Monday, May 28, 2018

थर्ड क्लास !

सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याची मजाच काही और होती. मल्टिस्क्रिनमधला प्रेक्षक वर्ग हा हातचं राखून सिनेमा पाहणारा. ना शिट्ट्यांचा आवाज ना टाळ्यांचा. नाही म्हणायला मोठा आवाज होणार नाही, याची काळजी घेत हसणारा प्रेक्षक. तर याच्या उलट चित्र सिंगल स्क्रिनमध्ये असायचं. हिरोच्या एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाट, शिट्यांचा आवाज असायचा. पण वाढत्या मल्टिस्क्रिनमुळे दर्दी प्रेक्षक कमी होत चालला आहे. सिंगल स्क्रिनमध्ये तिकीटांचे दर जास्त नसायचे. बाल्कनी, फर्स्ट क्लास आणि थर्ड क्लास अशी तिकीटांची उतरंड होती. पण प्रत्येकाला परवडेल त्या प्रमाणे तिकीट काढता येत होतं. मल्टिस्क्रिनमधला माजोरडेपणा तिथं नव्हता. इंटर्व्हलमध्ये खाल्लेल्या दोन रुपयाच्या समोस्याची चव अजूनही आठवते. मुंबईत तर असं म्हणतात की, एका फेमस समोस्यावाल्याकडून २० रूपयात दोन समोसे खरेदी करतात. आणि तेच मल्टिप्लेक्समध्ये ६० रुपयाला विकतात. १२० रुपयात पॉपकॉर्न विकत घेऊन खरेदी करणा-याच्या जीवाची 'लाहीलाही' सिंगल स्क्रिनमध्ये होत नव्हती.
ते जाऊ द्या. कारण आपल्या ब्लॉगचा आजचा विषय हा काही अर्थकारणाचा नाही. तर थर्ड क्लासचा आहे. मैने प्यार किया हा सिनेमा मी आठवीत असताना थर्ड क्लासमध्ये पाहिला होता. संभाजीनगरला अंजली थिएटरमध्ये हा सिनेमा पाहिला होता. त्या काळी संभाजीनगरमधलं सर्वात भारी थिएटर म्हणजे अंजली थिएटर होते. ते मला खूप आवडायचं. त्यामुळे मला पत्नीही अंजली नावाचीच मिळाली.
सिनेमा तर बघायचा होता पण जवळ पैसे नव्हते. नेमकी तेव्हा दिवाळी होती. लक्ष्मीपूजन झालेलं होतं. नेमके तीन रुपये घेतले. (ढापले म्हणा किंवा चोरी केली म्हणा.) बसचा पास असल्यानं जाण्या-येण्याची पैशाची चिंता नव्हती. तडक अंजली थिएटर गाठलं. थर्ड क्लासच्या लाईनमध्ये उभा राहिलो. बुकींगवाल्याकडे पैसे दिले. पण चोरी पकडली गेलीच. पैशांना कुंकू लागलेलं होतं. बुकींगवाला हसत म्हणाला, लक्ष्मीपूजनाचे पैसे आणले का ?. पण त्यानं तिकीट दिलं. बहुतेक माझ्या आधी काही मुलं लक्ष्मीपूजनाचे पैसे घेऊन आले असतील. लाल रंगाचं तिकीट मिळालं. डिग्री मिळाल्यावर एखाद्याला जसा आनंद व्हावा तसा मला झाला. ते लाल तिकीट घेऊन सर्वात पुढे बसलो. मेरे रंग में रंगने वाली, या गाण्याचे रंग जवळून अनुभवता आले.
मी आणि माझा मित्र रिंकू त्रिवेदी कोळसे सर कडे ट्युशनला जायचो. कोळसे सर वाल्मीमध्ये (water and land management institute) नोकरीला होते. त्यांच्या ऑफिसकडून आम्हाला ते अजिंठ्याला नेणार होते. ऐनवेळी हा प्रोग्राम कॅन्सल झाला. पण अजिंठ्याला जायचं असल्यानं घरून पैसे घेतलेले होते. लगेच प्लॅन शिजला आमचा अवली मित्र राजू शिंदे याला बरोबर घेतलं. अंबा किंवा अप्सरा थिएटरला मिथूनचा प्रेम प्रतिज्ञा सिनेमा चित्रपट बघितला. दिवसभर खाण्यासाठी पैसे लागणार होते. त्यामुळे हा सिनेमाही थर्ड क्लासमध्ये पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
१९९१ मध्ये मी, माझा भाऊ रवींद्र, मित्र संभाजी शिरसाट, त्याचा भाऊ मंगेश असे सर्व २६ जानेवारी रोजी सिनेमा बघायला बाहेर पडलो. पण त्या दिवशी सर्व थिएटरवाल्यांनी बंद पुकारला होता. परिणामी सिनेमा तर काही बघायला मिळाला नाही. पण जाण्यायेण्यात आणि हॉटेलमध्ये पैसे खर्च झाले. थोडे पैसे उरले. दुस-या दिवशी मी आणि संभाजीनं प्लॅन केला. रवींद्र आणि मंगेशला काहीही न सांगता गुपचूप सिनेमा बघायला गेलो. पैसे कमी असल्यानं पुन्हा थर्ड क्लासचं तिकीट काढलं. मिथूनचा प्यार का देवता हा सिनेमा बघितला. मिथूनला गरिबांचा अमिताभ, का म्हणतात हे त्यामुळे लक्षात आलं.
पण मी आणि संभाजी सिनेमा बघायला गेलो, ही बातमी फुटलीच. आपल्याला सोडून भाऊ सिनेमा बघायला गेले याचा रवींद्र आणि मंगेशच्या बालमनावर मोठा परिणाम झाला. बरेच दिवस त्यांना अन्नपाणी गोड लागलं नाही.
काही महिन्यांनी संभाजी, मंगेश जालन्याला राहायला गेले. जालन्यातले थिएटर त्या काळी तरी काही धड नव्हते. १९९२ मध्ये माधुरी दीक्षितचा बेटा सिनेमा लागला होता. संभाजी माधुरीचा जबरदस्त फॅन. सिनेमा तो बघण्यासाठी संभाजी जालन्याहून आला. आम्ही दोघे सादिया थिएटरला पोहोचलो. संभाजीने येताना जास्त पैसे आणले होते. पण सिनेमा हाऊसफुल्ल झालेला होता. तिकीटं संपली होती. पण ब्लॅक वाल्यांकडे तिकीट होती. फर्स्ट क्लासचं तिकीट होतं १५ रुपयाला. दोघांचे मिळून ३० रुपये होत होते. पण संभाजीकडे ४०च रुपये होते. ब्लॅक वाल्याला परिस्थिती समजावून सांगितली. मित्र जालन्याहून आलेला आहे, पैसे कमी आहेत. आणि आश्चर्य घडलं. ब्लॅकवाल्यानं ३०ची दोन तिकीटं ४० रुपयात दिली. ब्लॅकवाला असला तरी त्याच्या मनात काळंबेरं नव्हतं.
पण कोणताच क्लास नसलेल्या अशा टुरिंग टॉकिज म्हणजेच तंबूतही सिनेमा पाहण्याचं भाग्य मला लाभलं. साधारणपणे चौथी किंवा पाचवीत असताना टुरिंग टॉकिजमध्ये सिनेमा पाहिलेले आहेत. गंगापूर तालुक्यातलं आमचं गाव सोलेगाव. तिथून जवळ असलेल्या रांजणगावमध्ये उन्हाळ्यात उर्स भरायचा. उर्सासाठी टूरिंग टॉकिज आलेल्या असायच्या. रात्री बैलगाडीतून काकासोबत आम्ही रांजणगावला निघायचो. माझे अंकुश काका हे ही सिनेरसिक होते. गावातून अनेक गाड्या रांजणगावला जायच्या. दर्शन ऊरकून कधी एकदा तंबूत घुसतो याची घाई असायची. बरेच सिनेमे पाहिले. पण सध्या फक्त लोहा हाच सिनेमा आठवतोय. तिकीट काढा आणि कुठेही जागा धरून बसा. सगळ्यांचा एकच क्लास. ना बाल्कनी, ना फर्स्ट क्लास, ना थर्ड क्लास. अशी समानता तिथं होती. पण या मल्टिप्लेक्स आणि मल्टिस्क्रिनमध्ये समानताच नाही. सगळा पैशांचा खेळ. त्यामुळे पांढरपेशा वर्गच तिथं पाहायला मिळतो. कमी पैसे असलेला थर्ड क्लासच त्यांनी बाद केला आहे.

2 comments:

  1. खरच गेले ते दीवस राहिल्या न मिटणार्या खूपच सुंदर आणि आयुष्यभर पुरून उरणार्या आठवणी

    ReplyDelete
  2. मलाही रांजनगावचा उरूस आणी ती टुरिंग टाॅकीज आठवनत आह

    ReplyDelete