Saturday, November 26, 2016

भक्तांनो, तुमच्या दैवतांची लाज राखा !

देशात सध्या मोदी पंथाच्या भक्तांची संख्या जास्त आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी हा पंथ जन्माला आला. या पंथातली मंडळी सोशल मीडियावर सक्रीय आहे. काही भक्त तर एटीएमच्या रांगेतही मोदींचं गुणगान करत असतात. काही भक्तांना रांगेत उभं राहून चिडलेल्या नागरिकांनी चोपही दिल्याच्या घटना घडल्या आहेत. अर्थात आपल्या देशात व्यक्तीपूजा जुनीच आहे. प्रत्येक नेत्याचा असा पंथ निर्माण झालेला आहे. त्या पंथातल्या अनुयायांना त्यांच्या नेत्याविषयी म्हणजेच दैवताविषयी बोललेलं, टीका केलेली आवडत आवडत नाही. भलेही ते दैवत जीवंत असो किंवा ढगात पोहोचलेलं असो.

असं म्हणतात पंडित नेहरूंची लोकप्रियताही अफाट होती. अर्थात माझा तेव्हा जन्म झालेला नव्हता. पण वाचून ऐकून माहित आहे. त्यांना त्या काळात लहान असताना किंवा कुमार असताना पाहिलेली मंडळी हयात आहे. त्यातले कित्येक 'कुमार' अजूनही नेहरूंच्या तितक्याच प्रेमात आहेत. अर्थात त्यांना भक्त म्हणलेलं आवडणार नाही. पुरोगामी लोकांमध्ये देव, दैवत, भक्त हा प्रकार नसतो. पण गुण सगळे हे मोदी पंथासारखेच आहेत. जाऊ द्या, तो काही मुख्य विषय नाही.
सध्या मोदी पंथातल्या भक्तांच्या इभ्रतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीनं परदेशातला काळा पैसा भारतात आला तर प्रत्येक भारतीयाला १५ लाख मिळतील असं जाहीर भाषणांमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला असं वाटलं की, बँक खात्यात १५ लाख जमा होतील आणि अच्छे दिन येतील. पण आता अडीच वर्षे होऊन गेली पण खात्यात १५ लाख जमा झाले नाहीत. जमा तर सोडाच पण या नोटाबंदीमुळे खात्यात असलेले पैसे काढण्यासाठीही देशभक्तीचं नाव घेत रांगेत उभं राहावं लागतं.
त्यामुळे देशभक्त मोदी पंथातल्या भक्तांनो, पुढे या. दैवत मोदी यांची लाज राखा. भक्तांनो आता तुम्हीच वर्गणी काढा. काय असेल नसेल तो काळा-पांढरा पैसा एकत्र करा. मोदीच्या भक्तांमध्ये अनेक नेते, उद्योगपती, व्यापारी, दलाल, रिअल इस्टेट एजंट, व्याजानं पैसा देणारे असे अनेक जण आहेत. या तुम्ही सर्व पुढे या. तुमचा सगळा पैसा काढा आणि तो आमच्या सारख्या सामान्यांच्या बँक खात्यात जमा करा. तर आणि तरच तुमच्या दैवतांची लाज राखली जाईल. स्वीस बँकेतला आणि परदेशातला काळा पैसा भारतात आल्यावर आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत करू. तो पर्यंत तुम्ही आतापर्यंत जो पैसा कमावलात, तो तुमच्या नेत्यांनी दिलेलं आश्वासन पाळण्यासाठी जनतेत वाटा. मला विश्वास आहे. मोदी पंथातले भक्त असंच करतील. 'मोदी १५ लाख' या नावानं एक खातं उघडा त्याचा अकाऊंट नंबर तुम्ही भक्तांमध्ये वितरीत करा. आणि पैसे भरायला सुरूवात करा. भरपूर पैसे जमा झाले की, मग ते आमच्या सारख्यांच्या खात्यामध्ये जमा करा. मोदी भक्त हे करणारच. कारण त्यांच्या दैवतानेच हे आश्वासन दिलं होतं.
आता अच्छे दिन वाल्या मोदी भक्तांनंतर वळूयात ते 'गरिबी हटाव'वाल्या इंदिरा गांधींकडे. पाकिस्तानचे दोन तुकडे करून जगाचा नकाशा बदलणा-या इंदिरा गांधी यांच्यासारखं पोलादी व्यक्तीमत्व कोणीच नाही. इंदिरा गांधींनी गरिबी हटाव हा नारा देत सत्ता मिळवली होती. त्यांनी सत्ता मिळवली पण गरिबी कायमच राहिली. अर्थात भ्रष्ट काँग्रेस नेते, नेत्यांची हुजरेगिरी करणारे कार्यकर्त, दलाल, सहकारातून समृद्धीकडे गेलेले सहकार सम्राट, शिक्षण सम्राट यांची गरिबी दूर झाली यात शंका नाही. मात्र बहुसंख्य जनता ही गरिबच राहिली.
त्यामुळे काँग्रेसच्या सच्च्या कार्यकर्त्यांनो इंदिरा मातेचं स्वप्न पूर्ण करा. त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करा. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या गरिबांना तुम्ही आर्थिक मदत करा. काँग्रेस सत्तेत असताना सत्तेचा वापर करून जी काही माया काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी जमवली ती बाहेर काढा. तुमचे कारखाने विका, जमिनी विका, शिक्षण संस्था विका, दलालीतून मिळलेला पैसा बाहेर काढा पण इंदिरा मातेनं दिलेलं आश्वासन पूर्ण करा. गरिबी हटवाच. मला विश्वास आहे, इंदिरा मातेचं हे स्वप्न आणि आश्वासन पूर्ण केल्याशिवाय काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते शेवटचा श्वास घेणार नाहीत. तुम्हीही 'इंदिरा गरिबी हटाव' या नावानं खातं उघडून त्यात पैसे जमा करा. रग्गड पैसे जमा झाल्यावर ते गरिबांना वाटा. तुमची सत्ता आल्यावर या नावाने योजनाही सुरू करता येईल. नाही तरी काँग्रेस सरकारची कोणतीही योजना महात्मा गांधी, इंदिर गांधी, राजीव गांधी यांच्या नावाशिवाय सुरूच होत नाही. चला, मोदी पंथातल्या भक्तांनो आणि इंदिरा मातेच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनो करा सुरूवात. शुभस्य शीघ्रम.


No comments:

Post a Comment