुश काका हे ही सिनेरसिक होते. गावातून अनेक गाड्या रांजणगावला जायच्या. दर्शन ऊरकून कधी एकदा तंबूत घुसतो याची घाई असायची. बरेच सिनेमे पाहिले. पण सध्या फक्त लोहा हाच सिनेमा आठवतोय. तिकीट काढा आणि कुठेही जागा धरून बसा. सगळ्यांचा एकच क्लास. ना बाल्कनी, ना फर्स्ट क्लास, ना थर्ड क्लास. अशी समानता तिथं होती. पण या मल्टिप्लेक्स आणि मल्टिस्क्रिनमध्ये समानताच नाही. सगळा पैशांचा खेळ. त्यामुळे पांढरपेशा वर्गच तिथं पाहायला मिळतो. कमी पैसे असलेला थर्ड क्लासच त्यांनी बाद केला आहे.

Sunday, February 11, 2018

दाळ-बट्टी रोजगार योजना !

दाळ-बट्टी माझा आवडता पदार्थ, मला करताही येतो. दाळ-बट्टीला गंगापूर तालुक्यात बट्ट्या, बाफळ्या म्हटलं जातं. तर राजस्थानी लोक त्याला दाल-बाटी म्हणतात. मराठवाड्यात अनेक ठिकाणी नवरदेवाकडून जेव्हा गाव पंगत असते त्यावेळी दाळ-बट्टी केली जाते. तसंच आता हुरड्याच्या कार्यक्रमातही दाळ-बट्टी करण्याकडे कल वाढला आहे.
दाळ-बट्टी ही दोन प्रकारे करता येते. त्यातला पहिला प्रकार म्हणजे गव्हाचं जाड पीठ, मक्याचं पीठ आणि थोडासा रवा एकत्र करून ते पीठ मिसळून घ्यावं. त्यात ओवा, चवी प्रमाणे मीठ टाकावं. थोडासा सोडा टाकावा म्हणजे बट्टी खुसखुशीत होते. पीठ मळून झाल्यावर त्याचे लाडू सारखे गोळे करून घ्यावे. नंतर हे गोळे उकळत्या पाण्यात उकडून काढावे. उकडून काढलेल्या गोळ्यांचे थंड झाल्यावर, चार तुकडे करावे. ते तुम्ही तेलात किंवा गावरान तुपात तळून काढू शकतात. ज्या पाण्यात हे गोळे उकळून काढले तेच पाणी दाळ (वरण) करण्यासाठी वापरावं. त्यामुळे दाळही चवदार होते. 
गावाकडे दाळ-बट्टी करताना वेगळी पद्धत वापरली जाते. गव्हाचं जाडसर पीठ ओवा टाकून मळलं जातं. त्याचे गोळे केले जातात. एक छोटासा खड्डा खणून त्यात गोव-या जाळल्या जातात. चांगला विस्तव झाल्यावर त्यात गोळे चांगले भाजले जातात. ही झाली विस्तवावर तयार केलेली बट्टी. गावजेवणासाठी ही दाळ-बट्टी  चांगलीच लोकप्रिय आहे.
सध्या पकोडा रोजगार योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावरून सुरू असलेल्या गरम राजकारणात अनेक जण पकोडे तळत आहेत. तर मग मी माझी बट्टी का का तळू नये ? मागे पुढे दाळ-बट्टीचा व्यवसाय सुरू करण्याचाही एक सुप्त विचार आहे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत माझ्या हातची बट्टी चाखली आहे, त्या सर्वांनीच मला व्यवसायात उडी मारण्याचा सल्ला दिला आहे. बघू यात...

Saturday, January 6, 2018

ढिम्म सरकार, ३ दिवस हिंसाचार

भीमा कोरेगावसह सणसवाडी, वढू बुद्रूक, शिरुर परिसरात १ जानेवारी रोजी भयानक हिंसाचार झाला. भीमा कोरेगावमधल्या विजयस्तंभावर येणा-या अनुयायांवर हल्ले करण्यात आले. त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. हा हल्ला जरी एक तारखेला झाला असला तरी त्याची तयारी ब-याच महिन्यांपासून सुरू होती. या भागात पद्धतशीरपणे मराठा युवकांचं ब्रेन वॉश करण्यात आलं होतं, याची माहिती आता उघड झाली आहे. या ब्रेन वॉशमधूनच गोविंद गायकवाड यांच्या समाधीची मोडतोड करण्यात आली. संभाजी महाराजांच्या मृतदेहाचे तुकडे एकत्र करून गोविंद गायकवाड यांनी अंत्यसंस्कार केले होते. नंतर या गोविंद गायकवाड यांनाही मोघलांनी मारून टाकलं होतं. हा बहुजनांच्या एकतेचा इतिहास बदलून टाकण्याचा विडाच जातियवादी संघटनांनी घेतलेला आहे. गोविंद गायकवाड यांचं कर्तृत्व नाकारण्यात आलं. मराठा तरूणांना भडकवण्यात आलं. भडकवणा-या संघटना बाजूला राहिल्या. १ तारखेला हिंसाचार घडवण्याचं पातक घडलं. या हिंसाचारासाठी दगड साठवण्यात आले होते. याची खबरही गृहखात्याला नव्हती. ब-याच महिन्यांपासून खोटा इतिहास पसरवला जात आहे, हे ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित नव्हतं. १ जानेवारीला हिंसाचार घडत होता, गाड्या फोडल्या जात होत्या, अनुयायांवर हल्ले होत होते तरीही पोलिसांनी काहीच केलं नाही. त्या दिवशीच जर पोलिसांनी लाठीमार केला असता किंवा गोळीबार केला असता तर हिंसाचार लगेचच थांबला असता. १ जानेवारीला पोलिसांनी काहीच केलं नाही. त्यामुळे २ आणि ३ जानेवारीलाही पोलीस, सरकार ढिम्म राहिलं.
१ जानेवारीचे पडसाद २ जानेवारीला उमटले. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंद पुकारला. १ जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा उद्रेक ३ तारखेला पहायला मिळाला. बहुतांश ठिकाणी बंद शांततेत पार पडलाही. मात्र मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली. बेस्ट बसेस, अनेक कार, दुचाकींचं नुकसान झालं. काही ठिकाणी लोकलवर दगडफेक झाली. बाईकवरून जाणारेही आंदोलकांच्या रोषाला बळी पडले. अर्थात पोलीस १ तारखेच्या निष्क्रीयतेमुळे आधीच बॅकफूटवर गेलेले होते. त्यामुळे मुंबई परिसर हा जणू काही काश्मीर किंवा सीरिया झाला होता. अर्थात हा काही पहिलाच बंद नव्हता की, ज्यात हिंसाचार झाला. अर्थात हा काही शेवटचाही बंद नसेल. या राज्यानं आणि मुंबईनं अनेक बंद पाहिले आहेत. अगदी दंगली, बॉम्बस्फोटही पाहिले आहेत. आझाद मैदानात धर्मांध मुस्लीमांनी केलेला जिहादही पाहिलेला आहे.
बंद घडवणारे जॉर्ज फर्नांडिस यांना बंदसम्राट म्हटलं जायचं. डाव्या पक्षांनीही अनेकदा बंद करून उद्योगांची वाट लावलेली आहे. विरोधी पक्षात असताना भाजपनंही बंद केलेच आहेत. धाक, दहशत, दरारा या पद्धतीनं बंद करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व राज्यभरात मोठं झालं. बंद यशस्वी करणं ही नेतृत्व प्रस्थापित करण्याची एक पायरी आहे. या पायरीवरून आता पर्यंत अनेक नेते पुढे गेले आहेत. तीच पायरी पार करून प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्वही मोठं व्हायला मदत झाली आहे. बंद हे असंवैधानिक आहेत. तरीही ते पुकारले जातातच. दुष्काळ आवडे सर्वांना याप्रमाणे बंद आवडे राजकीय पक्षांना अशी स्थिती आहे.
पण या ३ दिवसाच्या हिंसाचारामुळे राज्यात पुन्हा जातीयवाद फोफावणार हे स्पष्ट झालं आहे. मराठा आणि दलित समाजात फूट पाडण्याचा डाव यशस्वी झाला आहे. गुजरातला संघाची प्रयोगशाळा म्हटलं जातं. गुजरात मॉडेल म्हणजे विकासाचं मॉडेल नाही. तर मुस्लीमांची भीती दाखवून मतं मिळवायची, हे गुजरात मॉडेल आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातल्या काही हताश पुरोगामी शक्ती कार्य करत आहेत, असं वाटतंय. जिग्नेश मेवानी, उमर खालिद, कन्हैया कुमार यासारखी मंडळी राज्यात फिरवून तणाव निर्माण करायचा. भाजप जशी मुस्लीमांची भीती दाखवतं, त्याचप्रमाणे ही मंडळी हिंदूत्ववाद्यांची भीती दाखवून मतांची मशागत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जशी संघाची गुजरातची प्रयोगशाळा धोकादायक आहे तशीच ही काही हताश पुरोगाम्यांची महाराष्ट्रातली प्रयोगशाळाही धोकादायक आहे.
पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे दोन्ही प्रयोगशाळेतून जातीयवादाची रसायनं मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील. अजून मोठे हिंसात्मक बंद, मोठे मोर्चे पुकारले जातील. अर्थात त्यावेळीही सरकार ढिम्मच राहील. कारण यातूनच मतांचं पीक बहरणार आहे. शेतक-यांच्या पिकाला जरी भाव नसला तरी हे मतांचं पिक सत्ता मिळवण्यासाठी मदतीचं ठरणार आहे.


Thursday, October 5, 2017

राज back in action

#bulletraj
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा संताप मोर्चा यशस्वी झाला असंच म्हणावा लागेल. एलफिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर सामान्य नागरिकांच्या मनात संताप निर्माण झाला होता. त्या संतापाला राज ठाकरेंनी वाट करून दिली. मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले. मुंबईकरांना बुलेटट्रेन नको, तर आहे त्या लोकलच्या सुविधा चांगल्या प्रकारे देण्याची गरज आहे. हा संदेश देण्यात राज ठाकरे यशस्वी ठरले.
लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर पालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे मनसे बॅकफुटवर गेली होती. अगदी देश पातळीवर जरी पाहिलं तरी कोणताही पक्ष हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवत नाही. अर्थात त्याला अपवाद होता, तो फक्त उद्धव ठाकरेंचा. पण आता राज ठाकरेंनीही थेट नरेंद्र मोदींना विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. अच्छे दिन, मोदींनी दिलेली आश्वासनं,बुलेटट्रेन या मुद्यांवरून राज ठाकरे जेव्हा टीका करत होते, त्यावेळी उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि नेते दाद देत होते. त्यावरून आता भाजपला विरोध सुरू झाल्याचं दिसून येतं. भाजपला विरोध करून पर्याय देता येऊ शकतो, हा विश्वास मनसे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
टोलच्या मुद्यावर राज ठाकरेंनी आंदोलन सुरू केल्यानंतर, आघाडी सरकारने अनेक टोल बंद केले होते. पण राज ठाकरेंना हा मुद्दा तडीस नेता आला नाही. आता बुलेटट्रेनला राज ठाकरेंनी विरोध सुरू केला आहे. या वेळी हा मुद्दा तडीस नेण्यावर मनसेला भर द्यावा लागेल. अर्थात हे झालं मुंबईपुरतं. राज्यातही अनेक प्रश्न आहेत. कर्जमाफी अजून झालेली नाही, शेतक-यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे या प्रश्नांकडेही मनसेनं लक्ष देण्याची गरज आहे. राज ठाकरेंनी जर या विषयातही लक्ष घातलं तर, राज्यातली जनताही त्यांना सााथ देईल. राज ठाकरे पुन्हा जोरकसपणे मैदानात उतरल्यानं काही भाजप नेत्यांनी त्यांचा धसका घेतला आहे. तर काही भाजप नेत्यांना आनंदही झाला आहे. कारण आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मनसेचा जनाधार पुन्हा निर्माण झाला, तर त्याचा फायदा भाजपलाच होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण मनसे शिवसेनेची मतं खेचेल, असा भाजपचा कयास आहे. त्यामुळे या मुद्यावर आता शिवसेना आणि मनसे यांनी विचार करण्याची गरज आहे. कारण या दोन्ही पक्षांचा समान शत्रू हा भाजप आहे.

Sunday, October 1, 2017

अगर तुम न होते...

राजकीय नेते आणि पत्रकार, म्हणजे एक दुजे के लिये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (असून अडचण नसून खोळंबा ही म्हण इथे लागू होत नाही, याची कृपया टीकाकारांनी नोंद घ्यावी.) वृत्तपत्रांना बातम्यांसाठी नेते मंडळी हवी असते. पण त्यांचं कसं आहे की, नेते किेंवा प्रवक्त्यांना कॉल केला, बातमी केली. ती वेब एडिशनला किंवा दुस-या दिवशी वृत्तपत्रात छापून आली विषय संपला.
पण न्यूज चॅनेलचं तसं नाही. न्यूज चॅनेल सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अखंड सुरू असतात. (नशीब रात्री १२ नंतर रेकॉर्डेड कार्यक्रम असतात. नाही तर आम्ही नेते आणि प्रवक्त्यांना झोपूही दिलं नसतं.) दिवसभर (काही ना काही) बातम्या दाखवायच्या असतात. आमचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. सगळ्यात आधी सामनात काय छापून आलं ते बघायचं. अग्रलेखात सरकारवर टीका. लगेच सात वाजता ब्रेकींग करायची. तिकडे असाईनमेंट डेस्कही कामाला लागतो. आठच्या बुलेटिनला संजय राऊत यांचा फोनो. नेहमीचे प्रश्न, वेगवेगळे प्रश्न. आम्ही काहीही विचारलं तर उत्तरं मात्र राऊत यांना जी हवी आहेत तीच मिळतात. मग लगेच भाजपच्या प्रवक्त्याला फोन. आम्ही सांगतो बघा, बघा तुमच्या सरकारविषयी सामनात काय छापून आलं. लगेच माधव भंडार, मधू चव्हाण गरम आवाजात बोलायला लागतात. आमचा प्रयत्न असतो, राऊत आणि भाजपच्या प्रवक्त्याला भिडवून द्यायचं. पण तोपर्यंत संजय राऊत फोन कट करतात. मग पुढची पाच मिनीटं भाजपचे प्रवक्ते त्यांची खदखद बाहेर काढतात, सरकारला धोका नाही असं ते शेवटी निक्षूण सांगतात. मला तर असं वाटतं, आशिष शेलार, माधव भंडारी सकाळीच सामनावाचून काढत असतील. न्यूज चॅनेलमधून कॉल येण्याच्या आधीच कोणते मुद्दे मांडायचे याची तयारी ते आधीच करत असतील. या विषयावर काँग्रेसच्या नेते मंडळींचा फोनो घ्यायचा असतो. पण काँग्रेसमध्ये या विषयावर बोलणार कोण ? या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. लगेच राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचं नाव समोर येते. चांगले सदगृहस्थ. कधीही फोन करा, फक्त विषय सांगा. धन्यवाद, म्हणेपर्यंत बोलत राहतात. त्यांचं बोलणं होतं, आणि इकडं बुलेटिनही संपतं.
फोनो घेताना काही विषयांमध्ये तज्ज्ञ असे नेते आहेत. दहशतवाद, पाकिस्तान आणि काश्मीर म्हटलं तर संजय राऊत यांच्या शिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित घोटाळे असल्यावर डॉ. नीलम गो-हे (माझं आडनाव गोरे आहे. आमचं आडनाव थोडं सारखं असल्यानं, मी अनेकदा नीलम ताईंच्या फोनोला प्राधान्य देतो. आता म्हणा आडनावात काय आहे ?) दुर्दैवानं महिला अत्याचाराची बातमी आल्यावर डॉ. नीलम गो-हे, चित्रा वाघ, विजया रहाटकर यांची नावं प्राधान्यानं समोर येतात. सनातन, इशरत जहाँ, डेव्हिड हेडलीचा विषय आल्यावर जितेंद्र आव्हाड यांच्याशिवाय बोलणारा हुकुमी एक्का दुसरा कोणीच नसतो. छगन भुजबळांच्या विषयी फोनो घ्यायचा म्हटलं तर किरीट सोमय्यांशिवाय पानही हलत नाही. आता तर अशी परिस्थिती आहे की, आधी सोमय्यांचा फोनो होतो आणि नंतर ईडीची कारवाई होते.
एकनाथ खडसे यांच्याविषयी थोडंही खट्ट झालं की, अंजली दमानिया, प्रिती मेनन-शर्मा, नवाब मलिक दणक्यात फोनो देतात. चिक्की घोटाळ्याच्या वेळी तर किती फोनो घेतले असतील याची गणती नाही. भाजपचेच नेते असाईनमेंटला फोन करून सांगायचे, आमचे फोनो घ्या. त्यांना पंकजा मुंडेंना वाचवायचं होतं की गोत्यात आणायचं होतं, हे त्यांनाच ठाऊक.
पण फोनो देण्यात सर्वात अव्वल दर्जाचे नेते आणि प्रवक्ते भाजपचेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं ही मंडळी आता सत्तेत आहे म्हणून. त्यांनी दिलेले फोनो आजही सर्वच चॅनेलमध्ये काम करणा-यांच्या लक्षात आहेत. मला तर असं वाटतं फोनो, लाईव्ह, मुलाखती, 121, बाईट्स देऊन ही मंडळी सत्तेत बसली. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमय्या, माधव भंडारी, मधू चव्हाण, अवधूत वाघ या मंडळींना कधीही फोन केला आणि ते फोनोला नाही म्हटले हे आठवत नाही. आघाडी सरकारच्या विरोधात रान पेटवण्यात या मंडळींनी दिलेले फोनो आणि लाईव्ह महत्त्वाचे होते. लाईव्हसाठी तर ही मंडळी कुठूनही धावतपळत ऑफिसला पळत यायची. आता मात्र ओबीशिवाय ही मंडळी लाईव्हला बसत नाहीत.
हे असं आमचं नातं आहे. अगर तुम न होते, खरंच नेते मंडळी आणि प्रवक्ते मंडळी अगर तुम न होते तो हमारे बुलेटिन न निकलते. आणि हो एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, स्टुडिओत ऑनएअर एकमेकांवर जोरजोरात आरोप-प्रत्यारोप करणारे, ओरडणारे हे नेते आणि प्रवक्ते टॉक शो संपल्यावर हसत-हसत एकमेकांच्या गळ्यात हात घालून बाहेर पडतात. कधीकधी तर एकाच गाडीतूनही जातात. त्या दिवसाचा टॉक शो संपतो. रात्रीनंतर पुन्हा सकाळ होते. काही तरी घडतं, आणि पुन्हा सुरू होतात...फोनो...फोनो...फोनो...लाईव्ह...लाईव्ह...लाईव्ह.